जपानची ओळख,
खरंतर अशा नावाचा देश आहे, याची माहिती शाळेत भूगोल शिकताना झाली. उगवत्या सूर्याचा
देश. सूर्य तर सगळ्याच देशात उगवतो मग जपानच्या बाबतीत वेगळ काय आहे? उगवत्या सूर्याचा देश, म्हणजे नेमकं काय? हे कळायला थोडा
अधिक काळ जावा लागला. पुढे महायुद्धांचा इतिहास शिकताना, एक आक्रमक देश म्हणून
जपान नव्याने समोर आला. दुसऱ्या महायुद्धाच्या
शेवटी महासंहारक आण्विक अस्त्रांच्या प्रयोगाने जवळजवळ नष्ट झालेला आणि फिनिक्स
पक्षासारखा राखेतून पुन्हा उभा राहून प्रगत देशांच्या पंगतीत जाऊन बसलेला हा देश
कायम खुणावत होता. तो योग यायला २०२६ साल उजाडावं लागलं.
“नमनाला घडाभर
तेल” ह्या म्हणीची आठवण करून देणारी प्रवासाची पूर्वतयारी झाली आणि ७ एप्रिल रोजी
सहप्रवाशांबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो.
सहप्रवाशांच्या ओळखींचा सोहोळा तिथेच पार पडला. विमानाचे प्रस्थान रात्रौ ११.३०
वाजता झाले आणि यथावकाश आम्ही टोकियोच्या नरिटा विमानतळावर उतरलो.
खरंतर नरीटा,
टोकियो पासून 80 किमीवर आहे आणि तरी त्याला टोकियो विमानतळ असं संबोधलं जात. नरीटा
(आंतरदेशीय) आणि हनीडा (अंतर्देशीय २६ किमी) हे दोन्ही विमानतळ टोकियो म्हणून
ओळखले जातात. टोकियो शहर आणि तीन प्रांत (prefecture) कानागावा (Kanagawa), चिबा (Chiba), आणि साईतामा (Saitama) हे चार मिळून बृहन टोकियो (greater Tokyo) तयार होते.
नरीटा विमानतळ चिबा प्रांतात येतो. हे सर्व प्रांत जपानमधील होन्शु (Honshu) ह्या सर्वात मोठ्या बेटावर स्थित आहेत. टोकियो, ओसाका, नागोया,
क्योटो आणि हिरोशिमा ही सर्व शहरे ह्याच बेटावर आहेत. थोडक्यात, बहुतांश
पर्यटकांप्रमाणे आमचे जपान दर्शन हे होन्शु बेटापुरते मर्यादित होते. जपान ६०००
बेटांचा देश आहे, त्यातील कित्येक इतकी छोटी
आहेत की त्यावर वस्ती शक्य नाही.
थोडंस जपानच्या
इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या प्रक्रियेबद्दल. उतरल्यावर इमिग्रेशन करता रीतसर रांग
लावल्यानंतर आमचा नंबर आल्यावर तेथील महिला अधिकाऱ्याने पारपत्र स्कॅन करून दोन बोटांचे ठसे घेतले आणि चेहेऱ्याची छबी देखील उतरवली. त्यानंतर
इमिग्रेशन करता असलेला अर्ज भरून दिल्यावर, पारपत्रावर छापा घेऊन पुढे गेलो. आमचे
मोठे सामान जे पट्यावरून अगोदरच उतरवून ठेवलेले, घेऊन कस्टम्स मध्ये आलो. तिथेही
एक अर्ज भरून दिल्यावर, संगणकाच्या पडद्यावर प्रतिबंधित वस्तूंची यादी आली आणि
ह्यातील आमच्या सामानात काही नाही अशी ग्वाही पडद्यावरच आमच्या कडून घेण्यात आली
आणि आम्ही बाहेर पडलो. मला हे लिहिण्याकरता जेव्हढा वेळ लागला त्यापेक्षा बहुदा
कमी वेळेतच ही प्रक्रिया पूर्ण झाली. (जे दोन अर्ज भरावयाचे असतात त्यांची माहिती
वेब पोर्टलवर भरून क्युआर (QR) कोड निर्माण
करता येतो जो स्कॅन करून ही प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करता येते. आम्हा
सर्वांना तसे QR कोड छापून दिलेले होते).
हो आणि पुढे
जाण्यापूर्वी आणखीन एक, जपान मध्ये खालील पदार्थ, वस्तू आणण्यास, सक्त मनाई आहे. असल्याच, तर विमानतळावर क्वारंटाईन काउंटर वर दाखवून घोषित कराव्या लागतात अन्यथा मोठ्या
दंडाला सामोरे जावे लागते. सर्व प्रकारची ताजी फळे, भाज्या, बियाणे, फुले, आणि कुंडीतील झाडे, मांस आणि प्राण्यांचे पदार्थ, गोठवलेले, वाळवलेले किंवा
शिजवलेले मांस. यामध्ये सर्व प्रकारच्या मांसाहाराचा समावेश होतो. कोणत्याही प्रकारची माती, माती मिश्रित झाडे. प्राणीजन्य उत्पादने, अंडी, दूध, चामड्याच्या वस्तू प्रक्रिया नसलेल्या इत्यादी.
भारतीय भोजनाने
८ एप्रिलची सांगता करून एका रात्रीसाठी “ANA Crowne Plaza” ह्या हॉटेल मध्ये उतरलो. उद्या सकाळी
सगळे उरकून, हॉटेल सोडून, ठीक ८:३० वाजता आमच्यासाठी असलेल्या बस मधून आम्हाला जपान
दर्शनाला सुरवात करायची होती.
