Tuesday, 18 April 2023

काश्मीर: एक अनुभव

 

प्रत्येक भारतीयासारखे (खरंतर जगातील सर्वच पर्यटकांप्रमाणे) माझेही काश्मीरला जाण्याचे कित्येक दिवसांचे स्वप्न होते. त्याची पूर्तता होण्याकरिता ६ मार्च २०२३ हा दिवस उजाडावा लागला. या सफरीवर आम्ही दोघे, नेल्सन आणि जेनिफर असे चौघे होतो. नेल्सन, जेनिफरशी आमचे गोव्यातील कैक वर्षांपासूनचे मैत्र. तो पहिला दिवस श्रीनगर व आसपास फिरण्यात घालविला. श्रीनगरमध्ये लाल चौक, जहांगीर चौक या भागात सीमा सुरक्षा आणि सैन्यदलाच्या जवानांची उपस्थिती जाणवण्याइतपत होती, पण त्याचा लोकांच्या दैनंदिन व्यवहारावर काही परिणाम होत होता असे वाटले नाही. किंबहुना त्यांची उपस्थिती पर्यटकांना कदाचित आश्वासक वाटत असेल असे वाटले.

दल किंवा डाल तलावाचा विस्तार बघून अचंबित व्हायला होते. तलावाचं पाणी जलपर्णी रहित बऱ्याच अंशी स्वच्छ वाटलं. संध्याकाळपर्यंत श्रीनगर आणि आसपास फिरण्यात घालवला. या भटकंतीत जाणवलेली गोष्ट म्हणजे काश्मीर भेटीचा योग जुळून आला खरा, पण तो १५ दिवसानंतर आला असता तर बरं झालं असतं (काही गोष्टी कदाचित टळल्या असत्या). १९-२० मार्चला जगप्रसिद्ध ट्युलिपच्या बागा पर्यटकांकरिता उघडणार होत्या. काश्मीरातल्या वेगवेगळ्या बागा अजून फुलायच्या होत्या. मुघल गार्डन, चष्मे शाही, शालीमार इत्यादी बागांमध्ये कुठे फुलांच्या ताटव्यांची मशागत चालू होती तर कुठे छाटणी केलेल्या गुलाबांच्या झाडांचे रसरशीत लाल-किरमिजी धुमारे थोडक्या काळात बहरणाऱ्या गुलाब पुष्पांची वर्दी देत होते. चिनार वृक्षांची छोट्या छोट्या केसाळ चेन्डूसारखी फळे पिकून काळपट तपकिरी झाली होती. पाईन, देवदार मात्र आपला गर्द हिरवा साज नम्रपणे मिरवीत होते. या बागांमधून, आणि त्यांच्या बाहेर, जागोजागी, ओल्या नारळाचे तुकडे तिखट, मीठ, मसाला लावून आणि त्यावर लिंबू पिळून विकताना, लोक दिसले. आश्चर्य वाटले, आपल्याकडे नारळ पिकत असून हा प्रकार आढळत नाही आणि इथे मात्र नारळ पिकत नसतांनाही हा खाद्य प्रकार लोकप्रिय वाटला, पर्यटक तसेच इथले रहिवासी नारळाचे तुकडे विकत घेतांना दिसत होते. आम्ही देखील त्याचा आस्वाद घेतला.

दुपारी हजरतबल प्रार्थनास्थळ किंवा दर्गा शरीफला भेट दिली. प्रेषित मुहंमदांचे केस येथे आहेत अशी लोकांची श्रद्धा आहे.  हे प्रार्थनास्थळ दल तलावाच्या किनाऱ्यावर आहे. आम्हा सर्वांकरिता इस्लामी प्रार्थनास्थळाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. महिलांना प्रवेश नव्हता. दर्ग्यात जवळ जवळ शुकशुकाट होता. मुख्य प्रवेशदारातून आत गेल्यावर पूर्ण मोकळा सभामंडप होता. जमीन पूर्णपणे गालिच्याने आच्छादलेली होती. बहुदा याचा वापर सामुहिक नमाजाकरीता होत असावा. समोरच्या खोलीच्या दारावर पडदा होता, मी आणि नेल्सन दोघंही तिथें येऊन थबकलो. आमच्या मागून आलेल्या एका गृहस्थाने पडदा बाजूला करून आत शिरताना सुहास्य मुद्रेने   (बहुदा आमचा संभ्रम ओळखून) आत येण्यास खुणावले. त्याच्या पाठोपाठ आम्ही आत गेलो. आत काही जण नमाज पडत होते. एकूणच हा अनुभव आम्हा दोघांकरिता भावनिक दृष्ट्या वेगळा होता.      

त्या दिवशी आमचा मुक्काम निगीन तलावात इंशाअल्लाह कंपनीच्या हाउस बोटीत होता. निगीन तलाव दल तलावाच्या तुलनेने छोटा आहे. हाउस बोटींची गर्दीपण कमी होती. सूर्यास्तानंतरचा शिकाऱ्यातून फेरफटका फारच रमणीय होता. वेगवेगळे विक्रेते त्यांच्या होड्यांतूनच जवळ येऊन आपला माल विकण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना नाही म्हणायला फारच जड जाते. पर्यटन व्यवसायावर सर्वच अवलंबून आहेत असे दिसले. शेवटी पहिल्याच दिवशी आम्ही येणाऱ्या विक्रेत्यांना आजचा आमचा शेवटचा दिवस आहे, आमची सगळी खरेदी झाली आहे असे सांगण्यास सुरुवात केली. शिकाऱ्यातून फिरतांना भाज्या, फुले वाढवण्याकरिता केलेले तरंगते वाफे बघायला मिळाले. आठ वाजण्याच्या सुमारास चहुबाजूनी नमाजाची अजान ऐकू येऊ लागली. भोवतालच्या विविध मशिदीतून थोड्याफार फरकाने एकाच वेळेला अजानची सुरुवात झाली. वातावरणात एक प्रकारचा काहीसा सुरेल कोलाहल निर्माण झाला होता. त्यावेळी आपण नक्की कुठे आहोत याचा क्षणभर संभ्रम निर्माण झाला. नुकताच उगवलेला पौर्णिमेचा चंद्र, शिकाऱ्याच्या बाजूला नावाड्याचे वल्हे बुडताना होणारा डुबुक डुबुक आवाज आणि ती अजान, मनात संमिश्र भावना उचंबळून आल्या. ह्या पार्श्वभूमीवर, ६ मार्च होळी, पौर्णिमेचा चंद्र आणि हाउस बोटीतील ती रात्र. अंग शहारणारी थंडी. उगाचच गूढ वाटू लागलं आणि गुलझारांच्या “रूह देखी हैं कभी?” कवितेतल्या ओळी आठवल्या..

...

या शिकारे में किसी झील पे जब रात बसर हो

और पानी के छपाकों में बजा करती हो टलियाँ

सुबकियाँ लेती हवाओं के कभी बैन सुने है?

....

