Wednesday, 4 May 2022

वसंतोत्सव

चेरी ब्लॉसम उत्सव-जपान, कार्निवल मेक्सिको, या देशांबरोबरच चीन, स्पेन, हॉलंड, थायलंड इत्यादींमधील वसंतोत्सव हे जगप्रसिद्ध आहेत. भारत देखील त्यात मागे नाही. भारताच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या नावाने वसंतोत्सव साजरा होतो. वसंतागमनाची वर्दी देणारे होलीकोत्सव, गोव्याचा शिग्मो, बैशाखी, खुद्द वसंतात वसंत पंचमी, चैत्र पाडवा, गोवा कार्निवल, उगाडी, बोहाग बिहू किती तरी नाव सांगता येतील. ह्या सगळ्या उत्सवांच मूळ, वसंतात निसर्ग जो आनंद, उल्हास, चैतन्य आणि नाना रंगांची उधळण करीत असतो, निसंश:य त्यातच असलं पाहिजे.

चैत्र सुरु होतो न होतो तोच सगळी झाडं जणु कात टाकावी तशी जुनी पान गाळून, मोहक हिरव्या, गुलाबी, लाल रंगात रंगून जातात. लुसलुशीत पालवीने डवरलेली झाडं, उन्हात इतकी सुंदर दिसतात की नजर हलतच नाही. त्यात पिंपळाचा थाट काही वेगळाच. पानांच्या एकजुटीचा विजय असो! असे म्हणत गळतातही एकत्र आणि नित्य नवा साज लेऊन येतातही एकत्र. सृष्टी जणु नवीन वस्त्रे परिधान करून पुढे येणाऱ्या पुष्पोत्सवाला हजेरी लावण्याची तयारी करीत असते.

उन्हाचा चटका जाणवायला नुकतीच सुरुवात होते. पारा हळुहळु चढत असतो, जणु ‘दाहक परी संजीवक’ ह्याचा दाखला देत प्रथम फुलतात ती Tabebuia Rosea Pink Trumpet झाडे, (मराठी नाव??) गुलाबी कागदी फुलांचा डोलारा सांभाळत इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ठाण्याकडे जातांना उजव्या बाजूला ओळीत दिसतात. गुलाबी रंगाच्या इतक्या वेगवेगळ्या छटा पहायला मिळतात की जणु काही प्रत्येक झाड सांगत असते माझा रंग पण गुलाबी आहे पण मी शेजाऱ्यासारखा नाही. ह्या फुलांच्या पाकळ्यांचा स्पर्श एखाद्या पातळ कागदासारखा भासतो. बहर चांगला १५-२० दिवस टिकतो. ह्या झाडाचे मूळ स्थान अमेरिका खंड, पण इथल्या उष्णकटिबंधीय वातावरणात इतका छान रमलाय की आता तो उपरा वाटतच नाही. नाहीतरी परकीयांनी आपल्या मातीत रुजणे हे आपल्या परंपरेला धरूनच आहे.

त्याच सुमारास त्याच रस्त्यावर डाव्या बाजूला दिसतात शाल्मलीची (काटे सावर) लालचुटूक फुले. चाफ्यासारखा हाही पर्णरहित आणि फुलांनी डवरलेला दिसतो. त्या फुलांवर वेगवेळ्या प्रकारचे फुल टोचे (Flower Peckers) फुलातील मधाचा चोच भरून आस्वाद घेतांना दिसतात. हा बहर ओसरल्यावर त्य फुलांची जागा हिरव्यागार बोन्डांनी घेतलेली दिसते. यथावकाश उन्हाने वाळून बोंडे तडकून त्यातील कापूस, म्हाताऱ्या होऊन वाऱ्यावर अल्लद तरंगत जातांना दिसतो.

ह्या सगळ्यांमधे हिरीरीने आपल्या  पिवळ्या धम्मक फुलांचे झेंडे घेऊन पिवळा गुलमोहोर, ताम्रशेंगी (Peltrophorum Ptercarpum, Copperpod, Yellow Flame) आपल्या फुलांच्या पसाऱ्याने आणि मंद, थोडासा उग्र पण सुदूर पसरणाऱ्या सुगंधाने लक्ष वेधून घेतों. प्रथम लक्ष जाते ते गळलेल्या फुलांच्या पखरणीकडे. बघण्यासारखी असते. ह्याच्या कळ्यांचा रंग आणि नंतर येणाऱ्या शेंगांचा रंग लालसर तपकिरी, ताम्रवर्णी असतो. प्रथम फुलांचा डोलारा घेऊन आणि नंतर शेंगाचा भार डोक्यावर वहात हा पाहाणाऱ्यांना दृष्टी-गंधाचे सुख एकाचवेळी देतो. दक्षिण आशियात प्रामुख्याने आढळणारा हा वृक्ष आता जगभर पसरला आहे.

मुंबई पुणे जलद महामार्गावर आणि पुण्यात देखील विपुल प्रमाणात दिसणारा निळ्या सुवासिक फुलांनी बहरलेला Jacaranda (निळा मोहोर) वृक्ष. ही झाडं देखील जमिनीवर पडलेल्या फुलांचा सडा पाहून प्रथम लक्ष वेधून घेतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून हा वृक्ष फुलायला सुरवात होते. याच जलद महामार्गावर दरीच्या उतारावर पांगाऱ्याची लाल भडक नजरेलाही जाड जाणवणाऱ्या पाकळ्यांची आकाशाकडे उमलणारी फुले दिसतात. जंगल फ्लेम (Jungle Flame – अग्निशिखा) या नावाने ओळखले जाण्याचे स्वाभाविक कारण. याही झाडावर फुलातील मधाकरिता फुल टोचे आणि मैनांची गर्दी दिसते. 

ह्या सर्व झाडांमध्ये आपल्या विशिष्ठ लाल रंगाने उठून दिसतो तो गुलमोहोर. त्याची मधली पाकळी पिवळ्या-लाल रंगाची (हळद-कुंकू) खूपच खुलुन दिसते. त्याच्या कळ्या घेऊन आम्ही लहानपणी त्या एकमेकांवर मारून तोडण्याचा खेळ करत असू. ज्याची काळी टिकेल तो जिंकला. ह्या फुलातील मधली पाकळी काढून खाल्याचे देखील आठवते आहे. नेमकी चव सांगता येणार नाही पण तुरट-गोड अशी काहीशी असावी. जागोजागी अगदी लहान झाडाला देखील एक दोन फांद्या फुलांच्या वजनाने नतमस्तक होऊन आपल्याकडे लक्ष वेधून घेतांना दिसतात. फुले गळत असतानाच चपट्या गडद हिरव्या रंगाच्या शेंगानी झाड भरून जाते. हा हा म्हणता या शेंगा वाळून तपकिरी झाल्यावर आतील बियांच्या आवाजाने खुळखुळायला लागतात. लहानपणी ह्या लहानश्या तलवारी सारख्या दिसणाऱ्या शेंगांनी लुटुपुटुच्या लढाया केलेल्या बहुतेक मुलांना आठवतील.

बहावा किंवा बाहवा, इंडिअन लॅबर्नम (Cassia Fistula, Golden Shower) इतके समर्पक नाव असेलेला बहुदा एकमेव वृक्ष असावा. सगळी नाव ही त्याच्या फुलांवरून, शेंगांवरून पडली आहेत. ह्या सोनसळी फुलांची कांचन झुंबरे झाडावर झुलताना तुमच्या नजरेतून सुटूच शकत नाहीत. ह्या झाडाची हलकी हिरवी पोपटी पालवी, पिवळ्या धम्मक फुलांचे घोस, त्यावर रुंजी घालणारी फुलपाखरे आणि छोटे भिरभिरणारे मधु भक्षी, मधेच लोंबणाऱ्या हिरव्या नळी सारख्या असलेल्या शेंगा. बहर सरेपर्यंत त्या वाळून तपकिरी रंगाच्या होतात आणि त्या हिरव्या, पिवळ्या रंगसंगतीत आपल्या रंगाची मोहक भर घालतात. हे दृश्य डोळ्यात साठवावे तेव्हढे थोडेच आहे. बाह्वाच्या शेंगांवरून आठवले, विषयांतराचा दोष पत्करून सांगतो. बाह्वाची ओळख मला व्यंकटेश माडगुळकरांच्या एका लेखावरून झाली. लेखाचे शीर्षक आत्ता आठवत नाही.  ह्या शेंगा अस्वलाला खूप आवडतात. बाहावाच्या झाडाखालून जातांना स्वारीला मोह आवरत नाही मग एकामागून एका शेंगेवर पोटभरेस्तो ताव मारून अस्वल पुढे जाऊन सावलीला अंमळ लवंडते. ह्या शेंगाचा गर सारक असतो. अतिसेवनामुळे व्हायचे तेच होते अस्वल अतिसाराची शिकार होऊन दोन दिवस जवळपासच निपचित पडून राहते. तरतरी आल्यावर भुकेची जाणीव होते आणि बाह्वाच्या शेंगा पुन्हा खुणावतात मग काय पहिले पाढे पंचावन्न. पुन्हा तीच अवस्था हा सगळा प्रकार त्या झाडाच्या सगळया शेंगा संपेपर्यंत चालतो. परिणामतः बाह्वाच्या बिया मात्र पसरतात आणि रुजतात देखील. 