सर्व प्रवाशांच्या सहकार्याने आणि आम्हा
सर्वांच्या मोठ्या बॅगा चालाकाने शीघ्र गतीने बस मध्ये चढवल्यावर आमची बस ९
तारखेला ठीक ८:३० वाजता गणपती बाप्पाचा गजर करून मार्गस्थ झाली. गंतव्य स्थान होते सरोवर ‘अशी’
(अशीनोको). साधारण अडीच पावणे तीन तासांनी आम्ही इप्सित स्थळी पोहोचलो. हे सरोवर
उल्का विवरामुळे तयार झालेले आहे.
इथे आम्ही ऐतिहासिक समुद्री चाच्यांच्या जहाजा सदृश दिसणाऱ्या बोटीतून प्रवास
केला. साधारण ४० मिनिटांच्या ह्या प्रवासात आम्ही बोटींच्या तीन डेकवरून (मजले)
प्रवास केला. वरील दोन डेकवर भणाण वाऱ्याचा अनुभव आला (ही बोटीची सफर वेगाने
वहाणाऱ्या वाऱ्यामुळे रद्द होण्याची शक्यता होती). ही बोट टोगेंडी, हकोने माची आणि
मोटो हकोने ही बंदरे घेते. बोटीतून प्रवास करतांना हवा स्वच्छ असेल तर फुजीयामा,
फुजीसान (इथे “सान” हा शब्द आदरार्थी उपाधी म्हणून न वापरता, पर्वत ह्या अर्थाने
वापरला आहे) किंवा सर्वश्रुत माउंट फुजीचे सदा बर्फाच्छादित असलेले शिखर
दृष्टीस पडते. जपान मध्ये प्रामुख्याने दोन धर्म आहेत. एक शिंटो (निसर्गाला देव
मानणारा) आणि दुसरा बुद्ध. शिंटो देवस्थानाला shrine (पवित्र स्थान) तर बौद्ध देवस्थानाला temple (मंदिर) असे संबोधतात.
आपल्याकडे ज्याप्रमाणे नवस पुरा करतांना काही गोष्टी
अर्पण करतात तशाच कारणाने टोरी गेट उभारली जातात. ढगांच्या सावलीने काळवंडलेले
सरोवराचे निळे पाणी, समोरील डोंगरावरची हिरवाई, त्यामागे दिसणारे माउंट फुजीचे बर्फाच्छादित शिखर आणि
पाण्यात जणु तरंगणारे पलीकडच्या काठावर असलेल्या हकोने देवस्थानाचे लाल रंगाचे
टोरी गेट. मंत्रमुग्ध करणारे दृश्य होते क्षणभर कानाशी घोंगावणाऱ्या वाऱ्याचा
देखील विसर पडला.
हे सरोवर पार
केल्यावर आधी ठरल्याप्रमाणे रज्जुमार्गाने (Ropeway) पलीकडच्या डोंगरावर जाऊन ओवाकुदानी गरम पाण्याचे झरे असलेल्या दरीला (Ovakudani boiling valley) भेट द्यायची होती. पण वर उल्लेखिलेल्या वेगवान
वाऱ्यांमुळे रज्जुमार्ग बंद होता आणि आम्ही बसने प्रवास करून ओवाकुदानीला
पोहोचलो. बस मधून उतल्यावर गंधकाच्या वासाने
आमचे स्वागत झाले. दूरवर वाफा येतांना दिसत होत्या.
३००० हून अधिक वर्षांपूर्वी झालेल्या
ज्वालामुखीच्या उद्रेकाने ही दरी तयार झालेली आहे. गरम पाण्याचे झरे आणि गंधकाचा
धूर, जमिनीवरच्या भेगांतून सतत बाहेर पडत असतो. ओवाकुदानी कुरो-टोमॅगो (गरम
पाण्याच्या गंधकयुक्त झऱ्यात उकडल्याने
काळे झालेले अंडे) करता प्रसिद्ध आहे.
गमतीचा भाग म्हणजे तिथे काळ्या अंड्याचा पुतळा देखील आहे. त्याच्या
बाजूला उभे राहून फोटो काढण्याकरता पर्यटकांच्यात अहमहमिका लागली होती. हा फोटो
मोठ्या मुश्कीलेने
मिळाला. वारा इतका होता की एका जागी उभे
रहाण्याकरता कष्ट पडत
होते.
भारतीय भोजन
घेऊन आम्ही माउंट फुजीकडे मार्गस्थ झालो. माउंट फुजीवर जाणारा रज्जुमार्ग (तोही
त्यादिवशी चालू नसावा) आमच्या कार्यक्रमात नव्हता. आम्ही बसनेच जितकेवर जाता येईल
तितके जाणार होतो. हे देखील हवामानावर अवलंबून होते. जर परिस्थिती धोकादायक असेल
तर वरील स्थानकांवर जाण्यास मनाई असते.

