Sunday, 10 June 2018

अर्थ हरवलेले शब्द... १



सगळ्याच भाषा आपापल्या परीने विविध भाषालंकारानी सर्वांगाने नटलेल्या असतात, तरी मराठीची गोडी काही औरच, मातृ भाषा आहे, म्हणून असेल कदाचित. मराठी भाषेतील साहित्य निर्मिती, साहित्यकारांच्या भाषेवरील प्रभुत्वाचे जागोजागी घडणारे दर्शन, निर्मितीतील अभिजातता, विषयांतील वैविध्य, कालातीत असलेल्या म्हणी, वाक्प्रचार, सुविचार काय काय म्हणून सांगू. या सगळ्यांच्या मुळाशी असलेले अर्थपूर्ण शब्द, संस्कृतोत्पन्न असल्याचा पदोपदी मिळणारा पुरावा. मी गाणी ऐकतो पण त्यातले काव्य मला जास्त भावते, त्यातील अर्थ मला नेहेमीच आकृष्ट करतो. बोलताना, ऐकताना माझं लक्ष सारखं शब्दांकडे जातं. बदलत्या राहणीमानामुळे म्हणा किंवा त्यातील वेगामुळे म्हणा अनेक शब्दांचा अर्थ लोप पावतोय असे वाटते. का त्या शब्दांचा उपयोग, वापर करण्या योग्य स्थितीच उरलेली नाही, नेमक सांगणे कठीण आहे. वानगी दाखल परवाचीच गोष्ट पहा ना.

रविवार संध्याकाळ, दारावरची बेल वाजली मला कोणीही अपेक्षित नव्हतं. कुतुहूल मिश्रित मुद्रेने मी दार उघडलं. बघतो तो काय एक जुना सोबती दारात उभा. “कायरें आश्चर्य वाटलं मला बघून?” ध्यानी मनी नसताना अचानक दारात उभ्या राहिलेल्या मित्राला बघून खरतर थोडा गडबडलोच. तसा तो अवलियाच, आज पर्यंतच्या त्याच्या आयुष्यात असामान्य नाही पण जगरहाटीला धरून देखील काही नव्हते, स्वतःला सावरत म्हणालो “नाहीरे, अगदी तसच काही नाही, पण आज अचानक?” चेहेऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून तो हसला, “घरात तरी घेशील, की दारातूनच बोळवण करणार आहेस?” मी पटकन बाजूला होउन त्याच्या खांद्यावर हात टाकत त्याला घरात घेतलं, स्वारी सोफ्यावर स्थानापन्न झाली. त्याची देहबोलीच सुचवत होती की त्याच्याकडे खूप मोकळा वेळ आहे. त्त्याचं पाणी पिऊन होईपर्यंत देखील मला धीर निघत नव्हता, “आज कसा काय..?” नेहेमीच्या सवयी प्रमाणे माझ वाक्य अर्धवट तोडत तो बोलता झाला “अरे सहजच” “सहज?, आमच्या घरावरून कुठे जात होतास ?” मी, त्याच्या भेटीला उद्देश देण्याच्या प्रयत्नात. “नाही रे, तुझ्याकडे म्हणून येऊ शकत नाही का?, आलो सहज भेटायला” पुन्हा सहज! त्याच्या दृष्टीने माझी भेट एवढ कारण पुरेसें होते. माझ्या पचनी त्याचं ते “सहज” काही पडत नव्हते. छान अर्धा पाउण तास गप्पा झाल्या. तो मोकळेपणी बोलत होता आणि मी मात्र हा आता कारण सांगेल मग सांगेल म्हणून मनातल्या मनात वाट बघत होतो. त्याला निरोप देत दार लावताना देखील मी त्याला म्हणालो, “feel free यार, if there is anything you want to share?” अडचणीच्या वेळेला आपण इंग्रजीचा आधार का शोधतो माहित नाही. तो गोड हसला, “लेका, तुम्हा लोकांना ना निर्हेतूक काही असू शकत, हे पटतच नाही. सहज वागताच येत नाही. चल बाय” धाड धाड पायऱ्या उतरून तो चालता झाला. पुन्हा सहज!! मला काही केल्या चैन पडेना. तासा दोन तासाने मी त्याला फोन केला, “पोचलास का रें?” “कधीचाच, तुझ्या कडून सरळ घरीच आलो, आणखीन कुठे जायचंच नव्हतं.”

गादीवर पडल्यावर देखील माझ्या डोक्यातून त्याच ते “सहज” काही निघत नव्हतं. सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत, कोणती गोष्ट आपण सहज करतो याचा विचार करत होतो. सकाळी चालायला बाहेर पडण्यापासून सुरवात करा, बहुतेकांना मधुमेह, हृदय विकार नाहीतर रक्तदाब यांची भूत चालवत असतात. किती जण त्यांच्या रोजच्या चालायच्या रस्त्त्यावर कोणती झाडे आहेत हे सांगू शकतील? वाटेतल्या बहाव्याची झुंबरं वाऱ्यावर झुलताहेत, कोपऱ्यावरचा गुलमोहोर पेटलाय, तम्राशिम्बी (गुगल copper pod tree) आभाळाकडे हात करून उभा आहे वा काटे सावर लाल पाकळ्यांचा सडा पायतळी पसरून हिरव्या गार बोन्डांनी डवरली आहे किती जणांना हे दिसतं, जाणवतं ? त्याच रस्त्यावर जर निरुद्देश फिरलो तर निसर्गाची, भर उन्हात डोळ्यांना निवावणारी ही रूपं मनाला भावल्याशिवाय राहणार नाहीत. मी शेवटचा एका जागी सहज कधी बसलो होतो हे आठवत नाही. कधी भ्रमणध्वनीचा छोटा पडदा तर कधी विश्व दर्शन घडवणारा मोठा पडदा डोळ्यासमोर असतो. ते नसेल तर वर्तमान पत्र किंवा मासिक, एखादे पुस्तक. माझा मीच असा कधी बसलेलो मला आठवत नाही.

