Saturday, 27 April 2024

औदुंबर


आज खरंतर औदुंबर कविता आठवण्याचं तसं काहीही कारण नाही. त्र्यंबक बापुजी ठोंबरे उर्फ बालकवी यांची ना आज जयंती आहे ना पुण्यतिथी. पण काही गोष्टी चिरकाल स्मरणात रहातात त्यापैकी एक, ही कविता आहे. माझ्या समवयस्कांना बहुदा औदुंबर म्हटल्यावर, ते एका वृक्षाचे नाव आहे हे आठवण्यापुर्वी बालकवींची कविता आठवेल.

शाळेत असतांना इयत्ता १० वीच्या अभ्यासक्रमात ही कविता होती. आज ही कविता अभ्यासक्रमात आहे का ह्याची मला कल्पना नाही. माझ्या सहाध्यायींना नक्की आठवेल की शाळेत ही कविता दोन प्रकारे शिकविली होती. एक शब्दार्थासहित अर्थ, कवितेतील सौंदर्य स्थळे, व्याकरण इत्यादी आणि दुसरा प्रकार म्हणजे त्या कवितेचा अन्वयार्थ, कवितेचे रसग्रहण, गर्भितार्थ, कवीला कवितेतून काय सांगायचे आहे आणि त्याने ते कसे सांगितले आहे याचे वाचकांनी स्वतःच्या संवेदनशील मनाने विचारपूर्वक केलेले विवेचन, विश्लेषण वगैरे.

ही कविता आठविण्याचे आणि त्यावर काही लिहावेसे वाटण्याचे तात्कालीक निमित्त म्हणजे व्हॉट्सअॅपवर आलेली एक चित्र फीत. ज्या मध्ये कवी वैभव जोशी यांनी स्पृहा जोशीं बरोबरच्या मुलाखतीत केलेले ह्या कवितेचे विश्लेषण.  त्याचबरोबर ह्याच मुलाखतीत कवी वैभव जोशी यांनी केलेल्या औदुंबर कवितेच्या विश्लेषणाने सुरवात करून, प्रसाद आठल्ये यांनी, आम्ही पार्लेकर-एप्रिल २०२३ च्या अंकातील त्यांच्या औदुंबर ह्या लेखात दिलेला, कै. नी. र. सहस्त्रबुद्धे सरांनी दहावीच्या वर्गात सांगितलेला अन्वयार्थ वाचनात आला आणि आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. आजही जवळजवळ ४८ वर्षांनी कै. नी. र. सहस्त्रबुद्धे सरांचा मंत्रमुग्ध करणारा तो रसग्रहणाचा तास डोळ्यासमोर उभा राहिला.

मला लिहिण्यास उद्युक्त करण्यासाठी ह्या दोन गोष्टी पुरेश्या होत्या.

माझ्यापुरते बोलायचे झाले तर त्या वयात, मी मंत्रमुग्ध होण्यात, कवितेच्या रसग्रहणाहून सरांचे वक्तृत्व, शिकविण्याची हातोटी आणि सादरीकरण जास्त कारणीभूत होते, असे आज वाटते. औदुंबराच्या त्या प्रथम दर्शनानंतर चार दशकाहून अधिक काळ आयुष्यातील चढ उतार पाहिले, वेगवेगळ्या भावभावनांचा, आशा निराशेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि आज ह्या कवितेबद्दल किंबहुना तिच्या रसग्रहणाबद्दल स्वतःचा एक दृष्टीकोन तयार झाला. ह्या दृष्टीकोनाच्या भिंगातून पाहिल्यावर आणि त्याच बरोबरीने केलेल्या थोड्याफार वाचनाने ही कविता खूप वेगळी दिसायला लागली आणि वरील उल्लेखिलेली दोन्ही रसग्रहणे ही संवेदनशील मनाने केलेल्या विश्लेषणाच्या जोडीने सर्जनशील मनाची स्वतंत्र निर्मिती आहे असे वाटू लागले.

बालकवींची जनमानसात प्रचलित असलेली काहीशी उदास, निराश अशी प्रतिमा,  आणि त्यांच्या मृत्युभोवती असलेले गूढतेचे सावट (अपघात की आत्महत्या?) ह्या पार्श्वभूमीवर वाचकांनी केलेला त्यांच्या कवितांचा उहापोह मनाला पटत नाही. निराशा, औदासिन्य आयुष्यात कोणाला चुकलेले आहे? पण त्याच अनुषंगाने झालेले त्यांच्या कवितेचे विश्लेषण हे काहीसे अन्यायकारक आहे असे वाटते.  रसग्रहण करतांना जर वर केलेली सीमित व्याख्या ग्राह्य धरली तर ज्या कवितेचे रसग्रहण करावयाचे आहे त्या कवितेचा कवी, एक व्यक्ती म्हणून कसा आहे, तो कसा विचार करतो हे समजून घ्यावे लागेल आणि औदुंबर कवितेवर लिहिण्यापूर्वी तसा प्रयत्न मी करणार आहे.

बालकवींनी त्यांच्या उण्यापुऱ्या २८ वर्षांच्या आयुष्यात, १६३ कविता लिहिल्या (त्यातील कित्येक कविता अपूर्ण1 आहेत). प्रामुख्याने निसर्गकवी हीच ओळख त्यांच्या कवितांमधून दिसून येते. बालकवींचे माझ्या पाहण्यात आलेले उपलब्ध चरित्र2 जर वाचले तर मित्रपरिवारात आनंदी असणारा, प्रांजळ, प्रामाणिक, लहान मुलांत रमणारा, सांपत्तिक स्थैर्य नसलेला, परिस्थितीशी संघर्ष करणारा, संवेदनशील, आणि अनाकलनीय सर्जनशीलता असलेला कवी नजरेसमोर समोर उभा राहतो.

कवींचे अंतरंग किती गूढ असते, त्यांच्या कवितांवरून वाचकांना जे उमजते त्याने कवींच्या अंतरंगाचा ठाव घेणे कसे अशक्य आहे, याचे वर्णन स्वतः बालकवींनी आपल्या कवींचे अंतरंग ह्या कवितेत केले आहे.-


सख्या वाचका, गीत कवींचे ऐकुनिया कानी

न वदे, कळले महाकवींचे अंतःकरण निदानी

.....

जा, जाउनिया अब्धि किनारीं एक शुक्तिका घेई

रंग मनोहर दीप्तिहि अनुपम याविण अन्य न कांहीं

अगाधगहने सागरलहरी झांकुनी ठेविती कांहीं

गूढतळींची त्या विषयीं ती शब्दही बोलत नाहीं

 असे असूनही, कवीच्या अनुपस्थितीत, त्याची अभिव्यक्ती हीच त्याची ओळख आहे, असे मानून त्याच्या इतर कवितांचा, साहित्याचा केलेला अभ्यास हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा निदान कवडसा ठरेल असे वाटते आणि कवीला नेमके काय सांगायचे आहे वा त्याने कोणत्या मनःस्थितीत ही रचना केली आहे त्याच्या थोडेतरी जवळ जाता येईल.