कल्पना करा, बहरलेला बाहवा, त्यावर झुकलेल्या, लाल चुटूक फुलांनी लगडलेल्या गुलमोहोराच्या फांद्या आणि त्याला निळ्या मोहोराची पार्श्वभूमी!! अहाहा असा रंगांचा खेळ फक्त निसर्गच करू जाणे. हाही वसंत त्याला अपवाद नाही. दोन्ही हातानी भरभरू उधळतोय निसर्ग! हा रंग सोहळा पाहिला नसलात तर एकदा मान वर करून नक्की पहा !

Saturday, 9 October 2021

कुंती

कुंती, महाभारतातील असं एक व्यक्तिमत्व की जे रंगमंचावर दिसत नसलं तरी आपल्या अस्तित्वाची सदोदित जाणीव करून देत रहात. कुंती शुरसेनाची मुलगी. यादव कुलोत्पन्न, वसुदेवाची बहिण, कृष्णाची सख्खी आत्या. पाळण्यातील नाव पृथा, शब्दशः अर्थाने पृथ्वीची कन्या. कुंतिभोज राजाची दत्तक कन्या म्हणून कुंती.

महाभारत नावाच्या प्रचंड गुंतागुंत असलेल्या महाकाय जुळणी कोड्याच्या (jigsaw puzzle) काही प्राथमिक तुकड्यांची सुरवात कदाचित दुर्वास मुनींनी कुंतीभोज राजाला दिलेल्या भेटी पासून झाली असेल असे वाटते. महाकोपिष्ट दुर्वास मुनींची भेट म्हणजे यजमानांवर संकटच. त्यांच्या रागाच्या धाकाची कल्पना करा, एक पिता जो राजा आहे, दुर्वासांच्या दिमतीला असंख्य दास, दासी ठेवण्याची त्याची कुवत असूनही आपल्या मुलीला त्यांची सेवा करण्यास सांगतो. आज्ञाधारक कन्या आपल्या पित्याच्या इच्छेनुसार दुर्वास ऋषींची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतें. संतुष्ट होऊन दुर्वास ऋषींनी तिला आशीर्वाद देऊन एक मंत्र सांगितला. त्या मंत्राचा जप करून कुंती ज्या मानवाचे, दानवाचे वा देवाचे स्मरण करेल, त्याच्या पासून तिला पुत्रप्राप्ती करून घेता येईल. (आजच्या सामाजिक मापदंडानुसार विचार करून कर्ण दुर्वास पुत्र होता असा मुद्दा मांडण्याचा मोह अनेकांना होईल पण कृपया तो टाळावा. अन्यथा कर्ण ब्राह्मण पुत्र ठरेल आणि व्यासांना महाभारत नव्याने लिहावं लागेल). थोडा विचार केला की या मंत्राचं किंवा दिलेल्या वराचं महत्व लक्षात येईल. भविष्यात कुंतीला जो पती मिळेल त्याच्या पासून तिला पुत्र प्राप्तीची शक्यता नाही आणि वेळेवर पुत्रप्राप्ती होणे हे राज्याला वारस देण्याच्या दृष्टीने आत्यंतिक गरजेचे असेल त्यावेळी हा मंत्र उपयोगी ठरेल ह्याची जाणीव दुर्वास ऋषींना होती असे म्हणावे लागेल. महाभारतातील अनंत प्रसंगांच्या साखळीतील अनेक सुरवातीच्या दुव्यांमधील एक दुवा म्हणता येईल असा हा प्रसंग.

तारुण्य सुलभ उतावळेपणा म्हणा, औत्सुक्त्य म्हणा, मिळालेल्या मंत्राचा वापर करून पहाण्याचा, त्याची शहानिशा करण्याचा मोह होण आत्यंतिक स्वाभाविक होतं आणि तो तसा कुंतीला झाला. त्या काळी आजच्या मुलामुलीं प्रमाणे इतक्या लहान वयात कोणावर आकृष्ट वगैरे होण्याचा प्रकार नसावा त्यामुळे मंत्राच स्मरण करतांना, रोज सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देताना दिसणारं, त्याचं ते सालस गोजिरे रूपच, कुंतीच्या डोळ्यासमोर आलं असावं. दुर्वासांचा मंत्र फुकट जाण्याचा वा सफल न होण्याचा संभवच नव्हता. कर्णाचा जन्म झाला. हेतू, कुतूहल शमन करण्याचा होता, माता होण्याचा नव्हे. कर्णाच्या जन्माबरोबरच तिच्यातील मातेआधी क्षत्रिय राजकन्या जागी झाली, राजाला, राज्याला हानी पोहोचेल असं कोणतही कृत्य आपल्या हातून घडू नये यासाठी ती जागृत झाली आणि कर्णाचा त्याग हा सोप्पा मार्ग अनुसरून मोकळी देखील झाली. तिच्यातील या क्षत्रिय स्त्रीच्या असंख्य प्रसंगांचे निष्ठुर दाखले महाभारतात पदोपदी मिळतात.   

यथावकाशाने कुंतीचा विवाह बलिष्ट कुरुवंशातील युवराजाशी, पंडुशी झाला. पंडूला कुंती पासून अपत्य होत नाही असे दिसल्यावर, मद्र कन्या माद्रीशी पंडूचा दुसरा विवाह केला गेला (त्या काळीही, पुरुषी अहंकारामुळे, पुत्र प्राप्ती ही बहुदा केवळ स्त्रीची जबाबदारी होती, अर्थात कुंतीने ती पार देखील पाडली). स्वाभिमानी कुंतीला कदाचित अपमान वाटला असेल किंवा पंडूच्या मर्यादा ठाऊक असल्यामुळे मनोमन हसूही आलं असेल. सर्व संमत्तीने नियोगाने पुत्रप्राप्ती करून घेण्यासाठी पंडू दोन्ही भार्यांसह वनात निघून गेला. काळ आपल्या गतीने जात होता, धृतराष्ट्राचा विवाह गांधार देशाच्या राजकन्येशी गांधारीशी झाला (आणि रंगमंचावर शकुनीच्या रूपाने खलनायकाचा वावर सुरु झाला – प्रसंगांचे कंगोरे दर्शवण्याचा मोह आवरला नाही). (वाचा ब्लॉगपोस्ट गांधारी). गांधारी गरोदर असल्याच्या बातम्या कुंती पर्यंत पोहोचल्या आणि तिची घालमेल सुरु झाली. ज्या कामा करिता आपण वनात आलो ते काम पूर्ण करावं, असा धोशा तिने पंडूच्या मागे लावला. हेतू, क्षत्रिय राज्ञीचा, पंडूच्या गादीला वारस मिळावा, कुरुवंशाचे राज सिंहासन पंडू पुत्रांकडे रहावं (नियोगाच्या नियमांनुसार अशी मुले त्यांच्या जैविक वडिलांची न मानता आईच्या पतीची मानली जात असतं).

सिंहासनाला वारस म्हणून एकच पुत्र असून भागणार होतं. राजा हा शांत, धर्मप्रिय, मृदू, सत्यवचनी असावा पण राज्य राखण्याकरिता वाढविण्याकरिता, मिळवण्याकरिता (ही परिस्थिती ओढवू शकते ह्याची पृथेला पूरेपर जाणीव होती) हे गुण पुरेसे नाहीत. शौर्य, गरज पडल्यास क्रौर्य, युद्ध शास्त्रात नैपुण्य, कुशाग्र, बलाढ्य, थोडक्यात काय षड्रीपुंशी दोस्ती नाही पण फारकत देखील घेतलेली नसावी अशा योध्यांची राजाला निश्चित गरज आहे. ह्या सर्वांकरिता बाहेरील कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या सहोदरांची साथ मिळाली तर अधिक काय हवं? ह्याची कुंतीला पुरेपूर कल्पना होती. नियोग किंवा दुर्वासांनी दिलेला मंत्र जे असेल ते असो, पण नियोगा करिता वा मंत्रोच्चार करतांना स्मरण करण्याकरिता, निवड केलेल्या देवतांची नावे पाहिली की कुंतीच्या दूरदृष्टीला दाद द्यावीशी वाटते. यमधर्म, वायू आणि इंद्र हे क्रमशः युधिष्टिर, भीम व अर्जुन ह्यांचे जन्मदात्रे ठरले. पुर्वनियोजनानुसार युधिष्ठिरा पाठोपाठ भिमार्जुनांचा जन्म बरच काही सांगून जातो. माद्रीला मंत्र सांगण्याचा मोठेपणा आणि त्यानंतर पंडूला व माद्रीला तिने मिळू दिलेला एकांत (तिच्या सारख्या दक्ष स्त्रीच्या हातून ही चूक होऊ शकत नाही). ह्यात शापित दुबळ्या पंडूची आहुती पडली आणि माद्री सती गेली. माद्रीच्या रूपाने सत्तेचा एका दावेदार निर्माण होण्यापूर्वीच संपला आणि नकुल सहदेव लहान वयातच कुंतीच्या पदरा खाली आले. कुंती पुत्रांबारोवर त्यांची नाळच जणु कायमची जोडली गेली (पंडू व धृतराष्ट्र देखील एकाच पित्यापासून पण भिन्न मातांच्या पोटी जन्माला आले होते). एका महत्वाकांक्षी राज्ञीला जगण्याकरिता एक हेतू मिळाला. पुढचा प्रवास केवळ पंडू पुत्रांना त्यांचा हक्क मिळवून देणे वा त्यांनी तो मिळवण्याकरिता त्यांना तयार करणे हे उद्दिष्ट गाठणे या दिशेने चालू राहिला.

