Wednesday, 28 June 2023
नाचू किर्तनाचे रंगी
Tuesday, 30 May 2023
अर्थ हरवलेले शब्द... ४
अर्थ हरवलेले
शब्द ह्या मालिकेतील हा चौथा ब्लॉग. पहिल्या तीन ब्लॉग मध्ये आजही वापरले जाणारे
पण आजच्या जीवन शैलीत अर्थ हरवलेल्या शब्दांचा उहापोह होता. ह्या ब्लॉग मध्ये मी दोन शब्दांविषयी
लिहिणार आहे. त्या शब्दांच्या अर्थासोबतच ते शब्दही हरवले आहेत असे वाटते. गुगल
शोधक वापरून जर एखाद्या शब्दाची व्याख्या शोधली तर शोधाच्या परिणामांच्या शेवटी,
शब्द निर्माण झाल्यापासून त्या शब्दाचा साहित्यात किती वापर झाला याची टक्केवारी
येते. तशी टक्केवारी मिळण्याची सुविधा जर कुठल्या मराठी शब्दकोशात किंवा तत्सम कुठल्याही
साधनाद्वारे उपलब्ध असेल तर आपल्या आजच्या शब्दांचा साहित्यातील उपयोगाचा उतरता
आलेख पाहायला मिळेल. इतकंच नव्हे तर बोली भाषेतील ह्या शब्दांचा वापर देखील कदाचित
आता होत नसावा आणि असलाच तर अगदी नगण्य.
पाहिला शब्द आपल्या
लहानपणी आपण बहुतेकांनी खुपदा ऐकला असावा, निदान आमच्या घरी तरी माझ्या आईच्या
तोंडी मी हा शब्द अनेक वेळा ऐकला आहे. लहानपणी जवळजवळ बहुतेक जेवणानंतर असं म्हटलं
तरी चालेल, “अरे अंचवलास तरी कां? की तसाच गेलास खेळायला?” खेळ अर्धवट टाकून
जेवायला यायला लागल्यामुळे जेवण झाल्या झाल्या खेळायला पळाल्यावर आईची आतून हाक
येत असे. अगदी मोठे झाल्यावर सुद्धा “आंचवून तरी या, आणि मग काय ते गप्पा मारीत बसा. हात
वाळले देखील” जेवणाच्या ताटावर आम्हा भावंडांच्या गप्पा रंगल्या की आईची तक्रार.
आंचवणे म्हणजे, चूळ भरून
तोंड, हात धुणे. सकाळी झोपून उठल्यावर, बाहेरून आल्यावर देखील आपण हात, तोंड धुतो, ते म्हणजे
आंचवणे कां? नाही!
जेवण, खाणं
करून झाल्यावर चूळ भरून तोंड आणि खरकटे हात धुणे याला आंचवणे म्हणातात. आहे की नाही,
आपली मराठी भाषा सुंदर. एका विविक्षित वेळेला करायच्या त्याच क्रियेला शब्द मात्र
वेगळा!!
माझ्या मुलीने
लहान असतांना आजीच्या तोंडून आंचवणे हा शब्द ऐकला आणि पटकन विचारलं “आजी, काय म्हणालीस? पुन्हा म्हण!”
तिने आमच्या तोंडून हा शब्द तो पर्यंत बहुदा ऐकला नसावा. आजीने पुन्हा तोच शब्द
वापरल्यावर तिच्या लहानग्या चेहेऱ्यावर प्रश्न चिन्ह आले “म्हणजे काय?” आजीने अर्थ
सांगितल्यावर स्वारी उष्टे हात धुवायला जागेवरून हलली.
असे शब्द
माझ्या दृष्टीने एका कालखंडाचे द्योतक आहे असे वाटते. एकत्र कुटुंब, कुटुंबात आजी
आजोबा असण्याच्या, एकत्र जेवण्याचा कालखंड. आजच्या जीवन शैलीत जागा लहान झाल्या, एकत्र कुटुंब
पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धती स्थिरावली. ताट, वाट्या आणि भांडी जाऊन त्या
जागी प्लेटस, काटे आणि चमचे आले. हात पुसायचे कागद आणि हस्तप्रक्षालन पात्रे आली (finger bowls). हाताने
खाल्ल्यावर हात धुवून, खळखळून चूळ भरणेच उरले नाही तर त्याला उद्देशून असलेला शब्द
तरी कसा राहणार?
दुसरा शब्द
किती लोकांनी ऐकला असेल ह्या बद्दल मला जरा शंकाच आहे. मी माझ्या घरात, शेजारी पाजारी
हा शब्द लहानपणी ऐकला आहे. त्याच वयात साने गुरुजींच्या गोष्टीतही हा शब्द
वाचल्याचे आठवते. मी गोव्यात असतांना कोकणीत देखील आजचा शब्द त्याच अर्थाने
वापरलेला ऐकला आहे. ‘अळसूद जाणे’ म्हणजे पाणी पितांना ठसका लागणे. खेळ अर्धवट
टाकून धावत पळत घरात शिरून उभ्याने फुलपात्र (हा ही शब्द अर्थ हरवलेल्या शब्दात
जमा झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही) तोंडाला न लावता घटाघटा पाणी पितांना
ठसका लागल्यावर पाठीवर थोपटत आई म्हणत असे “बघ गेल ना अळसूद, अरे बसून प्यावं
पाणी, बघ वर बघ, सासू कांदे सोलतेय” अळसूद आणि सासूने कांदे सोलण्याचं काय
नात आहे कोण जाणे आणि मुळात त्या वयात
सासूचा उल्लेखच अनाकलनीय. पण आम्ही वर बघायचो, ठसका थांबायचा आणि आम्ही पुनश्च
खेळण्याकरीता बाहेर पळत असू. जेवतांना, बसून बोलत असतांना, जर पाणी पितांना ठसका
लागला तर वडीलधाऱ्यांपैकी कोणीतरी म्हणत “अळसूद गेलं, आत्ता कोण आठवण काढतय? सुमी
असेल बहुतेक. जेवतांना एकमेकांच्या खोड्या काढायचात. आता सासरी गेल्यावर आठवण
काढतेय”. सुमन सगळ्यात थोरली बहिण.