दुर्देवाने आजही परिस्थिती तशीच होती आणि
आम्हाला पहिल्या पडावावरच समाधान मानावे लागले. १२९१ मीटरवर
आमची बस थांबवली. समोर रस्ता बंद केलेला होता. तिथे सर्वांनी फोटो सेशन केले. गुगल हवामानानुसार पाचव्या पडावावर (जेथे पोचण्याची
अपेक्षा होती) तापमान -१४ ℃ होते. वरवर पहाता जरी निराशा पदरात पडल्यासाखे वाटले तरी
याच फुजीसानने आज सकाळपासून आमच्या डाव्या-उजव्या बाजूला राहून सतत आमची साथ केली
होती. यापूर्वी अनेक पर्यटक असेही भेटले आहेत की खराब, ढगाळ हवामानामुळे
त्यांना फुजीसानने दर्शन देखील दिले नाही त्यांच्या परीने आम्ही खासच नशीबवान
होतो. आमच्या सारख्या अनेक बसेस आसपास उभ्या होत्या. समदुःखी अनेक पर्यटक होते. संध्याकाळी जेवून खाऊन आम्ही “La Vista Tokyo Bay” ह्या हॉटेलात
मुक्कामाकरता आलो. इथे तीन रात्री रहाण्याचा कार्यक्रम होता. उद्या दिनांक १०
एप्रिल, संपूर्ण दिवस टोकियो दर्शन.
सकाळी ठीक ९ वाजता बाप्पाच्या जयघोषाने दिवसाची
सुरवात झाली. पहिला थांबा टोकियो स्काय ट्री टॉवर (Tokyo Sky Tree Tower) होता. हा प्रसारण
(Broadcasting) करणारा मनोरा सुमिदा नदीच्या काठावर आहे. ह्याची उंची ६३४
मीटर (२०८० फूट) आहे. हा जगातील सर्वात उंच मनोरा आहे आणि जगातील तिसरी सर्वात उंच
इमारत.
ह्या मनोऱ्यात दोन प्रेक्षकांकरिता
सज्जे आहेत (बाजूच्या फोटोत दिसतात). एक ४४५-४५० मीटर (Tempo Galleria) आणि दुसरा ३५० मीटर (Tembo Deck). ४५० मीटर वरून काचेवरून चालत ४४५ मीटरवर येता
येते. (अधिकची माहिती गुगलवरून) जगात सगळ्यात उंचीवर असलेला हा स्कायवॉक आमच्या
कार्यक्रमात नव्हता. आमची प्रेक्षक
बाल्कनी ३५० मीटर उंचीवर होती. तिथे प्रेक्षकांना घेऊन
जाणारी उद्वाहक (लिफ्ट) भली मोठी आहे. आमचा ३० जणांचा चमू त्यात सहज मावला. त्या
उद्वाहाकाची गती सेकंदाला ~७ मी. इतकी होती आणि एका मिनिटाच्या आत (५० सेकंद)
आम्ही ३५० मीटरवर असलेल्या प्रेक्षक कक्षात पोहोचलो.
वरून दिसणारे दृश्य सहसा अशा
प्रकारच्या उंच इमारतींवरून (बुर्ज खलीफा ) दिसणाऱ्या
दृश्यासारखेच होते. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली
ती म्हणजे इमारतींची घनता. नजरेच्या आवाक्यात येणाऱ्या एखाद्या भूभागात किती
इमारतींची अथवा बांधकामांची आपण कल्पना
करू शकतो त्याही
पेक्षा खूप जास्त. त्यात पूल, मनोरे, पाण्याचे प्रवाह, खेळाची मैदाने, क्रिडागार म्हणाल ते ते दिसत होतें. आणखीन एक इतक्या उंचीवरूनही जाणवलेली गोष्ट म्हणजे जपानी स्वच्छता.
सगळया प्रेक्षणीय उंच इमारतीत,
आपण किती उंचीवर आहोत ह्याची थोडीशी भीतीदायक जाणीव करून देण्यासाठी असते तशीच
काचेची जमीन (स्कायवॉक) इथेही आहे. त्यावर उभं राहून खाली बघितल्यावर आपल्या
पायाखाली काहीच नाही ह्याच्या होणाऱ्या जाणीवेने काही जण त्यावर उभे राहण्यास तयार
होत नव्हते. आमच्या सह्प्रवाशांत उंचीची भिती असलेलं कोणीही नसल्यामुळे सगळ्यांनी
त्याची मजा घेतली. खूप सारे फोटो घेतले (यथावकाश ते डिलीट करत बसावे लागतील हा भाग
निराळा)
टोकियो स्काय ट्री च्या अनुभवानंतर भारतीय
भोजनाचा स्वाद घेऊन. पुढील गंतव्यस्थान होते उनो पार्क (Ueno Park). “ज्याच्या साठी केला होता अट्टाहास”, असा चेरी ब्लॉसमचा
सोहळा जिथे बघायला मिळणार होता ते उद्यान. तिथे पोहोचलो तेव्हा पाऊस रिपरीपत होता.
उद्यानात आमच्या अपेक्षेपेक्षा कमी पर्यटकांची उपस्थिती होती. पावसाने लावलेल्या सततच्या हजेरीने सगळा फुलोरा
अक्षरशः धुऊन निघाला होता.
नाही म्हणायला त्या पावसात काही झाडे आपल्या फुलांसहित
तग धरून होती. “शीतावरून भाताची परीक्षा” म्हणणात तसं त्यावरून पूर्ण बहर कसा असेल
याची थोडीफार कल्पना आली. पाउस पडतच होता, त्यामुळे आमच्या जपानी गाईडला खात्री
नव्हती की ठरल्याप्रमाणे पुढील मेगुरो
नदीवरची बोट सफर पार पडेल की नाही. बोट चालकांशी ती सतत संपर्क ठेवून होती. बोट
कंपनीने आम्हा सर्व प्रवाशांसाठी रेनकोट देण्याचे ठरवले आणि आम्ही जेटीवर पोहोचलो.