लाक्षागृहातून सहीसलामत निसटल्यानंतर अज्ञातवासात भीमाकरवी घडवलेला बकासुर व हिडींब राक्षसांचा निप्पात आणि त्या पश्चात बलाढ्य राक्षस वंशाशी कायमचे वैर टाळण्याकरता भीम व हिडीम्बेच्या विवाहाला दिलेली मान्यता. न्यायाने घटोत्कच हा पांडवांचा वारस ठरलास असता, ते टाळण्याकरिता, हिडींबेला मुल झाल्यानंतर, ती भीमाशी कोणताही व्यवहार वा संबंध ठेवणार नाही असे हिडीम्बेकडून घेतलेले वचन. ह्या तिच्या कृतींमधून, कुंतीच्या  राजकीय मुत्सद्देगिरीचा एक नमुना आपणास पहावयास मिळतो असे म्हणायला हरकत नाही. हे करीत असतांना एक स्त्री म्हणून हिडीम्बेला काय वाटेल, तिचे भीमावर प्रेम होते म्हणून ती ह्या दिव्याला तयार झाली ह्या कशाचाच परिणाम निर्णय घेतांना कुंतीवर झाला नाही. ह्याच हिडीम्बेच्या पुत्राचे, घटोत्कच्याचे बलिदान कृष्णाने कुरुक्क्षेत्रावरील महायुद्धात दिले आणि अर्जुनाला मारक ठरणारी वासवी शक्ती वापरण्यास कर्णाला भाग पडले (वाचा ब्लॉगपोस्ट बलिदान).

द्रौपदीला स्वयंवरात खरतर, पण पुरा करून, अर्जुनाने जिंकले होते. द्रौपदीने देखील मनोमन अर्जुनास वरले असावे. पाच पांडव तिला घेऊन परत आल्यावर तिचा विवाह पाचांशी व्हावा ही कुंतीची आज्ञा काही अंशी अमानुष वाटली तरी ती पाच पांडवांना घट्ट बांधून ठेवणारी ठरली. खास करून नकुल व सहदेव, ज्यांच्यात त्यांच्या वडीलबधुंइतकी क्षमता नव्हती. ही आज्ञा देतांना देखील द्रौपदीला, अर्जुनाला काय वाटेल, त्यांच्या भावना, ह्याचा विचार ती करत बसली नाही. द्रौपदीला पाहताक्षणी तिच्या लक्षात आलं की ह्या अलौकिक सौंदर्याचा मोह बाकीच्या भावांना आज न उद्या पडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तो प्रश्न निर्माण होण्यापुर्वीच तिने निकालात काढला.  

ह्या सगळ्या तिच्या निर्णयांवर कडी म्हणजे कुंतीची आणि कर्णाची भेट. बघण्यासारखे आहे, त्या भेटीची वेळ, नेमेकी महायुद्ध सुरु होण्यापूर्वी, कर्णाने पूर्ण निर्धाराने दुर्योधना बरोबर उभं रहाण्याचा निर्णय घेतल्यानंतर. भेटीत कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगितल्यावर त्याची सर्व बलस्थाने मुळापासून उखडली जातील ह्याची पूर्ण कल्पना कृष्णाला होती. कृष्णाच्या इच्छेनुसार ती गोष्ट कुंतीने अमलात आणली. ज्या कर्णाला आपण सोडून दिले त्याच्या कडून आपल्या चार  पुत्रांकारिता अभय मागतांना तिला यातना झाल्या होत्या की नाही ते कळायला मार्ग नाही. हे करीत असतांना तिने आपल्या पाचही पुत्रांना वाचवले (अर्जुनाला कृष्णाचे अभय होते).   

यादव राजकन्या म्हणून जन्माला आल्यापासून, ते कुरु राज्याची राजमाता होण्यापर्यंत, कुंतीने केलेला हा प्रवास बघतांना डोळ्यासमोर एक राजकारणी, धूर्त धुरीण, धोरणी, काहीशी कठोर आणि जन्मदात्री असूनही पुत्रांची निवड करणारी स्त्री उभी राहिल्याशिवाय रहात नाही. किंबहुना कुंतीला महाभारताला दिशा देणारी स्त्री म्हटली तरी फारसं गैर ठरणार नाही. 

Sunday, 15 August 2021

अश्वत्थामा एक रूपक?

 हेहीवाचा” ह्या माझ्या ब्लॉग मधून आतापर्यंत मी महाभारतातील शल्य, घटोत्कच, कृष्णा, भीष्म आणि गांधारी ही पात्रे माझ्यापरीने उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. महाकवी व्यासांचं महाभारत, ही विविध व्यक्तिमत्वांची कधीही न संपणारी खाण आहे. आज महाभारतातील असेच एक न उलगडलेलं, बहुतांशी दुर्लक्षिलेलं, किंबहुना महाभारतात त्याच्या असण्याच प्रयोजन न कळणारं व्यक्तिमत्व, तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.  

बहुतेकांना अश्वथामा माहीत आहे तो लहानपणी वडिलांच्या गुरुकुलात आलेल्या राजापुत्रांप्रमाणे दूध पिण्याकरिता हट्ट धरणारा आणि महायुद्धाच्या अखेरीस झोपलेल्या पांडव पुत्रांचा वध करणारा चिरंजीव म्हणून.  

कुरुगुरू आचार्य द्रोण (द्रोणातून जन्माला आलेला? आद्य Test Tube Baby?) आणि कृपाचार्यांची भगिनी कृपी ह्यांना शंकराच्या कृपाप्रसादाने झालेला पुत्र. जन्मतःच मस्तकी तेजस्वी रत्न धारण केलेला. ज्या रत्नाच्या प्रभावामुळे तहानभूकेपासून मुक्त असलेला. जन्मतःच त्याने उच्चैःश्रवा सारखा ध्वनी केला म्हणून त्याचे नाव अश्वथामा पडले. (ग्रीक पुराणात आलेल्या centaur शी तर साधर्म्य नसेल? उगाच आपली शंका).

भारद्वाज मुनींचा पुत्र द्रोण वडिलांचं गुरुकुल असून देखील अग्निवेशांच्या आश्रमात शिक्षणासाठी राहिले. कदाचित पितृ प्रेमामुळे मुलाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये हा त्या मागचा हेतू असावा. अग्निवेशांच्या आश्रमातच गुरुबंधू असलेला पांचाल देशाचा राजपुत्र द्रुपद पुढे जाऊन राजा झाल्यावर द्रोणांना ओळख देण्यास नकार देतो किंबहुना दरबारातून अवमानित करून पाठवतो. अपमानित द्रोण गुरुदक्षिणा म्हणून पांडवां करवी द्रुपदाला पराजित करून सूड घेतात. पांचाल देशाचे साम्राज्य विभागून उत्तर पांचालचा राजा म्हणून अश्वथाम्याचा राज्याभिषेक करतात.

ह्या प्रसंगा पर्यंत अश्वथाम्याच्या बालपणीची दुधाची गोष्ट सोडली तर महाभारतात त्याचा खास असा उल्लेख आढळत नाही. राजा होण्याचं वय असून देखील वडिलांच्या अपमानाचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न अश्वथाम्याकडून झालेला दिसत नाही. पांडवांच्या पराक्रमाने राज्य मिळालेलं असून देखील कौरवांच्या बाजूने पांडवाच्या विरुद्ध लढतांना तो दिसतो. इतकेच नव्हे तर आत्यंतिक अधर्माने पांडवांचा वध करण्याचा प्रयत्नही तो करतो. १८ दिवस चाललेल्या महाभारतातील युद्धात प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या महावीराने गाजवला होता. अश्वथाम्याच्या नावावर मात्र त्यातील कोणताही दिवस नाही. घटोत्कचाचा पराभव करण्यात अश्वथाम्याला आलेल्या अपशामुळे घटोत्कचाच्या वधाकरीता कर्णाला वासवी शक्तीचा वापर करावा लागला (वासवी शक्ती जर अर्जुना बरोबरच्या युद्धात कर्णाकडे असती तर महायुद्धाचा निकाल कदाचित वेगळा लागला असता). नाही म्हणायला, घटोत्कचाच्या राक्षस सेनेचा समर्थपणे प्रतिकार करून त्याच्या पुत्राचा त्याने केलेला वध ही एक जमेची बाजू. पित्याच्या, द्रोणाचार्यांच्या मृत्युनंतर नारायणास्त्राचा वापर आणि कृष्णाच्या समयसूचकतेमुळे त्याचा फसलेला प्रयोग हे योद्धा म्हणून नोंद घेण्यासारखे प्रसंग.  