विचार करता करता विजेवर गरम केलेल्या गादीवर कधी झोप लागली कळलं देखील नाही. हाउस बोटीतील परवेझने अतिथ्यशिलतेचा जणु दाखलाच दिला. त्याचं मला सर्वात आवडलेलं वाक्य “आप बोलो, whatever possible, हो जायेगा”.

दुसऱ्या दिवशीची पहाट फारच रम्य होती. निगीन तळ्यातील पाण्यावर थंडीमुळे बाष्प तरंगताना दिसत होते. त्या धुक्यातून वाट काढत छोट्या होड्यातून फुले, भाज्या विकणारे विक्रेते दिसले. सगळ्यांनी काळ्या किंवा तपकिरी रंगाचा फीरन किंवा फेरन (लोकरीचे पायघोळ गाऊन-झगे) घातले होते. सकाळी परवेझाच्या हातची न्याहरी केली आणि त्याला खुश करून निघालो. निघतांना पुन्हा येऊ असं म्हटल्यावर परवेझच्या तोंडून इंशाअल्लाह (ईश्वराची इच्छा) ऐकून सोनमर्गच्या वाटेला लागलो.


वाटेवर ठिकठिकाणी सफरचंदांच्या बागांमध्ये सफरचंदांची झाडे, झाडून सगळी पाने गाळून नव्या पालवीचे वरदान मागत हात उंचावून तटस्थ उभी होती. कुठे कुठे बागायतदार किंवा शेतमजूर सफरचंदांच्या झाडांवर भरगोस पिकाच्या आणि पिकाला चांगला भाव मिळण्याच्या अपेकक्षेने फवारणी करीत होते. फिरन किंवा फेरन घालून स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतांना दिसतं होत्या. पर्णरहित विलो वृक्षांच्या रांगाचरांगा रस्त्याच्या दोन्ही बाजूस दिसतात. ह्या झाडाच्या लाकडापासून क्रिकेट ब्याट बनविण्याचा मोठ्ठा उद्योग येथे चालतो. जगभरात  इंग्लंड आणि काश्मिर ह्या दोनच ठिकाणी होणारे विलो लाकूड क्रिकेट ब्याट करिता प्रसिध्द आहेत असे समजले. ही झाडे पर्ण रहित दिसण्याचे कारण पानगळ नसून हा पाला शेळ्या-मेंढ्या करिता गावकरी तोडतात अशी माहिती मिळाली. नवीन लाल चुटूक पालवी कुठे कुठे दिसत होती. विलो वृक्षांच्या बरोबरीने अक्रोडाची झाडे दिसली. ह्याची पाने मात्र हिवाळ्यातील पानगळीत गळली होती.
   
सोनमर्ग जसजसे जवळ येऊ लागले तसतसा हवेतला गारवा जाणवू लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फाचे ढीग दिसत होते. काही दिवसांपूर्वीच रस्ते मोकळे केले आहेत असे चालकाकडून समजले. हा हा म्हणता रस्त्याच्या कडेपासून ते थेट डोंगर माथ्यापर्यंत बर्फ दिसू लागले. संध्याकाळचा सूर्य प्रकाश डोंगरावरच्या बर्फावर सुवर्णाचा लेप चढवत होता. पाईन, देवदार सावल्यांचा खेळ खेळत होते. मजेशीर भाग म्हणजे ह्या वृक्षांच्या पायतळी बर्फाचा मागमूसही नव्हता. वृक्षांचा शाखा-पर्ण संभार, वृक्षांच्या पायाशी बर्फ पोहोचू देत नसावा. जणु प्रत्येक झाडाला बर्फाचं खळ असावं असं दिसत होतं. दुरून पहाता दळलेल्या पिठाच्या रिंगणात जात, आणि झाड हे त्या जात्याचा खुंटा असल्यागत भासत होत. पौर्णिमा नुकतीच होऊन गेल्यामुळे रात्रीच्या चंद्र प्रकाशाचा बर्फावरचा खेळ काही औरच होता. बर्फ नसलेला डोंगराचा भाग अधिकच काळाभोर दिसत होता. झाडांच्या सावल्या गडद गहिऱ्या झाल्यामुळे झाडांची उंची दिसेनाशी झाली होती. दिवसा त्रिमिती मध्ये दिसणारे दृश्य दोनच मितींमध्ये (लांबी, रुंदी) दिसतं होते. ह्या काळ्या पटावर बर्फाच्छादित भाग जास्तच पांढराशुभ्र दिसत होता. काळ्या-पांढऱ्या रंगाचा जणु गालिचाच अंथरल्यासारखे भासत होते. शब्दात हे सगळे पकडण्याचा प्रयत्न म्हणजे निव्वळ वेडगळपणा वाटतो. ह्याची डोळा ते अनुभवणे हेच खरे. रात्री तापमान उणे ९ पर्यंत खाली गेलं. पण गरम उबदार हॉटेलच्या खोलीमध्ये त्याचा पत्ताच लागला नाही, परिणामतः सोनमर्ग मधील पहाट झोपण्यातच गेली. सोनमर्गची पहाट बघण्याकरिता पुन्हा येणे हे नक्की.
 
सकाळी नाश्ता करून पहलगामच्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी बहुतेक घरे एक-दोन मजली व उतरत्या छपराची होती. बहुतांशी घरांवर गडद हिरव्या रंगाचे पत्रे होते, अपवादात्मक घरे लाल, जांभळ्या रंगाच्या पत्र्याच्या छपरांनी उठून दिसत होती. प्रत्येक फर्लांग दीड फर्लांग अंतरावर मशिदींचे हिरवे गर्द मिनार घरांच्या गर्दीतून डोकावून आपले अस्तित्व जाणवून देत होते. सकाळची वेळ असल्यामुळे वाटेत येणाऱ्या गावांमध्ये वर्दळ तशी कमीच होती, बरीचशी मंडळी आपल्या काश्मिरी पेहेरावात उन्हाला पाठ देऊन बसलेली, उभी असलेली दिसत होती. शाळेत जाणारी मुले, मुली रंगीबेरंगी लोकरीचे स्वेटर घालून जाता येता दिसत होती. फारच गोड वाटली ती मुले. तुरळक कुठे कुठे बायका बाजारहाट करतांना दिसल्या. 
 
पहलगामला ठराविक सहल घेतली. अनुक्रमे  बेताब व्हॅली, मामलेश्वर मंदिर, चंदनवाडी, अरु व्हॅली या स्थळांना भेट दिली. ह्या स्थळांना जायच्या वाटेवर अनेक हिंदी चित्रपटांच्या चित्रिकरणाच्या जागा दाखवण्याचं काम आमच्या चालकाने केले. बेताब व्हॅली मध्ये बर्फावरून ढकलगाडीतून सहल केली. अदनान, ढकलगाडी ढकलणाऱ्यांपैकी एक, फारच उत्साही होता. तोंडाने अखंड बोलत आमच्या बरोबर तोही जणु आनंद लुटत होता. बर्फात आम्हाला उभं करून त्याच्या दोन मित्रांनी दोहोबाजूला उभं राहून आमच्यावर बर्फ उधळून हिमवृष्टीचा आभास निर्माण करीत आमची खूपच करमणूक केली. अदनानने ह्या हिमवृष्टीचे आमच्या मोबाईलवर चित्रीकरण केले.  अमरनाथ आणि कारगिल पर्वतरांगा तिथून अगदी जवळ दिसतात. अदनान आणि त्याचे सोबती फ्रीसलन गावातीले होते, हे बहुदा भारतीय सीमेवरचे शेवटचे गाव आहे.
 
