Monday, 20 March 2023

चिउताईचा दिवस

आज २० मार्च चिउताईचा दिवस. नव्हतं ना माहीत? कसं असणार? व्यापारी उद्दिष्टे नाहीत ना? ना कुठे जाहिरात आहे, ना कोणी कुणाला चिऊताईच्या दिवसाचा संदेश पाठवत आहे.  ना कुणाला भेट कार्ड पाठवायचे आहे, ना भेट वस्तू द्यायची आहे. ना गुलाबाची फुलं द्यायची आहेत, ना चॉकलेट. २० मार्च लक्षात नाही राहिला म्हणून चिऊताई थोडीच रुसणार आहे? हे मात्र खरं नाही. कारण चिऊताई तर कधीचीच रुसलेली आहे.  हल्ली तीच दर्शन दुर्मिळ झालं आहे. पक्षीविद्येत वा पक्षिशास्त्रात कुठल्याही पक्षाचा आकार सांगतांना चिमणीचा आकार प्रमाण वा परिमाण म्हणून वापरला जातो. उदा. मैना आकार = चिमणी(+), सूर्यपक्षी आकार = चिमणी(-).  तात्पर्य चिमणीचा आकार बहुतांश वाचकांना ज्ञात होता, चिमणी हा पक्षी सर्वज्ञात होता वा सहजी दिसत होता.

आजकालच्या मंडळींना चिमणी दिसते कशी हेही कादाचीत माहित नसेल. चिमणा आणि चिमणी दोघे खूप वेगवेगळे दिसतात. चिमण्याचे कपाळ, शेपटीच्या वरचा तसाच पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग (लाळेरे बांधल्यागत), पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी-काळ्या तुटक रेषा असतात. चिमणी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात आणि चोचीचा रंग फिकट तपकिरी असतो.

आमच्या लहानपणी काऊचिऊची गोष्ट माहीत नसलेले मुल शोधुन सापडलं नसत आणि आत्ता? आता बहुदा ती गोष्ट माहीत असलेली मुलं सापडणार नाहीत. मला आठवत, माझ्या लहानपणी माझी आई, काकू किंवा शेजारच्या वहिनी व्हरांड्यात तांदूळ निवडत असत. त्यांनी तांदुळतील निवडण, भातगोटे, नाचणीचा चुकार दाणा, गवताचं बी ताटातून खाली टाकलं रे टाकलं की टिपायला चांगल्या चार- सहा चिमण्या हजर असतं. आता व्हरांड्यात उभं राहून तांदूळ निवडणाऱ्या काकू, वाहिनीही नाहीत आणि चिमण्याही नाहीत.

माझ्या वयाच्या सगळ्यांनाच घराच्या वळचणीला, खिडकीच्या शटर मध्ये असलेलं चिमणीच घरट आठवत असेलं. घरटे बांधण्याकरिता काड्या, कापूस आणतांना चिमणा-चिमणीची चाललेली लगबग, आणि नंतर पिल्लांच्या चिवचिवाटात त्यांना भरविण्यासाठीची धडपड त्यावेळच्या घरांचा अविभाज्य भाग असल्यागत होता. अगदी दिवाळीच्या साफसफाईत देखील चिमणीच्या घरट्यात अंडी असतील तर त्याला हात लागत नसे. क्वचित कधीतरी घरात फिरणाऱ्या पंख्याला चिमणी धडके, आम्ही मुलं तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न करीत असतांनाच ती आश्चर्यकारकरित्या उडून जात असे. चिमण्या स्वाभाविक मिळणाऱ्या संरक्षणामुळे मनुष्यवस्तीच्या आसपास राहतात. आता खिडक्यादारांना जाळ्यांनी वेढलेलं आहे, खिडक्यांना शटरही नाहीत. वातानुकुलीत घरांत कुठून असणार वळचणी आणि कुठून असणार घरटी?

संध्याकाळी साधारण चार पाचच्या सुमारास चिमण्यांची धूळ-मातीची आंघोळ पाहणे हा आम्हा मुलांचा एक मोठ्ठा कार्यक्रम असायचा. सतआठ-दहा चिमण्या जमिनीवर उतरून मातीत आपल्या पंखांनी धूळ माती अंगावर उडवून स्वतः भोवती गोल गोल फिरत. त्यांना माती बहुदा गरम किंवा उबदार वाटत असावी. ह्या आंघोळी मागचा नेमका उद्देश कधी कळला नाही. पण आम्ही मूलं धावत जाऊन त्यांना उडवत असू आणि चिमण्या जिथें बसल्या होत्या तिथें मऊ मुलायम मस्तीचे खळगे झालेले दिसत असत. आणि हो चिमण्यांना पाण्याच्या आंघोळीचे ही वावडे नाही. साठलेल्या किंवा त्यांना पिण्याकरिता ठेवलेल्या पाण्यात यथेच्छ खळबळ करीत सचैल स्नान करतानाही त्या दिसत. आम्हाला सगळीच गंमत वाटे. आता घरांभोवती, इमारतींच्या आवारात पावसाळ्यात चिखल (चिखलाची गंमत पुन्हा कधी तरी) होतो म्हणून कोंक्रीटीकरण केल्यावर माती दिसणार कुठे आणि चिमण्या येतील कशाला?

चिमण्यांचा रोमान्स कधी बघितला आहेत का? मजेशीर असतो. दोन चिमणे एकाच चिमणीचे प्रियाराधन करीत असतात. मग दोघ अंग फुलवून एकमेकांना आव्हान देतात. एखाद दोन वेळा हूल दिल्यागत एकमेकांचा अंगावर जात अचानक दोघांची जुंपते आणि त्या द्वंद्वात स्थळ काळाच भान न राहता कधी जमिनीवर तर कधी फांदीवर अशी झोंबी होताहोता ती जशी चालू होते तशीच तडकाफडकी संपते. आव्हान वीर पोबारा करतो. हा सगळा प्रकार आपण त्या गावचेच नाही अशा थाटात चिमणाबाई बघत असतात. मग जिंकलेला चिमणा जरा जास्त फुलून उड्या मारीत तिच्या जवळ जातो. चिमणाबाई वेगळाच आवाज काढत त्याच्या अंगावर जाते तोही दोन उड्या बाजूला मारीत माघार घेतल्यासारखे करतो. सरते शेवटी चिमणाबाईंचा मिलानाकरिता होकार मिळतो आणि दोघं जोडीने घरट्याकरिता जागा शोधतात.

खरंच कां रुसली आहे चिऊताई? की चिमण्यांची संख्या जगात कमी झाली आहे? एका निरीक्षणानुसार भारतातील चिमण्यांची संख्या काही राज्यात २०% इतकी खाली आली आहे (Study by Indian Council for Agriculture Research) तर काही राज्यात ७०%. ह्याचे मूळ कारण त्यांच्या अधिवासाचा नाश, बेसुमार जंगल तोड. त्यातून भर म्हणजे नवीन बांधकामांमध्ये असलेली वातानुकुलीत घरे आणि बंद खिडक्या. कीटक नाशकांच्या वारेमाप वापरामुळे होणारा त्यांच्या अन्नाचा नाश. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे चिमण्यांची कमी होणारी संख्या.

चिमणी हा अन्न साखळीतील एक अविभाज्य घटक आहे. छोट्या कीटकांना भक्ष करतांना शिकारी पक्षाचं भक्ष्य ठरणारा हा पक्षी अन्न साखळीतला एक महत्वाचा दुवा ठरतो. ह्याचा जणु पुरावाच १९६० च्या दशकात, खरतर १९५८-१९६२ मध्ये चीन मध्ये मिळाला. त्यावेळच्या चीनी राज्यकर्त्यांनी चिमण्या नष्ट करण्याकरिता फतवा काढला. कां? तर चिमण्या पिकांच नुकसान करतात, आणि त्याचा परिणाम पिक उत्पनावर होतो. झालं. माणसाविरुद्धच्या लढाईत चिमणी किती टिकणार? चिमण्या विरोधी मोहीम फत्ते झाली. पण त्या वर्षी आलेलं पिकाच उत्पन्न, आधीच्या वर्षांच्या तुलनेने खूपच कमी आलं. टोळ धाडींचे प्रमाण खूप वाढले होते. चीनी राज्यकर्त्यांचे डोळे उघडले. निसर्गाचा तोल ढळवणे एक वेळ सोपे असेल पण सावरणे महा कठीण.   