वेळ घेऊन, काम सांगून मगच भेटायला येणाऱ्यांच्या विश्वात वावरणाऱ्या मला त्याच ते “सहज” झेपत नव्हतं. मित्र असोत व आप्त सगळेच जण हे नियम पाळतात मी देखील कोणाकडे सांगितल्या शिवाय जात नाही. ही खरोखरच काळाची गरजच झाली आहे का संपर्क माध्यमांची विपुलता याला कारणीभूत आहे? त्यांचा अपव्यय?

एखादी गोष्ट प्रयास, सायास न करता जमली पाहिजे. तसं बघायला गेलो तर सहज शब्दाची ओळख लहानपणीच होते. वदनी कवळ घेता हा श्लोक आपल्यातील बहुतेकांना ठाऊक आहे. खालेल्ल्या अन्नाचे सहज हवन होते जर उदर भरण हा यज्ञ समजून घेतेलेला प्रत्येक घास हा त्या यज्ञातील श्रीहरिला दिलेली समिधा मानून सेवन केला तर. आपल्या आयुष्याचे काहीसे तसेच आहे. अहंकार, भीती आणि त्या पोटी निर्माण होणारा अविश्वास ह्या त्रिकोणात आपण स्वतःला पार अडकवून टाकलं आहे. भूतकाळात पाय रुतवून केलेली भविष्याची चिंता आणि वर्तमानाचा अधिक्षेप, अनिश्चिततेचा भासमान विळखा आणि त्या पासून स्वतःला वाचवण्याची सततची चालेली धडपड. ह्या सगळ्यात आपण आपले मूळ स्वरूप हरवून बसलोय. लहानपणीचा मी हरवलोय आणि आतातर त्याला शोधायची देखील भीती वाटत आहे. आपल्या भोवताली असलेल्या निसर्गाचा आपण ही एक भाग आहोत किंबहुना आपण निसर्गच आहोत, मग ते सहज सोपे का असू नये. आपल्याला मिळालेल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर स्वतः भोवती गुंता निर्माण करून त्यात अडकण्या पेक्षा मुक्त कसं होता येईल याचा विचार करा. जगण्यातली सहजता हरवू देऊ नका नाहीतर, सहज शब्द केवळ मराठी शब्द कोशातच राहील.  



Wednesday, 28 February 2018

महिला दिन



८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. गुगल नुसार महिला दिनाचा इतिहास १९०७ इतका मागे जातो, पण आजच्या स्वरुपात महिला दिन १९७५ पासून, संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केल्यावर अस्तित्वात आला आहे. १९०७ पासून १९७५ पर्यंत वेगवेगळ्या दिवशी (जगाच्या पाठीवर कुठे न कुठे स्त्रियांनी ह्या दिवशी अन्यायाला वाचा फोडलेली दिसते) पण बहुतांशी फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या तारखेला महिला दिन साजरा होत असे.

महिला दिन, जगभरातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, क्रीडा आणि कला इत्यादी विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या महिलांचा यथोचित सत्कार करण्याचा दिवस. या दिवशी अशा यशस्वी महिलांची ओळख जगाला होतेच पण त्याचबरोबर अनंत महिलांना आपापल्या क्षेत्रात अतुल्य कामगिरी करण्याची स्फूर्ती देखील मिळते. महिला दिन साजरा करणारा समाज, एका अर्थाने लिंग भेद नाकारून महिलांना समान संधीची ग्वाही देत असतो. त्याचबरोबर महिलांना बरोबरीचे स्थान देतानां त्यांच्या सुरक्षिततेची हमी देखील घेत असतो.

संयुक्त राष्ट्रासंघाने महिला दिनाला नेमके स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक महिला दिन एका मूळ संकल्पनेला धरून साजरा केला जातो, २०१७ साली #BeBoldforChange, बदल घडवून आणायच धाडस करा असं सांगणार वर्ष. मग तो बदल वृतीतला असो, स्त्री हिंसे विरोधात असो किंवा स्त्रियांच्या प्रगतीकरता, शिक्षणाकरिता असो. २०१८, म्हणजे ह्या वर्षी #PressforProgress ही संकल्पना घेऊन महिला दिन येत आहे. महिला दिनाची संकल्पना ठरविणाऱ्यांच्या दृष्टीने योग्य वेळ आलेली आहे, २०१७ च्या पार्श्वभूमीवर, प्रगती करता आवश्यक ती वातावरण निर्मिती झालेली आहे आणि हीच वेळ आहे प्रगतीचा आग्रह धरण्याची.  