महायुद्ध संपल्यानंतर नसलेल्या कौरव सेनेचे सेनापतीपद दुर्योधनाने अश्वथाम्याला बहाल केले  आणि कृतवर्मा व कुपाचार्यांच्या मदतीने झोपलेल्या धृष्टद्युम्ना बरोबर पांडव पुत्रांचा (झोपलेले वीर हे पांडव आहेत ह्या समजुतीमुळे) अश्वथामा वध करतो. तदनंतर झालेल्या अर्जुना बरोबरच्या द्वंद्वात दोघेही ब्रह्मास्त्राचा प्रयोग करतात. विश्वाचा विनाश टाळण्याकरिता देवांच्या व ऋषींच्या आवाहनावरून अर्जुन ब्रह्मास्त्र मागे घेतो पण अश्वथाम्याला आपले अस्त्र मागे घेता येत नाही आणि त्याला ते उत्तरेच्या गर्भावर वळवावे लागते. हे अश्वथाम्याचं आणखीन एक अपयश.

महाकवी महाभारतकार व्यासांनी अस्वथामा ह्या पात्राची योजना दोन-तीन कारणांनी केली असावी असे वाटते.

प्रत्यक्ष महायुद्धापर्यंत कौरवांनी अनेक कपट कारस्थाने करून पांडवांना सत्तेपासून लांब ठेवण्यात यश मिळवलेलं दिसतं तर प्रत्यक्ष युद्धात कौरवांकडील महावीरांचा पराभव व मृत्यू पांडवांनी अवैध मार्गाने केलेला आढळतो. ही नैतिक-अनैतिक मार्गांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची मालिका दुर्योधनाच्या मृत्युपर्यंत चालू राहिलेली दिसते (गदा युद्धाच्या नियमानुसार कमरेखाली वार करणे गैर होते). त्रयस्थ भावनेने जर आपण महाभारताकडे बघितले तर महायुद्धाच्या शेवटाकडे येता येता कपटनीती, खोट्याचा आधार, अधर्माने केलेले युद्ध अशा अनेक अनैतिक मार्गांचा वापर दोन्ही पक्षांनी सारख्याच प्रमाणात केलेला दिसतो. पण महायुद्धाच्या शेवटी अश्वथाम्या हातून घडवलेल्या या कृत्याने पांडवांचे पारडे नैतिकतेच्या युद्धात अचानक जड होते आणि कौरव हे कथेतील खलनायक ठरतात. एका नगण्य पण संदर्भाने महत्वपूर्ण पात्राच्या हातून लेखकाने वाचकाचे मत इतक्या निर्णायकपणे बदललेले क्वचितच पहायला मिळते.     

असूया, मत्सर ही तुलनात्मक दृष्टीकोनातून निर्माण होणारी एक आत्यंतिक नकारात्मक भावना. नकारात्मक अशाकरिता की ज्याला असूया वाटते तो जी उर्जा स्वतःभोवती निर्माण करतो ती त्याचा तर ऱ्हास करतेच पण त्याच बरोबर ज्याच्या बद्दल त्याला असूया वाटते त्याचेही नुकसान केल्याशिवाय रहात नाही. असूया कोणालाच चुकलेली नाही. दोन लहान, अगदी  पाठोपाठच्या भावंडात देखील असूया पाहायला मिळते, मोठ्यांची तर गोष्टच सोडा. जेव्हा ही असूया ती गोष्ट मिळण्याची लायकी नसलेल्याला वाटते तेव्हा ही असूया अधिकच विद्रूप रूप घेतें. जे नेमके अश्वथाम्याच्या रूपाने महाभारतकारांनी दाखवले आहे असे वाटते. अश्वथामा हा जन्मतः चिरंजीव नव्हता. तसे असते तर ‘नरोवा कुंजरोवा हे युधिष्ठीराचे बोल ऐकताच आपली शस्त्र ठेवून आपल्या पुत्रास मृत्यू नंतर कोणती गती प्राप्त झाली हे पाहण्यासाठी द्रोणाचार्य रथावर ध्यानस्थ बसले नसते आणि धृष्टद्ध्युम्नास त्यांचा वध करण्यची संधी मिळाली नसती. अश्वथाम्याला चिरंजीव होण्याचा शाप कृष्णाने दिला, जणू असूयेला चिरंजीवित्व बहाल झाले. ही सर्व भूतांचे ठायी आढळणारी भावना महाभारतकारांनी महाभारतात अश्वथामा ह्या रूपकाने आणली असेल कां?      

वरील दोन्ही प्रयोजनांसहित तिसरे अगदी भिन्न प्रयोजन आहे असे वाटते. पांडव पुत्र, पाच भावांचे पुत्र, भविष्यातील महायुद्धाची जणु बीजे. ह्यांचा वध घडवून महाकवी व्यासांनी पुढील महायुद्धाची, भाऊबंदकीची शक्यताच नष्ट केली. पांडव पुत्रांच्या वधा नंतर कृष्णाकरवी उत्तरेच्या गर्भाचे रक्षण करवून कुरु महासत्तेला एकमेव वारस ठेवून संघर्षाचे मूळच नष्ट करण्याचा प्रयत्न तर महाभारतकारांनी केला असेल कां?  

अश्वथाम्याची योजना करून महाभारतकारांनी वरील तीनही गोष्टी साध्य केल्या आहेत असे वाटते.

Sunday, 20 June 2021

अर्थ हरवलेले शब्द ..३

 “आनंद झाला तुम्ही दोघं येऊ शकलात, जेवायला ही थांबलात! तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! श्रीखंड आणू का? नाही म्हणजे वाटी रिकामी दिसतेय. नाही, मला आग्रह करता येत नाही. खरतर आवडत देखील नाही. सावकाश जेवा!” सर्वसाधारण पंगतीत ऐकायला मिळणारा हा संवाद. अर्थात आजकाल पंगतीत भोजन आणि त्यातून आग्रहाने वाढणे कमीच झालं आहे.

‘सावकाश जेवा ह्याचा अर्थ कोणी खोडसाळ ..कराने (सुज्ञ, गाळलेली अक्षरे वाचताना भरून घेतील) अवकाश ठेवून, पोटात जागा ठेवून जेवा असा सांगितला होता. थोडक्यात आहेर वसूल करण्याकरिता वा फुकट आहे म्हणून हादडू नका. असो, विनोदाचा भाग सोडला तर कोणतीही गोष्ट सावकाश करणे ह्याचा अभिप्रेत अर्थ समजून घेणे आजच्या युगात खरोखर गरजेचे झाले आहे.

सावकाश म्हणजे नेमक काय? सावकाश म्हणजे हळुहळु? सावकाश म्हणजे गतीहीन? सावकाश म्हणजे रमतगमत? नाही मला नाही तसं वाटत. ह्या शब्दाचा नेमका अर्थ आपण हरवून बसलोय हेच खरं. आजच्या जगात एका जागी राहण्याकरता सुद्धा आपल्याला धावावं लागत, जर पुढे जायचं असेल तर काय कराव लागेल ह्याचा विचार करा. ह्या एकाच जागी राहण्याच्या वा पुढे जाण्याच्या नादात आपण नेमक काय हरवून बसलोय हे ज्याच त्यानेचं शोधावं.

मला आठवतंय लहानपणी आमच्यापैकी कोणीही बाहेर निघालो की घरची वडीलधारी मंडळी आवर्जून सांगत “सावकाश जा हो”. या वाक्यातील ‘सावकाश बरचं काही सांगून जातो. इथे सावकाश जा ह्याचा अर्थ गाड्या जाईपर्यंत क्रॉस करायचा थांब असा आहे. सावकाश ह्याचा अर्थ घाई (don’t rush) करू नकोस असा आहे, सावकाश ह्याचा अर्थ लक्ष (be attentive) देऊन जा असा आहे, सावकाश ह्याचा अर्थ जागृत (be aware) राहून जा असा आहे. सावकाश ह्याचा अर्थ सावध (be careful) राहून जा असा आहे. सुरक्षित जा असा आहे.