मामलेश्वर किंवा मामल मंदिर. हे शिव मंदिर इस. ४०० मध्ये बांधले  गेले. राजा जयसिंहाने त्या मंदिरावर सुवर्ण कलश चढवून त्याचे नुतनीकरण (इस. ११२५-११५५) ह्या काळात केले. दंतकथे प्रमाणे महादेवांनी ह्याच जागी गणपतीला हत्तीचे मस्तक लावले. मंदिर केवळ ८ चौ. फुटाचे आहे. त्याचा समोर स्वच्छ पाण्याचे कुंड आहे. जिवंत पाण्याचे झरे कुंड सदोदित भरलेलं ठेवतात.
 

पहलगामवरून गुलमर्गच्या वाटेवर अवंतीपूर मधील अवन्तिस्वामी मंदिरचे अवशेष बघितले. अवन्तिवर्मा नामक राजाने ओडीशा मधून येऊन इस. ८५५-८८३ ह्या काळात ही मंदिरे बांधली. इथे माहिती देण्याकरिता अब्दुल हमीद नावाचा मार्गदर्शक होता. मध्यभागी उंच चबुतऱ्यावर विष्णू मंदिर होते. त्याच्या चार दिशांना गणपती, गरुड, भूमी आणि सरस्वती ह्या देवतांची  मंदिरे आहेत. १४ व्या शतकात भूकंपात किंवा पुरात ही मंदिरे गाडली गेली. १९१३ मध्ये इंग्रजांनी उत्खनन करून हे अवशेष शोधून काढले. ह्यातील काही मूर्ती श्रीनगर मधील वस्तुसंग्रहालयात आहेत, तर काही इंग्लंडमध्ये. ह्या मंदिरांच्या परिघात ६९ पुजाऱ्यांच्या खोल्या आहेत. आँधी चित्रपटातील तेरे बिना जिंदगी..... ह्या गाण्याचे चित्रीकरण ह्याच अवशेषांमध्ये झाले आहे अशी उद्बोधक माहिती अब्दुलने दिली.

 

सोनमर्ग सारखेच थंडगार, बर्फाळ स्वागत गुलमर्गने केले. भोवताल सर्वच बर्फाच्छादित होता. रस्ते देखील बर्फ बाजूला सारून मोकळे केले होते. त्यादिवशी हॉटेलमध्येच मुक्काम होता. गुलमर्गच्या वाटेवर तंगमर्गला थांबून गमबूट, ओव्हरकोट गोगल, सनक्रीम वगैरे घेऊन गुलमर्गला पोहोचलो. तंगमार्गला एका मार्गदर्शकाचा देखील बंदोबस्त केला होता. हॉटेलमध्ये प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण  केल्यानंतर फोटो काढण्याकरिता बाहेर आलो. परत येतांना हॉटेलच्या मुख्य दरवाजापासून ते स्वागतकक्षापर्यंत लाकडाचे फ्लोरिंग होते. मध्यभाग लोकांना चालण्यासाठी गालिच्याने झाकलेला होता. बोलण्याच्या नादात गालिच्यावरून न जाता मी लाकडी फरशीवर गेलो. फरशी ओली होती. काहीही कळण्याचा आता अस्मादिक पाय घसरून पार भुईसपाट झाले. पडतांना प्रतिक्षिप्त क्रियेने उजवा हात प्रथम जमिनीवर आपटला. शरीराचा तोल, भार हाताने सावरण्याच्या प्रयत्नात मनगटाने दगा दिला. हाड मोडणे आणि सरकणे ह्या दोन्ही गोष्टी एकाचवेळी घडल्या. बरोबरच्या कोणालाही मला सावरण्याची संधीच मिळाली नाही. लोकांच्या मदतीने उभा राहिलो. उजवे मनगट सोडून कुठेही दुखत नव्हते. बहुदा उजव्या हाताने मोठ्या अपघातापासून वाचवलं होतं, मनगटावर निभावलं असच म्हणावं लागेल.
हॉटेल मधील कर्मचारी मदतीकरता धावले. कुणीतरी बर्फ लावा म्हटल्यावर, एकाने धावत जाऊन बाहेरून बर्फ जमाकरून आणला. कुणीतरी हातात वाफाळणाऱ्या चहाचा कप ठेवला. बघता बघता मनगटाचा आकार बदलला. बर्फ लावून सुद्धा चांगलीच सूज आली. वेदना मुक्या माराचे गांभीर्य जाणवून देत होती. गुलमर्ग मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Centre) सोडून कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. हाड मोडले आहे ह्या बद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती पण डॉक्टरी निदान आवश्यक होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे नक्की झाल्यावर हॉटेलचा कर्मचारी आदिल मारुती व्हॅन घेऊन आला. मी आणि हेमा, माझी पत्नी त्याच्या बरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचलो. अत्यावश्यक माहिती घेऊन, शौकत आणि तारिक दोघा कर्मचाऱ्यांनी केस पेपर बनवून प्राथमिक तपासणी केली आणि हाड निखळले आहे असे निदान केले. खात्री करण्याकरता क्ष किरण चिकित्सा केल्यावर हेयरलाईन फ्रॅक्चर देखील आहे हे कळले. शौकत व तारिक दोघांनीही खूप धीर दिला. “यहां ऐसे बहोत पेशंट आते है, कोई चिंता की बात नहीं, हम ठीक कर देंगे”  ह्या केंद्रावर बर्फात स्केटिंग,स्कीईंग करतांना पडून हात, पाय फ्रॅक्चर झाल्याच्या खूप घटना घडतात त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना भरपूर अनुभव होता. डॉक्टर आले की ओढ (traction) देऊन हाड जागेवर आणू व मग प्लास्टर करू असे शौकतने सांगितले. शौकत आणि तारिक दोघांचेही बोलणे इतके आश्वासक होते की कोणताही किंतु, परंतु डोक्यात न आणता मी स्वतःला त्यांच्या स्वाधीन केले. त्यामुळे ओढ कशी देणार? भूल देणार का नाही? कितपत दुखेल? कोणतेही प्रश्न मला खरोखरच पडले नाहीत. थोड्यावेळात डॉ. बिलाल आले. हात बघितल्यावर शौकत आणि तारिकचे निदान अचूक आहे असे म्हणाले. ह्या सर्व काळात आदिल धाकट्या भावासारखा आमच्या सोबत होता. डॉ. बिलाल नी केस पेपरवर काय काय सामान लागेल त्याची यादी आदिलच्या हातात दिली. आदिल कुठून तरी सगळी सामुग्री घेऊन आला. ओपीडी मध्ये मला बसवल्यावर काहीही न बोलता तरिकने माझा उजवा दंड मागून घट्ट धरला. शौकतने हाताची बोटे धरून हात बळेच सरळ केला. रस्सीखेच करण्याचा दोर असावा अशी माझ्या हाताची अवस्था होती. डॉ. बिलालांनी आपल्या बोटांनी माझ्या मनगटावर विविक्षित ठिकाणी जोर द्यायला सुरवात केली. एखाद दोन मिनिटे हा प्रकार चालू होता. असह्य वेदनांनी त्या थंडीत देखील मला अक्षरशः घाम फुटला. मोठ्या कष्टांनी मी आरडाओरडा करण्याचे टाळले. ताण तसाच कायम ठेवून डॉ बिलाल आणि आणखीन एका सहकाऱ्याने हाताला प्लास्टर घालण्याचे काम केले. ह्या सगळया गडबडीत आमच्या दोघांच्याही अंगावर पुरेसे थंडीचे कपडे नव्हते हे लक्षातच आले नाही. हातावरचे प्लास्टर देखील ओले होते. वेदनेबरोबरच थंडीने माझा अंत बघायला सुरुवात केली. तारिकने मला गॅस हिटर समोर बसवले. डॉ. बिलालनी केस पेपर वर औषधांची नावे लिहून दिली. आदिल पुन्हा बाहेर जाऊन औषधे घेऊन आला. प्लास्टर सुकल्यावर आम्ही निघालो. आदिलच्या मदतीने केमिस्टचे बिल देऊन आदिलच्याच मदतीने पुन्हा रूमवर पोहोचलो. पुण्याला परत येऊन आमच्या अस्थिरोग तज्ञांना भेट दिल्यावर केलेले उपचार योग्य आहेत असे समजले आणि पुढील पाच आठवडे हात गळ्यात ठेवणे आले.