नेचर फोरेवर सोसायटीचे संस्थापक व अध्यक्ष मोहंमद दिलावर यांनी हा दिवस २०१० साली  सुरु केला. सह्योग्यांबरोबर गप्पा मारता मारता ही कल्पना पुढे आली आणि सत्यात उतरली. जगभरात २० मार्च हा sparrow day म्हणून साजरा होतो. ह्या वर्षाच्या जागतिक चिऊताई दिवसाची मूळ संकल्पना “I Love Sparrow” अशी आहे. आपण हा दिवस साजरा करण्याकरिता काय करू शकतो? जागरुकता निर्माण करू शकतो, ज्यांना शक्य असेलं त्यांनी घराच्या आसपास पक्षी खाद्याचे फिडर टांगणे, पक्षांना पाणी ठेवणे. पक्षी घरे (Bird houses) लावता येतील वगैरे.

दिल्ली आणि बिहार राज्यांनी चिमणीला आपला राज्य पक्षी घोषित केले आहे. चिमणी हा इटलीचा राष्ट्रीय पक्षी आहे.

जागरूकता निर्माण करणे तर सर्व नक्कीच करू शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केला तर पुन्हा एकदा आपल्याला सकाळ-संध्याकाळ चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येईल आणि त्यांची संख्या वाढू शकेल.


Thursday, 23 February 2023

अवघा रंग एक झाला

 

अवघा रंग एक झाला... या अभंगात प्रत्येक चरणात ७ शब्द आणि असे सात चरण म्हणजे ४९ शब्द. ह्या ४९ शब्दात एक जगावेगळी अनुभूती व्यक्त करायची हे केवळ सोयाराबाईच करू जाणे, ह्या अभंगाच निरुपण म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. कोणत्याही स्वानुभवाशिवाय निरुपण म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे. पण व्यक्त होण्याकरिता त्यांची मदत घेण्यावाचून पर्याय नाही. 

अवघा रंग एक झाला

रंगी रंगला श्रीरंग

भागवत धर्म हा प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात असून त्यात विष्णु आणि विशेषतः त्याचा कृष्णावतार वासुदेव भगवान हाच उपास्य आहे आणि वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल, हे विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहे.

कृष्ण सावळा, विठू सावळा, सावळा हरी, हरी भक्तही सावळा! 

आषाढातील एकादशी. झाकोळलेले नभ आहे. सावळ्या मेघांची आभाळात दाटी आहे. सह्याद्रीचे ओले कातळ, काळे तुकतुकीत दिसत आहेत. अवघा रंग, अवघ्या विश्वाचा रंग एक झाला आहे, विठूचा झाला आहे, श्री चा झाला आहे. 

अभंगाची पाहिली ओवी बाह्य रूपाशी तादात्म्य पावण्याच वर्णन करते. बाह्य रंग एक झाला, हा बाहेरून सुरु झालेला प्रवास हळुहळु अंतरात्म्यापर्यंत कसा जातो हे बघण्यासारखे आहे.

विठूच्या दर्शनाने...

मी तूपण गेले वाया

पाहता पंढरीच्या राया

द्वैत दूर झाले. मी आणि तू ह्यातील वेगळेपण लयास गेले, असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. कवियत्री सोयराबाई आहेचोखियाची महारी (चोखियाची पत्नी) अस्पृश्य आहे आणि त्यातून स्त्री म्हणून तिच्या लिखाणास, विठू दर्शनाच्या तिच्या ओढीबद्दलसमाजाकडून तीची जी काही घोर अवहेलना झाली असेल ते लक्षात घेतले, तर मी तू पणाला, सामाजिक भेदाचा अमंगल वास येतो. हे भेदाभेद करणाऱ्यांना उद्देशून आहे असे वाटते आणि तरीदेखील सोयराबाई क्षमाशील वाटतात, सूर समजावणीचा वाटतो. त्या सगळ्यांनाच विचारत आहेत काय मिळालं हा भेदाभेद करून? हाती काहीच आल नाही. तुझा काय आणि माझा काय अहंकार सारखाच गळला. त्या पंढरीच्या रायाच्या नजरेत असा कुठलाच भेदभाव, आपपर भाव, मी श्रेष्ठ तू कनिष्ठ अशी भावना दिसली नाही. मग तू कोण असा लागून गेलास की हा भेद भाव करावास? केलास तर केलास तोही वायाच गेला ना शेवटी. 

नाही भेदाचे ते काम

पळोनी गेले क्रोध काम

ह्या दोन ओळींकरता सोयाराबाईंच्या हुषारीला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. बघा आपल्याला शाड्रिपू माहीत आहेत. ते खालील प्रमाणे-

लोभ, मोह, मद आणि मत्सर,

काम आणि क्रोध.

लिहिताना मुद्दाम चार आणि दोन असे वेगळे लिहिले आहेत. चाणाक्षांच्या लगेच लक्षात आल असेल की अस लिहिण्यामागे काय उद्देश असावा. पहिल्या चार शत्रूंच्या अस्तित्वाला, भेद, दुजा भाव असणे गरजेचं आहे. लोभ (हाव) माझ्याकडे आहे पण अजून हवं आहे इतरांकडून ओरबाडयाचे आहे आणि मोहा करिता दुसऱ्याकडे जे आहे ते माझ्याकडे हवं ही लालसा. मद, गर्व ह्या करिताही तुलना गरजेची आणि मत्सर ज्याचा करायचा, तो हवाच की. पंढरीच्या रायाच्या दर्शनाने घडलं काय? लोभ, मद, मोह, मत्सर नष्ट झाले मग भेदाचे कामचं उरले नाही. सोयराबाई ह्या चारही शत्रूंच्या असण्याला भेदभावाला जबाबदार धरतात. आता उरलेले दोन रिपू, क्रोध आणि काम, ज्यांच्या असण्याला आपण स्वतःच जबाबदार असतो तेव्हा ते देखील विठूच्या दर्शनाने पळोनी गेले. ‘काम’ शब्दावराचा श्लेष चरणाच्या सौंदर्यात अधिक भर घालतो.

पुढच्या दोन ओळी विठूचे प्रत्यक्ष वर्णन वाटते. 

देही असोनी विदेही

सदा समाधिस्त पाही

विठ्ठलाला मानवी देह रूप आहे आणि त्याची असंख्य वर्णने आहेत. पण तसे असूनही त्याच्या देहातीत रूपाच्या अस्तित्वाची जाणीव झाल्या शिवाय रहात नाही. 

ही द्विधावस्था ज्ञानेश्वरानी केलेल्या विठ्ठलाच्या वर्णनात फार सुरेख प्रकट होते. तुज सगुण म्हणो की निर्गुण रे.... ह्या वर्णनात येणाऱ्या परस्पर विरोधी जोड्या बघण्यासारख्या आहेत. 

सगुण - निर्गुण, अनुमाने - ना अनुमाने( नेति - नेति)स्थूल - सूक्ष्म, आकारू - निराकारू, दृश्य - अदृश्य, व्यक्त - अव्यक्त

ह्याच उत्तर म्हणून ज्ञानदेव पुढे म्हणतात, दोहोच एकत्र रूप म्हणजेच तो गोविंद.

ह्या पलीकडे विदेही म्हणजे नेमके काय? ज्याच्या भौतिक देहाच्या कर्म - अकर्मा मुळे त्याचा सूक्ष्म देह (आत्मा) लिप्त होत नाही. त्या कर्म - अकर्माच्या फळाचा परिणाम ज्याच्यावर होत नाही तो विदेही.  

