Friday, 17 July 2026

उपपांडव

उपपांडव नेमके कोण होते? द्रौपदीच्या पाचही मुलांना एकत्रितपणे उपपांडव म्हटले जाते, ज्यांचा जन्म युद्धाच्या १३ वर्षांच्या वनवास काळानंतर किंवा त्यादरम्यान झाला होता. पांडवांच्या सर्व पुत्रांना मिळुन एकत्रितपणे येथे उपपांडव किंवा पांडवपुत्र  असे संबोधिलेले आहे.

उपपांडव किंवा पांडवपुत्र ह्यांच्याविषयी, अभिमन्यु, घटोत्कच, बभ्रुवाहन आणि इरावण ह्यांचा सन्माननीय अपवाद वगळता महाभारतात किंवा त्यापश्चात  महाभारतावर लिहिल्या गेलेल्या खूप साऱ्या लिखाणात फारसे काही लिहिले गेलेले आढळत नाही आणि असलेच तर, निदान माझ्या वाचनात ते आलेले नाही. (माझा व्यासंग तसा फार नाही, तेंव्हा हे लिहिणे कदाचित धाडसाचे असेल).

हे असे असले तरीही ह्यातील काही उपपांडवांचा मृत्यू खूपच नाट्यपूर्ण, धर्मयुद्धाला सोडून झालेला दिसतो. प्रसंगाचे गांभीर्य, स्फोटकता, त्यातील नाट्य आणि त्याचे दूरगामी परिणाम ह्याचा विचार केला तर महाभारतात ह्या प्रसंगाच्या जवळपास येणारे फारच थोडे प्रसंग सांगता येतील. उदा. लाक्षागृह,  द्युत-द्रौपदी वस्त्रहरण, भीष्म-द्रोण, दुर्योधन-कर्ण ह्यांचे मृत्यू, निकष थोडा बदलला तर द्रोण शिष्यांचे अस्त्र-शस्त्र प्रदर्शन, कर्णाने अर्जुनाला दिलेले आव्हान आणि त्याची आणि दुर्योधनाची चिरकाल टिकलेली मैत्री, हेही प्रसंग धरता येतील. त्यामुळे त्यांच्या विषयी लिहिण्याचा मोह आवरता येत नाही.

द्रौपदीला पाच पांडवांपासून पाच पुत्र झाले. त्यांची नावे खालीलप्रमाणे युधिष्ठिर – प्रतीविंध्या, विंध्य पर्वतासारखा शत्रुच्या हल्ल्याला तोंड देतां अविचल राहू शकेल असा, भीम - सुतसोम, भीमाने एक सहस्त्र सोमयाग केल्यानंतर झालेला पुत्र, अर्जुन – श्रुतकर्मा किंवा श्रुतकीर्ती, अर्जुन एकटा वनवासात / देशाटन करत असतांना त्याने अनेक चांगली कर्मे केली, त्याची आठवण, नकुल - शतानिक, कुरु वंशातील महान राजर्षीचे नाव, सहदेव – श्रुतसेन, कृत्तिका नक्षत्रावर जन्मलेला म्हणून देवांचा सेनापती कार्तिकेय याचे नाव.

पांडवांनी इतरही विवाह केले होते.

युधिष्ठिर व देविका (शिबी देशाच्या गोवसेना राजाची राजकन्या) यांचा पुत्र यौधेया. ह्याचा युद्धात सहभाग नाही. गोवसेनाच्या महाभारतातील युद्धातील मृत्यूनंतर यौधेया शिबी देशाचा राजा झाला. 

भीम व वलन्धरा (काशी देशाची राजकन्या) यांचा पुत्र सर्वगा. ह्याचा युद्धात सहभाग नाही, कारण महाभारतातील महायुध्दानंतर पांडवांनी केलेल्या अश्वमेध यज्ञात काशी देशाचा राजा सुबाहु ह्याचा पराभव भीमाने केला आणि त्याच्या पराक्रमाने प्रभावित होऊन वलन्धरेने स्वयंवरात भीमाचा स्वीकार करून त्याबरोबर विवाह केला. सर्वग पुढे काशीचा राजा झाला असा उल्लेख आढळतो.  

भीम व हिडींबा यांचा पुत्र घटोत्कच. ह्याचा युद्धात महत्वाचा सहभाग. कर्णाच्या हातून वासवी शक्तीचा वापर करून घडवलेला घटोत्कचाचा मृत्यू.

अर्जुन व उलुपी यांचा पुत्र इरावण. उलुपी, नागराज कौरव्य ह्या नागाची कन्या. कौरव्याचा जन्म ऐरावतच्या (नागांचा सर्वात बलिष्ट राजा) कुळात झाला होता.

अर्जुन व चित्रांगदा यांचा पुत्र बभ्रुवाहन. चित्रांगदा ही मणीपुरा राज्याचा राजा चित्रवाहन ह्याची कन्या. तिच्या वडिलांनी चित्रवाहनाने बभ्रुवाहनाला मणिपुर राज्याचा वारस म्हणून दत्तक घेतले. बभ्रुवाहन पुढे मोठा होऊन मणीपुराचा राजा झाला.

अर्जुनाची चौथी पत्नी सुभद्रा. श्रीकृष्णाची बहिण. श्रीकुष्णाच्या इच्छेनुसार अर्जुनाने सुभद्राहरण केले. त्यांचा पुत्र अभिमन्यु. अभिमन्युचे बलिदान, धर्मयुद्धाचे सर्व नियम धाब्यावर बसवून झालेली हत्या.