प्रवासाला निघालो. प्रत्येकाच्या हातात नवीन रेनकोट देण्यात आला. पांढऱ्या रंगाचे
रेनकोट सर्वांनी परिधान केले आणि रेनकोटधारी आमचा चमू ओली जेटी पार करून बोटीत
स्थानापन्न झाला.
आमच्यातल्याच एकाने
सर्वांना पेंग्विनची उपमा दिली. त्या ओल्या
पांढऱ्या रेनकोटात सगळ्यांची चाल पेंग्विन सारखीच झाली होती. जशी आमची बोट नदीतून
निघाली तेव्हा नदीच्या दोन्ही तीरावर फुलेली आणि अजूनही आपला बहर सांभाळून उभी
असलेली सकुराची झाडे दृष्टीस पडली आणि ज्या चेरी ब्लॉसमने आम्हाला उनो उद्यानात
हुलकावणी दिली तोच नदीच्या दोन्ही तीरांवरून झुकून पाण्यात आपले रुपडे न्याहाळताना
बघायला मिळाला. पाण्यावर गुलाबी पाकळ्या
तरंगत होत्या, काही ठिकाणी पाण्याचा रंगच गुलाबी दिसत होता.
वाटेत येणाऱ्या पुलाखालून बोट जातांना पुलावरून जाणारे थांबून आम्हाला हात करत
होते. सहसा न दिसणारे ते दृश्य बहुदा त्यांना स्तंभित करीत असावे. आम्ही सर्वच
ह्या सफारीचा आनंद घेत होतो. एकानेही तक्रारीचा सूर काढला नाही. त्यामुळे ह्या बोट
सफरीची एक यादगार अनुभव अशीच नोंद घ्यावी लागेल.
ही सफर संपवून
आम्ही टीम लॅब्स प्लॅनेट (Team Labs Planet) पहायला गेलो.
हे एक डिजिटल
तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले कलादालन आहे. ह्यात प्रामुख्याने तीन विभाग आहेत.
ज्यात पाणी (water) (ह्यात शारिरी अनुभव
येतो) आपण वहात्या पाण्यातून चालत जातो. हा अनुभव पादत्राणे काढून घ्यावा लागतो,
जंगल (Forest) – अॅथलेटिक्स फॉरेस्ट,
कॅचिंग अॅण्ड कलेक्टिंग फॉरेस्ट जंगलातील
भासमान जगात आपला प्रवेश होतो, प्राणी, पक्षी आपल्या आसपास असतात, बगीचा (garden) ह्यात उडणारी फुलपाखरे, पडणारी ऑकिड्स सभोवती दिसतात.
आवाज आणि प्रकाशाची सांगड घालत निर्माण झालेले मण्यांचे पडदे, आरशांच्या कल्पक उपयोगातून निर्माण झालेले अनंत प्रतिबिम्बांचे विश्व.
फोटो, चलचित्र ह्या पेक्षा प्रत्यक्ष अनुभव जास्त
श्रेयस्कर आहे.
उद्या ११
एप्रिल. शिकान्सेन बुलेट ट्रेनने हिरोशिमाला पोहोचायचे होते. आमची ट्रेन सकाळी
८:३३ ला होती. सकाळी ६ वाजता La Vista सोडून आम्ही निघालो. आमच्या मोठ्या बॅगा कुरिअरने त्या
दिवसाच्या निवासी पोचणार होत्या. त्यामुळे आदल्या
दिवशी सगळी बांधाबांध करून आम्ही तयार होतो.
सकाळी ६ वाजता लॉबीत आमच्या बॅगा आणून आम्ही हॉटेल सोडून ठरल्या प्रमाणे टोकियो स्थानकावर आलो.
झेंड्याच्या मागे जात रहा
अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या होत्या. पण प्रत्यक्ष स्थानकात शिरल्यावर, गर्दी
बघून कामाच्या दिवशी संध्याकाळच्या CST किंवा चर्चगेट स्थानकाची आठवण झाली. आमची छोटेखानी गाईड
आणि तो झेंडा गर्दीत, पाण्यात साखर विरघळते तसा
दिसेनासा झाला. मग आपल्या पुढील चमूतील सभासदाची पाठ सोडायची नाही. ह्या हिशोबाने
सगळे इप्सित फलाटावर योग्यजागी वेळेत पोचले.
मूळ
योजनेप्रमाणे टोकियो वरून थेट हिरोशिमा गाठायचे आणि संध्याकाळी परतायचे होते. प्रवास
योजनेत थोडा बदल करून दोन ऐवजी तीन शिकान्सेन बुलेट ट्रेननी प्रवास करण्याचे ठरले.
टोकियो ते शिन-ओसाका (शिन- नवीन) सकाळी ८:३३ ला टोकियोहून प्रयाण होते. ओसाका
होतेच पण शिकान्सेन ट्रेनचे स्थानक नव्हते म्हणून नवीन ओसाका. ह्या गाडीचे नाव
होते हिकारी(प्रकाश) ती शिन-ओसाकाला
११:१७ ला पोहोचणार होती.

शिन-ओसाकाहून दुसरी बुलेट ट्रेन हिरोशिमा करता
११:३१ ला वेगळ्या फलाटावर लागणार होती. १४ मिनिटात आमच्या बहुतांशी वरिष्ठ
नागरिकांच्या चमूला सामानासहित त्या फलाटावर पोहोचायचे होते आणि आम्ही पोचलो.