मी बालकवींना प्रांजळ, प्रामाणिक अशा करता म्हटले आहे की त्यांच्या मानसिकतेचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमधून सहज आणि सातत्याने प्रतित होते. प्रसंगानुरूप आलेली खिन्नता, विषण्णता असो अथवा निसर्ग सानिध्यात झालेला विमुक्त आनंद असो वा निसर्ग दर्शनाने प्रभावित होऊन भारावून जाऊन निसर्गाचे वर्णन करतांना सुचलेल्या कल्पना, उपमा, उत्प्रेक्षा असोत त्या त्यांच्या स्फटीकासारख्या कवितेतून स्पष्ट उमटतात. वानगीदाखल खालील कवितातील ओळी पहा-


निराशेचे गीत

काळाच्या भेसूर दाढा

करुं टपल्या हाय! चुराडा !!

काढा ! हो !! यांतुनि काढा !!!

द्या दीनाच्या उत्तर द्या हांकेला; उठवाहो ! मेलेल्याला !!

 

काय असे संसारांत?

 

स्वार्थ सुखाची झाली होळी

परमार्थाची राख रांगुळी

दुर्दैवाची पिकली पोळी

काय राहिले जगतांत

वडिलांच्या मृत्यूनंतर लिहिलेली यमाचें दूत ह्या कवितेत त्यांच्या उदासीनतेचे तात्कालिन एक कारण मिळाल्यासारखे वाटते-

परिस्थितीचीं कठोर भूतें

क्षणांत करिती शून्य मनातें

पुर्वस्मृती मग ताजी होते

जळतें त्यांत I हृद्याचे होऊनि भूत

खिन्नता का येते हे जणु न कळल्यामुळे बालकवी त्यांच्या निराशा ह्या कवितेत लिहितात-

रात्र संपली दिवसही गेले I अंधपणा ये फिरुनि धरेला I

खिन्न निराशा परि हृदयाला – या सोडित नाहीं.

नित्यापरि रविकिरणे देतीं। रंग मनोहर सांध्यमुखी तीं

खळखळ ओढा गुंगत गीती-राईंतुनि वाहे.

सुंदर सगळें, मोहक सगळें। खिन्नपणा परि मनिंचा न गळे

हाच कवी ज्यावेळी निसर्ग कविता करतो तेव्हा त्याच्या प्रतिभेचा फुलोरा अलौकिकच असतो असे म्हणावे लागेल. कवीच्या उत्कट भावना तितक्याच पारदर्शकतेने कवितेते उमटतात.

अरुण, निर्झरास, श्रावणमास अशा बऱ्याच कवितांमध्ये कुशल चित्रकार कुन्चल्याच्या साह्याने काय रंग भरेल, इतके सुंदर शब्दचित्र ह्या शारदेच्या रंगकर्मीने काढलेले आहे. फुलराणीचा उल्लेख केल्याशिवाय कवीच्या प्रतिभेच्या भरारीची चुणूक दिसणार नाही. अरुण सारख्या  कवितात अचेतानावर सचेतनत्वाचा आरोप करून (चेतनगुणोक्ती) अचेतानाचे सौंदर्य अधिक खुलवण्याची त्यांची हातोटी खरोखरच वाखाणण्यासारखी आहे.


पूर्व दिशा मधु मृदुल हांसते गालींच्या गाली

हर्षनिर्भरा दिशा डोलती या मंगल काली

किंवा

त्यांत लागला कृष्णाचा3 कर पूर्वेच्या गाला

विनयवती ती पूर्वदिशा मग अधोवदन झाली

निर्झरास या कवितेत एखाद्या अवखळ खेळकर बालकाप्रमाणे खेळत, वाहणाऱ्या निर्झराचे चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभे रहाते-

कड्यावरूनि घेऊन उड्या, खेळ लतावलयीं फुगड्या

घे लोळण खडकावरती, फिर गरगर अंगाभोवती

जा हळुहळु वळसे घेत लपत छपत हिरवाळीत

श्रावणमास ही तर अजरामर कविता आहे. ह्या कवितेतील श्रावणाचे वर्णन वाचून सृष्टीदेवतेला अक्षरशः स्वतःला आरशात पाहिल्यासारखे वाटत असेल.

 

उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा!

सर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचे रूप महा!

बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते,

उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि किं एकमतें!

 

फुलराणी कवितेत हिरव्या हिरव्या गवतात वाऱ्यासोबत डोलताना दिसलेल्या कलीकेला बघून कविमनाने किती सुंदर मोहक कथा निर्माण केली आहे. अल्लड कलिका मुग्ध तरुणी बनली आणि रविकराच्या प्रेमात पडली, आणि त्यासोबत तिचा झालेले विवाह. निव्वळ शब्दांनी उभे केलेलं चित्र वाचक अक्षरशः जगतो.


गाउं लागले मंगलपाठ,  सृष्टीचे गाणारे भाट,

वाजवि सनई मारुतराणा कोकीळ घे तानांवर ताना!

नाचू लागले भारद्वाज, वाजविती निर्झर पखवाज,

नवरदेव सोनेरी रविकर नवरी ही फुलराणी सुंदर!

लग्न लागले! सावध सारे! सावध पक्षी! सावध वारे!

दंवमय हा अंतःपट फिटला भेटे रविकर फुलराणीला!

 

असो, औदुंबर हा विषय असतांना बाकीच्या कवितांचा उल्लेख इतक्या खोलात जाऊन करण्याचं कारणच काय? असा स्वाभाविक प्रश्न वाचकांना पडला असेल. तर त्याच साध सोप्प उत्तर आहे की हा बालकवींतील सरळ स्वभावाच्या कवीवर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न आहे. त्यांच्या कविता, शब्दातून जे सांगतात तेच त्यांना वाचकांपर्यंत पोहोचवायचे असते. त्यात गुढार्थ, गर्भितार्थ असतो आणि तो शोधताना कवितेचा आनंद घालवावा असे मला वाटत नाही आणि खऱ्या अर्थाने जर बालकवींच्या कवितांचा आनंद लुटायचा असेल तर जे शब्दचित्र ते वाचकांच्या डोळ्यासमोर उभे करतात त्या चित्राचा आनंद घ्या. ते रेखाचित्र आहे, की oil on canvas आहे, की water colour आहे ह्याचा विचार करू नका.