नकुल व करेनुमती (शिशुपालाची मुलगी) ह्यांचा पुत्र निरामित्र. हा युद्धात सहभागी नव्हता. निरामित्र युद्धाच्या वेळेला खुप लहान असावा. पुढे मोठा होऊन तो मद्र देशाचा राजा झाला. नकुल, माद्रीचा पुत्र असल्यामुळे तो वारसा त्याच्याकडे आला. महाभारतात त्रिगर्ताचा राजपुत्र निरामित्र ज्याला सहदेवाने युद्धात मारले त्याच्या बरोबर नकुलपुत्र निरामित्राची बऱ्याच वेळा गल्लत केली जाते.   

सहदेव व विजया ह्यांचा पुत्र सुहोत्र. ह्याचा देखील युद्धात सहभाग नाही. विजया, मद्र प्रदेशातील साल्व राज्याचा राजा द्युतिमताची मुलगी. सुहोत्र ह्या नावाचा पुरू वंशात (चांद्रवंशीय) राजा होता. त्याचाही उल्लेख महाभारतात येतो. नाम साधर्म्य याखेरीच काहीही साम्य ह्या दोघांच्यात नाही.

उपपांडवांतील वयाने सर्वात मोठा घटोत्कच, त्याच्या पासूनच सुरवात करू. युद्धाच्या १४ व्या दिवशी अभिमन्युच्या वधाचा सूड म्हणून अर्जुनाने जयद्रथाचा वध केला. घटोत्कच राक्षस असल्यामुळे धर्मयुद्धाचे नियम त्याला लागू नव्हते आणि युद्ध सूर्यास्तानंतरही चालूच राहिले. अतुलनीय पराक्रम दाखवत आपल्या मायावी युद्ध कलेने कौरव सेनेची पार दाणादाण उडवली. द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, स्वतः दुर्योधन, ह्यांच्या सारख्या कसलेल्या योद्ध्यांचा देखील त्याच्या पुढे निभाव लागेना. त्यांची ही गत झाल्यावर बाकीच्यांची काय कथा? नाही म्हणायला अश्वत्थामा घटोत्कच्याच्या सामर्थ्यापुढे तग धरून उभा राहिला. त्याने घटोत्कचाला थोपविण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यालाही यश आले नाही. कौरवांना पळता भुई थोडी झाली आणि घटोत्कचाने शत्रू सैन्याचा अविरत संहार चालूच ठेवला. दुर्योधनाला मदत करण्यास भगदत्त आपल्या हत्ती दलासहित घटोत्कचावर चालून आला, पण त्या हत्ती दलाचाही त्याच्या पुढे टिकाव लागला नाही. दुर्योधानाकडून लढणारा राक्षस राजकुमार आयुधान, महापराक्रमी, महावीर, जो महाकाय गाढवांच्या रथातून लढत होता, त्यालाही घटोत्कचाने यमसदनास धाडले. इरावण आणि अलाम्बुशाच्या युद्धात इरावणाचा वध झाला हे लक्षात येताच, घटोत्कच वायुवेगाने अलाम्बुशावर तुटून पडला. दोघांच्यात न भूतो न भविष्यती अशी लढाई सुरु झाली. दोघंही मायावी युद्धात पारंगत असल्यामुळे वेगवेगळे आकार, आभास आणि आयुधे ह्यांनी दोघंही एकमेकांच्या सैन्यावर कोसळत होते. कौरवसैन्य ह्या मायावी युद्धामुळे, आकाशातून येणाऱ्या बाणांचा, होणाऱ्या शीळांच्या वर्षावाला कसे तोंड द्यायचे हेच न कळल्यामुळे हवालदिल होऊन रण सोडून पळत होते. तीच गत थोड्याफार फरकाने पांडव सेनेची होती. त्यांचे सेनानी त्यांना थांबून लढण्याचे आवाहन करत होते. भीम, इतर पांडव, सात्यकी वगैरे वीर, पांडव सेनेला बरोबर घेऊन, मिळालेल्या संधीचा फायदा उठवीत कौरव सैन्याची तोड करत होते. ह्या रणधुमाळीच्या कोलाहलात अलाम्बुश व घटोत्कच ह्यांचे रथ हवेत उंच उडून एकमेकांना भिडले आणि द्वंद्वाला सुरवात झाली. शेवटी घटोत्कचाने अलाम्बुशाला रथातून ओढून आकाशातून जमिनीवर आपटले. अलाम्बुशाच्या देहाचे अक्षरशः तुकडे उडाले आणि तो महापराक्रमी राक्षस राजा धारातीर्थी पडला.