आजच्या गतीमान युगात वेग हे यशाच गमक झालं आहे. दिवस सगळ्यांकरिता सारखाच, २४ तासांचा. त्या २४ तासात जो जितका जास्त धाऊ शकतो तितका तो यशस्वी. आजकालच्या मुलांना तुम्ही पाहिलंत तर ती एकाच वेळी विविध कामे करतांना दिसतात. कानात इयरफोन (कर्ण पिशाच्च म्हणण्याचा मोह आवरतोय) नाहीतर कानावर हेडफोन असतात त्यातून वाहणारे कर्ण मधुर (कटू?) संगीताचे सूर, हातातल्या भ्रमणध्वनीवर वेगाने नाचणारे दोन्ही हातांचे अंगठे, कोपराच्या कोनात पकडलेल्या चिप्सच्या पाकिटातून मधूनच तोंडात जाणारे चिप्स, पाठोपाठ उरलेल्या बोटांत पकडलेल्या कॉफी कपमधून (कागदी) घेतलेला कॉफीचा घोट आणि झपाट्याने कुठेतरी घेऊन जाणारी पाऊले. मधेच तुम्ही काही विचारलत तर थोड थांबून कानातली पुंगळी काढत “सॉरी”?, तुम्ही प्रश्न पुन्हा विचारताच त्या प्रश्नाच उत्तर खांदे उडवून, किवां ओठ मुडपून, मान हलवून मिळतं. ही ६४ कलांच्या पलीकडची कला त्यांनी आत्मसात केलेली आहे. एकाच वेळी अनेक कामे करण्याची (multitasking) कला. नेमक काय साधतोय आपण? आपण जे काम करतोय त्याला पूर्ण न्याय देतो का? संगणक, ज्या यंत्राचे एकाच वेळी अनेक काम करण्याकरीता कौतुक केले जाते, त्या प्रक्रियेत सुद्धा प्रत्येक कृतीला लागणारा आवश्यक तो वेळ दिलेला असतो आणि त्याची प्रणाली हा वेळ काम योग्य प्रकारे करण्याकरिता पुरेसा आहे ह्याची सदोदित दक्षता घेत असते. त्याच प्रमाणे आवश्यक ती गणन क्षमता देखील उपलब्ध करून दिली जाते. थोडक्यात काय कामाच्या प्रती बाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. बघणाऱ्याला मात्र सगळी काम एकदमच होत आहेत असं वाटते.

सावकाश हे क्रियेचे केवळ विशेषण म्हणून आपण त्या शब्दाकडे बघतो. पण माझ्या दृष्टीने सावकाश ह्या शब्दाचा गती पेक्षा वेळाशी जास्त संबध आहे. स+अवकाश, अवकाश म्हणजे जागा (space), अंतर, वेळ, वेळासहित केलेली क्रिया, वेळ देऊन केलेली क्रिया ना की वेळ लाऊन केलेली क्रिया. एखादी गोष्ट सावकाश करणे म्हणजे मन लावून करणे, पुरेसा वेळ देऊन करणे असा होतो. सावकाश शब्दातील अवकाश असा वापरायचा आहे. सावकाश हा लवकरच्या विरुद्धार्थी शब्द नाही. या शब्दाचा अर्थ आपण नव्याने शोधण्याची गरज आहे.       

Saturday, 12 June 2021

गंध विश्व

 “वास येतोय कां? बघ रे”, “नाही बाकी काहीच लक्षण नव्हती, न ताप न खोकला पण वास येत नाहीसा झाला होता”, “मोगऱ्याच्या गजऱ्याचा वास नाही आला? लागलीच चेक करून घ्या हों” असे कित्येक संवाद आजकाल नित्याचेच झाले आहेत. “वासा” भोवती एक वलय निर्माण झाले आहे. कोणत्याशा कपड्यांच्या पावडरीच्या जाहिरातीने “डाग चांगले असतात” हे वाक्य लोकप्रिय केलं आहे. त्याच चालीवर “दुर्गंधी चांगली असते” अशी म्हणायची वेळ आली आहे. वास कोणता आहे हे महत्वाचं नाही. तो येतोय ना?? हे महत्वाचं. खरंतर मराठीत वास म्हणजे सुवास; कारण दुर्गंधीला घाण असा “सुगंध” (सुस्पष्टच्या धरतीवर) शब्द आहे.

असो, आजच्या तात्कालिक परिस्थितीमुळे एक गोष्ट माझ्या बाबतीत मात्र नक्की झाली, ती म्हणजे वास येणे (घेणें म्हटले की हेतुपुरस्कर केलेली क्रिया) या अत्यंत स्वाभाविक घडणाऱ्या क्रियेची जाणीव झाली, त्या क्रियेबद्दल जागरुकता आली. खूपवेळा आपण बघण्याची क्रिया करीत असतो पण आपल्याला दिसतच असें नाही हा अनुभव प्रत्येकालाच केव्हा न केव्हातरी आला असेल. चक्षु पटलावर उमटलेली प्रतिमा मेंदू जो पर्यंत वाचीत नाही तो पर्यंत दिसण्याची वा बघण्याची क्रिया पूर्ण होत नाही. माहितीचं रुपांतर ज्ञानात होत नाही. तद्वतच नाकात शिरणाऱ्या हवे बरोबर गंधकण आत जातच असतात पण त्याचं विश्लेषण मेंदूने करे पर्यंत, नाकाला रुमाल लावायचा, “वा” म्हणायचं, की नुसताच वास घेत राहायचं, हे ठरत नाही. लोकलने  नित्य प्रवास करणाऱ्यांना वांद्र्याची खाडी गेलेली कळतं देखील नाही.

थोडक्यात काय? ह्या नवीन जागरूकतेमुळे आपल्याभोवती एक भले थोरले गंध विश्व आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली. सकाळी उठल्यापासुन झोपेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक गंधाची (सुवास वा दुर्गंधी) मेंदूकडून पावती मिळायला लागली. सकाळी टूथपेस्ट, ब्रश काढण्यासाठी अगदी झोपेंत जरी बेसिन वरील कपाट उघडलं तरी आता ओळखता येणारा शेविंग क्रीम आणि आफ्टरशेव्हचा संमिश्र वास, चहाच्या पाण्यात किसून आलं टाकल्यावर येणारा वास, त्या आधणात चहाची पत्ती टाकल्यावरचा वास, चहा गॅस वरून उतरवून संथावल्यावर गाळण्यापुर्वी येणारा वास, ताजं दूध तापल्यावर येणारा वास (शिळ दूध तापल्यावर वास वेगळा येतो) आणि ते दूध चहात घातल्यावर चहाचा येणारा वास. प्रत्येक वास वेगळा आहे आणि तो आता मला ओळखता येतो. खोटं वाटेल तुम्हाला, पण भाजीत मीठ आहे की नाही हे मला आजकाल वासावरून कळते. तुम्ही प्रयत्न करून बघा. हे वास पूर्वीही होतेच, मला येत नव्हते इतकंच. सकाळी फिरायला बाहेर पडल्यावर झुळूकेबरोबर स्वागत करणारा प्राजक्ताचा मंद पवित्र वास. नुकत्याच येऊन गेलेल्या वादळी पावसात तर येणारा पाऊस, तो येतोय याची सुवार्ता घेऊन पोहोचलेल्या मृदगंधाने मला अगोदरच दिली होती. जणू “तप्त धरेची दाद मिळाली नाकाला आधी, मग ऐकली कानांनी, नंतर डोळ्यांनी पाहिली”!  ओल्या गवताचा वास वेगळा, ओल्या पालापाचोळ्याचा वास वेगळा. एक जिवंत, एक गत. अगदी नव्याने सापडलेला वास म्हणजे वाहत्या स्वच्छ पाण्याचा वास, हो तो काहीसा दुरून देखील येतो. अवर्णनीय, कारण तो कशासारखा नाही, ज्याने त्याने त्याचा घेतला पाहिजे (अनुभूतीला पर्याय नाही), त्या वासाला अजून नाव सापडलेलं नाही, नसेलच कदाचित. मत्स्यगंधा, योजनगंधा या खऱ्या असाव्यात याची आता खात्री पटली. एक नवीन विश्वच जणू हळुहळु विदित होतंय असं वाटतं.   

ध्यानधारणेच्या संबधात कुठेतरी वाचलेलं आठवलं “श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वास आत घेताना जागरूक रहा, की तुम्ही श्वास आत घेताय. सोडताना जाणीव असू द्या की तुम्ही श्वास सोडताय, आणि कृतज्ञतापूर्वक अनुभव घ्या, प्रत्येक श्वासा बरोबर तुम्ही असण्याचा”. ध्यानधारणे संबंधात लिहिलंय तसंच काहीसं अगदी कृतज्ञतापूर्वक अनुभवतो आहे माझं असणं येणाऱ्या प्रत्येक वासागणिक.

Saturday, 1 May 2021

गांधारी

 

महाभारतकार महर्षी व्यासांनी महाभारत्तातील पात्र उभी करतांना प्रत्येक व्यक्तिरेखेला अक्षरशः अनंत छटा दिल्या आहेत आणि त्या सुद्धा इतक्या विविक्षित आहेत की त्या प्रत्येक छटेत ती व्यक्ती पूर्णतः वेगळी भासते. गांधारी ही अशीच एक बहुआयामी, बहुविध व्यक्तिरेखा.