२०१७ साल, एका अर्थाने धाडसी बदलाच्या प्रयत्नांच, महिलांच्या लैंगिक शोषणाला वाचा फोडणार वर्ष ठरलं. अत्त्याचार, जे आज नव्हे तर गेली कित्त्येक वर्षांपासून चाललेले आहेत, कैक वर्षांपूर्वी झालेले आहेत. ह्या अत्त्याचाऱ्यांच्या विरोधात ब्र काढण्याच धारिष्ट आजपर्यंत ज्या महिलांना झालं नव्हत, ते होण्याचं कारण महाजालावर सुरु झालेली ‘मी-सुद्धा’ (#MeToo) ही मोहीम आणि त्याचे जगभरात उमटलेले पडसाद, #YoTambien मेक्सिको, स्पेन, दक्षिण अमेरिका, #QuellaVoltache इटली, #BalanceTonPorc फ्रांस, #Ana_Kaman अरब राष्ट्र. या सर्व हॅश टॅगवर सूर एकच होता महिलांवर झालेले लैंगिक अत्यचार, आणि ते देखील कोणा सामान्य गुन्हेगारांनी नव्हे तर प्रतिथयश, सुप्रसिद्ध, उच्चभ्रु मान्यवरांनी केलेले. अनेक वर्ष चालू असलेले. २०१७ साल हे तसे अपवादात्मक नव्हे, वानगीदाखल २०१४ चे उदाहरण देता येईल. #YouOkSis रस्त्यावरील छळाविरुद्ध, #WhatWereYouWearing अत्त्याचार झाला तेव्हा पिडीत महिलेने काय परिधान केले होते, जेणे करून अत्त्याचाराला उद्युक्त केल्याबद्दल तिलाच जबाबदार धरता येईल (येथे पिंक चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही), #SurvivorPrivilege अत्त्याचारग्रस्त महिलांचे अधिकार, अशा अनेक मोहिमांमधून महिला, महाजालावर व्यक्त झाल्या होत्या. २०१७ मधे वेगळं काय घडलं जे आधी घडलं नाही, तर या वर्षातील मोहिमांची व्याप्ती. ‘मी-सुद्धा’ या मोहिमेने जगभरातील अनंत महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव झाली.

अन्याय करणाऱ्यांइतकाच सहन करणारा देखील जबाबदार असतो असे म्हणतात, पण स्त्रियांवरच्या अन्यायाबद्दल असं म्हणणं काहीसं गैर वाटतं, कारण या प्रकारात समजात आजही पिडीत महिलेलाच  दोषी ठरविण्याचा कल आहे. एक साधेच उदाहरण देऊन पुढे जातो. घटना घडल्यानंतर जवळचे, ज्यांच्या कडून पाठबळ मिळण्याची अपेक्षा असते, त्यांचाच प्रश्न असतो, तू तिथे किंवा त्याच्याबरोबर गेलीसच कां? म्हणजे आगळीक करणारा बाजूलाच राहिला. आवाज उठवण्याकरिता खरोखरच धाडस लागतं, आणि तशी परिस्थिती असावी लागते. परिस्थितीला समाज जबाबदार आहे.

रोजचे वर्तमानपत्र वा कुठल्याही वृत्तवाहिनीवरील कार्यक्रम  स्त्रियांवरील अत्त्याचाराच्या, विनयभंगाच्या किंवा लैंगिक शोषणाच्या बातमी शिवाय संपतच नाही. जस जशा स्त्रिया नवीन क्षेत्रात पदार्पण करू लागल्या आहेत, तसं तसे त्या क्षेत्रात नव नवे शोषणाचे, लैंगिक भेदभावाचे प्रकार देखील होऊ लागले आहेत. क्षेत्र मग ते शैक्षणिक असो, कला असो, व्यवसाय असो, लैंगिक छळाची घटना जणू अनिवार्य झाली आहे. होणाऱ्या तांत्रिक प्रगती बरोबरच अत्त्याचाराचे स्वरूप देखील बदलू लागले. महाजालावरच्या सामाजिक माध्यमांवर प्रत्येकाचा वावर जणू आवश्यकच झाला आहे. या सामाजिक माध्यमांचा वापर करून आपल्या मोहजालात फसगत करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. महाजालावरील छळामुळे मानसिक संतुलन बिघडल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. व्यावसायिक क्षेत्रात लैंगिक छळाच्या घटना तर रोजच्याच आहेत. या व्यतिरिक्त बलात्काराच्या घटना आपला सहयोग देतच असतात. वर उल्लेखिलेल्या २०१७ मधील मोहिमांचा थोडक्यात अर्थ अन्यायाला, अत्त्याचाराला, शोषणाला वाचा फुटली नाही म्हणजे ते झालेच नाहीत असे नाही. आज आपण २१ व्या शतकात असून देखील समाज १०० वर्षांपूर्वी होता तसाच आहे कि त्याहून वाईट असा प्रश्न पडतो.