मिथिलेचा राजा जनक विदेही होता असे मानतात. त्याने देवांच्या बाजूने दानवांविरुद्ध अनेक युद्धे केली. मिथिलेचा राजा म्हणून राज्य केले. सीतेचे कन्यादान ही एक पिता म्हणून केले. पण ह्यातील कोणत्याही कर्माचा त्याच्या आत्म्यावर परिणाम झाला नाही आणि तो जन्म - मृत्यूच्या चक्रातून कायम मुक्त राहिला.

विठ्ठलाला जर ह्या विश्र्वात घडणाऱ्या सगळ्याच चांगल्या वाईटाचा कर्ता करविता मानले तर ह्या सकारात्मक, नकारात्मक कर्मांचा, त्यांच्या फळांचा साधक बाधक परिणाम विठ्ठलावर होताना दिसायला हवा, पण तसे दिसत नाही. म्हणजेच एकाच वेळेला कर्म करण्याकरिता तुम्ही सगुण (देही) असायला हवं आणि त्या कर्माने अस्पर्श राहण्याकरिता विदेही. ते रूप पाहणाऱ्याने, द्रष्ट्याने कसे पाहावे? ह्या करिता पुढची ओळ विचाराला चालना देणारी आहे. हे जे विदेही रूप आहे ते द्रष्ट्याला तो स्वतः समाधीत असताना दिसते. सदा समाधिस्त पाही!

नाकी विठ्ठल सदा समाधिस्त असतो, आणि विठ्ठ्लाचे रूप विदेही असते. 

थोडक्यात विठ्ठलाचे विदेही रूप पाहण्याकरिता द्रष्ट्याला समाधिस्त व्हावं लागेल. हे विदेही रूप पाहण्याकरिता भक्ताला सुद्धा एक उंची गाठावी लागेल. आम भक्तांना, सर्वसामान्यांना ते रूप दिसणार नाही.

पाहते पाहणे देले दूरी

म्हणे चोखियाची महारी 

अवघा रंग एक होणे ही जर पहिली पायरी मानली तर वरील चरण कळस म्हणता येईल. समाधिस्त होऊन विठ्ठलाचे विदेही रूप दिसेपर्यंत पाहण्याची क्रिया होते आणि दृश्याचे वर्णन, त्याचे परिणाम येतात. जे बघायचे ते आणि बघणारा, हे वेगवेगळे आहेत. ज्ञेय आणि ज्ञाता वेगवेगळे आहेत. ह्या नंतरची स्थिती ही खरंतर व्यक्तिगत अनुभूती आहे, कवियत्रीचा स्वतःचा अनुभव आहे, सोयराबाईंचे विठ्ठल रुपाशी, विठ्ठलाशी तादात्म्य पावणे आहे, तल्लीन होणे आहे. विठ्ठलाला बघता बघता बघणारी सोयराबाई विठ्ठलमय झाली. जे बघायचे ते आणि बघणारी एकरूप झाले. पहाणारीच जर उरली नाही, तर पाहणे कसे बरे शिल्लक राहील? पाहता, पाहता पाहणेच दूर गेले, ती क्रिया निघून गेली, संपून गेली त्याची गरजच संपली. अस्तित्व, असण्याचा धर्म, भाव हाच जर विठ्ठल रुपात विलीन झाला, माझे आणि विठ्ठलाचे असणेच जर एक झाले, तर बघायला काय उरेल?

एव्हढी गहन अनुभूती अशा सोप्या शब्दात अभंग रुपात सांगणे ही सोयराबाईंच्या मुखातून आलेली देववाणीच म्हणावी लागेल.

Wednesday, 4 May 2022

वसंतोत्सव

चेरी ब्लॉसम उत्सव-जपान, कार्निवल मेक्सिको, या देशांबरोबरच चीन, स्पेन, हॉलंड, थायलंड इत्यादींमधील वसंतोत्सव हे जगप्रसिद्ध आहेत. भारत देखील त्यात मागे नाही. भारताच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या नावाने वसंतोत्सव साजरा होतो. वसंतागमनाची वर्दी देणारे होलीकोत्सव, गोव्याचा शिग्मो, बैशाखी, खुद्द वसंतात वसंत पंचमी, चैत्र पाडवा, गोवा कार्निवल, उगाडी, बोहाग बिहू किती तरी नाव सांगता येतील. ह्या सगळ्या उत्सवांच मूळ, वसंतात निसर्ग जो आनंद, उल्हास, चैतन्य आणि नाना रंगांची उधळण करीत असतो, निसंश:य त्यातच असलं पाहिजे.

चैत्र सुरु होतो न होतो तोच सगळी झाडं जणु कात टाकावी तशी जुनी पान गाळून, मोहक हिरव्या, गुलाबी, लाल रंगात रंगून जातात. लुसलुशीत पालवीने डवरलेली झाडं, उन्हात इतकी सुंदर दिसतात की नजर हलतच नाही. त्यात पिंपळाचा थाट काही वेगळाच. पानांच्या एकजुटीचा विजय असो! असे म्हणत गळतातही एकत्र आणि नित्य नवा साज लेऊन येतातही एकत्र. सृष्टी जणु नवीन वस्त्रे परिधान करून पुढे येणाऱ्या पुष्पोत्सवाला हजेरी लावण्याची तयारी करीत असते.

उन्हाचा चटका जाणवायला नुकतीच सुरुवात होते. पारा हळुहळु चढत असतो, जणु ‘दाहक परी संजीवक’ ह्याचा दाखला देत प्रथम फुलतात ती Tabebuia Rosea Pink Trumpet झाडे, (मराठी नाव??) गुलाबी कागदी फुलांचा डोलारा सांभाळत इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ठाण्याकडे जातांना उजव्या बाजूला ओळीत दिसतात. गुलाबी रंगाच्या इतक्या वेगवेगळ्या छटा पहायला मिळतात की जणु काही प्रत्येक झाड सांगत असते माझा रंग पण गुलाबी आहे पण मी शेजाऱ्यासारखा नाही. ह्या फुलांच्या पाकळ्यांचा स्पर्श एखाद्या पातळ कागदासारखा भासतो. बहर चांगला १५-२० दिवस टिकतो. ह्या झाडाचे मूळ स्थान अमेरिका खंड, पण इथल्या उष्णकटिबंधीय वातावरणात इतका छान रमलाय की आता तो उपरा वाटतच नाही. नाहीतरी परकीयांनी आपल्या मातीत रुजणे हे आपल्या परंपरेला धरूनच आहे.

त्याच सुमारास त्याच रस्त्यावर डाव्या बाजूला दिसतात शाल्मलीची (काटे सावर) लालचुटूक फुले. चाफ्यासारखा हाही पर्णरहित आणि फुलांनी डवरलेला दिसतो. त्या फुलांवर वेगवेळ्या प्रकारचे फुल टोचे (Flower Peckers) फुलातील मधाचा चोच भरून आस्वाद घेतांना दिसतात. हा बहर ओसरल्यावर त्य फुलांची जागा हिरव्यागार बोन्डांनी घेतलेली दिसते. यथावकाश उन्हाने वाळून बोंडे तडकून त्यातील कापूस, म्हाताऱ्या होऊन वाऱ्यावर अल्लद तरंगत जातांना दिसतो.

ह्या सगळ्यांमधे हिरीरीने आपल्या  पिवळ्या धम्मक फुलांचे झेंडे घेऊन पिवळा गुलमोहोर, ताम्रशेंगी (Peltrophorum Ptercarpum, Copperpod, Yellow Flame) आपल्या फुलांच्या पसाऱ्याने आणि मंद, थोडासा उग्र पण सुदूर पसरणाऱ्या सुगंधाने लक्ष वेधून घेतों. प्रथम लक्ष जाते ते गळलेल्या फुलांच्या पखरणीकडे. बघण्यासारखी असते. ह्याच्या कळ्यांचा रंग आणि नंतर येणाऱ्या शेंगांचा रंग लालसर तपकिरी, ताम्रवर्णी असतो. प्रथम फुलांचा डोलारा घेऊन आणि नंतर शेंगाचा भार डोक्यावर वहात हा पाहाणाऱ्यांना दृष्टी-गंधाचे सुख एकाचवेळी देतो. दक्षिण आशियात प्रामुख्याने आढळणारा हा वृक्ष आता जगभर पसरला आहे.