रक्त गोठवून टाकणाऱ्या आरोळ्या, घाम फोडणारी अक्राळविक्राळ रूपे आणि न दिसणाऱ्या योद्धायांकडून होणारा शस्त्रास्त्रांचा मारा ह्याने परास्त होऊन कौरवसेना दशदिशांना पांगली. आता दुर्योधनाचा नाईलाज झाला. कर्णाला गाठून त्याने कसही करून घटोत्कचाचा बीमोड कर अशी अक्षरशः विनंती केली. कर्णाला दुर्योधन काय सुचवित आहे याची कल्पना होती. वासवी शक्तीचा घटोत्कचावर प्रयोग करायला त्याने नकार दिला. मनोमन कर्णाला खात्री होती की वासवी शक्ती शिवाय तो अर्जुनाशी जिंकू शकत नाही. जी शक्ती त्याने इंद्राकडून त्याच्या अमरत्व देणाऱ्या कवच-कुंडलांच्या बदल्यांत मिळविली होती, आणि ती अर्जुनाशी होणाऱ्या निर्णायक युद्धासाठी त्याने राखून ठेवली होती. तसे त्याने दुर्योधानाला सांगितलेही. त्यावर राजा उत्तरला, अरे मित्रा, आपण उद्याची सकाळ पाहिली तर अर्जुनाशी लढण्याचा प्रसंग येईल. ज्या वेगाने घटोत्कचाने कौरवांचा नाश चालविलेला आहे त्या वरून अर्जुनाशी लढायला उद्या आपल्यापैकी कोणीही शिल्लक राहील असें मला वाटत नाही. तेंव्हा घटोत्कचाला या क्षणी ठार मारणे आणि कौरवांना वाचवणे एव्हढाच पर्याय तुज पुढे आहे. ते तू वासवी शक्ती ने कर, अन्यथा दुसऱ्या मार्गाने, तो तुझा प्रश्न आहे. दुर्योधनाच्या ह्या आदेशापुढे, अंकित कर्णाचे काहीएक चालले नाही आणि वासवी शक्तीचा प्रयोग त्याने घटोत्कचावर केला. वासवी शक्तीने आपले काम चोख केले, तो महान योद्धा धारातीर्थी पडला. वासवी शक्ती आपले काम बजावून इंद्राकडे परतली. पर्यायाने अर्जुनाला अभय मिळाले. ते युद्ध जिंकूनही, कर्णाची स्थिती, पराजितासारखी झाली. अर्जुनाबरोबरच्या त्याच्या युद्धाचा निकालच जणु लागला होता.

आपल्या चुलत्या करिता, कर्णाच्या मृत्यू करिता आणि पर्यायाने पांडवांच्या विजया करिता दिलेल्या घटोत्कचाच्या बलिदानानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. युद्ध भूमीवर त्याचा बळी तो अनार्य होता म्हणून दिला गेला? की पुढे जाऊन सर्वात मोठा म्हणून तो राज्यावर अधिकार सांगेल म्हणून? की राक्षस म्हणून बळी देण्यास तो योग्य होता? घटोत्कचाच्या मृत्यूचा शोक द्रौपदी पुत्रांच्या शोका इतका करूण कां बरें वाटत नाही?

घटोत्कचाच्या मागचा अभिमन्यु, त्याचे वीर मरण, त्याची कथा माहीत नसलेला विरळाच.  

महायुद्धाच्या १३ व्या दिवशी द्रोण, दुर्योधनाला दिलेले आपले वचन (युधिष्ठिराला जिवंत पकडण्याचे) पूर्ण करण्यासाठी चक्रव्यूहाची रचना करतात. द्रोणांचा युधिष्ठिराला जिवंत पकडण्याचा मनसुबा, अर्जुन युधिष्ठिरासोबत असतांना सफल होण्याची सुतराम शक्यता नव्हती. द्रोणाचार्यांनी सेनापातीपदाची धुरा सांभाळल्यापासून अथक प्रयत्न करूनही धर्माला पकडणे त्यांना शक्य झालं नव्हतं. अर्जुनाला युद्धभूमीपासून लांब नेण्याची खबरदारी संशप्तकांनी पुन्हा एकदा घेतली. ( संशप्तक - त्रिगर्तांचा राजा सुशर्मा, त्रिगर्तांचे आणि अर्जुनाचे जुने वैर होते, पार राजसूय यज्ञापासून, तो त्याचे भाऊ आणि त्यांची सेना ह्यांनी एकत्र होऊन घोर शपथ घेतलेली होती) (संशप्तक). शपथ होती, एकतर अर्जुनाचा मृत्यू त्यांच्या हातून होईल अथवा लढता-लढता ते मारले जातील, पण पाठ दाखविणार नाहीत. शपथ घेऊन या प्रचंड सेनेने जिवंतपणी स्वतःचे अंत्यविधी पार पाडले होते. थोडक्यात त्यांच्यातील कोणीही जिवंत परत येणार नव्हता. (आजच्या काळातील अतिरेक्यांचे घातपाती पथक असावे तसे).

चक्रव्यूहाचा भेद करून पुन्हा बाहेर पडण्याचे ज्ञान आणि शक्ति तीन वीरांच्यात होती. स्वतः श्रीकृष्ण, अर्जुन आणि कृष्ण पुत्र प्रद्यूम्न (जो महाभारतीय युद्धात कोणाच्याच बाजूने लढत नव्हता, बलरामासारखाच तोही तीर्थाटनाला गेला होता). प्रद्यूम्न हा अभिमन्युचा अस्त्र-शस्त्र विद्येतील गुरु. अभिमन्युला चक्रव्यूहात प्रवेश करणे ठाऊक होते, पण पुन्हा बाहेर येण्याचे ज्ञान त्याकडे नव्हते.