ह्या चौघांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्यामुळे आम्ही आमची सहल पूर्ण करू शकलो. अगदी गुलमर्ग मध्ये देखील बाकीच्यांनी बर्फावरच्या साहसांचा आनंद पुरेपूर घेतला.     

काश्मीर सहल काश्मीरी खाण्याबद्दल न लिहिता पुरी होणार नाही. आपण पाच पक्वानांच ताट सणासुदीला वाढतो तसाच पण मुख्यत्वे मांसाहारी आणि काही शाकाहारी पदार्थांचा एकाच ताटात समावेश म्हणजे काश्मिरी वाझवान. काश्मिरीमध्ये वाझ म्हणजे स्वयंपाक किंवा स्वयंपाकी आणि वान म्हणजे विकत घेणें.  कमीतकमी पाच मांसाहारी आणि दोन किंवा तीन शाकाहारी पदार्थांच्या समुदायाने वाझवानची थाळी सजते. ज्याच्यात्याच्या ऐपती प्रमाणे ही संख्या वाढत जाते. राजेशाही किंवा नवाबी वाझवानची थाळी ३६ खाद्यपदार्थांनी सजते. त्यात १५-३० पदार्थ मांसाहारी असतात. अनेक पदार्थांचा एकाच वेळेला आस्वाद देणारी वाझवान थाळी खाद्ययात्रींकरिता एक सुखद अनुभव आहे. नद्रू याखनी, ही कमळाची देठे व दही वापरून केलेली रसभाजी आहे. त्यात वापरलेल्या मसाल्यांमुळे त्याची लज्जत अधिकच वाढते. काश्मिरी हलव्याने थोडीशी निराशा केली. सढळ हाताने सुकामेवा घालून केलेला आपला शिरा ह्या व्यतिरिक्त काही वेगळ वाटलं नाही. काश्मिरी पुलाव देखील खास वेगळा वाटला नाही. भरपूर सुकामेवा घालून केलेला काहीसा गोडसर पुलाव. गोड पदार्थात फिरनी आणि गरम गरम गुलाबजाम लाजवाब.

मनात कोणताही पूर्वग्रह, अपेक्षा न ठेवता सहलीला गेल्याचा फायदा म्हणजे भेटलेल्या काश्मीरवासियांना मोकळेपणी भेटता आलं, त्यांच्याशी संवाद साधता आला. काश्मीरमध्ये लोकांचा अनुभव खूप चांगला आला. मग तो गाडीचा चालक असो, हॉटेल मधील रूम सर्विसचा स्टाफ वा वेटर असो, सगळ्यांचे वागणे अत्यंत अगत्यपूर्ण वाटले. पहिल्या पासून शेवट पर्यंत आमच्या बरोबर असलेल्या शौकतने, चालकापासून पर्यटन मार्गदर्शकापर्यंत सर्व भूमिका उत्कृष्ट पार पाडल्या. जागोजागी जाणवला तो प्रामाणिकपणा. लोक गरीब जरूर आहेत पण अप्रामाणिक नाहीत. आलेले पर्यटक हे पाहुणे आहेत आणि त्यांना त्रास होता कामा नये ही भावना घोडेवाले, स्लेज ओढणारे, बर्फावरची स्कूटर चालावणारे वा टॅक्सीवाले या सर्वांच्यात दिसली. प्रत्येक गोष्टीत भाव करावाच लागतो, पण कडवटपणा येत नाही.  शेवटी बक्षिसी किंवा टिपची अपेक्षा असतेच. पण नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे जे द्याल त्यात ते ख़ुश वाटले.

काश्मीर सहल संस्मरणीय झाली असेच म्हणावे लागेल. चुकलेला वसंतोत्सव पुन्हा जाऊन बघण्याची, तेथील लोकांना भेटण्याची इच्छा मात्र जरूर आहे.

 

Monday, 20 March 2023

चिउताईचा दिवस

आज २० मार्च चिउताईचा दिवस. नव्हतं ना माहीत? कसं असणार? व्यापारी उद्दिष्टे नाहीत ना? ना कुठे जाहिरात आहे, ना कोणी कुणाला चिऊताईच्या दिवसाचा संदेश पाठवत आहे.  ना कुणाला भेट कार्ड पाठवायचे आहे, ना भेट वस्तू द्यायची आहे. ना गुलाबाची फुलं द्यायची आहेत, ना चॉकलेट. २० मार्च लक्षात नाही राहिला म्हणून चिऊताई थोडीच रुसणार आहे? हे मात्र खरं नाही. कारण चिऊताई तर कधीचीच रुसलेली आहे.  हल्ली तीच दर्शन दुर्मिळ झालं आहे. पक्षीविद्येत वा पक्षिशास्त्रात कुठल्याही पक्षाचा आकार सांगतांना चिमणीचा आकार प्रमाण वा परिमाण म्हणून वापरला जातो. उदा. मैना आकार = चिमणी(+), सूर्यपक्षी आकार = चिमणी(-).  तात्पर्य चिमणीचा आकार बहुतांश वाचकांना ज्ञात होता, चिमणी हा पक्षी सर्वज्ञात होता वा सहजी दिसत होता.