मुंबई पुणे जलद महामार्गावर आणि पुण्यात देखील विपुल प्रमाणात दिसणारा निळ्या सुवासिक फुलांनी बहरलेला Jacaranda (निळा मोहोर) वृक्ष. ही झाडं देखील जमिनीवर पडलेल्या फुलांचा सडा पाहून प्रथम लक्ष वेधून घेतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून हा वृक्ष फुलायला सुरवात होते. याच जलद महामार्गावर दरीच्या उतारावर पांगाऱ्याची लाल भडक नजरेलाही जाड जाणवणाऱ्या पाकळ्यांची आकाशाकडे उमलणारी फुले दिसतात. जंगल फ्लेम (Jungle Flame – अग्निशिखा) या नावाने ओळखले जाण्याचे स्वाभाविक कारण. याही झाडावर फुलातील मधाकरिता फुल टोचे आणि मैनांची गर्दी दिसते. 

ह्या सर्व झाडांमध्ये आपल्या विशिष्ठ लाल रंगाने उठून दिसतो तो गुलमोहोर. त्याची मधली पाकळी पिवळ्या-लाल रंगाची (हळद-कुंकू) खूपच खुलुन दिसते. त्याच्या कळ्या घेऊन आम्ही लहानपणी त्या एकमेकांवर मारून तोडण्याचा खेळ करत असू. ज्याची काळी टिकेल तो जिंकला. ह्या फुलातील मधली पाकळी काढून खाल्याचे देखील आठवते आहे. नेमकी चव सांगता येणार नाही पण तुरट-गोड अशी काहीशी असावी. जागोजागी अगदी लहान झाडाला देखील एक दोन फांद्या फुलांच्या वजनाने नतमस्तक होऊन आपल्याकडे लक्ष वेधून घेतांना दिसतात. फुले गळत असतानाच चपट्या गडद हिरव्या रंगाच्या शेंगानी झाड भरून जाते. हा हा म्हणता या शेंगा वाळून तपकिरी झाल्यावर आतील बियांच्या आवाजाने खुळखुळायला लागतात. लहानपणी ह्या लहानश्या तलवारी सारख्या दिसणाऱ्या शेंगांनी लुटुपुटुच्या लढाया केलेल्या बहुतेक मुलांना आठवतील.

बहावा किंवा बाहवा, इंडिअन लॅबर्नम (Cassia Fistula, Golden Shower) इतके समर्पक नाव असेलेला बहुदा एकमेव वृक्ष असावा. सगळी नाव ही त्याच्या फुलांवरून, शेंगांवरून पडली आहेत. ह्या सोनसळी फुलांची कांचन झुंबरे झाडावर झुलताना तुमच्या नजरेतून सुटूच शकत नाहीत. ह्या झाडाची हलकी हिरवी पोपटी पालवी, पिवळ्या धम्मक फुलांचे घोस, त्यावर रुंजी घालणारी फुलपाखरे आणि छोटे भिरभिरणारे मधु भक्षी, मधेच लोंबणाऱ्या हिरव्या नळी सारख्या असलेल्या शेंगा. बहर सरेपर्यंत त्या वाळून तपकिरी रंगाच्या होतात आणि त्या हिरव्या, पिवळ्या रंगसंगतीत आपल्या रंगाची मोहक भर घालतात. हे दृश्य डोळ्यात साठवावे तेव्हढे थोडेच आहे. बाह्वाच्या शेंगांवरून आठवले, विषयांतराचा दोष पत्करून सांगतो. बाह्वाची ओळख मला व्यंकटेश माडगुळकरांच्या एका लेखावरून झाली. लेखाचे शीर्षक आत्ता आठवत नाही.  ह्या शेंगा अस्वलाला खूप आवडतात. बाहावाच्या झाडाखालून जातांना स्वारीला मोह आवरत नाही मग एकामागून एका शेंगेवर पोटभरेस्तो ताव मारून अस्वल पुढे जाऊन सावलीला अंमळ लवंडते. ह्या शेंगाचा गर सारक असतो. अतिसेवनामुळे व्हायचे तेच होते अस्वल अतिसाराची शिकार होऊन दोन दिवस जवळपासच निपचित पडून राहते. तरतरी आल्यावर भुकेची जाणीव होते आणि बाह्वाच्या शेंगा पुन्हा खुणावतात मग काय पहिले पाढे पंचावन्न. पुन्हा तीच अवस्था हा सगळा प्रकार त्या झाडाच्या सगळया शेंगा संपेपर्यंत चालतो. परिणामतः बाह्वाच्या बिया मात्र पसरतात आणि रुजतात देखील. 

कल्पना करा, बहरलेला बाहवा, त्यावर झुकलेल्या, लाल चुटूक फुलांनी लगडलेल्या गुलमोहोराच्या फांद्या आणि त्याला निळ्या मोहोराची पार्श्वभूमी!! अहाहा असा रंगांचा खेळ फक्त निसर्गच करू जाणे. हाही वसंत त्याला अपवाद नाही. दोन्ही हातानी भरभरू उधळतोय निसर्ग! हा रंग सोहळा पाहिला नसलात तर एकदा मान वर करून नक्की पहा !

Saturday, 9 October 2021

कुंती

कुंती, महाभारतातील असं एक व्यक्तिमत्व की जे रंगमंचावर दिसत नसलं तरी आपल्या अस्तित्वाची सदोदित जाणीव करून देत रहात. कुंती शुरसेनाची मुलगी. यादव कुलोत्पन्न, वसुदेवाची बहिण, कृष्णाची सख्खी आत्या. पाळण्यातील नाव पृथा, शब्दशः अर्थाने पृथ्वीची कन्या. कुंतिभोज राजाची दत्तक कन्या म्हणून कुंती.

महाभारत नावाच्या प्रचंड गुंतागुंत असलेल्या महाकाय जुळणी कोड्याच्या (jigsaw puzzle) काही प्राथमिक तुकड्यांची सुरवात कदाचित दुर्वास मुनींनी कुंतीभोज राजाला दिलेल्या भेटी पासून झाली असेल असे वाटते. महाकोपिष्ट दुर्वास मुनींची भेट म्हणजे यजमानांवर संकटच. त्यांच्या रागाच्या धाकाची कल्पना करा, एक पिता जो राजा आहे, दुर्वासांच्या दिमतीला असंख्य दास, दासी ठेवण्याची त्याची कुवत असूनही आपल्या मुलीला त्यांची सेवा करण्यास सांगतो. आज्ञाधारक कन्या आपल्या पित्याच्या इच्छेनुसार दुर्वास ऋषींची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतें. संतुष्ट होऊन दुर्वास ऋषींनी तिला आशीर्वाद देऊन एक मंत्र सांगितला. त्या मंत्राचा जप करून कुंती ज्या मानवाचे, दानवाचे वा देवाचे स्मरण करेल, त्याच्या पासून तिला पुत्रप्राप्ती करून घेता येईल. (आजच्या सामाजिक मापदंडानुसार विचार करून कर्ण दुर्वास पुत्र होता असा मुद्दा मांडण्याचा मोह अनेकांना होईल पण कृपया तो टाळावा. अन्यथा कर्ण ब्राह्मण पुत्र ठरेल आणि व्यासांना महाभारत नव्याने लिहावं लागेल). थोडा विचार केला की या मंत्राचं किंवा दिलेल्या वराचं महत्व लक्षात येईल. भविष्यात कुंतीला जो पती मिळेल त्याच्या पासून तिला पुत्र प्राप्तीची शक्यता नाही आणि वेळेवर पुत्रप्राप्ती होणे हे राज्याला वारस देण्याच्या दृष्टीने आत्यंतिक गरजेचे असेल त्यावेळी हा मंत्र उपयोगी ठरेल ह्याची जाणीव दुर्वास ऋषींना होती असे म्हणावे लागेल. महाभारतातील अनंत प्रसंगांच्या साखळीतील अनेक सुरवातीच्या दुव्यांमधील एक दुवा म्हणता येईल असा हा प्रसंग.