बालकवींच्या मोजक्याच बाकीच्या कविता अशा आहेत की ज्या कवितांवर चर्चा किंवा वाद झाले पण तेही बहुतेक कवितेच्या शब्दशः अर्थाशी निगडीत होते (उदा. धर्मवीर ज्यात जुन्या धार्मिक कल्पनांवर बालकवींनी चौफेर हल्ला चढवला आहे, अरुण – ह्य कवितेतील अरुणोदय कोणत्या ऋतूतला अथवा स्थळाचा आहे ह्याचा उल्लेख येत नाही हा आक्षेप होता). मग औदुंबर ह्या कवितेच्या बाबतीत अर्थावरून (खरंतर गर्भितार्थावरून) इतके लिखाण का झाले असावे? औदुंबर ह्या कवितेवर मी काही लिहिण्याचे धाडस करण्यापूर्वी कविता उधृत करणे संयुक्तिक ठरेल.

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन

 

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे

 

पायवाट पांढरी तयांतुनी अडवीतिडवी पडे

हिरव्या कुरणांमधुनी चालली काळ्या डोहाकडे

 

झाकळूनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर

पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर

 

ही कविता एका निसर्गप्रेमी कवीने निसर्ग दृश्य बघून केली आहे असे गृहीत धरून ह्या कवितेकडे बघितले तर एकच गोष्ट खटकते. बाकी सर्व रंगसंगती (तटावर हिरवाळी, निळासावळा झरा, शेतमळ्यांची हिरवी गरदी) नैसर्गिक दिसत असतांना अचानक येणाऱ्या पांढऱ्या पायवाटेवर वाचक अडखळतो. पांढऱ्या रंगाची माती ही अगदीच अनैसर्गिक नाही (मातीतील कॅल्शीयम कार्बोनेट, चुनखडी चे प्रमाण तसा रंग देईल) पण पायवाट ह्या रुपात कोणत्याही कवीच्या कवितेत आलेली आढळत नाही. गमतीचा भाग म्हणजे पायवाट किंवा पायावटेचे वर्णन बालकवींच्या दुसऱ्या कोणत्याही कवितेत आढळत नाही. ही पायवाट बा. भ. बोरकरांच्या मुशाफिरा मधील पायावाटेसारखीच (स्तब्ध मार्ग तांबडा वळत जाय बंदरा) स्तब्ध आहे, अडवीतिडवी पडली आहे पण तिचा रंग मात्र पांढरा आहे आणि ती काळ्या डोहाकडे जात आहे. माझ्या दृष्टीने इथे वाचकांची विचार करण्याची वाट, मार्ग (track) बदलला आणि मग मागील ओळींचा देखील पुनर्विचार झाला आहे असे वाटते. जणुकाही पांढऱ्या पायवाटेच्या स्पष्टीकरणार्थ बाकी संदर्भ बदलणे रसग्रहण करतांना वाचकांना भाग पडले आहे.  

 

वाहत्या झऱ्याच्या काठावर (तटावर) असलेली हिरवाळी आणि काठावरल्या हिरव्या झाडाझुडपांच्या सावल्या पडून सावळा भासणारा निळा झरा, पावसाळा सोडून इतर ऋतूत त्याच्या वाटेवरल्या उंच भूभागांना वळसा (असेच वर्णन निर्झरास ह्या कवितेत वर दिल्याप्रमाणे आले आहे) घालून जात असेल आणि ते भाग बेटांप्रमाणे जलवेष्टीत असतील. ह्यात नैसर्गिक वाहाणाऱ्या झऱ्याच्या आणि त्याच्या काठांच्या तंतोतंत वर्णनाव्यातिरिक्त काही शोधणे चुकीचे वाटते.

 

‘चार घरांचे गाव चिमुकले’ ह्या ओळीतील चार हा आकडा घरांची निश्चित संख्या दर्शवत नसून गावाच्या आकारमानाचे द्योतक आहे. गाव लहानसे आहे, छोटे आहे थोडक्या वस्तीचे आहे असे सूचित करतो आहे. ह्या पलीकडे ‘चार ला नेण्याचे काहीच कारण उरत नाही.

पांढरी पायवाट हिरव्या कुरणांमधुनी काळ्या डोहाकडे चालली आहे. येथे ‘काळा’ हे डोहाचें नैसर्गिक वर्णन आहे (डोह काळाच असतो). डोहाच्या काळ्या रंगाचा गडदपणा बहुतांशी त्याच्या खोलीवर अवलंबून असतो. निसर्गाशी प्रामाणिक असलेला कवी डोहाला काळ्या व्यतिरिक्त कुठल्याही रंगात रंगविण्याचा प्रयत्न करणार नाही. पण, ह्या कवितेत असलेल्या डोहाच्या काळ्या रंगाची प्रत वेगळी करण्याचा कवीचा निश्चित प्रयत्न दिसतो. ह्या डोहाचा काळा रंग केवळ त्याच्या खोलीमुळे आलेला नसून, डोहाच्या पाण्यावर पसरलेल्या सावल्यांचा गोड काळिमा त्यात मिसळला आहे आणि त्या सावल्या काठावरच्या औदुंबर वृक्षाने पसरल्या आहेत. जेंव्हा बालकवींना काळ्या रंगाचा, डोहाच्या कल्पनेचा नकारात्मक वापर करायचा असतो तेव्हा त्यांनी केलेली शब्दयोजना खेड्यातील रात्र या कवितेत पहा-

ओसाड देवळा पुढती

वडाचा पार – अंधार दाटला तेथ भरे भरपूर      

........

डोहात सावल्या पडती

काळया शार - त्या गर्द जाळिमधिं रात देत हुंकार

येथे झाडही बदलले आणि काळ्या रंगाचे विशेषणं देखील.

ही अडथळ्यांची शर्यत पार केल्यावर आता आपण कवितेच्या रसास्वादाकडे वळुया. कवीच्या डोळ्यापुढे जे दृश्य आहे त्याची एकेका शब्दागणीक वाढत जाणारी व्याप्त्ती कवितेत अत्यंत स्पष्टपणे दृग्गोचर होते. बेटाबेटातून वहात जाणाऱ्या निळ्यासावळ्या झऱ्याने पूर्ण दृश्यच प्रवाही बनवले आहे. वाहणाऱ्या झऱ्याबरोबर पुढे गेलेली दृष्टी पार पलीकडच्या टेकडीकडे जाते आणि एक छोटेखानी टुमदार गाव दृष्टीला पडते. तसेच पुढे जातांना दाट हिरव्यागर्द शेतमळ्यांची दाटी दिसून येते. त्यापुढे कुरणे पसरली आहेत आणि त्यात अडवीतिडवी, नागमोडी पायवाट पडली आहे. ही कोठून येत आहे हे जरी कळत नसले तरी ती काळ्या डोहाकडे चालली आहे आणि त्या पायवाटेवरून कवी पोचतो तो जळात पाय टाकून बसलेल्या (असला) औदुंबरापाशी. ‘असला ह्या एका शब्दाने औदुंबराला सचेतन केले आहे त्याला व्यक्तिमत्व (स्थितप्रज्ञ) प्राप्त झाले आहे. शब्दांची निवड खरोखर बघण्यासारखी आहे. पाय टाकून ऐवजी पाय सोडून म्हटले असते तर काय बिघडले असते? कवितेच्या व्याकरणाला कदाचित मारक ठरले असते पण त्याहूनही पाय सोडून बसायला कोठूनतरी यावे लागते पण औदुंबर इथलाच आहे ह्या डोहाकाठचाच आहे. इथेच रुजला आहे. मोठा होऊन वृक्ष झाला आहे. या एका शब्दाच्या निवडीमुळे डोहाच्या खोली इतकीच गेलेल्या काळाची, डोहाच्या वयाची कल्पना येते. 