आजकालच्या मंडळींना चिमणी दिसते कशी हेही कादाचीत माहित नसेल. चिमणा आणि चिमणी दोघे खूप वेगवेगळे दिसतात. चिमण्याचे कपाळ, शेपटीच्या वरचा तसाच पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग (लाळेरे बांधल्यागत), पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी-काळ्या तुटक रेषा असतात. चिमणी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात आणि चोचीचा रंग फिकट तपकिरी असतो.

आमच्या लहानपणी काऊचिऊची गोष्ट माहीत नसलेले मुल शोधुन सापडलं नसत आणि आत्ता? आता बहुदा ती गोष्ट माहीत असलेली मुलं सापडणार नाहीत. मला आठवत, माझ्या लहानपणी माझी आई, काकू किंवा शेजारच्या वहिनी व्हरांड्यात तांदूळ निवडत असत. त्यांनी तांदुळतील निवडण, भातगोटे, नाचणीचा चुकार दाणा, गवताचं बी ताटातून खाली टाकलं रे टाकलं की टिपायला चांगल्या चार- सहा चिमण्या हजर असतं. आता व्हरांड्यात उभं राहून तांदूळ निवडणाऱ्या काकू, वाहिनीही नाहीत आणि चिमण्याही नाहीत.

माझ्या वयाच्या सगळ्यांनाच घराच्या वळचणीला, खिडकीच्या शटर मध्ये असलेलं चिमणीच घरट आठवत असेलं. घरटे बांधण्याकरिता काड्या, कापूस आणतांना चिमणा-चिमणीची चाललेली लगबग, आणि नंतर पिल्लांच्या चिवचिवाटात त्यांना भरविण्यासाठीची धडपड त्यावेळच्या घरांचा अविभाज्य भाग असल्यागत होता. अगदी दिवाळीच्या साफसफाईत देखील चिमणीच्या घरट्यात अंडी असतील तर त्याला हात लागत नसे. क्वचित कधीतरी घरात फिरणाऱ्या पंख्याला चिमणी धडके, आम्ही मुलं तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न करीत असतांनाच ती आश्चर्यकारकरित्या उडून जात असे. चिमण्या स्वाभाविक मिळणाऱ्या संरक्षणामुळे मनुष्यवस्तीच्या आसपास राहतात. आता खिडक्यादारांना जाळ्यांनी वेढलेलं आहे, खिडक्यांना शटरही नाहीत. वातानुकुलीत घरांत कुठून असणार वळचणी आणि कुठून असणार घरटी?

संध्याकाळी साधारण चार पाचच्या सुमारास चिमण्यांची धूळ-मातीची आंघोळ पाहणे हा आम्हा मुलांचा एक मोठ्ठा कार्यक्रम असायचा. सतआठ-दहा चिमण्या जमिनीवर उतरून मातीत आपल्या पंखांनी धूळ माती अंगावर उडवून स्वतः भोवती गोल गोल फिरत. त्यांना माती बहुदा गरम किंवा उबदार वाटत असावी. ह्या आंघोळी मागचा नेमका उद्देश कधी कळला नाही. पण आम्ही मूलं धावत जाऊन त्यांना उडवत असू आणि चिमण्या जिथें बसल्या होत्या तिथें मऊ मुलायम मस्तीचे खळगे झालेले दिसत असत. आणि हो चिमण्यांना पाण्याच्या आंघोळीचे ही वावडे नाही. साठलेल्या किंवा त्यांना पिण्याकरिता ठेवलेल्या पाण्यात यथेच्छ खळबळ करीत सचैल स्नान करतानाही त्या दिसत. आम्हाला सगळीच गंमत वाटे. आता घरांभोवती, इमारतींच्या आवारात पावसाळ्यात चिखल (चिखलाची गंमत पुन्हा कधी तरी) होतो म्हणून कोंक्रीटीकरण केल्यावर माती दिसणार कुठे आणि चिमण्या येतील कशाला?

चिमण्यांचा रोमान्स कधी बघितला आहेत का? मजेशीर असतो. दोन चिमणे एकाच चिमणीचे प्रियाराधन करीत असतात. मग दोघ अंग फुलवून एकमेकांना आव्हान देतात. एखाद दोन वेळा हूल दिल्यागत एकमेकांचा अंगावर जात अचानक दोघांची जुंपते आणि त्या द्वंद्वात स्थळ काळाच भान न राहता कधी जमिनीवर तर कधी फांदीवर अशी झोंबी होताहोता ती जशी चालू होते तशीच तडकाफडकी संपते. आव्हान वीर पोबारा करतो. हा सगळा प्रकार आपण त्या गावचेच नाही अशा थाटात चिमणाबाई बघत असतात. मग जिंकलेला चिमणा जरा जास्त फुलून उड्या मारीत तिच्या जवळ जातो. चिमणाबाई वेगळाच आवाज काढत त्याच्या अंगावर जाते तोही दोन उड्या बाजूला मारीत माघार घेतल्यासारखे करतो. सरते शेवटी चिमणाबाईंचा मिलानाकरिता होकार मिळतो आणि दोघं जोडीने घरट्याकरिता जागा शोधतात.

खरंच कां रुसली आहे चिऊताई? की चिमण्यांची संख्या जगात कमी झाली आहे? एका निरीक्षणानुसार भारतातील चिमण्यांची संख्या काही राज्यात २०% इतकी खाली आली आहे (Study by Indian Council for Agriculture Research) तर काही राज्यात ७०%. ह्याचे मूळ कारण त्यांच्या अधिवासाचा नाश, बेसुमार जंगल तोड. त्यातून भर म्हणजे नवीन बांधकामांमध्ये असलेली वातानुकुलीत घरे आणि बंद खिडक्या. कीटक नाशकांच्या वारेमाप वापरामुळे होणारा त्यांच्या अन्नाचा नाश. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे चिमण्यांची कमी होणारी संख्या.

चिमणी हा अन्न साखळीतील एक अविभाज्य घटक आहे. छोट्या कीटकांना भक्ष करतांना शिकारी पक्षाचं भक्ष्य ठरणारा हा पक्षी अन्न साखळीतला एक महत्वाचा दुवा ठरतो. ह्याचा जणु पुरावाच १९६० च्या दशकात, खरतर १९५८-१९६२ मध्ये चीन मध्ये मिळाला. त्यावेळच्या चीनी राज्यकर्त्यांनी चिमण्या नष्ट करण्याकरिता फतवा काढला. कां? तर चिमण्या पिकांच नुकसान करतात, आणि त्याचा परिणाम पिक उत्पनावर होतो. झालं. माणसाविरुद्धच्या लढाईत चिमणी किती टिकणार? चिमण्या विरोधी मोहीम फत्ते झाली. पण त्या वर्षी आलेलं पिकाच उत्पन्न, आधीच्या वर्षांच्या तुलनेने खूपच कमी आलं. टोळ धाडींचे प्रमाण खूप वाढले होते. चीनी राज्यकर्त्यांचे डोळे उघडले. निसर्गाचा तोल ढळवणे एक वेळ सोपे असेल पण सावरणे महा कठीण.   