आजकालच्या
चौकोनी कुटुंबात, शिस्तीत वाढणाऱ्या आणि पूर्ण वेळ शाळा, जास्तीचे वर्ग
(कोचिंग क्लासेस), कार्य
शाळा ह्यात व्यग्र असलेल्या मुलांना खेळायलाच वेळ नसतो, धावत पळत पाणी पिण्याची
गोष्ट दूरच राहिली. आपली कोणी आठवण काढली तर आपल्याला पाणी पितांना ठसका लागतो हे
तर आता कोणाला माहितही नसेल. विनोदाचा भाग सोडा पण “अळसूद” ह्या शब्दाचा वापर आता
होत नसल्यात जमा आहे.
माझी बदलेल्या
जीवन शैली बद्दल तक्रार आहे असे नाही, काळानुसार गोष्टी बदलत रहाणार हे सत्य आहे. जुने
जाऊद्या मरणालागुनी.. असे म्हणतांना नेमके काय जाऊदे याचा विचार व्हावा असे वाटते.
झऱ्याच्या पाण्याला खळखळ, अवखळपणा नसेल तर त्याचे सौंदर्य खचितच कमी होईल, नव्हे
त्याला झरा म्हणताच येणार नाही. भाषेचे असेच काहीसे आहें असे वाटते. या आणि अशा
अनेक शब्दांनी मराठी भाषेचे सौंदर्य नक्कीच वाढते. अन्यथा ती गुळगुळीत, सपाट होत
जाईल आहे असे वाटते.
Sunday, 21 May 2023
सेल्फी (आत्मचित्र)
पौराणिक ग्रीक कथेत नार्सिसस हा सेफिससचा लिऱ्हायोपीपासून झालेला अतिशय देखणा पुत्र होता. ज्याच्या सौंदर्याचे गुणगान सगळीकडे गायले जात असे, कदाचित त्याचाच परिणाम असेल पण नार्सिससने कोणाच्याही प्रेम याचनेला कधीही प्रतिसाद दिला नव्हता. सरतेशेवटी एका तळ्याकाठी स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात बघून तो त्या प्रतिमेच्या, स्वतःच्याच प्रेमात पडला. या अप्राप्य प्रेमापायी त्याची अन्नपाण्यावरची वासना उडाली आणि तळ्याकाठी नार्सिसस जणू खिळून राहिला. काही काळाने अन्नपाण्यावाचून त्याच जागी नार्सिससचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या जागी एक फुलझाड फुलले, ज्याची फुले तळ्याच्या पाण्यात जणू डोकावून आपली प्रतिमा न्याहाळतात. त्या झाडाला नार्सिससचे झाड आणि फुलांना नार्सिससची फुले हेच नाव पडले. आत्यंतिक आत्मकेंद्रित, सदैव आत्मप्रेमात, स्वतःच्या कौतुकात रमणाऱ्या, स्वतःला अवास्तव महत्व देणाऱ्या व्यक्तींना नार्सिसिस्ट नाव पडले आणि ह्या मनोवृत्तीला नार्सिसिसम.
नार्सिससची कथा आठवण्याचे कारण आज चहुकडे दिसणार सेल्फीचे (आत्मचित्र, स्वछबी) वेड. लहान नाही, थोर नाही जो बघावा तो, जिथे बघाल तिथे, हातातील किंवा सेल्फी स्टिकवर (स्वछबी दांडी) असलेला भ्रमणध्वनी वेवेगळ्या कोनातून फिरवत आत्मचित्र घेण्यात निमग्न असतात. याचा इतका अतिरेक झालाय, काय सांगू काहीजण / जणी ह्या आत्मचित्र काढण्याच्या नादात, भिंतीवर खऱ्याखुऱ्या (कागदी) फोटोत जाऊन बसले आहेत. थंड हवेच्या ठिकाणी कड्याच्या टोकावरून दिसणाऱ्या देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वतःची छबी उतरविण्याच्या नादात कड्यावरून पडून घडलेल्या मृत्युच्या घटना काही कमी नाहीत. समुद्रकिनाऱ्यावर अशाच नादात बुडून मेल्याच्या बातम्या सर्वानीच वाचल्या असतील. पूर्वी दोघांचा फोटो काढायचा असेल तर तिसऱ्याची गरज लागायची, स्वतःची छबी काढायची असेल तर दुसरा असल्याशिवाय ते शक्यच नव्हते. पण आता दूरध्वनीच्या ह्या भ्रमणध्वनी अवतारात ही गरज जवळजवळ संपली. बाकी कशात असेल किंवा नसेल, स्वतःची छबी उतरविण्यात मात्र आपण आत्मनिर्भर झालो आहोत खरे.
नार्सिसस निदान दिसायला देखणा
होता, लाखात एक होता. स्वतःच्या देखण्या रूपाच्या प्रेमात आकंठ
बुडाला होता. त्याला दुसऱ्या कोणाही कडून आपल्या रुपाची ना पोच हवी होती ना
कोणाकडून कौतुकाची, स्तुतीची अपेक्षा होती. तो बिचारा स्वतःतच मश्गुल होता. मात्र आजचे
हे नार्सिसीस? ही मंडळी तोंडाचे चंबु करून, चित्रविचित्र कपडे घालून, हाताने वेडेविंद्रे अविर्भाव करीत स्वतःची छबी उतरवताना दिसतात.
प्रत्यक्षाहून प्रतिमा ह्यांना उत्कट वाटते की काय कोण जाणे. कोणत्या कोनातून
त्यांना स्वतःला ते चांगले वाटतात, हे त्यांना स्वतःला किंवा कदाचित परमेश्वरलाच
ठाऊक. बर एव्हढे कष्ट करून फोटो काढलेत तर काढलेत, बसून स्वतः बघावेत, आपल्या
रूपड्याचा काय घ्यायचा तो आनंद घ्यावा, तर ते नाही. ह्यातले बहुतांश फोटो सामाजिक
माध्यमांवर टाकून लोकांचे लाईक्स मिळवण्यात, मोजण्यात या सेल्फिवेड्यांना जास्त आनंद मिळतो असे
वाटते. तुम्हाला खरं नाही वाटणार, पण लाईक न केल्यामुळे मित्र, मैत्रिणीत भांडण झालेली मी पाहिली आहेत.