डोह म्हटल्यावर त्याच्या बरोबर येणारी गूढता येथे अस्पष्टपणे येते, कारण तो उद्देश नाही. औदुंबरच कां? वड, पिंपळ का नाहीत? एकतर औदुंबराचे अस्तित्व पाण्याचा आढळ दाखवतो, त्यामुळे त्याचे पाण्याजवळ असणे हे संयुक्तिक आहे आणि दुसरं म्हणजे वड, पिंपळ ह्या वृक्षांसोबत नकारात्मक संदर्भ देखील जोडलेले आहेत तसे ते औदुंबराशी नसावेत. पुराणकाळापासून औदुंबर हे दत्तात्रयांच, त्रीमुर्तींच स्थान मानलेलं आहे. त्याने पसरलेल्या गोड काळीम्यात मांगल्याची भावना अभिप्रेत आहे. त्याची सावली अशुभ कशी असेल? मृत्यूची कशी असेल? मायेची सावली देखील काळी आणि भर उन्हात पांथस्थाला सुखावणारी वृक्षाची सावली देखील काळीच असते ना.

कवितेत शेवटी डोहच कां? दोन कारणे. एक तर कवीने पाहिलेल्या दृश्यात खरोखरीच डोह असेल तर मग अन्वयार्थाची गरजच संपते, कविता निखळ निसर्ग कविता म्हणून अनुभवता येईल पण तसे नसेल तर कवीला काय सुचवायचे असेल हा प्रश्न उरतो.

डोह हा शेवटाचं, परिणतीचे प्रतिक आहे. डोहातून पुढे काही जात नाही, प्रवाही, वाहत्या निळासावळ्या झऱ्याचेच डोहात रुपांतर झाले असेल अथवा तो ज्या नदीला, प्रवाहाला मिळत असेल, त्याचे डोहात रुपांतर झाले असेल. अवखळ झऱ्याचे खोल गहिऱ्या डोहात झालेले रुपांतर उथळ विचारांना आलेली परिपक्वता, आलेली खोली आणि त्याच बरोबर आलेले स्थैर्य, शांती दर्शवते असे वाटते. ज्या स्थैर्याची, शांततेची कवी आतुरतेने वाट पाहत आहे तेच कवितेत उमटले आहे असे वाटते.

कवीची इच्छा ह्या कवितेत बालकवींनी केलेली मरणाची कल्पना बघा-

सत्याचीं स्वप्नें व्हावीं I सत्याला स्वप्नें यावी

स्वप्नींही स्वप्नें बघत I  स्वप्नांतच व्हावा अंत!

मरण्याचें स्वप्नही गोड I जगण्याचें स्वप्नही गोड!

येणेपरी सर्वही भास I अमृताचे व्हावे कोष.

.....

प्रेतही माझें पाहून I प्रेमानें गुंगत गान

यापरि जग हर्षित व्हावें I हें इच्छीं जीवेंभावें!

यावरून मृत्युच्या पलीकडे जाऊन आपल्या जगण्या-मारण्याने जग आनंदित व्हावे ही इच्छा मनात धरणारा, उदात्त विचार करण्याची क्षमता असलेल्या एका कवीची कविता आपण वाचतो आहोत ह्याची जाणीव होते, मृत्यू हा शेवटापेक्षा कालचक्रातील पुढील टप्प्याची किंवा पुढील फेऱ्याची सुरवात आहे असे म्हणता येईल. या  चक्रातून कवीला मुक्तीची अपेक्षा आहे आणि म्हणून औदुंबर कवितेतील औदुंबराचे अस्तित्व मृत्युपेक्षा मोक्षाचे प्रतिक अधिक आहे असे वाटते.

निसर्गाचे इतके विहंगम, प्रशांत दृश्य समोर पाहिल्यावर कोणताही माणूस आपला मीपणा हरवून निसर्गाशी तादात्म्य पावेल, त्यातून तो बालकवींसारखा तरल संवेदनशील, सर्जनशील मनाचा असेल तर मग त्याला दिव्यत्वाची अनुभूती झाल्यावाचून कशी राहील? ती अनुभूती स्वाभाविकच वैराग्याच्या, विरक्तीच्या धवल, पांढऱ्या पायवाटेवरूनच जाईल असे वाटते.      

संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे- 

कविः करोति काव्यानि रसं जानाति पण्डितः।
तरुः सृजति पुष्पाणि मरुद्वहति सौरभम्॥ 

अर्थात, एकाच कवितेचे रसग्रहण वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते आणि रसग्रहण करणाऱ्या पंडितांवर ते अवलंबून आहे. फुलांचा दरवळ, वारा घेऊन जातो. वृक्ष फक्त फुले फुलवतात.

इतके सगळे मंथन केल्यावर देखील, बालकवींनी म्हटल्याप्रमाणे, समुद्र किनाऱ्यावरून उचललेल्या एका शुक्तिकेचे, मोत्याच्या शिंपल्याचे कौतुक करावे, पण त्यावरून क्षीरसागरातील रत्नांचा अंदाज बांधायला जाऊ नये, असेही वाटते.



[1] समग्र बालकवी – नंदा आपटे श्रेयस मालिका

[2] बालकवीची समग्र कविता – संपादक प्रो. भा. ल. पाटणकर एम्. ए. नाशिक

[3] कर्षति इति कृष्णः अर्थात ज्याचे किरण सर्वंकष आहेत असा जो सूर्य तो कृष्ण

 

Tuesday, 1 August 2023

उपेक्षित

महाभारत हे महाकाव्य अनेक व्यक्तिमत्वांची, अमुल्य रत्नांची अक्षय खाण आहे.  प्रत्येक पात्र हे अतिशय आखीव, रेखीव, आपापले गुणविशेष जपणारी आहेत. वेद व्यासांनी ह्या पात्रांना उभं करतांना ज्याच्या त्याच्या विशेषाप्रमाणे, वकुबाप्रमाणे, लायकीप्रमाणे योग्य न्याय दिला आहे. माझ्या दृष्टीने एकच व्यक्तिरेखा अशी आहे की जिच्यावर अन्याय झाला आहे असे वाटते. त्याच्या योग्यतेनुसार त्याला महाभारतात महत्व मिळालेलं नाही असे वाटते. ती व्यक्तिरेखा म्हणजे विदुर.