गांधार नरेश सुबल, ह्याची कन्या. धृतराष्ट्राची पत्नी, कौरवांची जन्मदात्री, महासती, पतिव्रता, धृतराष्ट्राचा राज्याभिषेक न झाल्यामुळे महाराणी पदाला कायम मुकलेली, आणि दुर्योधनाचा राज्याभिषेक झाल्यावर राजमाता पद भूषाविणारी, अशा अनेक रुपात ती आपल्याला भेटते. पण एक स्त्री म्हणून गांधारी महाभारतातील कुठल्याही पर्वात वा प्रसंगात समोर येत नाही. ती कौरवांची जन्मदात्री आहे पण माता, आई म्हणून तिची व्यक्तिरेखा अपुरी वाटते. वरील वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना राजमाता गांधारीच्या मनात भावनांचा काय कल्लोळ उठत असेल त्याची कल्पना महाभारतकारांनी बहुतेक वाचकांवर व श्रोत्यांवर सोडली असावी.     

गांधार, हिमालयाच्या कुशीत, दऱ्याखोऱ्यानी वेढलेले एक छोटे राज्य सुबल त्याचा राजा आणि त्या निसर्गरम्य वातावरणात रहाणारे त्याचे प्रजाजन. त्यांच्या ध्यानीमनी नसतांना अचानक हस्तीनापुराहून, भीष्मांकडून गांधार देशीच्या राजकन्येला, गांधारीला, कुरुकुळाची स्नुषा होण्याची, धृतराष्ट्राची पत्नी होण्याची मागणी येते. हस्तिनापुर, दूरवर यमुनेच्या काठी, महाप्रतापी भीष्मांच्या    कृपाछत्राखाली, वसलेली पराक्रमी कुरूवंशाच्या राज्याची वैभवशाली ऐश्वर्यसंपन्न राजधानी एव्हढीच ऐकीव माहिती. नाही म्हणायला, पंडू, दिग्विजयी अभिषिक्त सम्राट, दोन भार्या असूनही अजून निपुत्रिक आहे हेही गांधार वासियांनी ऐकलं होतं. ही मागणी घेऊन येणाऱ्या दुताबरोबर गाड्या भरूभरून भेटीदाखल दिलेले सोनंनाण, कपडेलत्ते कुरु ऐश्वर्याची ग्वाही देत होती. आलेल्या भेटी ठेवायला गांधार नरेशचा खजिना देखील अपुरा पडला असता. ह्या धनभाराच्या संरक्षणार्थ आलेली कुरु सैन्याची तुकडी देखील संख्याबळाने गांधार सेनेपेक्षा जास्त होती. डोळे दिपवून टाकणारी ती धनसंपदा, एव्हढ्या मोठ्या कुळाशी जुळून येणारी ही सोयरिक आणि मुलीच्या मुलांची हस्तिनापूरच्या गादीचा वारस होण्याची शक्यता. हे सगळच सुबल राजाला स्वप्नवत वाटत होतें. हस्तिनापूरच्या प्रस्तावाला नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. गांधारी केव्हढी भाग्याची!! गांधार देशाची प्रजा जणू आनंदाच्या डोहीच तरंगत होती. विवाह हस्तिनापुरी संपन्न होणार होता. गांधार नरेशाकडून फक्त होकाराची आणि कन्यादानाची अपेक्षा होती.

माझ्या प्रयाणाकरिता खास रथाची व्यवस्थाही आलेल्या लव्याजम्यात होती. सुबल्र राजाला आणि मला जणू गृहीत धरलेले होते. माझी पाठवणी करतांना आईच्या डोळ्यातून वहाणारे अश्रू थांबतच नव्हते. मुलीचे सासरी जाणे हे काही नवीन नाही.  मी माझीच समजुत काढत होते, आईच्या अश्रुंचे उत्तर शोधीत होते. मी इतकी दूर जात आहे, ती देखील कायमची म्हणून असेल कदाचित. बाबा कसनुस अवसान आणून हसत होते. माझी अवस्थाही काही वेगळी नव्हती पण त्याचबरोबर नव- जीवना बद्दल, नवऱ्या बद्दल अपेक्षाही होत्या. शकुनी एकटाच केवळ अपवाद होता. त्याचा आनंद त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता.      

गांधारीचा स्वतःच्या भाग्यावर विश्वासच बसत नव्हता. गांधार देशातील सगळाच कारभार छोटेखानी. राजाला प्रजा कुटुंब प्रमुख मानत होती. दुर्गम प्रदेशामुळे परकीय आक्रमणाची शक्यताही नव्हती सगळ कस शांत, आनंदी. पर्वतराजीतील वाऱ्यापाण्यासारखं मुक्त, निर्मळ आणि स्वच्छंदी. मनात नाही म्हणायला शंकेची पाल चुकचुकत होती. एव्हढ्या मोड्या राज्याची साम्राज्ञी होण मला जमेल ना? तिथले रीतीरिवाज, शिष्टाचार सगळ सगळच नवीन.

गांधार ते हस्तीनापूर एव्हढा लांबचा प्रवास हा हा म्हणता संपला. सेवा करायला पुढे मागे दास दासी धावत होते आणि नुसत्या कल्पनेनेच माझे मन फुलपाखरू झाले होते. मनाने कधीचीच मी हस्तीनापुरी पोहोचले होते. आपल्या न पाहिलेल्या, होणाऱ्या पती विषयी विचार करण्यात, त्याचे चित्र ऐकीव गोष्टींवरून आपल्या मन:पटलावर चितारण्यात मी  गुंग होते. शकुनी आपल्या सख्ख्या बहिणीला काही कमी पडू देत नव्हता. शकुनीचे हस्तीनापुरी मजबरोबर येणे थोडे खटकलेच होते. स्वत:चे राज्य सांभाळायचे सोडून आपला भाऊ आपल्या बरोबर निघाला हे त्याच्या आपल्यावरील प्रेम म्हणायचे की ऐशोआरामाची अभिलाषा हे नेमके उलगडत नव्हते.

हस्तिनापुर वासियांनी माझे जंगी स्वागत केले. मोठ मोठे दरबारी मानकरी नगराच्या दारात स्वागताकरिता हजर होते. डोळे दिपविणारा सोहोळा होता तो. नगरातील उंच उंच इमारती, वाडे, महाल, चौपदरी रुंद रस्ते, दुतर्फा बांधलेली सुबक, रेखीव घरे सगळे कसे आखीव रेखीव जागाच्या जागी होतें. काढलेल्या रांगोळ्या, घातलेले अत्तरांचे सडे, बांधलेली तोरणे, उभारलेल्या गुढ्या, लावलेल्या पताका, टांगलेली झुंबरे, सोडलेल्या फुलांच्या माळा, वाद्यांचा घोष, फडकणारे ध्वज, नटलेल्या स्त्रिया आणि सजलेले पुरुष सगळे सगळे या गांधारीचे, माझे स्वागत करीत होते.

सुखाची परमावधी म्हणतात ती हीच की काय? एकदा वाटे महाराणीचं स्वागत आहे हे, मग आश्चर्य काय त्यात. त्या आनंदोत्सवात लोकांच्या चेहेऱ्यावरचा आंनद कृत्रिम का वाटतोय मला, काहींची नजर तर माझी कीव करीत असल्यासारखी भासतेय, भासच असेल बहुदा. असेच काहीसं निरोप घेताना आईवडीलांच्या डोळ्यात दिसलं कां? कन्या सासरी चाललेली बघून असेल कदाचित. खरोखरीच का मी इतकी भाग्यवान आहे? कां शंका यावी मला? स्वप्नातून जागी होईन कि काय मी?