नेचर फोरेवर सोसायटीचे संस्थापक व अध्यक्ष मोहंमद दिलावर यांनी हा दिवस २०१० साली  सुरु केला. सह्योग्यांबरोबर गप्पा मारता मारता ही कल्पना पुढे आली आणि सत्यात उतरली. जगभरात २० मार्च हा sparrow day म्हणून साजरा होतो. ह्या वर्षाच्या जागतिक चिऊताई दिवसाची मूळ संकल्पना “I Love Sparrow” अशी आहे. आपण हा दिवस साजरा करण्याकरिता काय करू शकतो? जागरुकता निर्माण करू शकतो, ज्यांना शक्य असेलं त्यांनी घराच्या आसपास पक्षी खाद्याचे फिडर टांगणे, पक्षांना पाणी ठेवणे. पक्षी घरे (Bird houses) लावता येतील वगैरे.

दिल्ली आणि बिहार राज्यांनी चिमणीला आपला राज्य पक्षी घोषित केले आहे. चिमणी हा इटलीचा राष्ट्रीय पक्षी आहे.

जागरूकता निर्माण करणे तर सर्व नक्कीच करू शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केला तर पुन्हा एकदा आपल्याला सकाळ-संध्याकाळ चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येईल आणि त्यांची संख्या वाढू शकेल.


Thursday, 23 February 2023

अवघा रंग एक झाला

 

अवघा रंग एक झाला... या अभंगात प्रत्येक चरणात ७ शब्द आणि असे सात चरण म्हणजे ४९ शब्द. ह्या ४९ शब्दात एक जगावेगळी अनुभूती व्यक्त करायची हे केवळ सोयाराबाईच करू जाणे, ह्या अभंगाच निरुपण म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. कोणत्याही स्वानुभवाशिवाय निरुपण म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे. पण व्यक्त होण्याकरिता त्यांची मदत घेण्यावाचून पर्याय नाही. 

अवघा रंग एक झाला

रंगी रंगला श्रीरंग

भागवत धर्म हा प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात असून त्यात विष्णु आणि विशेषतः त्याचा कृष्णावतार वासुदेव भगवान हाच उपास्य आहे आणि वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल, हे विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहे.

कृष्ण सावळा, विठू सावळा, सावळा हरी, हरी भक्तही सावळा! 

आषाढातील एकादशी. झाकोळलेले नभ आहे. सावळ्या मेघांची आभाळात दाटी आहे. सह्याद्रीचे ओले कातळ, काळे तुकतुकीत दिसत आहेत. अवघा रंग, अवघ्या विश्वाचा रंग एक झाला आहे, विठूचा झाला आहे, श्री चा झाला आहे. 

अभंगाची पाहिली ओवी बाह्य रूपाशी तादात्म्य पावण्याच वर्णन करते. बाह्य रंग एक झाला, हा बाहेरून सुरु झालेला प्रवास हळुहळु अंतरात्म्यापर्यंत कसा जातो हे बघण्यासारखे आहे.

विठूच्या दर्शनाने...

मी तूपण गेले वाया

पाहता पंढरीच्या राया

द्वैत दूर झाले. मी आणि तू ह्यातील वेगळेपण लयास गेले, असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. कवियत्री सोयराबाई आहेचोखियाची महारी (चोखियाची पत्नी) अस्पृश्य आहे आणि त्यातून स्त्री म्हणून तिच्या लिखाणास, विठू दर्शनाच्या तिच्या ओढीबद्दलसमाजाकडून तीची जी काही घोर अवहेलना झाली असेल ते लक्षात घेतले, तर मी तू पणाला, सामाजिक भेदाचा अमंगल वास येतो. हे भेदाभेद करणाऱ्यांना उद्देशून आहे असे वाटते आणि तरीदेखील सोयराबाई क्षमाशील वाटतात, सूर समजावणीचा वाटतो. त्या सगळ्यांनाच विचारत आहेत काय मिळालं हा भेदाभेद करून? हाती काहीच आल नाही. तुझा काय आणि माझा काय अहंकार सारखाच गळला. त्या पंढरीच्या रायाच्या नजरेत असा कुठलाच भेदभाव, आपपर भाव, मी श्रेष्ठ तू कनिष्ठ अशी भावना दिसली नाही. मग तू कोण असा लागून गेलास की हा भेद भाव करावास? केलास तर केलास तोही वायाच गेला ना शेवटी. 

नाही भेदाचे ते काम

पळोनी गेले क्रोध काम

ह्या दोन ओळींकरता सोयाराबाईंच्या हुषारीला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. बघा आपल्याला शाड्रिपू माहीत आहेत. ते खालील प्रमाणे-

लोभ, मोह, मद आणि मत्सर,

काम आणि क्रोध.

लिहिताना मुद्दाम चार आणि दोन असे वेगळे लिहिले आहेत. चाणाक्षांच्या लगेच लक्षात आल असेल की अस लिहिण्यामागे काय उद्देश असावा. पहिल्या चार शत्रूंच्या अस्तित्वाला, भेद, दुजा भाव असणे गरजेचं आहे. लोभ (हाव) माझ्याकडे आहे पण अजून हवं आहे इतरांकडून ओरबाडयाचे आहे आणि मोहा करिता दुसऱ्याकडे जे आहे ते माझ्याकडे हवं ही लालसा. मद, गर्व ह्या करिताही तुलना गरजेची आणि मत्सर ज्याचा करायचा, तो हवाच की. पंढरीच्या रायाच्या दर्शनाने घडलं काय? लोभ, मद, मोह, मत्सर नष्ट झाले मग भेदाचे कामचं उरले नाही. सोयराबाई ह्या चारही शत्रूंच्या असण्याला भेदभावाला जबाबदार धरतात. आता उरलेले दोन रिपू, क्रोध आणि काम, ज्यांच्या असण्याला आपण स्वतःच जबाबदार असतो तेव्हा ते देखील विठूच्या दर्शनाने पळोनी गेले. ‘काम’ शब्दावराचा श्लेष चरणाच्या सौंदर्यात अधिक भर घालतो.

पुढच्या दोन ओळी विठूचे प्रत्यक्ष वर्णन वाटते. 

देही असोनी विदेही

सदा समाधिस्त पाही

विठ्ठलाला मानवी देह रूप आहे आणि त्याची असंख्य वर्णने आहेत. पण तसे असूनही त्याच्या देहातीत रूपाच्या अस्तित्वाची जाणीव झाल्या शिवाय रहात नाही. 

ही द्विधावस्था ज्ञानेश्वरानी केलेल्या विठ्ठलाच्या वर्णनात फार सुरेख प्रकट होते. तुज सगुण म्हणो की निर्गुण रे.... ह्या वर्णनात येणाऱ्या परस्पर विरोधी जोड्या बघण्यासारख्या आहेत. 