विदुर, ह्या नावाचा शब्दशः अर्थ हुशार, ज्ञानी असा होतो. कुरु राजा विचित्रवीर्याच्या (शंतनू आणि सत्यवतीचा पुत्र) अंबिका व अंबालिका या राण्यांच्या परिश्रमी नावाच्या दासीला वेद्व्यासांपासून नियोगाने झालेला पुत्र. नात्याने कौरव, पांडवांचा काका, धृतराष्ट्र व पांडु (पंडु) यांचा कानिष्ट बंधु, म्हणजे एकाच पित्यापासून वेगवेगळ्या मातांना झालेले तीन सावत्र पुत्र.

कुरु वंशातील सर्वात थोरला म्हणून सत्यवतीने प्रथम भीष्माला विचित्रवीर्याच्या विधवा राण्यांना नियोगाने संतती देण्याची विनंती केली. भीष्माने आईला, (राजा शंतनूची पत्नी ह्या नात्याने) तिला दिलेल्या स्वतःच्या वचनाची आठवण देऊन तिच्या इच्छेची पूर्तता करण्यास असमर्थता प्रकट केली. नात्याने व्यास मुनी हे चित्रविर्य (चित्रांगद) व विचित्रवीर्य यांचे थोरले सावत्र बंधु (सत्यवतीला पराशर ऋषींपासून झालेला पुत्र) व या नात्याने चित्रविर्य व विचित्रवीर्य यांच्या अकाली अपत्यहीन मृत्युनंतर त्या काळातील नीतिनियमांनुसार सर्व संमतीने, विधवा राण्यांना नियोग पद्धतीने वारस देण्यास योग्य. भीष्माने नकार दिल्यानंतर सत्यवतीने कुरु साम्राज्याला नियोग पद्धतीने वारस देण्याची आज्ञा वजा आवाहन व्यासांना म्हणजे आपल्या मोठ्या पुत्राला, केले आणि तदनुसार ह्या तीन कुरुपुत्रांचा जन्म झाला.

थोरला धृतराष्ट्र हा जन्मतः अंध (अंबिकेचा), धाकटा पांडु  (अंबालीकेचा) हा जन्मतः पंडुरोगाने बाधित. राज्याचा वारस हा शक्यतो अव्यंग असावा असा दंडक असल्यामुळे, सत्यवतीच्या आग्रहाने व्यासांना पुन्हा एकदा पुत्रजन्माचा प्रयत्न करावा लागला. यावेळी मात्र विचित्रवीर्याच्या दोन्ही राण्यांनी संगनमताने परिश्रमी नावाच्या दासीला आपल्या ऐवजी व्यासांकडे पाठविले आणि विदुराचा जन्म झाला. हा अव्यंग असूनही दासी पुत्र असल्यामुळे सूतपुत्र ठरला व राजकुमार पदाला मुकला.  

विदुर जन्माची कथा इथे पूर्ण होत नाही. ती पूर्ण जाणून घेण्याकरिता मांडव्य किंवा अणि-मांडव्य ऋषींची कथा समजून घ्यावी लागेल. मांडव्य ऋषींना गैरसमजातून कोण्या राजाने चोरीच्या आरोपात दोषी ठरवून सुळावर चढवले पण मांडव्य ऋषींना अनेक दिवस सुळावर ठेऊन देखील मृत्यू आला नाही. राजाला आपली चूक कळली व त्याने ऋषींची क्षमा मागितली. ऋषींनीही राजाला क्षमा केली. मात्र झाल्या छळाचा जाब त्यांनी यमधर्माला (यमाला) विचारला. यमधर्माने दिलेल्या उत्तराने ऋषींचे समाधान झाले नाही आणि त्यांनी यमधर्माला इहलोकी जन्म घेशील व तोही हीन कुळात असा शाप दिला. या शापाची परिणीती म्हणजेच विदुराचा जन्म. यमधर्माने परीश्रमीच्या पोटी जन्म घेतल्यामुळे अर्थातच विदुर धर्मात्मा, धर्मज्ञ, नीतीज्ञ होता. महाभारतात ज्या व्यक्तिरेखेत वागण्यात व बोलण्यात तफावत, दोष आढळत नाही अशी व्यक्तिरेखा म्हणजे विदुर असे म्हणायला हरकत नाही.

विदुर आणि पांडवांची आई कुंती ह्यांच्या नात्याची वीण काही वेगळीच आहे. कुरुपुत्र लहान असतांना, कौरव, पांडवांना नेहमीच पाण्यात बघत असत. त्यातूनही भीमावर त्यांचा जास्तच राग होता. अर्थात भीमाची दांडगाई हे देखील त्याला कारण असू शकेल. राग इतका होता की भीमाला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यातला विषप्रयोग सगळ्यात गंभीर होता. विषप्रयोगानंतर मृच्छित भीमाला जखडून नदीच्या डोहात फेकून देणे हा तर कळस होता. कुंतीला काळजी पोटी धृतराष्ट्र किंवा भीष्मांकडे जाणे सहज शक्य होते. ते अधिक योग्यही ठरले असते. त्या दोघांनी अधिकार वाणीने लहान दुर्योधनाला कदाचित खडसावले असते. पण तसे न करता  कुंती विदुराकडे, कौरवांच्या काकांकडे गेली. विदुराला तसे बघायला गेले तर कोणतेच अधिकार नव्हते व त्याच्या कडे उपायही नव्हता. पण कुंतीचा विदुरावर इतका विश्वास होता की विदुराने भीम किंबहुना पांडव कसे ईश्वरी अवतार आहेत आणि त्यांना अपाय करण्याची कोणाची प्राज्ञा नाही अशी कुंतीची समजूत काढल्यावर ती निश्चिंत झाली. महाभारतातील युद्धादरम्यान कुंती विदुराकडेच राहिली होती. त्या कठीण प्रसंगात विदुराने तिला आधार दिला.

महायुद्ध संपून युधिष्ठीर सिंहासनावर स्थानापन्न झाल्यावर पांडवांचे राज्य सुरु झाले. कालांतराने कौरव जेष्ठांनी (धृतराष्ट व गांधारी) वानप्रस्थाश्रमात जावे असे ठरवले. त्या दृष्टिहीन दामपत्याची काळजी घेण्याकरिता विदुर त्यांच्याबरोबर वनात निघाला. कुंती खरंतर राजमाता, कुंतीची सर्व स्वप्ने, आकांक्षा पूर्ण झाल्या होत्या आणि खडतर आयुष्यानंतर प्रथमच उपभोग घ्यायची संधी कुंतीला मिळाली होती. पण अशावेळी तिने धृतराष्ट्र व विदुराबरोबर वानप्रस्थाश्रमात प्रवेश करणं प्रशस्त मानलं. 