जवळ जवळ वीस वर्षांपूर्वी अशाच काहीशा प्रसंगानंतर लिहिलेल्या ओळी उधृत कराव्याशा वाटतात-

दारातून तू झुकुनी बघता 
सळसळले ते
जुनाट जख्खड झाड वडाचे ।१।
मानवर करुनी हसलीस जेव्हा
थरथरले ते
जुनाट जर्जर झाड वडाचे ।२।
डोक्यावरचा पदर जाता
हलु लागले
जुनाट कुजकट झाड वडाचे ।३।
वाचा फुटता अन्याया मग
झुकू लागले
जुनाट पिचके झाड वडाचे ।४।
सुटलीस जेव्हां उंबऱ्या मागून
उन्मळले ते
जुनाट जुनाट झाड वडाचे ।५।
उरले सडके लाकूड केवळ
अन सुकलेली काळी बांडगुळ
पण जाता जाता जुनाट जख्खड
प्रसवूनी गेला
नवीन वडांचे जुनेच जंगल ।६।

महिला दिन साजरा करणारा समाज हा एक प्रबुद्ध, जबाबदार समाज असावा. ज्या समाजाने लिंग भेदाला पूर्णविराम दिलेला आहे, ज्या समाजात स्त्री म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून महिलांना स्थान आहे, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्यांना समान संधी उपलब्ध आहेत. माझ्या कल्पनेप्रमाणे हे उद्दिष्ट कमीत कमी १०० वर्षेतरी दूर आहे पण अशक्य नाही.

हा विषय ढोबळमानाने दोन भागात विभागता येईल. एक - स्त्रियांवर होणारे अत्त्याचार, मग तो बलात्कार, विनयभंग असो, कामाच्या, व्यवसायाच्या ठिकाणी होणार छळ असो, वा घरात होणारा स्त्रियांचा मानसिक वा शारीरिक छळ असो. थोडक्यात भारतीय दंड संहिते नुसार जो गुन्हा आहे. आणि दुसरा भाग लैंगिक असमानता आणि त्यामुळे होणारा अन्याय.

स्त्रियांवरील अत्त्याचार जरी समाजाच्या मानसिकतेशी निगडीत असला, तरी फक्त त्यातील बदल पुरेसा नाही. मुख्यत्वे कायदा, कायद्याची अमलबजावणी, न्यायदानाची तत्परता ह्या बाबींची सुधारणा अशा अत्त्याचाराना आवर घालण्यास अत्यावश्यक आहे.    
लिंग भेदामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकरिता खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाची गरज आहे. सामाजिक मानसिकतेतला बदलच केवळ लैगिक समानता आणू शकतो. या परिवर्तनाची सुरवात समाजाच्या छोट्यात छोट्या घटकापासन सुरु होणे आवश्यक आहे अन्यथा दिसलेला बदल तत्कालिक ठरेल. समाजाचे सर्वात लहान एकक, म्हणजे कुटुंब, बदलाला सुरुवात इथून झाली पाहिजे. लिंग भेदाची ओळख नवीन पिढीला कुटुंबाच्या चौकटीतच होते आणि म्हणूनच स्त्रीला एक व्यक्ती म्हणून दर्जा, सर्व प्रथम कुटुंबात मिळणे गरजेचे आहे. कुटुंब प्रमुख हा शब्द प्रयोग हेतुपुरस्सर टाळला आहे कारण हा शब्द प्रयोग निर्णय क्षमता एका व्यक्तीत केंद्रित करतो आणि जो आजच्या पुरुष प्रधान समाजात पुरुष आहे. थोड्क्यात घरातील, कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत स्त्रीचा समान सहभाग अपेक्षित आहे. जेणेकरून मुलांसमोर एक कायम स्वरूपी उदाहरण राहील. मुलांचे संगोपन करताना मुलगा आणि मुलगी असा भेदभाव होणार नाही ह्याची प्रयत्नपूर्वक काळजी घ्यावी लागेल. अगदी सहज मारलेला शेरा “अग तुला नाही जमणार दादाला सांग”, नुकसान करू शकतो. तिला का जमणार नाही ते सांगा अन्यथा तिच्या आणि दादाच्या डोक्यात फक्त लैंगिक तफावत नोंदवली जाईल. अभ्यासक्रम निवडताना, आयुष्याची ध्येय ठरवताना, आयुष्याच्या ज्या ज्या वळणावर मुलं तुमच्याकडे मार्गदर्शना करिता बघतील त्या वेळी शक्यतो लिंग हा निकष न लावता योग्य तो सल्ला द्या.  

लहान मुलांच्या संस्कारक्षम वयात त्यांच्या समोर आई आणि वडील हेच दोन आदर्श असतात. बहुतांशी मुले त्यांच्या पावलावर पाउल टाकून पुढे जात असतात. आई, वडिलांची जबाबदारी वरील विषयाला अनुषंगून अतिशय जागरूकतेने पार पाडणे गरजेचे आहे, जागरूकतेने अशा करिता साध्या बोलण्यात सुध्दा स्त्रीला कमी लेखल जाऊ शकत उदा. पुढे हळू जाणाऱ्या गाडीला मागे टाकून पुढे जाताना, त्या गाडीतील स्त्री चालक बघून ‘वाटलंच बाई असणार’ हा टोमणा वजा संवाद (जर चालक पुरुष असता तर ‘आयला काय चालवतात’ असा असता), मागच्या सीटवर बसलेल्या मुलांना नेमका चुकीचा संदेश देउन जातो. तुमचा उद्देश कदाचित तसा नसेलही. घरात मुलांसमोर होणार कोणत्याही स्त्रीचा उल्लेख कसा होतो ह्या कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. मग स्त्री कोणत्याही क्षेत्रातील असो.

ज्या क्षणी मुलं घराबाहेर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पडतील त्या वेळी त्यांच्या डोक्यात महिलांबद्दल आदर आणि बरोबरीची भावना जर असेल तर ही पिढी बदलाकरिता पोषक वातावरण निर्माण करू शकेल. हे समाज परिवर्तन आहे. त्याचे दृश्य परिणाम दिसण्याकरिता कैक वर्ष, काहीएक पिढ्या कदाचित जाव्या लागतील. प्रत्येक सुविद्य नागरिकाने हा वसा आपल्या पुढच्या पिढीला, त्यांच्या पुढच्या पिढीला देण्याकरिता देणे, अत्यंत आवश्यक आहे.