दुसऱ्याच दिवशी ह्या स्वप्नांचा भंग झाला, एखादे नक्षीदार नाजूक काच पात्र खळकन फुटावे तद्वत. भीष्म पितामह आवर्जून मला भेटण्यास आले. आपल्या धीरगंभीर आवाजात मला म्हणाले “मुली, तुझा होणारा पती जन्मांध आहे हे ठाऊक असूनही तू ह्या विवाहाला मान्यता दिलीस, थोर आहेस. कुरु आणि व्यक्तिश: मी सदैव तुझ्या ऋणात राहू. धन्य आहेस तू!” दोन्ही हातांनी मला आशिर्वाद देत पितामह माझ्या उत्तराची वाट न बघता महालाबाहेर निघून गेले. जन्मांध? माझे पती जन्मांध आहेत? मला हे माहित असूनही मी विवाहाला मान्यता दिली? कसं शक्य आहे? माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मला, मला तरी हे निश्चित माहित नव्हते. मग भीष्मांनी असें का म्हणावे? ह्याचा अर्थ एकच माझ्या आईवडीलांना, भावाला, शकुनीला हे ठाऊक होते तर. हतबुद्ध झाले मी. आलेला हुंदका घशातच अडकला, इथे रडण्याची चोरी होती. हळुहळू एकेका प्रश्नाची उत्तर मिळू लागली. आईच्या डोळ्यांना लागलेली संतत धार. बाबांचा आनंदाचा मुखवटा. कां फसवल मला माझ्या खुद्द आईवडीलांनी? पर्याय होता कां बाबांना? मला मागणी घालायला आलेल्या दूतांबरोबर इतका फौजफाटा का होता याचे उत्तर मिळालं. सुबल राजाला, माझ्या बाबांना धाक म्हणून पाठवलं होत तर सैन्य, नाहीतर कुरु राज्याचा ध्वज मिरवणाऱ्या पथकावर हल्ला करण्याच वा लुटण्याच धारिष्ट्य कोणात होत? होकार जवळ जवळ धमकावूनच घेतल्यासारखा होता. मला हे कळलं असत तर मी विरोध केला असता, जीवाच काही बरवाईट करून घेतलं असत म्हणून बहुदा राज्यहीतासाठी माझा बळी गेला. काय करू मी? माझा भाऊ शकुनी. त्याला सोडून इथे मी कोणालाच ओळखत नाही, आणि तो तर आधीच विकला गेलाय. त्याच्या स्वतंत्र महालात गेल्यापासून त्याने माझी साधी चौकशी देखील केली नाही. त्याच्याकडून मदतीची काय अपेक्षा करणार. विवाह अटळ आहे. आता राग येतोय सगळ्यांचाच आणि सगळ्याचा. माझ्या असहायतेचा. कुरुकुळाला वारस हवा म्हणून माझा बळी, जन्मांध धृतराष्ट्राला हक्काची दृष्टी मिळावी, त्याची कायमची काठी व्हावी म्हणून माझा बळी. बदल्यात राजमाता पद, हे ऐश्वर्य जे मी कधीच मागितलं नव्हतं. अक्षरं जोडायची म्हटली तरी एकाचा पाय मोडावा लागतो. नात्यातही नेमक हेचं असतं तडजोड करावीच लागते, पण फसवणूक नाही. ज्या विश्वासावर नात्याची वास्तू उभी राहते तो मुळातूनच हरवला होता. बसं ठरलं. मी धृतराष्ट्राची दृष्टी होणार नाही. त्याची काठी होणे मला मान्य नाही. मी ही फसवणूक सहन करणार नाही. काय करणार होते मी? विवाहाला उभी रहाण्यापुर्वी माझा निर्णय मी जाहीर केला “माझ्या पतीला जे दृष्टी सुख नाही ते मी उपभोगणार नाही. माझ्या डोळ्यांवर मी आजन्म  पट्टी बांधून राहीन” माझ्या निर्णयाचा काय परिणाम होईल ते माझ्या ध्यानीमनीही नव्हते मी फक्त धृतराष्ट्राचा, माझ्या होणाऱ्या अन्ध पतीवर सूड घेतल्याच्या आनंदात होते. माझा सूडाचा आनंद क्षणभंगुर ठरला. माझ्या नावाचा जयजयकार सुरु झाला. पतिव्रता, महासती उपाध्यांनी माझा सत्कार होऊ लागला, प्रजा माझी थोरवी गाण्यात दंग झाली. जी पट्टी मी माझ्या हाताने बांधली तिची गाठ आता नीरगाठ झाली होती, कधीही न सुटण्याकरिता. ढोल ताशांच्या गदारोळात विधवेला सती सती म्हणत नवऱ्याच्या चितेवर ढकलणारा हा समाज मला पट्टी कधीच काढू देणार नाही हे नक्की होत.  धृतराष्ट्राला माझ्या निर्णयाने राग आला असेल, दु:ख झालं असेल तर त्याने ते तसं दिसू दिल नाही.

प्रत्येक स्त्रीची आपल्या लग्नानंतरची पहिली रात्र कशी असेल याची काही स्वप्न, काही अपेक्षा असतात, त्या स्वप्नांचा आकांक्षांचा चुराडा झाला. ती रात्र बाकी कशीहि असेल पण ती चाचपडण्यात जाईल असें मात्र कधीही वाटल नव्हतं. तो जन्मजात अधू आणि मी माझ्या प्रतिज्ञेमुळे. पुढील प्रवास तर एखाद्या दु:स्वप्नागत. आपल्याला सतत कोणीतरी पाहत आहे ही जाणीव डोक्यातून निघतच नव्हती. धृतराष्ट्राला जन्मापासून ह्या गोष्टीची सवय होती किंबहुना कोणीतरी सतत बाजूला असणे ही त्याची गरज होती आणि माझ्या बाबतीत ती नव्याने निर्माण झाली होती. मीच निर्माण केली होती ती! धृत्राष्ट्राने जग बघितलच नव्हतं, रंग नसणे म्हणजे काय हे समजण्याकरिता रंग एकदा तरी पहावे लागतात. प्रकाश ज्याला माहीतच नाही त्याला अंधार असण्याचे वा प्रकाश नसण्याचे दु:ख काय समजणार? पण माझ्याकरिता उगवणारा प्रत्येक दिवस हा रंगहीन, प्रकाशहीन होता. खरच कां हा अंधार मी मनापासून स्वीकारला होता? स्वतःचे डोळे बांधून घेण्याच्या या निर्णयाचा पश्चात्ताप कधीच झाला नाही कां?

माझ्या पहिल्या पुत्राचा, दुर्योधनाचा जन्म. माझ्या मुलाच पाहिलं दर्शन? माझ्या हातांच्या स्पर्शाने, ओठांनी आणि सुईणीने केलेल्या वर्णनावरून आलेली ती फक्त एक कल्पना. हे त्यानंतर प्रत्येक मुलाच्या जन्माच्यावेळी झाल. पुढे पुढे मूल हातीपायी, नाकीडोळी धड आहेना एव्हढे विचारून माझे कुतूहल मी शमवू लागले. स्तनपान करून निजलेल्या निरागस बाळाचा चेहेरा बघणे काही माझ्या भाग्यात नव्हते. मातृसुख म्हणजे फक्त प्रसूती वेदानां, एव्हढच समीकरण माझ्याकरिता शिल्लक राहीलं.

दुर्योधनाचा राज्याभिषेकाच्यावेळी, पांडवांनी राजसूययज्ञा नंतर केलेल्या सांगतेच्या वेळी, आद्य पूजेचा मान कृष्णाने स्वीकारला तेंव्हा, द्यूतात पांडव सर्वस्व हरले तेंव्हा, शरपंजरी पडलेला भीष्म, दुर्योधानाच्या मृत्युनंतर शोकाकुल झालेला धृतराष्ट्र

आणि महायुद्धात माझ्या सर्वाधिक मुलांच्या मृत्यूला कारणीभूत झालेला भीम मानभावीपणे आमच्या संत्वानाकरिता आला तेंव्हा, होय, या प्रत्येक वेळी आणि अशा अनेक क्षणी मला माझ्या डोळ्यांवरची पट्टी ओरबाडून काढावीशी वाटली.

पुत्र जन्माच्या शर्यतीत कुंतीने बाजी मारली. युधीष्टीराचा जन्म दुर्योधनाच्या आधी झाला. माझ्या पतीने औदार्याचा आव आणीत पांडवांना खांडव वन देऊ केलं आणि त्यांनी त्याच नंदनवन करीत इद्र्प्रस्थ उभे केले. त्यानंतर त्यांनी केलेला राजसूय यज्ञ, उभे केलेलं वैभव आणि मिळालेली वाहवा, प्रसिद्धी. हस्तिनापूरच्या नाकावर जणू टिच्चून आपल साम्राज्य उभारल पांडवांनी आणि कुरुकुलाच्या राजमातेच पद माझ्या हातून हिसकावून कुंतीच्या हाती सुपूर्त होतंय अस वाटू लागलं. कुरुकुळाची राजमाता बनण्याचे माझे स्वप्न स्वप्नच राहील, असें वाटू लागले दुर्याधानाच्या महत्त्वाकांक्षेने, शकुनीच्या कुटील नीतीने, आधीच अंध असलेल्या धृतराष्ट्राने पुत्रप्रेमाने विवेकाचे सर्व दरवाजे बंद केल्याने त्या स्वप्नांना आशेची पालवी फुटू लागली. एका क्रोधाच्या क्षणी स्वीकारलेल्या अंधत्वाबरोबर आई म्हणून मुलांना योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मी झटकत होते की मी जशी पूर्वी होते तशीच आजही असाहाय आहे. तेंव्हा आई वडील, भाऊ, भीष्म ह्यांच्या पुढे आणि आता पती व पुत्रांपुढे. मागे न परतण्याच्या वाटेवर कौरवांची वाटचाल सुरु झाली. पुढे घडला तो अतर्क्य नृसंहार. राहिले फक्त राजेपद, प्रजाहीन राज्याचे.