भ्रमणध्वनीच्या
ह्या सुविधेचा चांगला उपयोग होताना देखील पाहिला मिळतो. जसं कौटुंबिक सोहळ्यात हजर
असलेल्या सगळ्यांची छबी छायाचित्रकार नसतानाही काढणे. कुटुंबातील सर्वात उंच आणि
बहुदा तरुण (आत्मचित्र काढण्याच्या कलेत खास प्राविण्य असलेला – सामाजिक
माध्यमातील त्याच्या मुशाफिरीवरून हे बहुदा ठरत असावं) व्यक्ती कमीतकमी तीन चार
छायाचित्रं काढून ही औचारीकता पूर्ण करून तात्काळ ते फोटो सामाजमाध्यमावरून
छायाचित्रातील सर्व कलाकारांना पाठवतो. शेवटी भ्रमणध्वनी हे साधन आहे. त्याचा वापर
जो तो आपल्या अकलेनुसार करतो त्याला कोण काय करणार.
मला आठवतंय, आम्ही लहान असतांना गरजेपेक्षा जास्त वेळ
आरशासमोर उभे दिसलो की घरातील वडीलधारी मंडळी हटकत असतं, “आरशासमोर इतका वेळ काय
करतो आहेस? आरशासमोर उभा राहिलास म्हणून बसके नाक अपरे होणारे आहे, की
रंग उजळणार आहे?” नाहीतर “पुढचा जन्म माकडाचा येईल हो, असेच बघत बसलात तर”.
माकडं आरशात बघताना कधी पाहिली नाहीत पण स्वतःची प्रतिमा न्याहाळत बसणे ह्यात
काहीतरी चुक आहे हे बरीक लक्षात आलं.
अंतमुर्ख होऊन आत्मज्ञान, आत्मभान मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आत्मकेंद्रित, आत्मसंतुष्ट होऊन आत्मप्रेमात पडण्याचा मार्ग ही मंडळी कां निवडतात ह्याचा उलगडा होत नाही.
Saturday, 13 May 2023
मातृदिन
लेखाच्या सुरुवातीलाच माझी भूमिका स्पष्ट करतो. लेखाचा मातृत्व, मातृत्वाची
थोरवी, महानता, आई वा
त्यासंबंधातील कोणत्याही भावनांचा अनादर करण्याचा उद्देश नाही. अनाहूतपणे कोणाच्या
भावना दुखावल्या तर त्या बद्दल अगोदरच दिलगिरी व्यक्त करतो.
मातृदिन ही संकल्पना तसं बघायला गेलं तर,
पाश्चिमात्यांकडून आलेली आहे. आपल्याकडे मातृदेव भव, पितृदेव भव ही भावना आहे.
माता, पिता हे सदा वंदनीय आहेत आणि एखाद्या दिवशी
मुद्दाम त्याची आठवण करून द्यायची, तसं बघायला गेलं तर गरज नाही. मातृदिनामागची जी
कृतज्ञतेची भावना आहे ती खरोखर प्रशंसनीय आहे आणि ह्या निमित्ताने जर कोणा
कृतघ्नास, जर मातेने जे दिले त्या बद्दल विस्मृती झाली असेल, तर कदाचित ह्या दिनी
तरी त्याचे त्यास स्मरण होईल. पाश्चिमात्यांकडून ‘व्यक्त होणे’ हे खरंच
शिकण्यासारखे आहे. मातृदिनी कृतज्ञताच आभाराच्या रूपाने व्यक्त व्हावी.
मातृत्व हे एखाद्या कडक व्रतासारखं आहे, आणि हे व्रत
समजून उमजून अंगीकारलं तरच ते फलदायी ठरते. प्रसूती वेदनांपासून किंबहुना
त्यापूर्वीच सुरु होणारं हे मातृत्व म्हणजे त्याग, मातृत्व म्हणजे निर्व्याज प्रेम, मातृत्व
म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवता देत राहणं, माझं आयुष्य
माझ्या बाळाला दे, असं परमेश्वराला साकड घालणारी ती आई. आई फक्त आणि फक्त देतच
रहाते, आयुष्यभर तिला गृहीत धरले जाते, किंबहुना तिला गृहीत धरणे हा तिच्या
मुलांचाच नव्हे तर समाजाचाही हक्क झाला आहे. वृद्धापकाळात, ती स्वतःचे सर्वस्व
देऊन बसल्यावर मुले काळजी घेतील ही अपेक्षा देखील आजकाल अमान्य दिसते.
स्त्री ही क्षणाची पत्नी, प्रिया आणि
अनंतकाळची माता असते हे म्हणत असतांना ती स्त्री कधी असते? ती ‘स्वतः’ कधी असते? अनंत काळची माता म्हणजे मुलांच्या (ती
कोणत्याही वयाची असोत) संगोपनाची, मुलांच्या अडल्या-नाडल्याला उपयोगी पडण्याची कायम
स्वरूपी जबाबदारी तिच्यावर टाकली आहे कां? पुरुषांना कधी
क्षणाचा पती, प्रियकर आणि अनंत काळचा पिता म्हणल्याच कुणी ऐकलं आहे कां?
मातृत्व! एखाद्या गोष्टीचे, संकल्पनेचे
एवढे उद्दात्तीकरण केलेले दुसरे उदाहरण सापडणार नाही. क्षणभर ह्या उद्दत्तीकरणापासून
जरा दूर होऊन मातृत्वाकडे बघितलं तर काय दिसतं?