त्यादिवशी हिरोशिमा पाहून, रात्री आमचा मुक्काम क्योटोला होता आणि ती शिकान्सेन
बुलेट ट्रेन, गाडीचे नाव होते नोझोमी (आशा) संध्याकाळी ६:१८ मिनिटांनी सुटणार
होती. ही जपान मधील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन. बाजूच्या फोटोवरून स्वच्छतेची
कल्पना येईल. पराकोटीची स्वच्छता, फलाटावर, गाडीत, यायच्या जायच्या जिन्यात. गाडीत असलेल्या पायलटचा वेष, त्याची अदब, जणु आम्ही
त्याचेच पाहुणे होतो. अजून एक कर्मचारी (टीसी असावा, आमचा आपला अंदाज) बघितला, तो प्रवाशांची गुढघ्यावर बसून बोलत होता, त्यांना त्यांचे समान ठेवायला, काढायला मदत करत होता. डब्यात शांतता होती, एकही भ्रमणध्वनीची घंटा कानावर आली नाही. पुढील स्थानकाची
माहिती वेळेत प्रवाशांना दिली जात होती. स्थानक कुठल्या बाजूला येईल हे देखील
सांगितलं जात होतं, आणि योग्य वेळी प्रवाशांना उतरण्याच्या तयारीत राहण्याची
विनंती केली जात होती. कायम स्मरणात राहील असा अनुभव होता. शिस्त कशी असावी ह्याचा
नमुना बघायला मिळाला. आमच्या स्थानकाची सूचना मिळाल्यावर आम्ही उठून तयार राहिलो.
उतरतांना चढणारे एका बाजूला उभे होते. जर काही गडबड असलीच तर ती आम्हा लोकांचीच
होती.
दुपारी हिरोशिमा स्थानकावर उतरल्यावर ८०-८१
वर्षांपूर्वी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या शहरात आपण पाउल ठेवत आहोत यावर विश्वास
बसणार नाही
इतके अद्ययावत विकसित शहर आमच्या समोर होते. आम्ही हिरोशिमा पीस मेमोरियलला भेट देणार होतो. हिरोशिमा पीस
मेमोरियल पार्क मधेच जेनबाकू डोम (घुमट), अणुबॉम्ब डोम अथवा अ-बॉम्ब डोम उभा
आहे. ज्या ठिकाणी ६ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्बचा विस्फोट केला गेला त्या भागात उभी
असलेली ही एकमेव इमारत. हा डोम UNESCO 1996 मधे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. त्याच्या आवारातून नजरेस
पडतो तो नवा आईओई पुल, (Aioi Bridge) , त्याच्या मूळ “T” ह्या
अद्याक्षरा सारख्या आकारामुळे लढाऊ विमानाला हा सहज दिसणार, म्हणून ६ ऑगस्ट १९४५
च्या हल्ल्यातील लक्ष होता.
खालील माहिती तिथें असलेल्या स्तंभ लेखाचा अनुवाद आहे.
“मूळचा आईओई पूल १९३२ मध्ये
एका विशिष्ट "T" आकारात बांधला गेला होता. ६ ऑगस्ट १९४५ रोजी झालेल्या
अणुबॉम्ब हल्ल्याचे हे मुख्य लक्ष्य होते. या पुलावर प्रति चौरस मीटर सुमारे सात
टन इतका प्रचंड दाब पडला होता—जो सामान्य दाबापेक्षा १५ पटीने जास्त होता. या अचानक आलेल्या प्रचंड दाबामुळे, हा पूल एखाद्या 'लीफ स्प्रिंग' प्रमाणे (leaf spring) वर-खाली जोरात हेलकावे खाऊ लागला आणि पुलाचा स्लॅब हवेत
उडाला. सुदैवाने, संपूर्ण पूल कोसळण्यापासून वाचला आणि दुरुस्ती केल्यानंतर
आईओई पूल आणखी ३५ वर्षांहून अधिक काळ वापरासाठी सज्ज राहिला. मात्र, काळाच्या ओघात पूल कमकुवत होत गेल्यामुळे, अखेर ऑक्टोबर १९८३ मध्ये त्याजागी हा नवीन
पूल बांधण्यात आला.
तिथून पुढे गेल्यावर आपण स्मारकापाशी येतो.

स्मारकात असलेल्या काचेखाली ह्या हल्ल्यात हताहत झालेल्या १४०,००० जपानी
नागरिकांची नावे आहेत. ही यादी आजही वाढत आहे. ह्याचे कारण काही कुटुंबेच्या
कुटुंबे ह्या स्फोटात नष्ट झाल्यामुळे त्यावेळी त्यांची माहिती मिळाली नाही पण
नंतर ती उपलब्ध झाली आणि त्यांची नावे ह्या यादीत समाविष्ट झाली. तर काही
किरणोत्सर्गाने कर्करोगाचे बळी ठरले, त्यांची नावे मूळ यादीत नव्हती. तिथे अखंड तेवणारी ज्योत आहे आलेले पर्यटक,
नागरिक श्रद्धांजली वाहताना दिसतात.
इथेच सादाको सासाकी चे स्मारक आहे. सादाको
सासाकी चा जन्म १९४३ हिरोशिमा बॉम्बस्फोटा वेळी तिचे वय अवघे २ वर्षे होते.