आज वनात वानप्रस्थाश्रमात मागे वळून बघतांना पुनःपुन्हा एकच विचार मनात येतो, काय उरलं

 माझ्या हातात? ना मी महाराणी झाले, ना कुरुकुळाची राजमाता. राजमाताच काय माता म्हणून घेण्याकरिता माझा एकही पुत्र जिवंत राहिला नाही. स्वत:च पेटविलेल्या राज्य लोभाच्या वणव्यात सगळे जळून खाक झाले. ज्या कुंतीचा आयुष्यभर मी द्वेष केला तिच्याच मुलांचे आश्रित म्हणून जगण्याची वेळ आली. भयंकरच होते सारे आणि ह्याला जबाबदार कोण? माझे आईवडील, शकुनी, धृतराष्ट्र, भीष्म कां मी? मनोमन मी सगळ्यांनाच श्रापित होते. कोणत्याही सूडाची किंमत ही मोजावीच लागते.

Sunday, 4 April 2021

हा माझा .....

माझ्या नित्य रहिवासाची जागा सायन मुंबई असून अर्थार्जनाची कर्मभूमी नवीन मुंबई असल्यामुळे न चुकता नित्य नेमाने, दररोज (रविवार आणि सम शनिवार सोडून) सकाळी व संध्याकाळी (खरतर रात्री) सायन ते नवी मुंबई आणि परत हा जवळजवळ जाऊन येऊन ५०-५५ किमी चा प्रवास घडतो. घडतो, असे म्हणण्याचं कारण, सारथ्य सक्षमपणे सांभाळणाऱ्या चक्रधर स्वामींवर सर्व भिस्त ठेऊन मी मागील आसनावर निर्धास्त बसतो आणि रथ जाईल तसा जात राहतो. सुरवातीला वेळेचा सदुपयोग करा, गेलेला क्षण परत येत नाही वगैरे, बराच वेळ खर्ची पाडून, पूर्वी ऐकलेले सुविचार आठवून, वर्तमान पत्र वाचनाने सुरवात करून, व्होट्सअॅप पर्यंत येऊन सर्व प्रयत्न सोडून दिले. 

आता त्या वेळात काय करतो?, खिडकीच्या बाहेर बघत बसतो. काय सांगू, खूप गंमत आहे असं बघत बसण्यात. चालकांचे (बेस्ट ने प्रवास करायला लागे पर्यंत ड्रायव्हरला मराठीत प्रती शब्द नाही असाच माझा समज होता) विविध नमुने पाहायला मिळतात. मला नेहमी वाटत्तं की चालकांच्या स्वभावाच प्रतिबिंब त्यांच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीत दिसून येतें. वरवर बघता चालकांचे, चार गट त्यांच्या पंथ निवडीवरून मी पाडतो. वाम, उत्तम, उपलब्ध आणि स्वैर. पंथांच्या नावांवरून तुम्हाला त्यांच्या शिकवणीची व त्यांचे अनुसरण करणाऱ्यांच्या स्वभावधर्माची थोडीफार कल्पना आली असेलच. तरी थोडं अधिक खोलात शिरतो.

ज्या पंथाचे आचरण करणाऱ्यांना आणि त्यांच्या सभोवती असणाऱ्या सर्वांस, सारखाच धोकादायक असणारा, अर्थात स्वैर पंथ. ह्या पंथाचे अनुग्रहित साधारण १७-२५ वयोगटातील दिसतात, एखाद-दोन कमी किंवा जास्त. वेळ दिवसातील कोणतीही. पण ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ सूर्यास्त नंतर जसजशी रात्र वाढत जाते तशी होतें. मध्यरात्री नंतर काही ठरावीक रस्त्यांवर त्यांचा प्रादुर्भाव वाढतो. ह्या पंथाचं अनुसरण करणाऱ्यांची काही व्यवछ्छेदक लक्षणे आहेत. उदा.  यांत्रिक दुचाकी, (मोटार सायकल वा मोटार बाईक) ही प्रवासाच साधन नसून लोकांना घाबरवण्याचे वा मुलीबाळींमधील सूमार बुद्धिमत्तेच्या वर्गाला प्रभावीत (प्रभे शिवाय) करण्याचे हत्यार आहे असा विश्वास. रहदारीचे नियमन करणाऱ्या लोह पट्टी (सिग्नल) वरील लाल दिवा हा इतरांना थांबवून, स्वैर मार्गीयांनाच जाण्याकरिता असतो अशी ठाम समजूत इत्यादी. ही मंडळी तुमच्या ध्यानीमनी नसताना तुमच्या गाडीच्या डाव्या अथवा उजव्या (बहुदा डाव्याच) अंगाशी घसट करीत तुम्हा समोरून तुम्हाला प्रसंगाचे आकलन हो होस्तो पुढील वाहनाशी लगट करीत त्याही वाहनाच्या पुढे अदृश्य होतात. समोरील वाहनाला मागे टाकून या स्वैराचारींचे पुढे जाणे सर्वस्वी तुमच्या नशीबावर अवलंबून असते. ही मंडळी ह्यांच्या वैयक्तिक जीवनात देखील बेदरकार असावीत, योग्य अयोग्य, चूक बरोबर ह्याचा विचार न करता, परिणामांची तमा न बाळगता, क्षणिक थरारा करता, रोमांचक अनुभव घेण्याकरता ह्यांच्या हातून काहीही कृत्य घडू शकेल. एकूणच ह्यांची संगत टाळता आली तर उत्तम.

वाम मार्ग, ह्या मार्गाचे आचरण करणारे उत्तम मार्गाच्या अगदी विरुद्ध असतात, पुढील वाहनाच्या डाव्या बाजूनेच पुढे जायचं असत ह्यावर ठाम विश्वास ठेवणारे आणि ह्यात गैर काहीच नाही असं नुसते न मानता आचरणात आणारे. तसं बघायला गेल तर हे लोक धाडसी असतात, धाडसी अशाकरता की, पुढील वाहन चालकाच्या कृपेवर सर्वतः ह्यांचे जगणे अवलंबून असते. ह्यांचा वाममार्गावरून जाण्याचा अट्टाहास बघितला कि कुठेतरी हे सर्व पांथस्थ डावरे असावेत आणि त्यांच्या करता डावं हेच उजव असावे असं वाटतं, (खर सांगतो, डावऱ्यां लोकांनी गैरसमज करून घेऊ नये पण हा संशोधनात्मक प्रबंधाला योग्य विषय आहे असें वाटते). ह्या मार्गावरून जाण्याकरिता वयाची कोणतीही अट नसते. ह्यां पंथातील लोकांचा शेवट बहुतेक स्वैर पंथांच्या मार्गाने जाण्याची मोठी शक्यता असते. ह्या मार्गाने जाणारी मंडळी बहुतेक शोर्ट कट वर विश्वास ठेवणारी असवित. ‘जुगाड हा शब्द त्यांच्या शब्दकोशात बहुतेक पहिल्या पानावर असतो. ही मंडळी त्यामुळे लोकप्रिय असू शकतात पण त्यांच्या किती जवळ जायचं हे ज्याच त्याने ठरवायचं आहे.

उपलब्ध मार्गीय, सहसा संधीसाधू असतात. मार्गाच्या नावाप्रमाणेच कुठल्याही एका मार्गाचा आग्रह हे धरीत नाहीत. साधारणत: पुढील वाहनाने निर्माण केलेल्या पोकळीचा फायदा घेत पुढे जाण्याच्या प्रयत्नात दिसतात. वाम मार्गाचा वापर जर त्यांच्या करिता सुरक्षित असेल तर निषिद्ध नाही. सहसा धोका पत्करत नाहीत आणि त्यांच्या पासून इतरांना धोका (त्याचा त्रास शेवटी त्यानाही होणारच) पोहोचणार नाही असा त्यांचा प्रयत्न असतो. मुख्यत्वे सदैव स्वतःचा फायदा बघणे इतकांच हेतू असतो. ही मंडळी शेवट, अंगिकारलेल्या पद्धतीचे समर्थन करतो’ (End Justifies the Means) या विचारसरणीवर विश्वास ठेवणारी असावीत त्यामुळे वैध, अवैध वगैरे भेद ते करीत नाहीत. ह्यांची संगत नसली तरी फारसं बिघडणार नाही कारण फायदा शेवटी त्यांचाच होणार.

वरील तीन मार्गात विभागल्यावर उरणारी बाकी मंडळी उत्तम मार्गाचा वापर करताना दिसतात. अर्थात ही संख्या तशी कमीच असते. तसं बघायला गेलं तर ह्या मार्गाचे अनुकरण खूप सोपं आहे. रहदारीच्या नियमांचं पालन करणे, वेळेवर निघणे वगैरे साधे सोपे नियम पाळण्याने ह्या मार्गाचे अनुकरण सहज शक्य आहे. नियम पाळणे आणि इतर वाहनचालकांचा आदर करणे ही दोन पथ्ये पाळलीत तर गंतव्य ठिकाणी वेळेत सुरक्षित पोहोचणे सहज शक्य आहे.

अर्थात आपला मार्ग आपणच निवडायचा,  सुज्ञास अधिक सांगणे न लगे!