युधिष्ठीर हा कुंतीने आवाहन करून झालेला यमधर्माचा मुलगा. युधिष्ठीर आणि विदुर यांच्यात कमालीचं साम्य पदोपदी जाणवतं. दोघंही नेहमीच कटाक्षाने धर्माचरण करीत. विदुराला सगळेच पांडव प्रिय होते पण त्यातल्यात्यात विदुराचा ओढा युधिष्ठीराकडे सर्वात अधिक होता. लाक्षागृहासारख्या बाक्या प्रसंगात आणि थोड्याशा चुकीने देखील प्राण जाण्याची शक्यता असतांनाही भीमार्जुनांना सोडून त्याने युधिष्ठीरावर विश्वास दाखवला आणि त्याच्या योजनेनुसार युधिष्ठीर सर्व पांडवांचे आपल्या आईसमवेत प्राण वाचविण्यात यशस्वी ठरला. विदुराचा विश्वास त्याने सार्थ ठरवला होता.

महाभारत युद्धानंतर, युधिष्ठीर सम्राटपदी विराजमान झाल्यावर, विदुराने, राजा कसा असावा याचा उपदेश युधिष्ठीराला केला. महायुध्द संपल्यावर भीष्म शरपंजरी उत्तरायण सुरु होण्याची वाट पहात होते तेंव्हा विदुराने युधिष्ठीराला भीष्मांकडे जाऊन राजनीती म्हणजे काय? राज धर्म म्हणजे काय? धर्माचे पालन म्हणजे काय? याचे मार्गदर्शन घ्यायला सांगितले. थोडक्यात विदुराने युधिष्ठीराला एक आदर्श राजा बनविण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला.   

विदुर, वर उल्लेखील्याप्रमाणे स्वतः यमधर्माचा, मांडव्य ऋषींची शापवाणी खरी ठरविण्याकरिता परीश्रामिच्या पोटी जन्माला आलेला अवतार होता. वानप्रस्थाश्रमात तप केल्यानंतर विदुराने देह ठेवला आणि महाभारतात असा उल्लेख आहे की विदुराच्या देहातून एक तेजस्वी ज्योत बाहेर पडली आणि ती युधिष्ठीराच्या शरीरात प्रविष्ट झाली.             

वरील सर्व गोष्टींवरून महाभारताच्या काही अभ्यासकांनी युधिष्ठीर हा विदुराचा नियोगाने झालेला कुंती पुत्र होता असे मत मांडले आहे. कुंतीला प्राप्त वरामुळे हे सहज शक्यही होते. हा मतप्रवाह चूक की बरोबर ह्यावर भाष्य करण्या इतका माझा अधिकारही नाही आणि अभ्यासही नाही. पण एक शंका मनात डोकावते की विदुराच्या सूतपुत्र असण्याचा आणि पितापुत्राच्या ह्या नात्याचा महाभारतात नसलेल्या उल्लेखाचा काही संबध असावा कां? पण तसेही वाटत नाही. कर्णाचा अपवाद (कुंती जरी क्षत्रिय असली तरी ते ज्ञात नसल्यामुळे लहानाचा मोठा ज्या आईने केला तिच्या मागून तो सूतपुत्र ठरला) वगळता महाभारतातील सर्व पात्रांचे क्षत्रिय, ब्राह्मण अथवा सूत ठरणे सर्वस्वी त्यांच्या आईवर अवलंबून होते. आई जर दासी असेल आणि पिता भलेही क्षत्रिय राजा (दासी पुत्र युयुत्सु हा धृतराष्ट्राचा पुत्र) असेल, किंवा वेद व्यासांसारखा ब्राह्मण असेल (पंडू व धृतराष्ट्र क्षत्रिय ठरले कारण अंबिका आणि अंबालिका ह्या क्षत्रिय कन्या होत्या आणि परिश्रमीचा विदुर सूत ठरला). महापराक्रमी पांडवांच्या इतर पित्यांशी विदुराची तुलना होण्याऐवजी तो दुर्लक्षीतच राहिला असे वाटते.

महाभारतात वैचारिक अथवा तत्वज्ञानाची चर्चा, उपदेश वा त्यावर अधिकाराने केलेलं भाष्य बहुतांशी दोनच ठिकाणी आढळते. एक श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली ७०० श्लोकांची गीता आणि विदुराने धृतराष्ट्राला सांगितलेली ५८८ श्लोकांची विदुर नीती. श्रीकृष्णाने आणि विदुराने आपापले तत्वज्ञान महाभारतातील महायुद्धाच्या अगोदर सांगितले. दोघांचाही उद्देश्य अधर्माचा शेवट करून धर्माची स्थापना करणे, झालेला अन्याय दूर करून न्याय मिळवून देणे, जे योग्य आहे ते धर्मसंमत म्हणून ते घडवून आणणे असाच होता. विदुराने अधर्माचे मूळ म्हणून धृतराष्ट्राकडे बघितले तर श्रीकृष्णाने अधर्माचा समूळ नायनाट करणारा म्हणून अर्जुनाकडे बघितले. श्रीकृष्णाने अर्जुनाला यूद्धाला प्रवृत्त करण्याकरिता गीता सांगितली तर विदुराने धृतराष्ट्राला युद्धापासून परावृत्त करण्याकरिता नीतीमत्तेचे बोधामृत देण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णाने युद्धाचा मार्ग निवडण्यापूर्वी मुत्सद्देगिरी, राजकारण, शिष्टाई करून पहिले होते. धृतराष्ट्राला पर्यायाने दुर्योधनाला युद्धापासून परावृत्त करण्यात अपयश आल्यावर विदुराला दुसऱ्या कुठल्याही मार्गाचा अवलंब करताच आला नाही.

धर्माच्या स्थापनेचा मान अर्थातच श्रीकृष्णाकडेच गेला. हे अपयश खचितच विदुराने सांगितलेल्या तत्वज्ञानाच नाही किंवा त्याचा दर्जा कमी ठरतो असाही त्याचा अर्थ होत नाही. श्रीकृष्णाचे काम तसं बघायला गेलं तर सुकर होते. अन्याय झालेल्यालाच अन्यायाविरुद्ध पेटवायचे होते युद्धाकरिता उभे करायचे होते. अर्जुनाचा युद्धाचा सरावही झाला होता, मानसिक तयारीही, आयत्यावेळी त्याने कच खाल्ली म्हणून श्रीकृष्णाला गीता सांगावी लागली. इतके असूनही सांगितलेल्या तत्वज्ञानाची खोली श्रीकृष्णाला साजेशीच आहे. या उलट विदुराला मात्र अन्याय करणाऱ्यालाच तो कसा अयोग्य आहे हे पटवून द्यायचे होते आणि नुसते पटवून द्यायचे नाही तर कृतीत देखील उतरले पाहिजे आणि ते सुद्धा कोणाला? तर अशा बापाला जो आजवर दुर्योधनाची कर्तुते नजरे आड करीत जणु त्याला खतपाणी घालीत होता आणि आजवर केलेल्या त्या सर्व अन्यायाचा परिपाक म्हणूनच भारतीय महायुद्ध होत होते. बिकट काम होते. झारीने वाळवंट भिजविण्यागत प्रयत्न होते विदुराचे. ह्या इतक्या सुस्पष्ट अशक्य परिस्थितही अहिंसक मार्गाने गोष्टी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या विदुराचा म्हणावा तितका आदर झाला नाही असेच म्हणावेसे वाटते.  