ती
स्फोटातून वाचली पण पुढे १० वर्षांनी तिला रक्ताचा कर्करोग झाला आणि त्यात तिचा
मृत्यू झाला. जपानी दंतकथेनुसार जर एखाद्या आजारी व्यक्तीने कागदाचे १००० क्रेन (करकोचे,
ओरीझुरु- ओरिगॅमी हे शांतता, आरोग्य
ह्यांचे प्रतिक मानले जाते) घड्या घालून बनवले तर ती व्यक्ती बरी होते. सादाकोने
६४४ क्रेन बनवले, अगदी औषधाच्या कागदांचेही
तिने पक्षी बनवले पण ती वाचली नाही, २५ ऑक्टोबर १९५५ ला तिचा मृत्यू झाला. आजही जगभरातून
कागदी क्रेन बनवून तिला श्रद्धांजली वाहिली जाते.
हिरोशिमा पीस
मेमोरियल म्युझियम हे हिरोशिमा पीस मेमोरियल पार्कमधील एक संग्रहालय आहे, जे दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमावर झालेल्या
अणुबॉम्बस्फोटाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी समर्पित आहे. हे संग्रहालय ऑगस्ट १९५५
मध्ये हिरोशिमा पीस मेमोरियल हॉलसह स्थापित करण्यात आले. ह्या संग्रहालयाला भेट, हा पर्यटकाला
एक विदारक, निराशाजनक, उदास आणि दुःखी करणारा
अनुभव आहे. तिथे मांडलेली छायाचित्रे, स्फोटात
जळलेले, चिंध्या झालेले कपडे, दिलेली माहिती, लहानमुलांची तीन चाकी सायकल आणि त्यानंतर
दाखवली जाणारी चित्रफीत सगळच अंगावर काटा आणणारे आहे. ज्यांनी भोगले ते तर
निर्दोषच होते. कोणी काहीही म्हणो मी तर हेच म्हणेन जे झालं ते अमानुष आणि
निर्घ्रुणच होते.
वरती
लिहिल्याप्रमाणे आमची निवासाची सोय क्योटोमध्ये होती.
क्योटो हे
आपल्या काशी किंवा हरिद्वार सारखे मंदिरे आणि पवित्र प्रार्थनास्थळे असलेले शहर
आहे. अर्थात तीर्थक्षेत्रे हे केवळ एकच साधर्म्य. सरकारने हे टिकवण्यासाठी बांधकामासाठी
खास नियम केले आहेत. अक्षरशः दर काही पावलांवर मंदिर किंवा पवित्र स्थान आहे. ह्या
शहरात गगनचुंबी इमारती नाहीत. क्योटो मधील सर्वांत उंच मंदिराच्या कळसापेक्षा एकही
इमारत उंच नाही. जुन्या इमारती तशाच टिकवल्या आहेत. विकासाच्या ओघात त्यांचा ऱ्हास
होणार नाही ह्याची काळजी
घेतलेली आहे.
१२ एप्रिल, क्योटो आणि आसपास स्थळ दर्शन. सकाळी
नाष्टा आटपून आमची बस
आम्हाला सगोना रोमॅंटिक ट्रेन स्थाकावर घेऊन आली. ही ट्रेन
अराशियामा आणि कामेओका स्थानकां दरम्यान होझुगवा नदीच्या खोऱ्यातून प्रवास करते.
दोन्ही बाजूला आलटूनपालटून दिसणारी नदी, डोंगर, त्यावरची हिरवाई. दृश्य मनाला खचितच लोभावणार होते.आम्हाला
इथेही चेरी ब्लॉसमने हुलकावणी दिली. नावाप्रमाणे अनुभव निदान मलातरी फारसा
रोमॅंटिक वाटला नाही (वयाचा दोष असावा, कदाचित), गाडीचा आवाज खूप होता आणि त्यात
तेथील कर्मचारी स्पीकरवरून जपानीत माहिती (बहुतेक) देत होते. ह्या सगळ्या आवाजांवर
आवाज चढवून बोलावे लागत होते त्यामुळेही असेल कदाचित.
इथून चालतच आम्ही अराशियामा बांबूच्या बनातून दुसऱ्या
टोकाला बाहेर पडलो. अरुंद रस्त्याच्या दुतर्फा गच्च बांबूची झाडे, पार आभाळाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात असलेली, काही
हिरवी, काही पिवळी, त्यांच्या बुंध्याशी गवत आणि इतर
वनस्पतींची दाटी.
पर्यटकांची
गर्दी खूप होती आणि जो तो सेल्फी, अथवा फोटो
काढण्याकरता चांगली जागा शोधण्याकरता धडपडत होता त्यातील किती जणांनी बांबूचे ते
गच्च बन बघितलं त्याबद्दल मला शंकाच आहे. आता सांगायला हरकत नाही पण एक विचार मानत
येऊन गेला की काही क्षणांकरता हे सगळे पर्यटक, ही गर्दी नाहीशी झाली आणि त्या
शांततेत बांबूच्या बनातून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकत मी एकटाच उभा राहिलो तर कसा
असेल तो अनुभव. जाउदे कवी कल्पना, झालं. पलीकडे पोचल्यावर आईस्क्रीमची मजा घेऊन,
नदीकिनारी फोटो काढल्यावर आम्ही निघालो. जेऊन खाऊन चार वाजण्याच्या सुमारास आम्ही
कियोमिझू डेरा मंदिरात पोचलो.