किती मुली स्वेच्छेने माता होतात? किती मुलींवर,
कितीदा मातृत्व लादले जाते? अमेरिकेत (प्रगत राष्ट्र?) तर आता स्त्रियांना त्यांचा निवडीचा तर सोडाच, पण मातृत्व
नाकारण्याच्या अधिकारपासून देखील वंचित व्हावं लागेल असं दिसतंय. किती मुलामुलींना
मातापिता होणं म्हणजे काय हे खरोखर समजतं? त्यातील दोघांच्या जबाबदारीची जाणीव
ठेऊन पालक बनण्याचा निर्णय किती जण घेतात?. पालकत्व ही एक पूर्णवेळ दोन्ही
पालकांनी एकत्र पार पाडण्याची जबाबदारी आहे हे समजण्याएव्हढा समाज प्रगल्भ आहे कां? आजकाल सुशिक्षित
समाजांत ही टक्केवारी कदाचित जास्त असेल, पण भारतातील बहुसंख्यांकांचा विचार केला
तर दृश्य खूप वेगळ दिसेल.
वरील गोष्टी जर सत्य म्हणून क्षणभर मान्य केल्या, तर हे उद्दात्तीकरण नेमक कां
झालं आणि कुणी केलं?
ह्या मागे पुरुषप्रधान संस्कृतीच, केवळ कारणीभूत आहे कां? की नि:संतान स्त्रीपेक्षा (ज्याला कदाचित वा बहुतांश वेळा ती
कारणीभूत नसते), मातेला (पुत्रवती असेल तर अधिकच) समाजात जास्त मान मिळतो म्हणून पुरुषप्रधान संस्कृती इतक्याच स्त्रिया देखील, वा संपूर्ण समाज त्याला जबाबदार आहे? नि:संतान म्हणून बायकाच बायकांना
हिणवताना दिसतात.
एखाद्या व्यक्तीला एकदा का देवघरात नेऊन बसवले की त्यांच्या मार्गावरून
चालण्याची सामान्यांची जबाबदारी संपते. तसेच काहीसे ह्या उद्दात्तीकरणाचे आहे.
वर्षातून एक दिवस मातृदिन साजरा केला, जातायेता मातृत्वाचा उदोउदो केला, की आपली
माता सोडून (त्यालाही काही अपवाद आहेत) बाकी स्त्रिया ह्या कोणाच्या न कोणाच्या
तरी माता असु शकतात, होऊ शकतात आणि मुळात त्या एक स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि
त्यानाही सन्मानाने वागवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे ह्याचा सोयीस्कर विसर पडला
तरी चालतो.
ह्या आणि तत्सम सर्व संकल्पनामध्ये ‘माता’ ही एक व्यक्ती आहे, स्त्री आहे हे कुठे तरी हरवल्यासारखे, जाणीवपूर्वक
विसरल्यासारखे वाटते. मातृत्वाचा खरोखर आदर करायचा असेल तर प्रथम आदर
स्त्रीत्वाचा, स्त्रीचा करता यावयास हवा. कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर ती एक
दिवस न करता, सदोदित कृतज्ञ (being grateful) असणे हे जास्त महत्वाचे आहे.
ह्या मातृदिनी जर आपण स्त्रीत्वाचा आदर करण्यचा संकल्प सोडला तर मातृदिन खऱ्या
अर्थाने साजरा होईल असे वाटते.
Tuesday, 18 April 2023
काश्मीर: एक अनुभव
प्रत्येक
भारतीयासारखे (खरंतर जगातील सर्वच पर्यटकांप्रमाणे) माझेही काश्मीरला जाण्याचे
कित्येक दिवसांचे स्वप्न होते. त्याची पूर्तता होण्याकरिता ६ मार्च २०२३ हा दिवस
उजाडावा लागला. या सफरीवर आम्ही दोघे, नेल्सन आणि जेनिफर असे चौघे होतो. नेल्सन, जेनिफरशी आमचे
गोव्यातील कैक वर्षांपासूनचे मैत्र. तो पहिला दिवस श्रीनगर व आसपास फिरण्यात
घालविला. श्रीनगरमध्ये लाल चौक, जहांगीर चौक या भागात सीमा सुरक्षा आणि सैन्यदलाच्या जवानांची
उपस्थिती जाणवण्याइतपत होती, पण त्याचा लोकांच्या दैनंदिन व्यवहारावर काही परिणाम
होत होता असे वाटले नाही. किंबहुना त्यांची उपस्थिती पर्यटकांना कदाचित आश्वासक
वाटत असेल असे वाटले.
दल किंवा डाल
तलावाचा विस्तार बघून अचंबित व्हायला होते. तलावाचं पाणी जलपर्णी रहित बऱ्याच अंशी
स्वच्छ वाटलं. संध्याकाळपर्यंत श्रीनगर आणि आसपास फिरण्यात घालवला. या भटकंतीत
जाणवलेली गोष्ट म्हणजे काश्मीर भेटीचा योग जुळून आला खरा, पण तो १५
दिवसानंतर आला असता तर बरं झालं असतं (काही गोष्टी कदाचित टळल्या असत्या). १९-२०
मार्चला जगप्रसिद्ध ट्युलिपच्या बागा पर्यटकांकरिता उघडणार होत्या. काश्मीरातल्या
वेगवेगळ्या बागा अजून फुलायच्या होत्या. मुघल गार्डन, चष्मे शाही, शालीमार इत्यादी
बागांमध्ये कुठे फुलांच्या ताटव्यांची मशागत चालू होती तर कुठे छाटणी केलेल्या
गुलाबांच्या झाडांचे रसरशीत लाल-किरमिजी धुमारे थोडक्या काळात बहरणाऱ्या गुलाब
पुष्पांची वर्दी देत होते. चिनार वृक्षांची छोट्या छोट्या केसाळ चेन्डूसारखी फळे
पिकून काळपट तपकिरी झाली होती. पाईन, देवदार मात्र आपला गर्द हिरवा साज नम्रपणे
मिरवीत होते. या बागांमधून, आणि त्यांच्या बाहेर, जागोजागी, ओल्या नारळाचे तुकडे
तिखट, मीठ, मसाला लावून आणि त्यावर लिंबू पिळून विकताना, लोक दिसले. आश्चर्य वाटले,
आपल्याकडे नारळ पिकत असून हा प्रकार आढळत नाही आणि इथे मात्र नारळ पिकत नसतांनाही हा
खाद्य प्रकार लोकप्रिय वाटला, पर्यटक तसेच इथले रहिवासी नारळाचे तुकडे विकत घेतांना दिसत
होते. आम्ही देखील त्याचा आस्वाद घेतला.