आपण भारतात जन्माला आलो हे आपले भाग्य आहे. भक्कम कुटुंब व्यवस्था हा आजही आपल्या समाजाचा गाभा आहे, गार्गी, मैत्रेयी या सारख्या विदुशींचा ह्या देशाला वारसा आहे, स्त्री ही देवी स्वरुपात  कुठे सरस्वती, कुठे लक्ष्मी म्हणून घराघरात पुजली जाते, इतर देशांच्या मानाने कदाचित आपलं काम सोपं आहे. फक्त गरज आहे ती विचार करू शकणाऱ्या प्रत्येकाने आपले योगदान देण्याची. मला खात्री आहे पाश्चिमात्य देशांना या बाबतीत आपण नक्की मार्ग दाखवू शकतो.  




Monday, 19 February 2018

देखल्या देवा...



तसा हा प्रसंग खूपच जुना आहे. जवळ जवळ २८ वर्षे उलटली. मी एका मोठ्ठ्या अपघातात्तून वाचलो. अपघात कसा झाला? कां झाला? ते अलहिदा, पण परिणामतः मला अडीच महिने घरी बसायची वेळ आली. अपघातामुळे माझा जबडा तारांनी बांधलेला होता, बोलायलाच काय खायला देखील बंदी होती. त्यावेळी एवढ पेय पान करावं लागलं की एखाद्या पट्टीच्या पिणाऱ्याला देखील हेवा वाटावा. वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्नच होता. तो पर्यंत मला स्वतःला वाचनाची खूप आवड आहे असं वाटत होतं पण जेव्हा वाचन सक्तीचं झालं तेव्हा नकोस वाटू लागलं.

आमची बिल्डींग, आजच्या भाषेत रोड फेसिंग (खरतर रस्त्याला लागुनच) आहे. बेडच्या बाजूच्या खिडकीतून वाहता रस्ता दिसतो, जाणारी येणारी वाहन, माण सतत दिसत असतात, हा चांगला विरंगुळा आहे हे कळायला काही दिवस जावे लागले. दिवसाकाठी सहज दोन चार तास रहदारी बघण्यात जायचा. वेगवेगळ्या वेळी जाणारी येणारी माणसं देखीलं आता ओळखता यायला लागली. खिडकीतून पानाची गादी, वटवृक्षाच्या खोडाला लागून असलेले मारुतीचे मंदिर, जुनाट उडुपी हॉटेल आणि केश कर्तनालय दिसे. आता त्या हॉटेलच आणि केशकर्तनालयाच नाव नाही आठवत, आता काही नवीन उद्योग त्या जागी चालतात.  

त्या अडीच महिन्याच्या कालावधीत पानाच्या गादिला भेट देणारे पान तंबाखूचे शौकीन, त्यातला पान खाणारा कोण, नुसतंच चुन्याच्या दगडाला बोट लाऊन जाणारा कोण आणि तिथेच उभं राहून सिगारेट ओढणारे कोण, पानवाल्याची सगळी गिऱ्हाईक परिचित वाटायला लागली. हॉटेल मधे राबता कष्ट कऱ्यांचा दिसे. फारच थोडे पांढरपेशे तिथे हजेरी लावताना दिसत. नाही म्हणायला संध्यकाळी पानाच्या गादीवर सिगारेट घेऊन कटिंग चहा पिणारी तरुण मुलं उभी दिसायची.

पण सगळ्यात जास्त वेळ  मारुती मंदिरात येणाऱ्या, खरतर मंदिरा समोरून जाण्याऱ्या भक्तांमुळे जात असे. त्या खिडकीत बसून देवाला नमस्कार करणारे अनंत लोक आणि नमस्कारांचे तितकेच प्रकार बघायला मिळाले.

चालता चालता वेग जराही कमी न करता थोडसं पुढे झुकून, किंचित मान वळवून (मूर्ती कडे) उजव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा जुळवून छाती, ओठ आणि कपाळ हा प्रवास क्षणार्धात संपवून पुढे जाणारे, चपला काढून डोळे मिटून भक्तिभावाने क्षण दोन क्षण मंदिरा समोर उभे रहाणारे, ख्रिस्ती मंदिरातून करतात तसा नमस्कार करणारे तरुण, तरुणी, गाडी रस्त्यातच उभी करून घाईघाईने नमस्कार करून, मागील निषेध नोंदवणाऱ्यावर कावून, गाडीत बसून भरकन निघून जाणारे, शाळकरी मुले, मुली त्यांच्या आया, बायका, हात जोडून बोटाच्या टोकाला नाक लावून नमस्कार करणारे, थोडा जास्त काळ मंदिरा समोर रेंगाळणारे वयस्क, आजाराने धास्तावून मोर्निंग वॉकला बाहेर पडून साकडे घालणारे..शनिवारी तर विचारूच नका, वक्र दृष्टीक्षेपात असलेले, तेल आणि रुईच्या पानांच्या माळा वाहणारयांची लांबच लांब रांग पाहायला मिळे ... कित्ती प्रकार सांगू?