तारुण्य सुलभ उतावळेपणा म्हणा, औत्सुक्त्य म्हणा, मिळालेल्या मंत्राचा वापर करून पहाण्याचा, त्याची शहानिशा करण्याचा मोह होण आत्यंतिक स्वाभाविक होतं आणि तो तसा कुंतीला झाला. त्या काळी आजच्या मुलामुलीं प्रमाणे इतक्या लहान वयात कोणावर आकृष्ट वगैरे होण्याचा प्रकार नसावा त्यामुळे मंत्राच स्मरण करतांना, रोज सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देताना दिसणारं, त्याचं ते सालस गोजिरे रूपच, कुंतीच्या डोळ्यासमोर आलं असावं. दुर्वासांचा मंत्र फुकट जाण्याचा वा सफल न होण्याचा संभवच नव्हता. कर्णाचा जन्म झाला. हेतू, कुतूहल शमन करण्याचा होता, माता होण्याचा नव्हे. कर्णाच्या जन्माबरोबरच तिच्यातील मातेआधी क्षत्रिय राजकन्या जागी झाली, राजाला, राज्याला हानी पोहोचेल असं कोणतही कृत्य आपल्या हातून घडू नये यासाठी ती जागृत झाली आणि कर्णाचा त्याग हा सोप्पा मार्ग अनुसरून मोकळी देखील झाली. तिच्यातील या क्षत्रिय स्त्रीच्या असंख्य प्रसंगांचे निष्ठुर दाखले महाभारतात पदोपदी मिळतात.   

यथावकाशाने कुंतीचा विवाह बलिष्ट कुरुवंशातील युवराजाशी, पंडुशी झाला. पंडूला कुंती पासून अपत्य होत नाही असे दिसल्यावर, मद्र कन्या माद्रीशी पंडूचा दुसरा विवाह केला गेला (त्या काळीही, पुरुषी अहंकारामुळे, पुत्र प्राप्ती ही बहुदा केवळ स्त्रीची जबाबदारी होती, अर्थात कुंतीने ती पार देखील पाडली). स्वाभिमानी कुंतीला कदाचित अपमान वाटला असेल किंवा पंडूच्या मर्यादा ठाऊक असल्यामुळे मनोमन हसूही आलं असेल. सर्व संमत्तीने नियोगाने पुत्रप्राप्ती करून घेण्यासाठी पंडू दोन्ही भार्यांसह वनात निघून गेला. काळ आपल्या गतीने जात होता, धृतराष्ट्राचा विवाह गांधार देशाच्या राजकन्येशी गांधारीशी झाला (आणि रंगमंचावर शकुनीच्या रूपाने खलनायकाचा वावर सुरु झाला – प्रसंगांचे कंगोरे दर्शवण्याचा मोह आवरला नाही). (वाचा ब्लॉगपोस्ट गांधारी). गांधारी गरोदर असल्याच्या बातम्या कुंती पर्यंत पोहोचल्या आणि तिची घालमेल सुरु झाली. ज्या कामा करिता आपण वनात आलो ते काम पूर्ण करावं, असा धोशा तिने पंडूच्या मागे लावला. हेतू, क्षत्रिय राज्ञीचा, पंडूच्या गादीला वारस मिळावा, कुरुवंशाचे राज सिंहासन पंडू पुत्रांकडे रहावं (नियोगाच्या नियमांनुसार अशी मुले त्यांच्या जैविक वडिलांची न मानता आईच्या पतीची मानली जात असतं).

सिंहासनाला वारस म्हणून एकच पुत्र असून भागणार होतं. राजा हा शांत, धर्मप्रिय, मृदू, सत्यवचनी असावा पण राज्य राखण्याकरिता वाढविण्याकरिता, मिळवण्याकरिता (ही परिस्थिती ओढवू शकते ह्याची पृथेला पूरेपर जाणीव होती) हे गुण पुरेसे नाहीत. शौर्य, गरज पडल्यास क्रौर्य, युद्ध शास्त्रात नैपुण्य, कुशाग्र, बलाढ्य, थोडक्यात काय षड्रीपुंशी दोस्ती नाही पण फारकत देखील घेतलेली नसावी अशा योध्यांची राजाला निश्चित गरज आहे. ह्या सर्वांकरिता बाहेरील कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या सहोदरांची साथ मिळाली तर अधिक काय हवं? ह्याची कुंतीला पुरेपूर कल्पना होती. नियोग किंवा दुर्वासांनी दिलेला मंत्र जे असेल ते असो, पण नियोगा करिता वा मंत्रोच्चार करतांना स्मरण करण्याकरिता, निवड केलेल्या देवतांची नावे पाहिली की कुंतीच्या दूरदृष्टीला दाद द्यावीशी वाटते. यमधर्म, वायू आणि इंद्र हे क्रमशः युधिष्टिर, भीम व अर्जुन ह्यांचे जन्मदात्रे ठरले. पुर्वनियोजनानुसार युधिष्ठिरा पाठोपाठ भिमार्जुनांचा जन्म बरच काही सांगून जातो. माद्रीला मंत्र सांगण्याचा मोठेपणा आणि त्यानंतर पंडूला व माद्रीला तिने मिळू दिलेला एकांत (तिच्या सारख्या दक्ष स्त्रीच्या हातून ही चूक होऊ शकत नाही). ह्यात शापित दुबळ्या पंडूची आहुती पडली आणि माद्री सती गेली. माद्रीच्या रूपाने सत्तेचा एका दावेदार निर्माण होण्यापूर्वीच संपला आणि नकुल सहदेव लहान वयातच कुंतीच्या पदरा खाली आले. कुंती पुत्रांबारोवर त्यांची नाळच जणु कायमची जोडली गेली (पंडू व धृतराष्ट्र देखील एकाच पित्यापासून पण भिन्न मातांच्या पोटी जन्माला आले होते). एका महत्वाकांक्षी राज्ञीला जगण्याकरिता एक हेतू मिळाला. पुढचा प्रवास केवळ पंडू पुत्रांना त्यांचा हक्क मिळवून देणे वा त्यांनी तो मिळवण्याकरिता त्यांना तयार करणे हे उद्दिष्ट गाठणे या दिशेने चालू राहिला.

लाक्षागृहातून सहीसलामत निसटल्यानंतर अज्ञातवासात भीमाकरवी घडवलेला बकासुर व हिडींब राक्षसांचा निप्पात आणि त्या पश्चात बलाढ्य राक्षस वंशाशी कायमचे वैर टाळण्याकरता भीम व हिडीम्बेच्या विवाहाला दिलेली मान्यता. न्यायाने घटोत्कच हा पांडवांचा वारस ठरलास असता, ते टाळण्याकरिता, हिडींबेला मुल झाल्यानंतर, ती भीमाशी कोणताही व्यवहार वा संबंध ठेवणार नाही असे हिडीम्बेकडून घेतलेले वचन. ह्या तिच्या कृतींमधून, कुंतीच्या  राजकीय मुत्सद्देगिरीचा एक नमुना आपणास पहावयास मिळतो असे म्हणायला हरकत नाही. हे करीत असतांना एक स्त्री म्हणून हिडीम्बेला काय वाटेल, तिचे भीमावर प्रेम होते म्हणून ती ह्या दिव्याला तयार झाली ह्या कशाचाच परिणाम निर्णय घेतांना कुंतीवर झाला नाही. ह्याच हिडीम्बेच्या पुत्राचे, घटोत्कच्याचे बलिदान कृष्णाने कुरुक्क्षेत्रावरील महायुद्धात दिले आणि अर्जुनाला मारक ठरणारी वासवी शक्ती वापरण्यास कर्णाला भाग पडले (वाचा ब्लॉगपोस्ट बलिदान).