द्रोणाचार्यांनी केलेल्या सैन्याच्या चक्रव्युहात्मक रचनेत कौरव वीर आणि त्यांच्या बरोबरचे कौरव सैन्य ह्यांनी मिळून पांडव सेनेचा संहार सुरु केला. अर्जुन आणि श्रीकृष्ण ह्यांच्या अनुपस्थितीत द्रोणांचा सामना करण्याची जबाबदारी अर्जुनेतर पांडव, सात्यकी, पांचालपुत्र धृष्टद्युम्न, शिखंडी आणि इतर ह्यांच्यावर आली. ह्या सर्वांच्या अथक प्रयत्नांनंतर देखील व्यूहाचा भेद तर झालाच नाही, पांडवांची हानी मात्र झाली. युधिष्ठिराला द्रोणांनी दुर्योधानाला दिलेल्या वचनाची माहिती होती आणि अर्जुनाच्या अनुपस्थितीत जर युद्ध असेच चालू राहिले तर सूर्यास्तापर्यंत द्रोण आपल्यापर्यंत पोहोचतील अशी रास्त भिती देखील त्याला वाटत होती. त्याचा नाईलाज झाला. युधिष्ठिराकडे अभिमन्यूला चक्रव्यूहाचा भेद करायला सांगण्यावाचून पर्याय उरला नाही. अभिमन्युला विचारणा झाल्यावर अभिमन्यूने आपली मर्यादा स्पष्ट केली. तो म्हणाला “मी चक्रव्यूहाचा भेद नक्की करीन, आतही शिरेन, पण मला बाहेर कसं यायचं ते ठाऊक नाही. तसं घडलं तर त्या  परीस्थितीत मी सर्व कौरव वीरांसमोर एकटा पडीन”. यावर युधिष्ठीर, भीम, नकुल, सहदेव, पांचाल बंधु, सात्यकी ह्या सगळ्यांनी त्याला आश्वासन दिले की “तू व्यूहाचा भेद केलास, की तुझ्या पाठोपाठ आम्ही व्युहात शिरतो. तू एकटा पडणार नाहीस ही जबाबदारी आमची”. तसेही अर्जुनाच्या अनुपस्थित अभिमन्यूचे संरक्षण त्याच्या बलशाली काकांनी करणे अपेक्षित होते.  

अभिमन्यु चक्रव्यूहाचा भेद करून आत प्रविष्ट झाला. त्या वाटेने युधीष्ठीर, भीम, आणि इतर पांडववीर व्युहात शिरण्याच्या प्रयत्नात असतानाच जयद्रथ, सिंधु देशाचा राजा याने त्यांची वाट अडवली. घनघोर युद्धानंतर देखील, पांडव वीरांना आत शिरण्यात यश आले नाही. जयद्रथाला हे यश मिळण्याचे कारण त्याला महादेवांकडून मिळालेला वर. थोडक्यात, पांडव वनवासात असतांना द्रौपदीला एकटीला पाहून जयद्रथाने तिला रथात घेऊन पळवून नेले. पांडवांनी, मुख्यत्वे भीमार्जुनांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या सैन्याचा निप्पात करत त्याची अक्षरशः धिंड काढली. द्रौपदी समोर त्याला नाक घासायला लावले. ह्या अपमानाचा सूड घेण्यासाठी जयद्रथाने महादेवाचे घोर तप केले आणि अर्जुनाला मारण्याची आपली इच्छा व्यक्त केली. प्रसन्न महादेवांनी “हे शक्य नाही, अर्जुनाला मी स्वतः पराभूत करू शकलो नाही, पण त्या बदल्यात अर्जुनेतर पांडवांना तू एक दिवस थोपवू शकशील” असा वर दिला. याचा परिपाक म्हणजे अभिमन्यु चक्रव्युहात एकटा पडला.

त्या दिवशी अभिमन्यूने अभूतपूर्व पराक्रम केला. कौरववीर अभिमन्यूला घेरून त्याच्यावर शरसंधान करत होते. पण त्यातील एकही बाण अभिमन्युपर्यंत पोचत नव्हता. अभिमन्युचे बाण त्यांना हवेतच थांबवत होते. तो वीर सगळ्यांना न्यायाने ज्याचे त्याचे माप देत होता. त्याच्या समोर युद्धात माघार घ्यायला लागलेल्या कौरव दिग्गज वीरांची यादी खूपच मोठी होती. खुद्द दुर्योधन, कर्ण, दुःशासन, शकुनी, शल्य, भूरीश्रवा, क्रथा, सोमदत्त, अश्वकेतु, मघदाचा राजपुत्र, कृप, द्रोण व त्यांचा पुत्र अश्वत्थामा, कृतवर्मा इत्यादी. अभिमन्युच्या हातून मारले गेलेले कौरव वीर देखील अनेक होते. वानगीदाखल, शत्रुंजय, चंद्र्केतू, महामेघना, सुवर्चास, सुर्यभास, कोसला राज्याचा राजा बृहद्दबाला आणि दुर्योधनपुत्र लक्ष्मण.