सगुण - निर्गुण, अनुमाने - ना अनुमाने( नेति - नेति)स्थूल - सूक्ष्म, आकारू - निराकारू, दृश्य - अदृश्य, व्यक्त - अव्यक्त

ह्याच उत्तर म्हणून ज्ञानदेव पुढे म्हणतात, दोहोच एकत्र रूप म्हणजेच तो गोविंद.

ह्या पलीकडे विदेही म्हणजे नेमके काय? ज्याच्या भौतिक देहाच्या कर्म - अकर्मा मुळे त्याचा सूक्ष्म देह (आत्मा) लिप्त होत नाही. त्या कर्म - अकर्माच्या फळाचा परिणाम ज्याच्यावर होत नाही तो विदेही.  

मिथिलेचा राजा जनक विदेही होता असे मानतात. त्याने देवांच्या बाजूने दानवांविरुद्ध अनेक युद्धे केली. मिथिलेचा राजा म्हणून राज्य केले. सीतेचे कन्यादान ही एक पिता म्हणून केले. पण ह्यातील कोणत्याही कर्माचा त्याच्या आत्म्यावर परिणाम झाला नाही आणि तो जन्म - मृत्यूच्या चक्रातून कायम मुक्त राहिला.

विठ्ठलाला जर ह्या विश्र्वात घडणाऱ्या सगळ्याच चांगल्या वाईटाचा कर्ता करविता मानले तर ह्या सकारात्मक, नकारात्मक कर्मांचा, त्यांच्या फळांचा साधक बाधक परिणाम विठ्ठलावर होताना दिसायला हवा, पण तसे दिसत नाही. म्हणजेच एकाच वेळेला कर्म करण्याकरिता तुम्ही सगुण (देही) असायला हवं आणि त्या कर्माने अस्पर्श राहण्याकरिता विदेही. ते रूप पाहणाऱ्याने, द्रष्ट्याने कसे पाहावे? ह्या करिता पुढची ओळ विचाराला चालना देणारी आहे. हे जे विदेही रूप आहे ते द्रष्ट्याला तो स्वतः समाधीत असताना दिसते. सदा समाधिस्त पाही!

नाकी विठ्ठल सदा समाधिस्त असतो, आणि विठ्ठ्लाचे रूप विदेही असते. 

थोडक्यात विठ्ठलाचे विदेही रूप पाहण्याकरिता द्रष्ट्याला समाधिस्त व्हावं लागेल. हे विदेही रूप पाहण्याकरिता भक्ताला सुद्धा एक उंची गाठावी लागेल. आम भक्तांना, सर्वसामान्यांना ते रूप दिसणार नाही.

पाहते पाहणे देले दूरी

म्हणे चोखियाची महारी 

अवघा रंग एक होणे ही जर पहिली पायरी मानली तर वरील चरण कळस म्हणता येईल. समाधिस्त होऊन विठ्ठलाचे विदेही रूप दिसेपर्यंत पाहण्याची क्रिया होते आणि दृश्याचे वर्णन, त्याचे परिणाम येतात. जे बघायचे ते आणि बघणारा, हे वेगवेगळे आहेत. ज्ञेय आणि ज्ञाता वेगवेगळे आहेत. ह्या नंतरची स्थिती ही खरंतर व्यक्तिगत अनुभूती आहे, कवियत्रीचा स्वतःचा अनुभव आहे, सोयराबाईंचे विठ्ठल रुपाशी, विठ्ठलाशी तादात्म्य पावणे आहे, तल्लीन होणे आहे. विठ्ठलाला बघता बघता बघणारी सोयराबाई विठ्ठलमय झाली. जे बघायचे ते आणि बघणारी एकरूप झाले. पहाणारीच जर उरली नाही, तर पाहणे कसे बरे शिल्लक राहील? पाहता, पाहता पाहणेच दूर गेले, ती क्रिया निघून गेली, संपून गेली त्याची गरजच संपली. अस्तित्व, असण्याचा धर्म, भाव हाच जर विठ्ठल रुपात विलीन झाला, माझे आणि विठ्ठलाचे असणेच जर एक झाले, तर बघायला काय उरेल?

एव्हढी गहन अनुभूती अशा सोप्या शब्दात अभंग रुपात सांगणे ही सोयराबाईंच्या मुखातून आलेली देववाणीच म्हणावी लागेल.

Wednesday, 4 May 2022

वसंतोत्सव

चेरी ब्लॉसम उत्सव-जपान, कार्निवल मेक्सिको, या देशांबरोबरच चीन, स्पेन, हॉलंड, थायलंड इत्यादींमधील वसंतोत्सव हे जगप्रसिद्ध आहेत. भारत देखील त्यात मागे नाही. भारताच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या नावाने वसंतोत्सव साजरा होतो. वसंतागमनाची वर्दी देणारे होलीकोत्सव, गोव्याचा शिग्मो, बैशाखी, खुद्द वसंतात वसंत पंचमी, चैत्र पाडवा, गोवा कार्निवल, उगाडी, बोहाग बिहू किती तरी नाव सांगता येतील. ह्या सगळ्या उत्सवांच मूळ, वसंतात निसर्ग जो आनंद, उल्हास, चैतन्य आणि नाना रंगांची उधळण करीत असतो, निसंश:य त्यातच असलं पाहिजे.

चैत्र सुरु होतो न होतो तोच सगळी झाडं जणु कात टाकावी तशी जुनी पान गाळून, मोहक हिरव्या, गुलाबी, लाल रंगात रंगून जातात. लुसलुशीत पालवीने डवरलेली झाडं, उन्हात इतकी सुंदर दिसतात की नजर हलतच नाही. त्यात पिंपळाचा थाट काही वेगळाच. पानांच्या एकजुटीचा विजय असो! असे म्हणत गळतातही एकत्र आणि नित्य नवा साज लेऊन येतातही एकत्र. सृष्टी जणु नवीन वस्त्रे परिधान करून पुढे येणाऱ्या पुष्पोत्सवाला हजेरी लावण्याची तयारी करीत असते.

उन्हाचा चटका जाणवायला नुकतीच सुरुवात होते. पारा हळुहळु चढत असतो, जणु ‘दाहक परी संजीवक’ ह्याचा दाखला देत प्रथम फुलतात ती Tabebuia Rosea Pink Trumpet झाडे, (मराठी नाव??) गुलाबी कागदी फुलांचा डोलारा सांभाळत इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ठाण्याकडे जातांना उजव्या बाजूला ओळीत दिसतात. गुलाबी रंगाच्या इतक्या वेगवेगळ्या छटा पहायला मिळतात की जणु काही प्रत्येक झाड सांगत असते माझा रंग पण गुलाबी आहे पण मी शेजाऱ्यासारखा नाही. ह्या फुलांच्या पाकळ्यांचा स्पर्श एखाद्या पातळ कागदासारखा भासतो. बहर चांगला १५-२० दिवस टिकतो. ह्या झाडाचे मूळ स्थान अमेरिका खंड, पण इथल्या उष्णकटिबंधीय वातावरणात इतका छान रमलाय की आता तो उपरा वाटतच नाही. नाहीतरी परकीयांनी आपल्या मातीत रुजणे हे आपल्या परंपरेला धरूनच आहे.