कियोमिझू डेरा मंदिर UNESCO 1994 मधे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. ह्या मंदिराची स्थापना ७७८ मध्ये क्योटोच्या पूर्व भागात
झाली. हे मंदिर क्योटो ही राजधानी होण्यापूर्वीचे आहे. हे मंदिर सैगोकु किंवा
साईगोकू कान्नोन यात्रेतील (Saigoku Kannon Pilgrimage) १६ वे मंदिर
आहे. कांसाई प्रांतातील ३३ मंदिरांची ही यात्रा
आहे. आणि ह्या सर्व मंदिरात प्रामुख्याने कान्नोनची
(बोधिसत्व – इतरांना बोधी (बुद्ध) होण्याकरिता मदत करण्यासाठी ज्याने आपलं निर्वाण
किंवा बोधी होणे पुढे ढकलेले आहे) पूजा होते. हे छायाचित्र मंदिराच्या आतील आहे. मंदिराच्या बाहेर उंचीवरून दिसणारे क्योटो शहर आणि डोंगर उतारावरील गर्द झाडी आणि
साकुराचा बहर. अधिकची माहिती अर्थात गुगल, अशा इतिहासाची अथवा माहितीची अपेक्षा जपानी
मार्गदर्शकाकडून होती.
ओटोवा धबधब्याचे तीन प्रवाह बांबुच्या नळ्यांद्वारे खाली पडते, हे तीनप्रवाह पवित्र मानले जातात. त्यांचे पाणी पिणे
शुभ मानले जाते. प्रत्येक प्रवाह हा पाणी पिणाऱ्याला वेगवेगळे वरदान देतो. उजवा
प्रवाह आरोग्य, दीर्घायुष्य, मधला प्रवाह प्रेम आणि डावा
प्रवाह यश देतो. पिणाऱ्याने कोणत्याही एकाच प्रवाहातून पाणी पिणे अपेक्षित आहे.
तिन्ही प्रवाहातून पिणे हे लोभी माणसाचे लक्षण समजतात. पाणी पिण्याकरता लाब
दांड्याच्या पळ्या आहेत. पिऊन झाल्या पळी ठेवण्याकरता केलेली जागा अती नील
किरणांनी (निर्जंतुक) प्रकाशीत केलेली होती. संध्याकाळी सुदर्शन नामक भारतीय
भोजनालयात चायनीज खाण्याचा आस्वाद घेऊन, निवासी परत आलो.
उद्या १३
एप्रिल, सकाळी किमोनो परिधान करून (अर्थात भाड्याचे) फुशीमी
इनारी ताईशाला भेट देण्याचे ठरले होते. फुशीमी इनारी ताईशा हे क्योटोतील सर्वात
महत्वाचे शिंतो प्रार्थना स्थळ आहे.
सकाळी भरपेट नाष्टा करून आम्ही वेळेवर निघालो.
वेळेत जर पोहोचलो नाही तर
मनासारखे किमोनो मिळणार नाहीत असे सांगण्यात आले
होते. किमोनो परिधान करून अनंत फोटो काढून झाल्यावर आम्ही प्रार्थना स्थळाला भेट
देण्याकरता निघालो.
मंदिराच्या आवारात कोल्ह्यांचे अनेक पुतळे दिसले.
प्रत्येकाच्या तोंडात काहीना काही होते. कोल्हा हे समृद्धीचे प्रतिक आहे. सफल पीकाच्या
हंगामाचे
प्रतिक म्हणून त्यातील काहींच्या तोंडात कणसे
आहेत. फार रेखीव पुतळे आहेत आणि व्यवस्थित ठेवले आहेत. हे स्थान ७११ मध्ये स्थापित
झाले. पुढे गेल्यावर असंख्य टोरी गेटस् (१०००० असा आकडा सांगण्यात आला) समोर आली.
त्यातील ८००-१००० इतक्या जवळ जवळ आहेत की भुयारातून चालल्याचा भास होतो. त्यांना
सेनबॉन(हजारो) टोरी असे म्हणतात. डोंगरावर जाण्याकरता ४ किमी चालावे लागते अर्थात
वेळे अभावी ते शक्य नव्हते. त्यानंतर जपानी किझाकुरा साके निर्मिती कंपनीला भेट
दिली. किझाकुरा साके ही फुशिमिझू झऱ्याच्या पाण्यापासून बनवतात. तांदूळ हा कच्चा
माल आणि त्याच्या वेगवेगळ्या पोलिश टक्क्यांवरून साकेची प्रत ठरते, इथे सर्व माहिती प्रदर्शन स्वरूपात दिली जाते एक चित्रफित
बघून आपण साकेची चव चाखू शकतो. सगळ्यांनी मनमुराद आस्वाद घेतला.
रात्री पुन्हा
मरक्युर (Mercure) हॉटेल मध्ये आलो. उद्या १४ एप्रिल जपान भेटीचा शेवटचा दिवस.
सर्वजण आतुरतेने या दिवसाची वाट बघत होते, सफर संपणार म्हणून नव्हे तर उद्या खरेदी
करायला मिळाणार म्हणून!!
१४ एप्रिल, सकाळी नारा डीअर पार्क आणि तोडायजी
मंदिराला भेट देण्याचा कार्यक्रम होता.
नारा शहरातील सात मोठ्या मंदिरांपैकी एक.
हे मंदिर ७३८ मध्ये बांधले गेले, प्रत्यक्षात ते ७५२ मध्ये लोकांसाठी खुले झाले.
ह्या मंदिराचा अनेक वेळा जीर्णाद्धार झाला. आज दिसणारे मंदिर हे १९७४-८० ह्या
काळात झालेल्या जीर्णोद्धारा नंतरचे रूप आहे. अतिशय भव्य असे हे मंदिर आहे. त्यात
बुद्धाची सर्वात मोठी बसलेली मूर्ती आहे. ह्याचा उलेख महाबुद्ध असाही करतात आणि
शिंतो धर्मियांनी त्याला सूर्यरूप म्हणून मान्यता दिलेली होती. मुख्य मूर्तीच्या
सभोवती अनेक मोठमोठ्या मूर्ती (पुतळे) आहेत. हे सर्व काम लाकडात केलेले आहे. हे
मंदिर UNESCO १९९८ मधे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.