विदुराचे ज्ञान, नितीमत्ता, नात्याचा अधिकार आणि धृतराष्ट्राच्या दरबारी असलेलं मंत्रिपद, ह्या कशाचाही उपयोग द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी तो प्रसंग टाळण्याकरिता झाला नाही. शेवटी त्यालाही मान खाली घालावी लागली. लाक्षागृहाच्या प्रसंगी ती गोष्ट टाळू न शकल्यामुळे एखादे कारस्थान करावे अशा प्रकारे त्याला पांडवाना गुप्तपणे मदत करावी लागली. श्रीकृष्ण शिष्टाई करता आला तेव्हा तो विदुराकडे उतरला. विदुर उघडपणे पांडवांच्या बाजुने आहे असे दिसावे  हा कृष्ण नीतीचा भाग असेलही कदाचित पण विदुरा इतका तटस्थ आणि विश्वासू युद्ध पूर्व काळात दुसरा कोणीही नव्हता हे ही तितकेच खरे.

ज्या मिंधेपणाच्या कारणामुळे भीष्म, द्रोण ह्यासारखे ऋषितुल्य महारथी अन्यायाच्या बाजूने सत्याची पूर्ण जाणीव असतांना युद्धाला उभे रहिले, त्याच परिस्थितीत असलेल्या विदुराची तटस्थता आणि अन्यायाच्या विरोधातील ठाम भूमिका ही खरोखर लक्षणीय आहे. स्वतःच्या नीतीमुल्यावर असलेल्या श्रद्धेचे ते द्योतक आहे असे वाटते.             

विदुर ह्या व्यक्तिरेखेच्या पदरात त्याच्या गुणविशेषांच्या तोलामोलाचा कार्यभाग पडायला हवा होता असे वाटते. विदुर त्या दृष्टीने महाभारतात उपेक्षित राहील्यासारखा वाटतो.

Wednesday, 28 June 2023

नाचू किर्तनाचे रंगी

किर्तनाचे अनेक प्रकार आहेत. जसे की नारदीय, वारकरी, रामदासी, राष्ट्रीय इत्यादी. नारद मुनींना आद्य किर्तनकार मानले जाते आणि त्यांची परंपरा पुढे चालू ठेवणाऱ्यांना नारदीय संप्रदायातील मानले जाते. ह्या प्रकारातील किर्तनात, किर्तनकार आपल्या उपास्य देवतेची आराधना करतात. दुसरा प्रकार वारकरी, हे किर्तन बहुतेकांनी ऐकलेले असेल. ह्या प्रकारच्या किर्तनात उपास्य दैवत केवळ पांडुरंग, विठ्ठल हेच असते. ह्यात किर्तनकार आणि श्रोते मंडळीत संवाद साधला जातो आणि श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत देत किर्तनकार बुवा अध्यात्मासारखा गहन विषय सुद्धा सोपा करून सांगतात. ह्यात बहुतेक करून संतांचे अभंग, संतांची शिकवण, सदाचरण इत्यादींचा उहापोह केला जातो. राष्ट्रीय किर्तन हे लोकामान्यांच्या काळात सुरु झालं ह्यात मुख्यत्वे करून राष्ट्रभक्ती, जनजागृती, प्रेरणादायी ऐतिहासिक पुरुषांची चरित्रे इत्यादी विषय निवडले जातात.

हा संगीतमय भक्तीचा प्रकार मला कायम आकृष्ट करीत आला आहे. लहानपणी विलेपार्ल्याला पार्लेश्वर मंदिरात किर्तन ऐकल्याचे आठवते. नामसंकिर्तानाची मजा काही औरच आहे.

आज समस्त किर्तनकारांची क्षमा मागून स्वरचित किर्तनाचा प्रयोग खाली देत आहे.

मंडळी आज आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी. भगवान विष्णू शेष शय्येवर आज चार महिन्यांकरिता झोपण्यास जातात. थेट कार्तिकी एकादशीला त्यांना जाग येते, हे चार महिने, श्रद्धावान भक्त चातुर्मास म्हणून पाळतात.

जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी

आपल्याकडे आपल्या जवळ जवळ सर्वच देवदेवतांना त्राता, तारक, रक्षक म्हणून बघितलं जातं. प्रत्येक देवाच्या, देवीच्या अवतार कार्यात एखाद दुसऱ्या राक्षसाचा पाडाव, नाहीतर दुर्जनांचे निर्दालन असतेच. उगाच नाही गोवेकर जातायेता म्हणतात 'देवाक काळजी'.

अहो खुद्द भगवंतांनी गीतेच्या चवथ्या अध्यायात सांगितलं आहे -

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।४.७।।

मंडळी भगवंत अर्जुनाला सांगतात की, बा अर्जुना जेव्हा जेव्हा या इहलोकात, भूतलावर अधर्माचे स्तोम माजेल, ज्या ज्या वेळी अन्यायाच्या भीतीने न्याय दडी मारून बसेल त्या त्या वेळ मी जन्म घेईन आणि उच्छाद मांडलेल्या अधर्माचा उच्छेद करीन, नायनाट करीन.

भगवंत पुढे सांगतात -

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।४.८।।

अर्जुना मी सदाचारींना, सज्जनांना संरक्षण देईन, दुष्कृत्य करणाऱ्यांचा बीमोड करीन, विनाश करीन आणि धर्माचं पुंनरुज्जीवन करण्याकरिता, धर्माच्या पुनर्स्थापनेकरीता युगानुयुगे येत राहीन, अवतार घेत राहीन.

मंडळी इथे धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान वगैरे नव्हे तर जेथे अधर्माचा अभाव तेथे धर्माचे अधिष्टान आहे.

खुद्द भगवंतांनीच जबाबदारी घेतली म्हटल्यावर म्या पामराने काय आणि कशास काही करावे अशीच भावना असावी आणि पिढ्यान् पिढ्या हाच संस्कार कदाचित आपल्यावर झाला असावा. आपल्या देवादिकांची छबी डोळ्यासमोर आणा, पहा भगवंतांच संरक्षक रूप स्पष्ट दिसेल.