बरें, नमस्कार करणाऱ्या प्रत्येकाची देहबोली वेगळी, कोणी लीन तर कोणी दीन. कोणाच प्रदर्शन तर कोणाच दर्शन, कोणी याचक तर कोणी कृतज्ञ. कोणी शरणागत तर कोणी आक्रमक, कुठे केवळ उपचार तर काही मनःपूर्वक. श्रद्धा तीच पण जितक्या व्यक्ती तितकी प्रकटीकरण, भाव कदाचित तोच पण कारणे निराळी. दाता केवळ एकच बाकी घेणारे?

मंदिराच्या दरवाजातून डोकावून क्षणात होणारे ते दर्शन, झालेला न झालेला एकतर्फी संवाद जर कोणाला आयुष्याच्या संघर्षात शक्ती, उमेद देत असेल तर काय हरकत आहे. चमत्कार शिवाय नमस्कार नाही असं म्हणतात पण इथे बहुतांशी चमत्कार होण्याकरता नमस्कार करताना दिसतात. देव आहे नाही, ह्या वादात मला पडायचे नाही. तो मुद्दा गौण आहे. सुभाषितकारांनी पूर्वीच सांगून ठेवले  आहे ..... भावोही विध्यते देव, तस्मात भावोही कारणं! प्रत्येकाला जो जसा भावाला तसा तो त्याचा देव! तो त्याला जसा वाटेल तसा त्यांनी पुजावा. ज्याचा त्याचा देव व्यक्तिगत असावा आणि त्याचे स्वतःच्या देवाशी एक खास भावबंधन असावे. बस! बहुदा तेहेतीस कोटींची मूळ संकल्पना तशीच असावी. नेहेमी प्रमाणे आम्ही आकड्यातच अडकतो. 

Sunday, 21 January 2018

शल्य


मला प्रत्येक व्यक्तीत एक ‘शल्य’ डोकावताना दिसतो. तुम्हाला कधी दिसलाय  का? ‘शल्य’ जो दुसऱ्याचा पाणउतारा करण्याचा सदोदित प्रयत्न करीत असतो. दुसऱ्याचा तेजोभंग करण्याची, तुलनात्त्म्क कमीपणा दाखवण्याची एकही संधी तो सोडत नाही. खरतर आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवत असत पण त्याला विरोध करण्या ऐवजी आपण त्याच्या आहारी जातो आणि मग उरतो तो नात्यातला कडवटपणा, वितुष्ट आणि दुरावा.

अनेकांच्या बाबतीत, मनातील हा ‘शल्य’, ज्याच्या मनात असतो त्यालाच दुजा भावाने टीकेचे लक्ष्य करतो, स्वतःत असलेल्या नसलेल्या हिंनतेच्या, कमीपणाच्या भावना जोर धरू लागतात, परिणामतः  आत्म बलाचा निचरा होऊन खच्ची करण व्हायला वेळ लागत नाही.

‘हा’ शल्य कुठून आला?

प्रश्न पडला ना? शल्य म्हणजे बोचरं दुःख, सल. सतत टोचत राहणार दुःख ते शल्य. किंबहुना त्याला शल्य का म्हणतात? 

वरील प्रश्नांची उत्तर मला महाभारतात सापडली. महाभारत वाचताना मला पदोपदी रूपक आढळतात. दर वेळेला वाचताना काही न काही नवीन सापडते. महाभारतकार महाकवी व्यासांनी हेतुपुरस्सर पात्रांची योजना केलेली आहे. प्रत्येक पात्र, प्रसंग, घटना क्रम इतका विलक्षण आहे कि वाचाक अवाक झाल्याशिवाय रहात नाही. नाना विविध रूपकांचा उपयोग करून मनुष्य स्वभाव, विकारांच विश्व नेमक उलगडून दाखवल्याच याहून अधिक चांगले दुसरे उदाहरण माझ्या वाचनांत तरी नाही.

शल्य हा मद्र देशाचा राजा, पंडू पत्नी माद्री चा सख्खा भाऊ. नकुल, सहदेव यांचा मामा. बलाढ्य, शूर, लढवय्या, अश्व कला जाणणारा, उत्कृष्ट सारथी. पांडवांचा चाहता, हितचिंतक आणि पांडवांच्या विजयाची सतत कामना करणारा. कौरवांच्या राजकीय खेळी मुळे, महायुद्धात कौरवांच्या बाजून युद्धात उतरलेला, पण मनोमन पांडवांच्याच बाजूचा. असा ‘शल्य’ हे एक अद्वितीय रूपक आहे असे मला नेहमी वाटते.   

दुर्योधनाने ज्यावेळी कर्णाला कौरव सेनेचा सेनापती होण्यास सांगितलं तेव्हा कर्णाने दुर्योधनाशी, स्वतःच्या व अर्जुनाच्या बलाबलाची चर्चा करताना, कृष्णाच्या तोडीचा सारथी माझ्याकडे नाही अस तक्रारिचा सूर लावला आणि शल्याने त्याचे सारथ्य करावे अस प्रस्तावही मांडला. कृष्णाच्या तोडीचा एकमेव सारथी आपल्याकडे आहे आणि तो म्हणजे शल्य अशी पुस्ती देखील त्याने जोडली. दुर्योधाने नाईलाजास्तव शल्याला गळ घातली. शल्याला दुर्योधनाची विनंती मान्य करण्यावाचून पर्यायच नव्हता. राजाने सारथ्य करायचे? मनातून पांडवांच्या पक्षातील, साहजिकच शल्याने एक अट घातली, “सारथ्यात मी कमी पडणार नाही पण मी कर्णाला काहीही बोललो तरी कर्णाने मला उलट बोलता कामा नये, ज्या क्षणी तो उलट बोलेल त्या क्षणी मी रथाचे लगाम खाली ठेवीन”. कर्णाकडे हि अट मान्य करण्यावाचून गत्यंतरच नव्हते.