अभिमन्युच्या सुवर्ण कवचाचा भेद एकही बाण करू शकत नव्हता. त्या उलट अभिमन्यूचे बाण नेमकी जागा शोधून शत्रुच्या कवचाचा भेद करत त्यांचा निप्पात करत होते. द्रोणांना अभिमन्यूची स्तुती केल्यावाचून राहवले नाही. अर्जुनाचा पुत्र शोभतोय, तसाच सव्यसाची. त्याच्या चिलखताचा भेद करता येत नाही, यात मला आश्चर्य वाटत नाही. मीच त्याच्या पित्याला कवच कसे घालायचे ते शिकविले आणि ते त्याने अभिमन्यूला. चिलखताची जोडणी शत्रूला कशी दिसणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते”. हे ऐकून कर्ण, दुर्योधनादिंचा तिळपापड झाला. ते द्रोणांना विचारते झाले, “आचार्य शत्रूची स्तुती पुरे झाली, त्याच्या पराभवाचा मार्ग सांगा. आपल्यातील एकही रथी, महारथी त्याच्यासमोर टिकत नाही. एकतर अभिमन्यूच्या हातुन मृत्यू अथवा त्याला पाठ दाखवून रणांगणातून माघार हे दोनच पर्याय आहेत”. द्रोणांनी मार्ग दाखवला. तुमचे बाण जरी त्याच्या पर्यंत पोहोचत नसले तरी त्याच्या शस्त्रांवर आघात करता येईल. सर्वांनी मिळून अभिमन्यूला निशस्त्र करा. द्रोण, कर्ण, दुर्योधन, बृह्द्द्बाला, कृप, अश्वत्थामा आणि कृतवर्मा सर्वांनी अभिमन्युला घेरले. सूर्यपुत्र कर्णाने त्याचे धनुष्य तोडले. द्रोणांनी त्याच्या रथाचे घोडे मारले, कृपाने सारथ्याला, सुमित्राला मारले. विरथ अभिमन्यु तलवार घेऊन लढू लागला. द्रोणांनी रथावरून शरसंधान करीत तलवार तोडली. कर्णाने ढालीच्या ठिकऱ्या उडविल्या. इतक्या जणांनी घेरल्यावर काहीजण अर्थातच अभिमन्यूवर पाठीमागून शरसंधान करत होते. कौरववीर रथावर आरूढ तर अभिमन्यु विरथ, कौरववीर शस्त्रांसहित तर अभिमन्यु जवळजवळ निशस्त्र. रथाचे चाक घेऊन तो कौरवांवर धावून गेला. साक्षात सुदर्शनधारी श्रीकृष्णासारखा भासला तो. अनेक बाणांनी, शस्त्राघातांनी घायाळ अभिमन्यु वैशाख वणव्यात फुललेल्या पलाश वृक्षासारखा दिसत होता. हातातील रथचक्राचेही तुकडे उडाले. महाकाय गदा घेऊन अभिमन्यु अश्वत्थाम्याच्या रथावर धावून गेला. त्याने रथाचे घोडे मारले, दोन रथी जे अश्वत्थाम्याला साथ देत होते त्यांना यमसदनाला धाडून, शकुनीचा मुलगा कालकेय याला देखील त्याच वाटेने पाठविले. दुःशासनाचा मुलगा (दृमसेन?) गदा घेऊन त्यावर तुटून पडला. एका क्षणी दोघेही वीर एकमेकांच्या प्रहाराने जमिनीवर कोसळले. दुःशासनाचा मुलगा आधी उभा राहिला आणि अभिमन्यु उभा रहाण्याच्या प्रयत्नात असतानाच दुःशासनाच्या मुलाने गदेचा प्रहार अभिमन्यूच्या मस्तकी केला. अभिमन्यु धारातीर्थी पडला. कौरवांनी एकच विजयनाद केला. अभिमन्यूच्या दुःखानेच जणु सूर्यास्त झाला. युद्ध १३ व्या दिवशी रात्री करता थांबले.

संशप्तकांचे निर्दालन करून अर्जुन शोकाकुल पांडव शिबिरात पोहोचला आणि युधीष्टीराच्या संरक्षणासाठी १६ वर्षाच्या अभिमन्यूने केलेले बलिदान त्याला समजले. द्रोण, कृप, कर्ण यांच्यासहित एकत्र येऊन अनेक कौरव वीरांनी मिळून निहत्थ्या अभिमन्यूची केलेली ती हत्या होती. त्यानंतर घडलेल्या घटना या लेखाच्या कक्षेबाहेर आहेत.

या नंतर झाला तो इरावाणाचा जन्म, नागकन्या उलुपी हिचा अर्जुनापासून झालेला पुत्र. युधिष्ठीर आणि द्रौपदि एकांतात असतांना अर्जुनाने त्यांच्या कक्षात प्रवेश केला आणि म्हणून आत्मक्लेशार्थ पत्करलेला वनवास. अर्जुन देशाटन करीत गंगा किनारी पोहोचला. एक दिवस गंगास्नान करतांना उलुपी त्याला घेऊन नागलोकात गेली. उलुपीने, अर्जुनाला मला स्वीकार अशी विनंती केली. तिच्या कुलाबद्द्ल समजल्यावर अर्जुनाने तिच्या मागणीला होकार दिला. इरावण नागलोकात वाढला आणि युद्धात पांडवांच्या बाजूने लढला. त्याने शकुनीचे गांधार बंधु मारले आणि घनघोर युद्ध करून कौरव सेनेची अपरमित हानी केली. कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या अलाम्बुश ह्या राक्षस राजाने त्याचा वध केला. अलाम्बुश आणि इरावण ह्यांच्यातले युद्ध म्हणजे मायावी शक्ती आणि नागलोकातील युद्धकौशल्य ह्यांचा वापर करून झालेले एकमेव युद्ध होते. अलाम्बुशाने मायावी रूपे धरण करून इरावणाचा पराभव करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, पण ते सर्व प्रयत्न हाणून पाडत इरावणाने नागलोकांसह त्याच्यावर हल्ला केला. सरतेशेवटी अलाम्बुश मायावी युद्धात वरचढ ठरला.