त्याच सुमारास त्याच रस्त्यावर डाव्या बाजूला दिसतात शाल्मलीची (काटे सावर) लालचुटूक फुले. चाफ्यासारखा हाही पर्णरहित आणि फुलांनी डवरलेला दिसतो. त्या फुलांवर वेगवेळ्या प्रकारचे फुल टोचे (Flower Peckers) फुलातील मधाचा चोच भरून आस्वाद घेतांना दिसतात. हा बहर ओसरल्यावर त्य फुलांची जागा हिरव्यागार बोन्डांनी घेतलेली दिसते. यथावकाश उन्हाने वाळून बोंडे तडकून त्यातील कापूस, म्हाताऱ्या होऊन वाऱ्यावर अल्लद तरंगत जातांना दिसतो.

ह्या सगळ्यांमधे हिरीरीने आपल्या  पिवळ्या धम्मक फुलांचे झेंडे घेऊन पिवळा गुलमोहोर, ताम्रशेंगी (Peltrophorum Ptercarpum, Copperpod, Yellow Flame) आपल्या फुलांच्या पसाऱ्याने आणि मंद, थोडासा उग्र पण सुदूर पसरणाऱ्या सुगंधाने लक्ष वेधून घेतों. प्रथम लक्ष जाते ते गळलेल्या फुलांच्या पखरणीकडे. बघण्यासारखी असते. ह्याच्या कळ्यांचा रंग आणि नंतर येणाऱ्या शेंगांचा रंग लालसर तपकिरी, ताम्रवर्णी असतो. प्रथम फुलांचा डोलारा घेऊन आणि नंतर शेंगाचा भार डोक्यावर वहात हा पाहाणाऱ्यांना दृष्टी-गंधाचे सुख एकाचवेळी देतो. दक्षिण आशियात प्रामुख्याने आढळणारा हा वृक्ष आता जगभर पसरला आहे.

मुंबई पुणे जलद महामार्गावर आणि पुण्यात देखील विपुल प्रमाणात दिसणारा निळ्या सुवासिक फुलांनी बहरलेला Jacaranda (निळा मोहोर) वृक्ष. ही झाडं देखील जमिनीवर पडलेल्या फुलांचा सडा पाहून प्रथम लक्ष वेधून घेतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून हा वृक्ष फुलायला सुरवात होते. याच जलद महामार्गावर दरीच्या उतारावर पांगाऱ्याची लाल भडक नजरेलाही जाड जाणवणाऱ्या पाकळ्यांची आकाशाकडे उमलणारी फुले दिसतात. जंगल फ्लेम (Jungle Flame – अग्निशिखा) या नावाने ओळखले जाण्याचे स्वाभाविक कारण. याही झाडावर फुलातील मधाकरिता फुल टोचे आणि मैनांची गर्दी दिसते. 

ह्या सर्व झाडांमध्ये आपल्या विशिष्ठ लाल रंगाने उठून दिसतो तो गुलमोहोर. त्याची मधली पाकळी पिवळ्या-लाल रंगाची (हळद-कुंकू) खूपच खुलुन दिसते. त्याच्या कळ्या घेऊन आम्ही लहानपणी त्या एकमेकांवर मारून तोडण्याचा खेळ करत असू. ज्याची काळी टिकेल तो जिंकला. ह्या फुलातील मधली पाकळी काढून खाल्याचे देखील आठवते आहे. नेमकी चव सांगता येणार नाही पण तुरट-गोड अशी काहीशी असावी. जागोजागी अगदी लहान झाडाला देखील एक दोन फांद्या फुलांच्या वजनाने नतमस्तक होऊन आपल्याकडे लक्ष वेधून घेतांना दिसतात. फुले गळत असतानाच चपट्या गडद हिरव्या रंगाच्या शेंगानी झाड भरून जाते. हा हा म्हणता या शेंगा वाळून तपकिरी झाल्यावर आतील बियांच्या आवाजाने खुळखुळायला लागतात. लहानपणी ह्या लहानश्या तलवारी सारख्या दिसणाऱ्या शेंगांनी लुटुपुटुच्या लढाया केलेल्या बहुतेक मुलांना आठवतील.

बहावा किंवा बाहवा, इंडिअन लॅबर्नम (Cassia Fistula, Golden Shower) इतके समर्पक नाव असेलेला बहुदा एकमेव वृक्ष असावा. सगळी नाव ही त्याच्या फुलांवरून, शेंगांवरून पडली आहेत. ह्या सोनसळी फुलांची कांचन झुंबरे झाडावर झुलताना तुमच्या नजरेतून सुटूच शकत नाहीत. ह्या झाडाची हलकी हिरवी पोपटी पालवी, पिवळ्या धम्मक फुलांचे घोस, त्यावर रुंजी घालणारी फुलपाखरे आणि छोटे भिरभिरणारे मधु भक्षी, मधेच लोंबणाऱ्या हिरव्या नळी सारख्या असलेल्या शेंगा. बहर सरेपर्यंत त्या वाळून तपकिरी रंगाच्या होतात आणि त्या हिरव्या, पिवळ्या रंगसंगतीत आपल्या रंगाची मोहक भर घालतात. हे दृश्य डोळ्यात साठवावे तेव्हढे थोडेच आहे. बाह्वाच्या शेंगांवरून आठवले, विषयांतराचा दोष पत्करून सांगतो. बाह्वाची ओळख मला व्यंकटेश माडगुळकरांच्या एका लेखावरून झाली. लेखाचे शीर्षक आत्ता आठवत नाही.  ह्या शेंगा अस्वलाला खूप आवडतात. बाहावाच्या झाडाखालून जातांना स्वारीला मोह आवरत नाही मग एकामागून एका शेंगेवर पोटभरेस्तो ताव मारून अस्वल पुढे जाऊन सावलीला अंमळ लवंडते. ह्या शेंगाचा गर सारक असतो. अतिसेवनामुळे व्हायचे तेच होते अस्वल अतिसाराची शिकार होऊन दोन दिवस जवळपासच निपचित पडून राहते. तरतरी आल्यावर भुकेची जाणीव होते आणि बाह्वाच्या शेंगा पुन्हा खुणावतात मग काय पहिले पाढे पंचावन्न. पुन्हा तीच अवस्था हा सगळा प्रकार त्या झाडाच्या सगळया शेंगा संपेपर्यंत चालतो. परिणामतः बाह्वाच्या बिया मात्र पसरतात आणि रुजतात देखील. 

कल्पना करा, बहरलेला बाहवा, त्यावर झुकलेल्या, लाल चुटूक फुलांनी लगडलेल्या गुलमोहोराच्या फांद्या आणि त्याला निळ्या मोहोराची पार्श्वभूमी!! अहाहा असा रंगांचा खेळ फक्त निसर्गच करू जाणे. हाही वसंत त्याला अपवाद नाही. दोन्ही हातानी भरभरू उधळतोय निसर्ग! हा रंग सोहळा पाहिला नसलात तर एकदा मान वर करून नक्की पहा !