प्रत्यक्ष युद्धभूमीवर, शल्याने आपल्या तोंडाचा पट्टा चालू केला, कर्णाला, शल्याचे एकामागून एक वाक्बाण घायाळ करत होते. त्याचा तेजोभंग करण्याची एकही संधी शल्य सोडत नव्हता. अर्जुनापुढे कर्णाचा निभाव कसा लागणार नाही ह्याचा पुनरुच्चार तो करीत होता. ज्याने सारथ्य करून कर्णाला पुढे न्यायचे तोच कर्णाचे पाय ओढत होता. या परीस्थितीत देखील कर्णाच्या पराक्रमाने स्तंभित होऊन शेवटी शल्याने त्याची स्तुती केली आणि युद्धात अर्जुनाच्या विरोधात एक मौलिक सल्ला त्याने कर्णाला दिला, पण सतत निर्भत्सना ऐकल्यामुळे कर्णाने त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल. मनाच्या संभ्रमित अवस्थेत वेगळे काही घडणे अपेक्षित नव्हते.

महाप्रतापी, धनुर्धारी कर्ण हा पांडवांच्या कौरवांवरील विजयाच्या मार्गातील एकमेव अडथळा उरला होता. युद्धाच्या आधीच कृष्ण आणि कुंतीने कर्णाच्या मनात संदेह निर्माण करण्याचे काम केलेले होते. मनाच्या संदिग्ध अवस्थेत कर्ण युद्धात उतरला आणि राहिलेली कसर शल्याने भरून काढली. 

कर्णाच्या मृत्युला जेव्हढे रथाचे रुतलेले चाक कारणीभूत होते तेव्हढाच किवा रत्तीभर जास्तच शल्य जबाबदार होता (रथाचे चाक रुतले तेव्हा सारथ्य शल्याकडेच होते, असो).
कर्णाच्या मृत्यूला कारणीभूत झालेला हा शल्य, खरच व्यक्ती आहे की एक रूपक? कर्णाच्या मनातील द्वंद्व? कि व्यास मुनीना काही वेगळ सुचवायचं आहे?, मनावर ताबा ठेवणारी (सारथ्य करणारी) बुद्धी जर विरोधात उभी राहिली तर पराभव करायला बाहेरील शत्रूची गरज नाही, तो केवळ निमित्त मात्र ठरेल. यशापयश हे परिस्थितीपेक्षाही मनाच्या काय स्थितीत आपण प्रसंगाला सामोरे जातो यावर अवलंबून आहे. नेमक हेचतर त्यांना सुचवायचं नसेल? 

Saturday, 27 May 2017

पिंपळपान



मराठीत पिंपळ, शास्त्रीय भाषेत फायकस रेलीजीओसा, अंजीर वर्गातील भारतीय उपखंडात आढळणारा वृक्ष. संपली विकिपीडिया मधे मिळणारी माहिती. अश्वत्थ वृक्ष, बोधी वृक्ष हि देखील याचीच नाव. गौतम बुद्धांना याच वृक्षाखाली बोध झाला म्हणून बोधी वृक्ष.

पिंपळ म्हटला कि डोळ्यासमोर ऋषीतुल्य, तटस्थ, धीर गंभीर प्रतिमा उभी राहते. गूढ थोड्याशा भितीदायक वलयात लपेटलेला. स्वतःच्या नादात कुठल्यातरी वैश्विक (cosmic) आनंदात नर्तन करीत असतो. सळसळ म्हटली कि ती पिंपळाची, पानांच्या आवाजाला नाव असलेला एकमेव वृक्ष. या पानांचा हृदयाकार आणि त्याचं लांब देठ हे या वारा नसताना थरथरण्या मागच रहस्य असेल कदाचित पण मला मात्र ती नेहेमी काही सांगत आहेत असं वाटतं. पिंपळाची सळसळ कधी लक्षपूर्वक ऐकली आहेत. ती त्या पानांच्या पसाऱ्यात कुठेतरी एका ठिकाणी सुरु होते आणि काही क्षणात वृक्षाची सगळी पान एका लयीत हलतात (resonate) आणि जशी अचानक सुरु होते तशीच क्षणात थांबते. रात्री उशीरा जेव्हा बाकी सगळे आवाज बंद होतात तेव्हा ह्या सळसळीची आवर्तने अनुभवण्यासारखी असतात. एखादी हलकी झुळूक त्या पानांच्या पसाऱ्यातून वाट काढत सळसळत जाते तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही.