हा झाला महाभारतात आलेला भाग. पण दक्षिण भारतात एक वेगळीच लोककथा प्रसिद्ध आहे. त्यानुसार, इरावणाने देवी काली समोर पांडवांच्या विजयासाठी युद्धाच्या आठव्या दिवशी आत्मसमर्पण केले. तत्पूर्वी त्याची शेवटची इच्छा लग्न करावे अशी होती म्हणून श्रीकृष्णाने मोहिनी रूप घेऊन त्याच्याशी लग्न केले. दुसऱ्या दिवशी त्याने आत्मसमर्पण केले आणि मोहिनी त्याची विधवा म्हणून जगली. आजही तामिळनाड मध्ये १८ दिवस चालणाऱ्या कुवागम उत्सवात ह्या आत्मसमर्पणाचे नाट्य रुपांतर होऊन सणाची सांगता होते. दुसऱ्या लोककथेनुसार इरावणाला मृत्युनंतर देखील पांडवांचा विजय पहाता येईल असा वर श्रीकृष्णाने दिला. त्याच्या धडावेगळे झालेल्या शीराने युद्ध पहिले. आजही तामिळनाड, केरळ  मध्ये अनेक देवळांवर इरावणाचे शीर(आकृती) संरक्षक म्हणून लावलेले दिसते.

तृतीयपंथी समाजाने इरावणला आपला देव मानलेले आहे आणि इरावणाच्या नावाने अनेक उत्सव आजही साजरे होतात.

उलुपीचा निरोप घेऊन अर्जुन महेंद्र पर्वत पार करून समुद्र किनाऱ्याने मणीपुरा राज्यात पोहोचला. मणीपुरा राज्याचा राजा चित्रवाहन याची लावण्यवती कन्या चित्रांगदा, हिला पहाताच अर्जुनाला तिला प्राप्त करून घेण्याची इच्छा झाली आणि त्याने तसे राजाला बोलून दाखवले. चित्रवाहनाने अर्जुनाची चौकशी करून त्याला आपली कुलाची कथा सांगितली. चित्रवाहनाच्या पूर्वजांपैकी एक राजा प्रभंजन हा अपत्यहीन  होता. त्याने घोर तप करून महादेवांना प्रसन्न करून घेतले. महादेवांनी त्याला वर दिला की तो आणि त्याच्या वंशजाना एक अपत्य प्राप्ती होईल. अर्थातच तोच गादीचा वारस होईल. त्या नियमानुसार चित्रवाहनाने चित्रांगदेला पुत्रिका म्हणून वाढविले आणि तीच राज्याची वारस होती. अर्जुनाने चित्रांगदेशी विवाह करण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावर चित्रवाहनाने त्याला वरील सर्व कथा सांगून अट घातली की तुम्हाला होईल ते अपत्य मणीपुरा राज्याचा वारस राहील आणि अर्जुन त्याला बरोबर नेऊ शकणार नाही. त्या अटीनुसार बभ्रुवाहनाच जन्म झाल्यावर अर्जुन त्याला मागे ठेवून आपल्या भावांकडे परत आला. बभ्रुवाहन मणीपुरा राज्याचा राजा झाला.

महायुद्ध झाले. युधिष्ठीर राजा झाला आणि त्याने अश्वमेध यज्ञ करायचे ठरविले. अश्वमेधाचा घोडा निघाला आणि त्यामागे निघाली पांडवांची चतुरंग सेना, अर्जुनाच्या नेतृत्वाखाली. राज्यामागून राज्य पार करीत घोडा निघाला. काही राजांनी त्याला अडविण्याचा विफल प्रयत्न केला. महाप्रतापी अर्जुनासमोर त्यांचा निभाव लागला नाही. युधीष्टीराच्या आज्ञेनुसार, अर्जुनाने त्यांना अभय देऊन खंडणी घेऊन सोडून दिले. अश्वमेधाचा घोडा, नदी नाले, डोंगर दऱ्या पार करत राज्यामागून राज्य मागे टाकत मणीपुरा राज्यात पोहोचला. घोड्याच्या मागोमाग अर्जुन व सेना तिथें पोहोचली.

महापराक्रमी बभ्रुवाहनाला ही बातमी समजताच तो ब्रह्मन्वृंदासमवेत अर्जुनाचे, आपल्या पित्याचे स्वागत करण्यास सरसावला. अर्जुनाने त्याला हातानेच थांबवले आणि पृच्छा केली, खरंतर निर्भत्सनाच केली; तो म्हणाला “तुझे हे वागणे क्षत्रिय राजाला शोभा देत नाही. हातात बळ असतांना तू ओवाळणीचे तबक घेऊन, पुष्पमाला घेऊन माझे स्वागत कसले करतोस? अश्वमेधाचा घोडा अडवून मला आव्हान दे आणि माझा पुत्र, पार्थ पुत्र म्हणून शोभ”. दोन सेना समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत आणि पिता, पुत्राचे वाक्ताडन करीत आहे, इतक्यात भूमीचा भेद करून उलुपी, अर्जुनाची पत्नी, बभ्रुवाहनाची सावत्र आई प्रकटली. तिने तात्काळ अर्जुनाच्या आपल्या पतीच्या मताशी सहमती दर्शविली. ती आपल्या मुलाला म्हणाली “अरे अश्वमेधाचा घोडा रोखणे आणि त्या बरोबर असलेल्या संरक्षकांशी लढणे ह्यातच खरा पुरुषार्थ आहे, हाच क्षात्रधर्म आहे. मग आलेल्या सैन्याचा सेनापती कुणीही कां असेना, अगदी तुझा पिता असला तरी. तुझ्या डोक्यात कुठलाही संदेह असेल तर तुझी आई म्हणून मी तो दूर करीत आहे. तू युद्ध कर आणि स्वतःला आणि त्याच बरोर तुझ्या पित्याला देखील सिद्ध कर”.         