द्रौपदीला स्वयंवरात खरतर, पण पुरा करून, अर्जुनाने जिंकले होते. द्रौपदीने देखील मनोमन अर्जुनास वरले असावे. पाच पांडव तिला घेऊन परत आल्यावर तिचा विवाह पाचांशी व्हावा ही कुंतीची आज्ञा काही अंशी अमानुष वाटली तरी ती पाच पांडवांना घट्ट बांधून ठेवणारी ठरली. खास करून नकुल व सहदेव, ज्यांच्यात त्यांच्या वडीलबधुंइतकी क्षमता नव्हती. ही आज्ञा देतांना देखील द्रौपदीला, अर्जुनाला काय वाटेल, त्यांच्या भावना, ह्याचा विचार ती करत बसली नाही. द्रौपदीला पाहताक्षणी तिच्या लक्षात आलं की ह्या अलौकिक सौंदर्याचा मोह बाकीच्या भावांना आज न उद्या पडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तो प्रश्न निर्माण होण्यापुर्वीच तिने निकालात काढला.  

ह्या सगळ्या तिच्या निर्णयांवर कडी म्हणजे कुंतीची आणि कर्णाची भेट. बघण्यासारखे आहे, त्या भेटीची वेळ, नेमेकी महायुद्ध सुरु होण्यापूर्वी, कर्णाने पूर्ण निर्धाराने दुर्योधना बरोबर उभं रहाण्याचा निर्णय घेतल्यानंतर. भेटीत कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगितल्यावर त्याची सर्व बलस्थाने मुळापासून उखडली जातील ह्याची पूर्ण कल्पना कृष्णाला होती. कृष्णाच्या इच्छेनुसार ती गोष्ट कुंतीने अमलात आणली. ज्या कर्णाला आपण सोडून दिले त्याच्या कडून आपल्या चार  पुत्रांकारिता अभय मागतांना तिला यातना झाल्या होत्या की नाही ते कळायला मार्ग नाही. हे करीत असतांना तिने आपल्या पाचही पुत्रांना वाचवले (अर्जुनाला कृष्णाचे अभय होते).   

यादव राजकन्या म्हणून जन्माला आल्यापासून, ते कुरु राज्याची राजमाता होण्यापर्यंत, कुंतीने केलेला हा प्रवास बघतांना डोळ्यासमोर एक राजकारणी, धूर्त धुरीण, धोरणी, काहीशी कठोर आणि जन्मदात्री असूनही पुत्रांची निवड करणारी स्त्री उभी राहिल्याशिवाय रहात नाही. किंबहुना कुंतीला महाभारताला दिशा देणारी स्त्री म्हटली तरी फारसं गैर ठरणार नाही. 

Sunday, 15 August 2021

अश्वत्थामा एक रूपक?

 हेहीवाचा” ह्या माझ्या ब्लॉग मधून आतापर्यंत मी महाभारतातील शल्य, घटोत्कच, कृष्णा, भीष्म आणि गांधारी ही पात्रे माझ्यापरीने उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. महाकवी व्यासांचं महाभारत, ही विविध व्यक्तिमत्वांची कधीही न संपणारी खाण आहे. आज महाभारतातील असेच एक न उलगडलेलं, बहुतांशी दुर्लक्षिलेलं, किंबहुना महाभारतात त्याच्या असण्याच प्रयोजन न कळणारं व्यक्तिमत्व, तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.  

बहुतेकांना अश्वथामा माहीत आहे तो लहानपणी वडिलांच्या गुरुकुलात आलेल्या राजापुत्रांप्रमाणे दूध पिण्याकरिता हट्ट धरणारा आणि महायुद्धाच्या अखेरीस झोपलेल्या पांडव पुत्रांचा वध करणारा चिरंजीव म्हणून.  

कुरुगुरू आचार्य द्रोण (द्रोणातून जन्माला आलेला? आद्य Test Tube Baby?) आणि कृपाचार्यांची भगिनी कृपी ह्यांना शंकराच्या कृपाप्रसादाने झालेला पुत्र. जन्मतःच मस्तकी तेजस्वी रत्न धारण केलेला. ज्या रत्नाच्या प्रभावामुळे तहानभूकेपासून मुक्त असलेला. जन्मतःच त्याने उच्चैःश्रवा सारखा ध्वनी केला म्हणून त्याचे नाव अश्वथामा पडले. (ग्रीक पुराणात आलेल्या centaur शी तर साधर्म्य नसेल? उगाच आपली शंका).

भारद्वाज मुनींचा पुत्र द्रोण वडिलांचं गुरुकुल असून देखील अग्निवेशांच्या आश्रमात शिक्षणासाठी राहिले. कदाचित पितृ प्रेमामुळे मुलाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये हा त्या मागचा हेतू असावा. अग्निवेशांच्या आश्रमातच गुरुबंधू असलेला पांचाल देशाचा राजपुत्र द्रुपद पुढे जाऊन राजा झाल्यावर द्रोणांना ओळख देण्यास नकार देतो किंबहुना दरबारातून अवमानित करून पाठवतो. अपमानित द्रोण गुरुदक्षिणा म्हणून पांडवां करवी द्रुपदाला पराजित करून सूड घेतात. पांचाल देशाचे साम्राज्य विभागून उत्तर पांचालचा राजा म्हणून अश्वथाम्याचा राज्याभिषेक करतात.

ह्या प्रसंगा पर्यंत अश्वथाम्याच्या बालपणीची दुधाची गोष्ट सोडली तर महाभारतात त्याचा खास असा उल्लेख आढळत नाही. राजा होण्याचं वय असून देखील वडिलांच्या अपमानाचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न अश्वथाम्याकडून झालेला दिसत नाही. पांडवांच्या पराक्रमाने राज्य मिळालेलं असून देखील कौरवांच्या बाजूने पांडवाच्या विरुद्ध लढतांना तो दिसतो. इतकेच नव्हे तर आत्यंतिक अधर्माने पांडवांचा वध करण्याचा प्रयत्नही तो करतो. १८ दिवस चाललेल्या महाभारतातील युद्धात प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या महावीराने गाजवला होता. अश्वथाम्याच्या नावावर मात्र त्यातील कोणताही दिवस नाही. घटोत्कचाचा पराभव करण्यात अश्वथाम्याला आलेल्या अपशामुळे घटोत्कचाच्या वधाकरीता कर्णाला वासवी शक्तीचा वापर करावा लागला (वासवी शक्ती जर अर्जुना बरोबरच्या युद्धात कर्णाकडे असती तर महायुद्धाचा निकाल कदाचित वेगळा लागला असता). नाही म्हणायला, घटोत्कचाच्या राक्षस सेनेचा समर्थपणे प्रतिकार करून त्याच्या पुत्राचा त्याने केलेला वध ही एक जमेची बाजू. पित्याच्या, द्रोणाचार्यांच्या मृत्युनंतर नारायणास्त्राचा वापर आणि कृष्णाच्या समयसूचकतेमुळे त्याचा फसलेला प्रयोग हे योद्धा म्हणून नोंद घेण्यासारखे प्रसंग.  

महायुद्ध संपल्यानंतर नसलेल्या कौरव सेनेचे सेनापतीपद दुर्योधनाने अश्वथाम्याला बहाल केले  आणि कृतवर्मा व कुपाचार्यांच्या मदतीने झोपलेल्या धृष्टद्युम्ना बरोबर पांडव पुत्रांचा (झोपलेले वीर हे पांडव आहेत ह्या समजुतीमुळे) अश्वथामा वध करतो. तदनंतर झालेल्या अर्जुना बरोबरच्या द्वंद्वात दोघेही ब्रह्मास्त्राचा प्रयोग करतात. विश्वाचा विनाश टाळण्याकरिता देवांच्या व ऋषींच्या आवाहनावरून अर्जुन ब्रह्मास्त्र मागे घेतो पण अश्वथाम्याला आपले अस्त्र मागे घेता येत नाही आणि त्याला ते उत्तरेच्या गर्भावर वळवावे लागते. हे अश्वथाम्याचं आणखीन एक अपयश.