दुपारी हजरतबल प्रार्थनास्थळ
किंवा दर्गा शरीफला भेट दिली. प्रेषित मुहंमदांचे केस येथे आहेत अशी लोकांची
श्रद्धा आहे. हे प्रार्थनास्थळ दल
तलावाच्या किनाऱ्यावर आहे. आम्हा सर्वांकरिता इस्लामी प्रार्थनास्थळाला भेट
देण्याची ही पहिलीच वेळ होती. महिलांना प्रवेश नव्हता. दर्ग्यात जवळ जवळ शुकशुकाट
होता. मुख्य प्रवेशदारातून आत गेल्यावर पूर्ण मोकळा सभामंडप होता. जमीन पूर्णपणे
गालिच्याने आच्छादलेली होती. बहुदा याचा वापर सामुहिक नमाजाकरीता होत असावा.
समोरच्या खोलीच्या दारावर पडदा होता, मी आणि नेल्सन दोघंही तिथें येऊन थबकलो. आमच्या
मागून आलेल्या एका गृहस्थाने पडदा बाजूला करून आत शिरताना सुहास्य मुद्रेने (बहुदा आमचा संभ्रम ओळखून) आत येण्यास खुणावले.
त्याच्या पाठोपाठ आम्ही आत गेलो. आत काही जण नमाज पडत होते. एकूणच हा अनुभव आम्हा
दोघांकरिता भावनिक दृष्ट्या वेगळा होता.
त्या दिवशी आमचा मुक्काम निगीन तलावात इंशाअल्लाह कंपनीच्या हाउस बोटीत होता. निगीन तलाव दल तलावाच्या
तुलनेने छोटा आहे. हाउस बोटींची गर्दीपण कमी होती. सूर्यास्तानंतरचा शिकाऱ्यातून
फेरफटका फारच रमणीय होता. वेगवेगळे विक्रेते त्यांच्या होड्यांतूनच जवळ येऊन आपला
माल विकण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना नाही म्हणायला फारच जड जाते. पर्यटन
व्यवसायावर सर्वच अवलंबून आहेत असे दिसले. शेवटी पहिल्याच दिवशी आम्ही येणाऱ्या विक्रेत्यांना
आजचा आमचा शेवटचा दिवस आहे, आमची सगळी खरेदी झाली आहे
असे सांगण्यास सुरुवात केली. शिकाऱ्यातून फिरतांना भाज्या, फुले वाढवण्याकरिता केलेले तरंगते वाफे बघायला मिळाले. आठ वाजण्याच्या
सुमारास चहुबाजूनी नमाजाची अजान ऐकू येऊ लागली. भोवतालच्या विविध मशिदीतून
थोड्याफार फरकाने एकाच वेळेला अजानची सुरुवात झाली. वातावरणात एक प्रकारचा काहीसा
सुरेल कोलाहल निर्माण झाला होता. त्यावेळी आपण नक्की कुठे आहोत याचा क्षणभर संभ्रम
निर्माण झाला. नुकताच उगवलेला पौर्णिमेचा चंद्र, शिकाऱ्याच्या बाजूला नावाड्याचे
वल्हे बुडताना होणारा डुबुक डुबुक आवाज आणि ती अजान, मनात संमिश्र भावना उचंबळून
आल्या. ह्या पार्श्वभूमीवर, ६ मार्च होळी, पौर्णिमेचा चंद्र आणि हाउस बोटीतील ती
रात्र. अंग शहारणारी थंडी. उगाचच गूढ वाटू लागलं आणि गुलझारांच्या “रूह देखी हैं कभी?”
कवितेतल्या ओळी आठवल्या..
...
या शिकारे में किसी झील पे जब रात बसर हो
और पानी के छपाकों में बजा करती हो टलियाँ
सुबकियाँ लेती हवाओं के कभी बैन सुने है?
....
विचार करता
करता विजेवर गरम केलेल्या गादीवर कधी झोप लागली कळलं देखील नाही. हाउस बोटीतील
परवेझने अतिथ्यशिलतेचा जणु दाखलाच दिला. त्याचं मला सर्वात आवडलेलं वाक्य “आप
बोलो, whatever possible, हो जायेगा”.
दुसऱ्या दिवशीची पहाट फारच रम्य होती. निगीन तळ्यातील पाण्यावर थंडीमुळे बाष्प तरंगताना दिसत होते. त्या धुक्यातून वाट काढत छोट्या होड्यातून फुले, भाज्या विकणारे विक्रेते दिसले. सगळ्यांनी काळ्या किंवा तपकिरी रंगाचा फीरन किंवा फेरन (लोकरीचे पायघोळ गाऊन-झगे) घातले होते. सकाळी परवेझाच्या हातची न्याहरी केली आणि त्याला खुश करून निघालो. निघतांना पुन्हा येऊ असं म्हटल्यावर परवेझच्या तोंडून इंशाअल्लाह (ईश्वराची इच्छा) ऐकून सोनमर्गच्या वाटेला लागलो.