बभ्रुवाहन मायेच्या कह्यातून बाहेर पडला आणि त्याने गांडीवधारी अर्जुनाला आव्हान दिले. पिता, पुत्रात न भूतो न भविष्यती असे युद्ध सुरु झाले. बिंब, प्रतिबिम्बाचीच लढाई होती जणु. बाणाला बाणाने उत्तर, अस्त्राला प्रति-अस्त्र, आघाताला प्रत्याघात अशी जुगलबंदी चालू होती. कोणीच पाठी हटत नव्हते. अर्जुनाने बभ्रुवाहनाचे धनुष्य तोडले, क्षणाचाही विलंब न होता बभ्रुवाहनाने दुसरे धनुष्य उचलून शरसंधान चालूच ठेवले. ह्या धुमश्चक्रीत बभ्रुवाहनाने एक अमोघ बाण धनुष्यावर चढवला. प्रत्यंचा पार कानामागे ओढली आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्या बाणाने अर्जुनाचा वेध घेतला. अजेय धनुर्धराचे बाण त्याला थांबवू शकले नाहीत आणि अर्जुनाचे सुवर्ण कवच भेदून बाण त्याच्या हृदयापर गेला. शत्रुंजय, अजेय, महादेवांनाही पराभूत करणारा, पंडू पुत्र धारातीर्थी कोसळला, आपल्या पुत्राहातून मारला गेला. युद्धभूमीवर सन्नाटा पसरला. बभ्रुवाहनाला काय घडले हे कळायला क्षणिक वेळच लागला. काय घडले हे समजताच शोकाकुल पुत्र मृच्छा येऊन धरणीवर पडला.  

वणव्यासारखी ही बातमी राजवाड्यात चित्रांगदेपर्यंत पोहोचली. शोकाकुल चित्रांगदा धावतच रणभूमीवर पोहोचली. पुत्राच्या विजयाचा आनंद मानायचा की पती निधनाचे दुःख? तिच्या कानी उलुपीचा हस्तक्षेप देखील पोहोचला. आपल्या पतीच्या, स्वतःच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याबद्दल ती तिला दुषणे देऊ लागली. चित्रांगदेने जाहीर केले “माझा पती अर्जुन जर जिवंत झाला नाही, तर त्याच्या पायाशी मी प्रायोपवेशन करून प्राण त्याग करीन”. अर्जुनाचे डोके मांडीवर घेऊन ती युद्धभूमीवर बसली. बभ्रुवाहनाला शुद्ध आल्यावर हे दृश्य बघून पश्चातापदग्ध बभ्रुवाहनाने देखील प्रायश्चित्त म्हणून अन्न त्यागून देह टाकण्याचे ठरवले.

उलुपीने दोघांनाही असे काही करू नका असे सांगितले. “मी अर्जुनाला जिवंत करीन. नागलोकात एक दिव्य रत्न आहे. त्याच्या स्पर्शाने हे जिवंत होतील”. आपल्या जवळचे दिव्य रत्न अर्जुनाच्या छाती वर उलुपीने ठेवताच, साखर झोपेतून जागे झाल्यासारखा अर्जुन डोळे चोळत उठून बसला आणि हा सगळा काय प्रकार आहे असे विचारता झाला.

उलुपीने आता सगळ्याचा उलगडा केला. महाभारतयुद्धात भीष्माचा वध अर्जुनाच्या हाती झाला. पण त्यावेळी भीष्म अर्जुनाशी लढत नव्हते, शिखंडी आडून अर्जुनाने शरसंधान करून भीष्मांना शरपंजरी पाडले आणि त्यांचा मृत्यू झाला. भीष्म त्यांच्या जन्मकहाणीनुसार अष्टवसुंपैकी एक, वसूना ह्या कृत्याचा राग आला आणि तो योग्यही होता. त्यांनी अर्जुनाला शाप देऊन त्याचा स्वर्गाचा मार्ग बंद केला. ही गोष्ट अर्जुनालाही ठाऊक नव्हती. कारण वसुंनी ही इच्छा बोलून दाखविताच माता गंगेकडून त्याला होकार मिळाला होता.

उलुपीचा पिता कौराव्याला ह्या शापाविषयी समजताच त्याने अष्टवसुंकडे धाव घेतली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले आणि आपल्या जावयासाठी, उलुपीच्या पतीसाठी, अर्जुनासाठी उःशाप देण्याची विनंती केली. वसुंनी उःशाप दिला. “जर अर्जुनाचा मृत्यू त्याच्या मुलाच्या हातुन घडला तर ह्या शापातून तो मुक्त होईल”. नागराजाकडे असलेल्या दिव्य रत्नाचा वापर करून उलुपीने हे सर्व जमवून आणले. उःशापाच्या पूर्ततेसाठी बभ्रुवाहनाहाती अर्जुनाचा मृत्यू झाला आणि ह्या दिव्य मण्यामुळे तिचा पती तिला परतही मिळाला.

अश्वमेधाचा घोडा यथावकाश हस्तिनापुरी परत आला आणि यज्ञ यथासांग पार पडला. बभ्रुवाहन, चित्रांगदा, उलुपी ह्या सर्वांचा यथोचित आदर करण्यात आला.

वर म्हटल्याप्रमाणे यौधेय, सर्वग, निरामित्र आणि सुहोत्र ह्याचा निदान महाभारतात तरी फारसा उल्लेख आढळत नाही.