महाकवी महाभारतकार व्यासांनी अस्वथामा ह्या पात्राची योजना दोन-तीन कारणांनी केली असावी असे वाटते.

प्रत्यक्ष महायुद्धापर्यंत कौरवांनी अनेक कपट कारस्थाने करून पांडवांना सत्तेपासून लांब ठेवण्यात यश मिळवलेलं दिसतं तर प्रत्यक्ष युद्धात कौरवांकडील महावीरांचा पराभव व मृत्यू पांडवांनी अवैध मार्गाने केलेला आढळतो. ही नैतिक-अनैतिक मार्गांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची मालिका दुर्योधनाच्या मृत्युपर्यंत चालू राहिलेली दिसते (गदा युद्धाच्या नियमानुसार कमरेखाली वार करणे गैर होते). त्रयस्थ भावनेने जर आपण महाभारताकडे बघितले तर महायुद्धाच्या शेवटाकडे येता येता कपटनीती, खोट्याचा आधार, अधर्माने केलेले युद्ध अशा अनेक अनैतिक मार्गांचा वापर दोन्ही पक्षांनी सारख्याच प्रमाणात केलेला दिसतो. पण महायुद्धाच्या शेवटी अश्वथाम्या हातून घडवलेल्या या कृत्याने पांडवांचे पारडे नैतिकतेच्या युद्धात अचानक जड होते आणि कौरव हे कथेतील खलनायक ठरतात. एका नगण्य पण संदर्भाने महत्वपूर्ण पात्राच्या हातून लेखकाने वाचकाचे मत इतक्या निर्णायकपणे बदललेले क्वचितच पहायला मिळते.     

असूया, मत्सर ही तुलनात्मक दृष्टीकोनातून निर्माण होणारी एक आत्यंतिक नकारात्मक भावना. नकारात्मक अशाकरिता की ज्याला असूया वाटते तो जी उर्जा स्वतःभोवती निर्माण करतो ती त्याचा तर ऱ्हास करतेच पण त्याच बरोबर ज्याच्या बद्दल त्याला असूया वाटते त्याचेही नुकसान केल्याशिवाय रहात नाही. असूया कोणालाच चुकलेली नाही. दोन लहान, अगदी  पाठोपाठच्या भावंडात देखील असूया पाहायला मिळते, मोठ्यांची तर गोष्टच सोडा. जेव्हा ही असूया ती गोष्ट मिळण्याची लायकी नसलेल्याला वाटते तेव्हा ही असूया अधिकच विद्रूप रूप घेतें. जे नेमके अश्वथाम्याच्या रूपाने महाभारतकारांनी दाखवले आहे असे वाटते. अश्वथामा हा जन्मतः चिरंजीव नव्हता. तसे असते तर ‘नरोवा कुंजरोवा हे युधिष्ठीराचे बोल ऐकताच आपली शस्त्र ठेवून आपल्या पुत्रास मृत्यू नंतर कोणती गती प्राप्त झाली हे पाहण्यासाठी द्रोणाचार्य रथावर ध्यानस्थ बसले नसते आणि धृष्टद्ध्युम्नास त्यांचा वध करण्यची संधी मिळाली नसती. अश्वथाम्याला चिरंजीव होण्याचा शाप कृष्णाने दिला, जणू असूयेला चिरंजीवित्व बहाल झाले. ही सर्व भूतांचे ठायी आढळणारी भावना महाभारतकारांनी महाभारतात अश्वथामा ह्या रूपकाने आणली असेल कां?      

वरील दोन्ही प्रयोजनांसहित तिसरे अगदी भिन्न प्रयोजन आहे असे वाटते. पांडव पुत्र, पाच भावांचे पुत्र, भविष्यातील महायुद्धाची जणु बीजे. ह्यांचा वध घडवून महाकवी व्यासांनी पुढील महायुद्धाची, भाऊबंदकीची शक्यताच नष्ट केली. पांडव पुत्रांच्या वधा नंतर कृष्णाकरवी उत्तरेच्या गर्भाचे रक्षण करवून कुरु महासत्तेला एकमेव वारस ठेवून संघर्षाचे मूळच नष्ट करण्याचा प्रयत्न तर महाभारतकारांनी केला असेल कां?  

अश्वथाम्याची योजना करून महाभारतकारांनी वरील तीनही गोष्टी साध्य केल्या आहेत असे वाटते.

Sunday, 20 June 2021

अर्थ हरवलेले शब्द ..३

 “आनंद झाला तुम्ही दोघं येऊ शकलात, जेवायला ही थांबलात! तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! श्रीखंड आणू का? नाही म्हणजे वाटी रिकामी दिसतेय. नाही, मला आग्रह करता येत नाही. खरतर आवडत देखील नाही. सावकाश जेवा!” सर्वसाधारण पंगतीत ऐकायला मिळणारा हा संवाद. अर्थात आजकाल पंगतीत भोजन आणि त्यातून आग्रहाने वाढणे कमीच झालं आहे.

‘सावकाश जेवा ह्याचा अर्थ कोणी खोडसाळ ..कराने (सुज्ञ, गाळलेली अक्षरे वाचताना भरून घेतील) अवकाश ठेवून, पोटात जागा ठेवून जेवा असा सांगितला होता. थोडक्यात आहेर वसूल करण्याकरिता वा फुकट आहे म्हणून हादडू नका. असो, विनोदाचा भाग सोडला तर कोणतीही गोष्ट सावकाश करणे ह्याचा अभिप्रेत अर्थ समजून घेणे आजच्या युगात खरोखर गरजेचे झाले आहे.

सावकाश म्हणजे नेमक काय? सावकाश म्हणजे हळुहळु? सावकाश म्हणजे गतीहीन? सावकाश म्हणजे रमतगमत? नाही मला नाही तसं वाटत. ह्या शब्दाचा नेमका अर्थ आपण हरवून बसलोय हेच खरं. आजच्या जगात एका जागी राहण्याकरता सुद्धा आपल्याला धावावं लागत, जर पुढे जायचं असेल तर काय कराव लागेल ह्याचा विचार करा. ह्या एकाच जागी राहण्याच्या वा पुढे जाण्याच्या नादात आपण नेमक काय हरवून बसलोय हे ज्याच त्यानेचं शोधावं.

मला आठवतंय लहानपणी आमच्यापैकी कोणीही बाहेर निघालो की घरची वडीलधारी मंडळी आवर्जून सांगत “सावकाश जा हो”. या वाक्यातील ‘सावकाश बरचं काही सांगून जातो. इथे सावकाश जा ह्याचा अर्थ गाड्या जाईपर्यंत क्रॉस करायचा थांब असा आहे. सावकाश ह्याचा अर्थ घाई (don’t rush) करू नकोस असा आहे, सावकाश ह्याचा अर्थ लक्ष (be attentive) देऊन जा असा आहे, सावकाश ह्याचा अर्थ जागृत (be aware) राहून जा असा आहे. सावकाश ह्याचा अर्थ सावध (be careful) राहून जा असा आहे. सुरक्षित जा असा आहे.