वाटेवर ठिकठिकाणी सफरचंदांच्या बागांमध्ये सफरचंदांची झाडे, झाडून सगळी पाने गाळून नव्या पालवीचे वरदान मागत हात उंचावून तटस्थ उभी होती. कुठे कुठे बागायतदार किंवा शेतमजूर सफरचंदांच्या झाडांवर भरगोस पिकाच्या आणि पिकाला चांगला भाव मिळण्याच्या अपेकक्षेने फवारणी करीत होते. फिरन किंवा फेरन घालून स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतांना दिसतं होत्या. पर्णरहित विलो वृक्षांच्या रांगाचरांगा रस्त्याच्या दोन्ही बाजूस दिसतात. ह्या झाडाच्या लाकडापासून क्रिकेट ब्याट बनविण्याचा मोठ्ठा उद्योग येथे चालतो. जगभरात इंग्लंड आणि काश्मिर ह्या दोनच ठिकाणी होणारे विलो लाकूड क्रिकेट ब्याट करिता प्रसिध्द आहेत असे समजले. ही झाडे पर्ण रहित दिसण्याचे कारण पानगळ नसून हा पाला शेळ्या-मेंढ्या करिता गावकरी तोडतात अशी माहिती मिळाली. नवीन लाल चुटूक पालवी कुठे कुठे दिसत होती. विलो वृक्षांच्या बरोबरीने अक्रोडाची झाडे दिसली. ह्याची पाने मात्र हिवाळ्यातील पानगळीत गळली होती.
सोनमर्ग जसजसे जवळ येऊ लागले तसतसा हवेतला गारवा जाणवू लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फाचे ढीग दिसत होते. काही दिवसांपूर्वीच रस्ते मोकळे केले आहेत असे चालकाकडून समजले. हा हा म्हणता रस्त्याच्या कडेपासून ते थेट डोंगर माथ्यापर्यंत बर्फ दिसू लागले. संध्याकाळचा सूर्य प्रकाश डोंगरावरच्या बर्फावर सुवर्णाचा लेप चढवत होता. पाईन, देवदार सावल्यांचा खेळ खेळत होते. मजेशीर भाग म्हणजे ह्या वृक्षांच्या पायतळी बर्फाचा मागमूसही नव्हता. वृक्षांचा शाखा-पर्ण संभार, वृक्षांच्या पायाशी बर्फ पोहोचू देत नसावा. जणु प्रत्येक झाडाला बर्फाचं खळ असावं असं दिसत होतं. दुरून पहाता दळलेल्या पिठाच्या रिंगणात जात, आणि झाड हे त्या जात्याचा खुंटा असल्यागत भासत होत. पौर्णिमा नुकतीच होऊन गेल्यामुळे रात्रीच्या चंद्र प्रकाशाचा बर्फावरचा खेळ काही औरच होता. बर्फ नसलेला डोंगराचा भाग अधिकच काळाभोर दिसत होता. झाडांच्या सावल्या गडद गहिऱ्या झाल्यामुळे झाडांची उंची दिसेनाशी झाली होती. दिवसा त्रिमिती मध्ये दिसणारे दृश्य दोनच मितींमध्ये (लांबी, रुंदी) दिसतं होते. ह्या काळ्या पटावर बर्फाच्छादित भाग जास्तच पांढराशुभ्र दिसत होता. काळ्या-पांढऱ्या रंगाचा जणु गालिचाच अंथरल्यासारखे भासत होते. शब्दात हे सगळे पकडण्याचा प्रयत्न म्हणजे निव्वळ वेडगळपणा वाटतो. ह्याची डोळा ते अनुभवणे हेच खरे. रात्री तापमान उणे ९ पर्यंत खाली गेलं. पण गरम उबदार हॉटेलच्या खोलीमध्ये त्याचा पत्ताच लागला नाही, परिणामतः सोनमर्ग मधील पहाट झोपण्यातच गेली. सोनमर्गची पहाट बघण्याकरिता पुन्हा येणे हे नक्की.
सकाळी नाश्ता करून पहलगामच्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी बहुतेक घरे एक-दोन मजली व उतरत्या छपराची होती. बहुतांशी घरांवर गडद हिरव्या रंगाचे पत्रे होते, अपवादात्मक घरे लाल, जांभळ्या रंगाच्या पत्र्याच्या छपरांनी उठून दिसत होती. प्रत्येक फर्लांग दीड फर्लांग अंतरावर मशिदींचे हिरवे गर्द मिनार घरांच्या गर्दीतून डोकावून आपले अस्तित्व जाणवून देत होते. सकाळची वेळ असल्यामुळे वाटेत येणाऱ्या गावांमध्ये वर्दळ तशी कमीच होती, बरीचशी मंडळी आपल्या काश्मिरी पेहेरावात उन्हाला पाठ देऊन बसलेली, उभी असलेली दिसत होती. शाळेत जाणारी मुले, मुली रंगीबेरंगी लोकरीचे स्वेटर घालून जाता येता दिसत होती. फारच गोड वाटली ती मुले. तुरळक कुठे कुठे बायका बाजारहाट करतांना दिसल्या.
पहलगामला ठराविक सहल घेतली. अनुक्रमे बेताब व्हॅली, मामलेश्वर मंदिर, चंदनवाडी, अरु व्हॅली या स्थळांना भेट दिली. ह्या स्थळांना जायच्या वाटेवर अनेक हिंदी चित्रपटांच्या चित्रिकरणाच्या जागा दाखवण्याचं काम आमच्या चालकाने केले. बेताब व्हॅली मध्ये बर्फावरून ढकलगाडीतून सहल केली. अदनान, ढकलगाडी ढकलणाऱ्यांपैकी एक, फारच उत्साही होता. तोंडाने अखंड बोलत आमच्या बरोबर तोही जणु आनंद लुटत होता. बर्फात आम्हाला उभं करून त्याच्या दोन मित्रांनी दोहोबाजूला उभं राहून आमच्यावर बर्फ उधळून हिमवृष्टीचा आभास निर्माण करीत आमची खूपच करमणूक केली. अदनानने ह्या हिमवृष्टीचे आमच्या मोबाईलवर चित्रीकरण केले. अमरनाथ आणि कारगिल पर्वतरांगा तिथून अगदी जवळ दिसतात. अदनान आणि त्याचे सोबती फ्रीसलन गावातीले होते, हे बहुदा भारतीय सीमेवरचे शेवटचे गाव आहे.