आता द्रौपदि पुत्रांबद्दल. द्रौपदीचे पाचही पुत्र अनुक्रमे प्रतीविंध्य, सुतसोम, श्रुतकीर्ती / श्रुतकर्मा, शतानिक, श्रुतसेन. हे पाचही पुत्र अतिशय पराक्रमी, महारथी होते. वेगवेगळ्या दिवशी त्यांनी भाग घेतलेल्या युद्धाची आणि योद्ध्यांची वर्णने महाभारतयुद्धात ठिकठीकाणी आहेत. बहुतेक वर्णानात ते एकमेकांना साथ देतांना दिसतात. एखादा विरथ झाला तर त्याचा भाऊ त्याला आपल्या रथात घेऊन युद्ध चालू ठेवतांना दिसतात. त्यात महत्वाची द्वंद्वे प्रतीविंध्या विरुद्ध अलाम्बुश राक्षस राजा. त्याच्या रथाला पिशाच्चे जोडलेली होती, अस्वलांच्या कातड्याने रथ मढवलेला होता आणि रथाच्या कळसावर गिधाडांचा राजा पंख फडफडवत, चित्कारत विराजमान होता. अश्वत्थामा, शकुनी, दुःशासन, त्रिगर्त राजांपैकी एक चित्रसेन हे इतर नाव घेण्यासारखे योद्धे. प्रतीविंध्याने दृमसेनाचा वध केला. वर म्हटल्याप्रमाणे ह्यात त्याला श्रुतकर्माची साथ मिळाली आणि श्रुतकर्माने चित्रसेनाचा वध केला. सुतसोमाने कर्णपुत्र विकर्णा बरोबर युद्ध केले. कर्णपुत्र सत्यसेन, सुशेन ह्यांच्याबरोबर लढतांना नकुलाच्या रथाचे घोडे, सारथी मारले गेले. विरथ झालेल्या नकुलाला सुतसोमाने आपल्या रथात घेतले आणि क्रुद्ध नकुलाकडून सत्यसेन व सुशेन दोघेही मारले गेले. कौरव बंधुंबरोबर लढताना द्रौपदी पुत्र एकोप्याने लढताना दिसतात. जयत्सेना, दुःशकर्मा हे कौरव वीर शतनिकाच्या हातून मारले गेले. शतनिकाने शल (भूरीश्रावाचा भाऊ) ह्या सोमादत्ताच्या मुलाचा वध केला.  शतनिक आणि कर्णपुत्र वृषसेन ह्यांच्या युद्धात शतनिकाचे धनुष्य तुटल्यावर त्याला त्याच्या भावाने त्याला रथात घेतले. राजा विराटाचा भाऊ देखील शतनिक, त्याच्या सोबत, द्रौपदिपुत्राच्या नाम साधर्म्यामुळे गोंधळ होऊ शकतो. श्रुतसेनाने शल्य, कम्भोजचा सुदक्षिणा ह्यांचा सामना केला.

थोडक्यात द्रौपदीपुत्र महायुद्धातून ताऊन सुलाखून बाहेर पडले. पण तो आनंद थोडक्या काळाकरताच टिकला. युद्धानंतर प्रत्यक्ष कृतांतासारख्या अश्वत्थाम्याने, कृप आणि कृतवर्म्याच्या मदतीने भर रात्री पांडवांच्या शिबिरावर छापा घालून, झोपेतून धडपडत उठलेल्या, अंगावर चिलखत व कवच नसताना, हातात अशावेळी मिळेल त्या हत्याराने लढणाऱ्या पाची द्रौपदिपुत्रांचा घात केला.          

महाभारतात निर्माण झालेला वाद सावत्र  भावांच्यात होता आणि पांडव पुत्रांच्या (उपपांडव) बाबतीत तर सहोदर आणि सावत्र अशी भावंड, त्यांच्यात बखेडा उभा राहायला वेळ लागला नसता. युधिष्ठीरासारखा धर्मज्ञ, भीष्म, द्रोण, कृपाचार्या  सारखे अनेक विषयातील मर्मज्ञ आणि खुद्द श्रीकृष्ण असूनदेखील  जे महाभारत टळू शकले नाही, जो अपार नरसंहार झाला तो थांबला नाही. त्यांच्या पश्चात उपपांडवातील तंटा  (झालाच असता तर?) कोणत्या थराला गेला असता हे  सांगणे महाकठीण. कोणकोणत्या अभद्र युती, महायुती झाल्या असत्या ह्याची कल्पना करणे बहुदा महामुनी महर्षि व्यासांना देखील शक्य झाले नसते.

दुसऱ्या महायुद्धाची बीजे पहिल्या महायुद्धात लावली गेली. तसे काहीही महाभारतकालीन महायुद्धात झाले नाही. महाभारतकार कृष्ण द्वैपायन (व्यास) मुनींनी महाभारत लिहिताना नेमकी हीच काळजी घेतल्यासारखी वाटते, ह्या गृहकलहात (भाऊबंदकीत) पुढील कलहाची नांदी नसेल. दोन भावांच्या मुलांच्यातील ही सत्ता स्पर्धा जी नृसंहाराला, महाभारताला कारणीभूत ठरली तिची पुनरावृत्ती होणार नाही ह्याची दक्षता घेतल्यासारखी वाटते. अभिमन्यु पुत्राच्या, परीक्षिताच्या रूपाने राज्याला एकमेव वारस उरला.