पिंपळाच सौंदर्य त्याचा डौल, थाट सगळ सगळ त्या पानांच्यात आहे. या वैशाखात तुम्ही कोणी पिंपळाला पालवी येताना पहिलीत का? मी पहिली, मी पाहतो, त्याची पानगळ आणि पालवी दरवर्षी पाहतो अगदी न चुकता बरोबर कोणी असेल तर त्यालाही दाखवतो. बघण्यासारखा, दाखवण्यासारखाच सोहळा असतो तो. लहानात लहान झाड अगदी दोन तीन पान घेऊन भिंतीच्या खबदाडीतून आलेलं असो वा अगडबंब खोडासाहित जटाधारी महावृक्ष असो, त्यांचा पालवी मोहोत्सव एकसारखाच असतो. नियम एकच, झाडून सगळीच्या सगळी जुनी पान त्यागून नवीन साज चढवायचा. अस जरी असलं तरी प्रत्येक झाडाची स्वतःची एक खासीयत असते. प्रत्येकाची तऱ्हा निराळी.

काहीना इतकी घाई असते कि रातो रात आपली जुनी पान गाळून बेटे तयार असतात नवीन कपडे चढवायला. शाळेतून घरी आल्याबरोबर शाळेचा गणवेष बदलून क्षणात खेळायला धावण्यारा एखाद्या मुलासारख तर दुसरा, शर्ट काढलाय आणि टंगळ मंगळ चालली आहे आईची हाक आल्याशिवाय गाड पुढे जातच नाही अगदी तद्वत निम्म्यापेक्षा जास्त पान गळून पडली आहेत पण बाकीच्यांचा मोह काही सुटता सुटत नाही. ती तशीच रेंगाळत असतात आणि आधी गळलेल्या पानांच्या जागी नवीन धुमारे फुटले रे फुटले कि दचकून उठल्यासारखी गळून पडतात.   

पानगळती नंतरचा एखादा दिवस त्याच्या विराट फांद्यांच, विस्ताराच सुस्पष्ट दर्शन होत. एखादा  बैरागी जणू सर्वसंग परित्याग करून आपले हात उभारून परमेश्वराच्या कृपाप्रसादाची वाट बघत असतो. आभाळाशी स्पर्धा करणाऱ्या फांद्या जणू पालवीला आवाहन करत असतात आणि मग दुसऱ्याच दिवशी जिथे पहिली पान होती त्या प्रत्येक जागी लाल, किरमिजी धुमारे दिसायला लागतात. पहिल्या दिवशी फांद्या फांद्यात हे कोंब दिसतात, त्यानंतर त्यांची वाढ इतक्या वेगाने होते को रोज सकाळी त्यांचा वाढलेला आकार आणि बदलेला रंग मनाला अचंबित करतो. हि नवीन पान इतकी नाजूक आणि तलम, मुलायम असतात पारदर्शक वाटतात. त्यांचा स्पर्श? वर्णन करण खूप कठीण आहे. अनुभवल्या शिवाय कळणार नाही. सांगायचच झाल तर नवजात शिशूच्या तळव्याचा स्पर्श त्याच्या जवळ पास जाऊ शकतो.

आता अख्खा पिंपळ लाल, किरमिजी रंगाच्या अनंत छटांनी नटलेला दिसतो आणि एक गंमत, सगळ कस शांत शांत असत, ती इवलीशी पान आजही हलत असतात पण सळसळ बिल्कुक बंद. सुरवातीच्या लाल, किरमिजी रंगात पोपटी रंगाच्या छटा दिसू लागतात. लाल गुलाबी रंगापासून ते हिरव्या रंगा पर्यंतचा तो पानांचा प्रवास बघून डोळे तृप्त होतात. रोज रंगाची नवीन छटा, अविष्कार असतो तो लाल गुलाबी रंगांचा, त्या रंगाना नाव देताच येणार नाही.
दावण्या हा रंग सोहळा शब्द माझे तोकडे
पाहण्या तव चक्षुंनी व्हा जरासे मोकळे ।।

हाहा म्हणता पिंपळ आपल्या स्व-रुपात पुन्हा उभा राहतो. तीच सळसळ तोच गंभीर चेहरा जणू काही घडलेच नाही. मला तर नेहेमी वाटत याला अश्वत्थ म्हणतात याच कारण त्याची केवळ नैसर्गिक आर्युमर्यादा नसून पाना पानात अथक चालेले हे जन्म मृत्युच चक्र आणि त्या पासून अलिप्त असेलेले त्याचे व्यक्तिमत्व हे हि असेल कदाचित.  

याच वेळेला दिसतात ती पिंपळाची फळ, चण्यामण्यां बोरांच्या आत बाहेरचा आकार. कधी बघायची वेळच येत नाही आणि पानात सहजी दिसत देखील नाहीत. पानांच्या बेचक्यातून गुच्छा सारखी लागतात, हिरव्या मातकट रंगाची. हातात घेऊन हलकेच दाबली तर फुटतात. आत अन्जीरासारख्या अनंत बीया. अंगठ्याच्या नखावर तीस-चाळीस सहज मावतील. त्या बघितल्यावर ...एका बीजा पोटी तरु कोटी कोटी ..... गाणं आठवल्या शिवाय रहात नाही. त्यावरची कावळ्यांची घरटी, आधाराने राहणारे खारी सारखे प्राणी आणि सकाळ संध्याकाळ किलबिलाणारे पक्षी. पिंपळ स्वतःच एक परिपूर्ण परिसंस्था (ecosystem) आहे. निसर्गासारखा दुसरा किमयागार नाही.

कालच माझ्या या सगळ्या मित्रांचा खरतर बुजुर्गांचा, थोरांचा दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारून निरोप घेऊन आलो. सोमवारी चर्चगेट स्टेशन पासून ऑफिसला जाताना त्यातलं कोणी भेटणार नाही मला.