मामलेश्वर किंवा मामल मंदिर. हे शिव मंदिर इस. ४०० मध्ये बांधले गेले. राजा जयसिंहाने त्या मंदिरावर सुवर्ण कलश चढवून त्याचे नुतनीकरण (इस. ११२५-११५५) ह्या काळात केले. दंतकथे प्रमाणे महादेवांनी ह्याच जागी गणपतीला हत्तीचे मस्तक लावले. मंदिर केवळ ८ चौ. फुटाचे आहे. त्याचा समोर स्वच्छ पाण्याचे कुंड आहे. जिवंत पाण्याचे झरे कुंड सदोदित भरलेलं ठेवतात.
पहलगामवरून गुलमर्गच्या वाटेवर अवंतीपूर मधील अवन्तिस्वामी मंदिरचे
अवशेष बघितले. अवन्तिवर्मा नामक राजाने ओडीशा मधून येऊन इस. ८५५-८८३ ह्या काळात ही मंदिरे
बांधली. इथे माहिती देण्याकरिता अब्दुल हमीद नावाचा मार्गदर्शक होता. मध्यभागी उंच
चबुतऱ्यावर विष्णू मंदिर होते.
त्याच्या चार दिशांना गणपती, गरुड,
भूमी आणि सरस्वती ह्या देवतांची मंदिरे
आहेत. १४ व्या शतकात भूकंपात किंवा पुरात ही मंदिरे गाडली गेली. १९१३ मध्ये
इंग्रजांनी उत्खनन करून हे अवशेष शोधून काढले. ह्यातील काही मूर्ती श्रीनगर मधील
वस्तुसंग्रहालयात आहेत, तर काही इंग्लंडमध्ये. ह्या मंदिरांच्या परिघात ६९ पुजाऱ्यांच्या खोल्या आहेत. आँधी चित्रपटातील तेरे
बिना जिंदगी..... ह्या गाण्याचे चित्रीकरण ह्याच अवशेषांमध्ये झाले आहे अशी
उद्बोधक माहिती अब्दुलने दिली.
सोनमर्ग सारखेच थंडगार, बर्फाळ स्वागत गुलमर्गने केले. भोवताल सर्वच बर्फाच्छादित होता. रस्ते देखील बर्फ बाजूला सारून मोकळे केले होते. त्यादिवशी हॉटेलमध्येच मुक्काम होता. गुलमर्गच्या वाटेवर तंगमर्गला थांबून गमबूट, ओव्हरकोट गोगल, सनक्रीम वगैरे घेऊन गुलमर्गला पोहोचलो. तंगमार्गला एका मार्गदर्शकाचा देखील बंदोबस्त केला होता. हॉटेलमध्ये प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर फोटो काढण्याकरिता बाहेर आलो. परत येतांना हॉटेलच्या मुख्य दरवाजापासून ते स्वागतकक्षापर्यंत लाकडाचे फ्लोरिंग होते. मध्यभाग लोकांना चालण्यासाठी गालिच्याने झाकलेला होता. बोलण्याच्या नादात गालिच्यावरून न जाता मी लाकडी फरशीवर गेलो. फरशी ओली होती. काहीही कळण्याचा आता अस्मादिक पाय घसरून पार भुईसपाट झाले. पडतांना प्रतिक्षिप्त क्रियेने उजवा हात प्रथम जमिनीवर आपटला. शरीराचा तोल, भार हाताने सावरण्याच्या प्रयत्नात मनगटाने दगा दिला. हाड मोडणे आणि सरकणे ह्या दोन्ही गोष्टी एकाचवेळी घडल्या. बरोबरच्या कोणालाही मला सावरण्याची संधीच मिळाली नाही. लोकांच्या मदतीने उभा राहिलो. उजवे मनगट सोडून कुठेही दुखत नव्हते. बहुदा उजव्या हाताने मोठ्या अपघातापासून वाचवलं होतं, मनगटावर निभावलं असच म्हणावं लागेल.
हॉटेल मधील कर्मचारी मदतीकरता धावले. कुणीतरी बर्फ लावा म्हटल्यावर, एकाने धावत जाऊन बाहेरून बर्फ जमाकरून आणला. कुणीतरी हातात वाफाळणाऱ्या चहाचा कप ठेवला. बघता बघता मनगटाचा आकार बदलला. बर्फ लावून सुद्धा चांगलीच सूज आली. वेदना मुक्या माराचे गांभीर्य जाणवून देत होती. गुलमर्ग मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Centre) सोडून कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. हाड मोडले आहे ह्या बद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती पण डॉक्टरी निदान आवश्यक होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे नक्की झाल्यावर हॉटेलचा कर्मचारी आदिल मारुती व्हॅन घेऊन आला. मी आणि हेमा, माझी पत्नी त्याच्या बरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचलो. अत्यावश्यक माहिती घेऊन, शौकत आणि तारिक दोघा कर्मचाऱ्यांनी केस पेपर बनवून प्राथमिक तपासणी केली आणि हाड निखळले आहे असे निदान केले. खात्री करण्याकरता क्ष किरण चिकित्सा केल्यावर हेयरलाईन फ्रॅक्चर देखील आहे हे कळले. शौकत व तारिक दोघांनीही खूप धीर दिला. “यहां ऐसे बहोत पेशंट आते है, कोई चिंता की बात नहीं, हम ठीक कर देंगे” ह्या केंद्रावर बर्फात स्केटिंग,स्कीईंग करतांना पडून हात, पाय फ्रॅक्चर झाल्याच्या खूप घटना घडतात त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना भरपूर अनुभव होता. डॉक्टर आले की ओढ (traction) देऊन हाड जागेवर आणू व मग प्लास्टर करू असे शौकतने सांगितले. शौकत आणि तारिक दोघांचेही बोलणे इतके आश्वासक होते की कोणताही किंतु, परंतु डोक्यात न आणता मी स्वतःला त्यांच्या