आजच्या गतीमान युगात वेग हे यशाच गमक झालं आहे. दिवस सगळ्यांकरिता सारखाच, २४ तासांचा. त्या २४ तासात जो जितका जास्त धाऊ शकतो तितका तो यशस्वी. आजकालच्या मुलांना तुम्ही पाहिलंत तर ती एकाच वेळी विविध कामे करतांना दिसतात. कानात इयरफोन (कर्ण पिशाच्च म्हणण्याचा मोह आवरतोय) नाहीतर कानावर हेडफोन असतात त्यातून वाहणारे कर्ण मधुर (कटू?) संगीताचे सूर, हातातल्या भ्रमणध्वनीवर वेगाने नाचणारे दोन्ही हातांचे अंगठे, कोपराच्या कोनात पकडलेल्या चिप्सच्या पाकिटातून मधूनच तोंडात जाणारे चिप्स, पाठोपाठ उरलेल्या बोटांत पकडलेल्या कॉफी कपमधून (कागदी) घेतलेला कॉफीचा घोट आणि झपाट्याने कुठेतरी घेऊन जाणारी पाऊले. मधेच तुम्ही काही विचारलत तर थोड थांबून कानातली पुंगळी काढत “सॉरी”?, तुम्ही प्रश्न पुन्हा विचारताच त्या प्रश्नाच उत्तर खांदे उडवून, किवां ओठ मुडपून, मान हलवून मिळतं. ही ६४ कलांच्या पलीकडची कला त्यांनी आत्मसात केलेली आहे. एकाच वेळी अनेक कामे करण्याची (multitasking) कला. नेमक काय साधतोय आपण? आपण जे काम करतोय त्याला पूर्ण न्याय देतो का? संगणक, ज्या यंत्राचे एकाच वेळी अनेक काम करण्याकरीता कौतुक केले जाते, त्या प्रक्रियेत सुद्धा प्रत्येक कृतीला लागणारा आवश्यक तो वेळ दिलेला असतो आणि त्याची प्रणाली हा वेळ काम योग्य प्रकारे करण्याकरिता पुरेसा आहे ह्याची सदोदित दक्षता घेत असते. त्याच प्रमाणे आवश्यक ती गणन क्षमता देखील उपलब्ध करून दिली जाते. थोडक्यात काय कामाच्या प्रती बाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. बघणाऱ्याला मात्र सगळी काम एकदमच होत आहेत असं वाटते.

सावकाश हे क्रियेचे केवळ विशेषण म्हणून आपण त्या शब्दाकडे बघतो. पण माझ्या दृष्टीने सावकाश ह्या शब्दाचा गती पेक्षा वेळाशी जास्त संबध आहे. स+अवकाश, अवकाश म्हणजे जागा (space), अंतर, वेळ, वेळासहित केलेली क्रिया, वेळ देऊन केलेली क्रिया ना की वेळ लाऊन केलेली क्रिया. एखादी गोष्ट सावकाश करणे म्हणजे मन लावून करणे, पुरेसा वेळ देऊन करणे असा होतो. सावकाश शब्दातील अवकाश असा वापरायचा आहे. सावकाश हा लवकरच्या विरुद्धार्थी शब्द नाही. या शब्दाचा अर्थ आपण नव्याने शोधण्याची गरज आहे.       

Saturday, 12 June 2021

गंध विश्व

 “वास येतोय कां? बघ रे”, “नाही बाकी काहीच लक्षण नव्हती, न ताप न खोकला पण वास येत नाहीसा झाला होता”, “मोगऱ्याच्या गजऱ्याचा वास नाही आला? लागलीच चेक करून घ्या हों” असे कित्येक संवाद आजकाल नित्याचेच झाले आहेत. “वासा” भोवती एक वलय निर्माण झाले आहे. कोणत्याशा कपड्यांच्या पावडरीच्या जाहिरातीने “डाग चांगले असतात” हे वाक्य लोकप्रिय केलं आहे. त्याच चालीवर “दुर्गंधी चांगली असते” अशी म्हणायची वेळ आली आहे. वास कोणता आहे हे महत्वाचं नाही. तो येतोय ना?? हे महत्वाचं. खरंतर मराठीत वास म्हणजे सुवास; कारण दुर्गंधीला घाण असा “सुगंध” (सुस्पष्टच्या धरतीवर) शब्द आहे.

असो, आजच्या तात्कालिक परिस्थितीमुळे एक गोष्ट माझ्या बाबतीत मात्र नक्की झाली, ती म्हणजे वास येणे (घेणें म्हटले की हेतुपुरस्कर केलेली क्रिया) या अत्यंत स्वाभाविक घडणाऱ्या क्रियेची जाणीव झाली, त्या क्रियेबद्दल जागरुकता आली. खूपवेळा आपण बघण्याची क्रिया करीत असतो पण आपल्याला दिसतच असें नाही हा अनुभव प्रत्येकालाच केव्हा न केव्हातरी आला असेल. चक्षु पटलावर उमटलेली प्रतिमा मेंदू जो पर्यंत वाचीत नाही तो पर्यंत दिसण्याची वा बघण्याची क्रिया पूर्ण होत नाही. माहितीचं रुपांतर ज्ञानात होत नाही. तद्वतच नाकात शिरणाऱ्या हवे बरोबर गंधकण आत जातच असतात पण त्याचं विश्लेषण मेंदूने करे पर्यंत, नाकाला रुमाल लावायचा, “वा” म्हणायचं, की नुसताच वास घेत राहायचं, हे ठरत नाही. लोकलने  नित्य प्रवास करणाऱ्यांना वांद्र्याची खाडी गेलेली कळतं देखील नाही.

थोडक्यात काय? ह्या नवीन जागरूकतेमुळे आपल्याभोवती एक भले थोरले गंध विश्व आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली. सकाळी उठल्यापासुन झोपेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक गंधाची (सुवास वा दुर्गंधी) मेंदूकडून पावती मिळायला लागली. सकाळी टूथपेस्ट, ब्रश काढण्यासाठी अगदी झोपेंत जरी बेसिन वरील कपाट उघडलं तरी आता ओळखता येणारा शेविंग क्रीम आणि आफ्टरशेव्हचा संमिश्र वास, चहाच्या पाण्यात किसून आलं टाकल्यावर येणारा वास, त्या आधणात चहाची पत्ती टाकल्यावरचा वास, चहा गॅस वरून उतरवून संथावल्यावर गाळण्यापुर्वी येणारा वास, ताजं दूध तापल्यावर येणारा वास (शिळ दूध तापल्यावर वास वेगळा येतो) आणि ते दूध चहात घातल्यावर चहाचा येणारा वास. प्रत्येक वास वेगळा आहे आणि तो आता मला ओळखता येतो. खोटं वाटेल तुम्हाला, पण भाजीत मीठ आहे की नाही हे मला आजकाल वासावरून कळते. तुम्ही प्रयत्न करून बघा. हे वास पूर्वीही होतेच, मला येत नव्हते इतकंच. सकाळी फिरायला बाहेर पडल्यावर झुळूकेबरोबर स्वागत करणारा प्राजक्ताचा मंद पवित्र वास. नुकत्याच येऊन गेलेल्या वादळी पावसात तर येणारा पाऊस, तो येतोय याची सुवार्ता घेऊन पोहोचलेल्या मृदगंधाने मला अगोदरच दिली होती. जणू “तप्त धरेची दाद मिळाली नाकाला आधी, मग ऐकली कानांनी, नंतर डोळ्यांनी पाहिली”!  ओल्या गवताचा वास वेगळा, ओल्या पालापाचोळ्याचा वास वेगळा. एक जिवंत, एक गत. अगदी नव्याने सापडलेला वास म्हणजे वाहत्या स्वच्छ पाण्याचा वास, हो तो काहीसा दुरून देखील येतो. अवर्णनीय, कारण तो कशासारखा नाही, ज्याने त्याने त्याचा घेतला पाहिजे (अनुभूतीला पर्याय नाही), त्या वासाला अजून नाव सापडलेलं नाही, नसेलच कदाचित. मत्स्यगंधा, योजनगंधा या खऱ्या असाव्यात याची आता खात्री पटली. एक नवीन विश्वच जणू हळुहळु विदित होतंय असं वाटतं.   

ध्यानधारणेच्या संबधात कुठेतरी वाचलेलं आठवलं “श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वास आत घेताना जागरूक रहा, की तुम्ही श्वास आत घेताय. सोडताना जाणीव असू द्या की तुम्ही श्वास सोडताय, आणि कृतज्ञतापूर्वक अनुभव घ्या, प्रत्येक श्वासा बरोबर तुम्ही असण्याचा”. ध्यानधारणे संबंधात लिहिलंय तसंच काहीसं अगदी कृतज्ञतापूर्वक अनुभवतो आहे माझं असणं येणाऱ्या प्रत्येक वासागणिक.