नारा डीअर
पार्क हे आणखीन एक आकर्षण. तोडायजी मंदिरा समोर ही बाग आहे आणि त्या बागेत हरणं
मुक्त विहरत असतात. आपण तेथील दुकानात तांदुळाचे पापड (राईस केक) विकत घेऊन
त्यांना खायला घालू शकतो, त्यांना हात लावता येतो.
आपल्या भोवती गोळा होऊन आपल्या हातातून खातात. एक सूचना, बालवाडीत मुले कशी वर्गातल्या बाईंच्या भवती गोळा होऊन
बाईंचे लक्ष वेधून घेण्याकरता बाईंच्या पदराचे टोक किंवा साडी ओढतात (निदान आमच्या
वेळी) तसेच ही हरणे आपले कपडे तोंडाने ओढून खाणं मागतात. फरक इतकाच हरणांच्या
तोंडात दात असतात आणि आपण कपड्याच्या आत असतो ह्याची त्यांना जाणीव नसते. असो.
स्वानुभवाचे बोल आहेत. प्रथमोपचार केंद्रात मदतनीसही होती आणि प्रथमोपचाराच्या
डब्यात लागणारे साहित्यही होते, प्रथमोपचारानंतर
तिने एक छापील कागद माझ्या हातात दिला त्यावर स्पष्ट शब्दात लिहिले आहे की गेल्या
५० वर्षात जपानमध्ये एकही रेबीजची घटना नाही. त्यामुळे अशा प्रसंगात कोणतेही
इंजेक्शन घेण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही इतर जखमेची जशी काळजी घेतो फक्त तशी
काळजी पुरेशी आहे. जाता जाता कागदाचे हरीण (ओरिगामी) द्यायला ती विसरली नाही.
सर्व महिला
वर्ग ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आला. खरेदी!! ओसाका मध्ये अनेक
जागा खरेदी करता प्रसिद्ध आहेत. आम्ही डोटोन्बोरी
स्ट्रीट, हे ठिकाण ओसाका शहराच्या मध्यभागी, डोटोन्बोरी नदीच्या काठावर वसलेले आहे येथे पोहोचलो.
हा रस्ता म्हणजे खाऊ गल्ली
आणि
औषधे व प्रसाधने ह्याच्या दुकानांची गर्दी.
रस्ता हा चालणाऱ्यांकरताच आहे. खाद्यगृहांवर चित्र-विचित्र हलणाऱ्या आकृत्या बहुदा
त्यात मिळणाऱ्या पदार्थांच्या जाहिराती करून खवय्यांना आकृष्ट करत होत्या. अर्थात
आमच्यापैकी कोणालाच त्यात फारसे गम्य व स्वारस्य नसल्यामुळे आम्ही सारेच अर्जुनाला
दिसणाऱ्या पोपटाच्या डोळ्यागत दुकाने हुडकत जीवाचे ओसाका / जपान करित होतो. ह्याच
रस्त्याला काटकोनात मिळणारा दुसरा रस्ता शिन्साइबाशी-सुजी. हा रस्ता जपान मधील
खरेदीसाठी सर्वात प्रसिद्ध रस्ता, ह्याही
रस्त्यावर गाड्यांचा फारसा वावर नसतो (छेद रस्ते सोडलेतर). इथे मॉल
दिसतात, जगातले बहुदा
सगळे ब्रॅंड इथे आहेत.
जपान हा तसा
महागडा देश आहे त्यामुळे फारशी स्वस्त खरेदी करण्याचा विचार करू नका. जर तुम्ही
तुमच्या वस्तूंची यादी बनवली असेल तर जपानी मार्गदर्शक ह्याही बाबतीत मदत करू
शकतात. घासाघीस कुठेही आढळली नाही. ब्रॅंडेड गोष्टींची किंमत जपान मध्ये कुठेही गेलात
तरी सारखीच असते इतर गोष्टी अशा ठिकाणी घेण्यात फायदा असतो.
खरेदीने समाधान? झालेली मंडळी शेवटच्या रात्री करता कानसाई विमानतळा लागून
असलेल्या हॉटेलात आली. सकाळी ६ वाजता न्याहरी उरकून विमानतळ गाठायचा होता. नाष्टा
करून बाहेर पडल्यावर सामान नेण्याकरता उपलब्ध केलेल्या ट्रॉलीवर सामान टाकून
हॉटेलमधून केवळ तीन-चार मिनिटे चालत आम्ही विमानतळावर पोचलो. जपानची यात्रा सफल
संपूर्ण करून आम्ही मायभूमीच्या दिशेने प्रवास सुरु केला.
हा सर्व योग
जुळवून ३० वेगवेगळ्या डोक्यांची मोट बांधून हा प्रवास घडवून आणण्याचे श्रेय
पुण्याच्या BG Tours च्या श्री. मनीष केळकरांना जाते. त्याच बरोबर हर्शल व किकी
(जपानी मार्गदर्शक) ह्यांचेही आभार मानणे उचीत ठरेल. कोणत्याही गोष्टीत काहीना
काही सुधारणा कायमच करता येतात त्यामुळे त्यात न जाता, आयोजक, सहप्रवासी ह्या सर्वांचे मनापासून आभार.