स्वाधीन केले. त्यामुळे ओढ कशी देणार? भूल देणार का नाही? कितपत दुखेल? कोणतेही प्रश्न मला खरोखरच पडले नाहीत. थोड्यावेळात डॉ. बिलाल आले. हात बघितल्यावर शौकत आणि तारिकचे निदान अचूक आहे असे म्हणाले. ह्या सर्व काळात आदिल धाकट्या भावासारखा आमच्या सोबत होता. डॉ. बिलाल नी केस पेपरवर काय काय सामान लागेल त्याची यादी आदिलच्या हातात दिली. आदिल कुठून तरी सगळी सामुग्री घेऊन आला. ओपीडी मध्ये मला बसवल्यावर काहीही न बोलता तरिकने माझा उजवा दंड मागून घट्ट धरला. शौकतने हाताची बोटे धरून हात बळेच सरळ केला. रस्सीखेच करण्याचा दोर असावा अशी माझ्या हाताची अवस्था होती. डॉ. बिलालांनी आपल्या बोटांनी माझ्या मनगटावर विविक्षित ठिकाणी जोर द्यायला सुरवात केली. एखाद दोन मिनिटे हा प्रकार चालू होता. असह्य वेदनांनी त्या थंडीत देखील मला अक्षरशः घाम फुटला. मोठ्या कष्टांनी मी आरडाओरडा करण्याचे टाळले. ताण तसाच कायम ठेवून डॉ बिलाल आणि आणखीन एका सहकाऱ्याने हाताला प्लास्टर घालण्याचे काम केले. ह्या सगळया गडबडीत आमच्या दोघांच्याही अंगावर पुरेसे थंडीचे कपडे नव्हते हे लक्षातच आले नाही. हातावरचे प्लास्टर देखील ओले होते. वेदनेबरोबरच थंडीने माझा अंत बघायला सुरुवात केली. तारिकने मला गॅस हिटर समोर बसवले. डॉ. बिलालनी केस पेपर वर औषधांची नावे लिहून दिली. आदिल पुन्हा बाहेर जाऊन औषधे घेऊन आला. प्लास्टर सुकल्यावर आम्ही निघालो. आदिलच्या मदतीने केमिस्टचे बिल देऊन आदिलच्याच मदतीने पुन्हा रूमवर पोहोचलो. पुण्याला परत येऊन आमच्या अस्थिरोग तज्ञांना भेट दिल्यावर केलेले उपचार योग्य आहेत असे समजले आणि पुढील पाच आठवडे हात गळ्यात ठेवणे आले.
ह्या चौघांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्यामुळे आम्ही आमची सहल पूर्ण करू शकलो. अगदी गुलमर्ग मध्ये देखील बाकीच्यांनी बर्फावरच्या साहसांचा आनंद पुरेपूर घेतला.
काश्मीर सहल काश्मीरी
खाण्याबद्दल न लिहिता पुरी होणार नाही. आपण पाच पक्वानांच ताट सणासुदीला वाढतो
तसाच पण मुख्यत्वे मांसाहारी आणि काही शाकाहारी पदार्थांचा एकाच ताटात समावेश
म्हणजे काश्मिरी वाझवान. काश्मिरीमध्ये वाझ म्हणजे स्वयंपाक किंवा स्वयंपाकी आणि
वान म्हणजे विकत घेणें. कमीतकमी पाच
मांसाहारी आणि दोन किंवा तीन शाकाहारी पदार्थांच्या समुदायाने वाझवानची थाळी सजते.
ज्याच्यात्याच्या ऐपती प्रमाणे ही संख्या वाढत जाते. राजेशाही किंवा नवाबी
वाझवानची थाळी ३६ खाद्यपदार्थांनी सजते. त्यात १५-३० पदार्थ मांसाहारी असतात. अनेक
पदार्थांचा एकाच वेळेला आस्वाद देणारी वाझवान थाळी खाद्ययात्रींकरिता एक सुखद
अनुभव आहे. नद्रू याखनी, ही कमळाची देठे व दही वापरून केलेली रसभाजी आहे. त्यात
वापरलेल्या मसाल्यांमुळे त्याची लज्जत अधिकच वाढते. काश्मिरी हलव्याने थोडीशी
निराशा केली. सढळ हाताने सुकामेवा घालून केलेला आपला शिरा ह्या व्यतिरिक्त काही
वेगळ वाटलं नाही. काश्मिरी पुलाव देखील खास वेगळा वाटला नाही. भरपूर सुकामेवा
घालून केलेला काहीसा गोडसर पुलाव. गोड पदार्थात फिरनी आणि गरम गरम गुलाबजाम
लाजवाब.
मनात कोणताही
पूर्वग्रह, अपेक्षा न ठेवता सहलीला गेल्याचा फायदा म्हणजे भेटलेल्या काश्मीरवासियांना
मोकळेपणी भेटता आलं, त्यांच्याशी संवाद साधता आला. काश्मीरमध्ये लोकांचा अनुभव खूप
चांगला आला. मग तो गाडीचा चालक असो, हॉटेल मधील रूम सर्विसचा स्टाफ वा वेटर असो, सगळ्यांचे
वागणे अत्यंत अगत्यपूर्ण वाटले. पहिल्या पासून शेवट पर्यंत आमच्या बरोबर असलेल्या
शौकतने, चालकापासून पर्यटन मार्गदर्शकापर्यंत सर्व भूमिका उत्कृष्ट पार पाडल्या. जागोजागी
जाणवला तो प्रामाणिकपणा. लोक गरीब जरूर आहेत पण अप्रामाणिक नाहीत. आलेले पर्यटक हे
पाहुणे आहेत आणि त्यांना त्रास होता कामा नये ही भावना घोडेवाले, स्लेज ओढणारे, बर्फावरची
स्कूटर चालावणारे वा टॅक्सीवाले या सर्वांच्यात दिसली. प्रत्येक गोष्टीत भाव
करावाच लागतो, पण कडवटपणा येत नाही. शेवटी
बक्षिसी किंवा टिपची अपेक्षा असतेच. पण नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे जे द्याल
त्यात ते ख़ुश वाटले.
काश्मीर सहल
संस्मरणीय झाली असेच म्हणावे लागेल. चुकलेला वसंतोत्सव पुन्हा जाऊन बघण्याची, तेथील लोकांना
भेटण्याची इच्छा मात्र जरूर आहे.