चक्र आणि गदा घेऊनीया हाती l
श्रीहरी ठाकले रक्षणासी ll

ह्या श्रीहरी, महाविष्णुचा अवतार, पुरुषोत्तम प्रभू राम

हाती चापबाण घेऊनीया श्रीराम l
करीती निर्दालन दूर्जनांचे ll

आणि त्या रामरायाचा दास मारुतीराया

द्रोणागिरी हाती, गदा स्कंधावरी l
हनुमान अवतरे भुभूत्कारे ll

देवाधिदेव सांब सदाशिव, त्यांच वर्णन काय करू ?

त्रिनेत्री ज्वाळा, त्रिशूळ हाती l
कैलासी बैसले महादेव ll

महादेवांचा सुपुत्र गणपती,

पाश, अंकुश घेऊनीया करी l
वरद विनायक विघ्नहर्ता ll

आणि गणरायांची माता पार्वती

त्रिशुळ, तलवार विक्राळ वदन l
सिंहावर बैसली आदीमाया ll

पण बुवा, आमचा विठ्ठल? त्याच नाही वर्णन केलतं. तो असा कुठे असतो?

अगदी बरोबर, मंडळी असा नाही दिसत विठुराया, मग कसा दिसतो आपला विठुराया?

अस्त्र ना शस्त्र, ना अंगार नयनी l
प्रेमाचा पुतळा इंद्रायणी ll

ज्या इंद्रायणीच्या प्रवाहात...

भेदाभेद अमंगळ वाहूनी जाती l
घोष नामाचा आसमंती ll

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

तर अशा या इंद्रायणी काठी, मंडळी ...

उभी माऊली भक्तांची साऊली l
घेऊनिया कर कटेवरी ll

बुवा, कशी आहे ही माऊली?

माऊली माऊली l
भक्तही माऊली l
विठाई माऊलीl
ममता सामोरी उभी राहिली ll

जणू ममता, प्रेम, मायाच विठ्ठल रूपाने, विठ्ठल भक्तांच्या रूपाने समोर उभी राहिली आहे.

मंडळी तुम्ही म्हणाल, बाकी सगळे देव आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी अस्त्र, शस्त्र घेऊन असतात मग विठू माऊली अस काहीच कां करत नाही? आपल्या भक्तांच संरक्षण कां करीत नाही?

चुकताय महाराजा, काय सांगू. बाहेरच्या शत्रूंपेक्षा अंतस्थ शत्रूच जास्त धोकादायक असतात. बाह्य शत्रूंनी एकदाच मृत्यू येईल हो, पण ह्या अंतस्थ शत्रूंनी जन्म मृत्यूच्या फेऱ्यात फिरत बसावे लागेल. भवसागरात गटांगळ्या खाव्या लागतील.

भक्तीत, प्रेमात, मायेत इतकी ताकद आहे, की त्याच्या जोरावर या शत्रूंचा नक्की पाडाव करता येईल तिथें शस्त्रांस्त्रांची काय गरज? आणि विठाई तर प्रत्यक्ष आईच, प्रेमाची, मायेची प्रतिमाच.

या अंतस्थ शत्रूंनी आमची अवस्था कशी केली आहे काय सांगू?

अनंत दोषांचे आगरु, मन झाले बावरू
माये विना तुझ्या, आता कसे आवरू

मन ही अनंत दोषांची बजबजपुरी झाली आहे, सैरभैर झालं आहे मन, भरकटते आहे मन.

अहो बुवा का भरकटते आहे हे मन?... नेमके असं घडलंय काय?

अहो अंतस्थ शत्रूंनी आपला डाव साधला आहे !!

क्रोधाग्नी दिली विवेका आहुती l
वासनेची कधी होई ना पूर्ती ll

रागाच्या आहारी गेलात की विवेकशून्य वागलात म्हणून समजा ...

वासनेची भूक जेव्हढी शमवांयला जाल तेव्हढी ती वाढतच जाते ...

केव्हाही वर्तमानपत्र उघडून बघा ..पहिल्या पानावर ठळक मथळ्यात बातम्या दिसतील

रागाचा भरात डोक्यात दगड घालून भावाचा खून...

अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार....

लोभाचा कधी होई ना अंत l
मिळे किती, तरी नसल्याची खंत ll

अहो, दोन दोन गाड्या दारात उभ्या असताना तिसरी नाही म्हणून दुःख करणारे आहेतच की.

मंडळी नीट लक्ष देऊन ऐका पुढचा शत्रू तितकाच धोकादायक आहे

मत्सरा पोटी कुंथली गती l
होते नेमेची मतीची क्षिती ll

मत्सराग्नित स्वतःच्या प्रगतीची गती तर कुंठते पण बुध्दीचा देखील निश्चित ऱ्हास होतो.

बुवा ह्या अंतःस्थ शत्रूंनी घाला घातल्यावर काय स्थिती झाली आहे या देहाची?

अहं झाला राजा, षड् रिपु दरबारी l
प्राण झाले बंदी, कोणी ना कैवारी ll

प्राण, आत्मा कोंडला आहे ह्या पिंजऱ्यात. मुक्तीचा मार्गच दिसत नाही, कोण सोडविल मला ह्या शत्रूंच्या कचाट्यातून ? कोण घेईल माझा कैवार?

अरे माझी अशी अवस्था झाली आहे म्हणून का बा पांडुरंगा तू मला दूर लोटत आहेस अरे पण..वासरू किती ओढाळ, अवखळ असलं तरी त्याला पाहताच त्याची माय, गाय पान्हा सोडतेच ना रे?

मग ही माझी माऊली मला का बरं जवळ करत नाही ?

ओढाळ वासरू, उधळे चौखूर l
गाय माय त्याची, लोटे का दूर? ll

माय बापा,

अगा पांडुरंगा, साहवेना ताप l
कां देशी अंतर, पाहसी का अंत ll

माझी लायकी नाही की तू मला कुशीत घ्यावंसं पण निदान पायाशी तरी जागा दे.

म्हणे विठुमाये, घेऊ नको कुशी l
राहु दे ग माये, पामरा पायाशी ll


मंडळी, थोडक्यात काय भक्तिमार्गात स्वतःला झोकून द्या. पांडुरंग अत्यंत मायाळू आहे, आपल्या भक्तांना आजवर त्याने कधीही अंतर दिलेले नाही. पुंडलीकाकरिता विटेवर उभा विठठल, नामदेवांचा नैवेद्य त्यांच्या हातातून खाणारा विठ्ठल, जनाबाईच्या घरी पीठ दळणारा विठठल, चोखोबांच्या पत्नीचे बाळंतपण करण्याकरिता आलेला विठठल, भक्तांकरिता धावणाऱ्या विठुरायाची उदाहरणे द्यावी तेव्हढी थोडी आहेत.

भक्तांच्या हाकेला ओ देणारा हा बहुतांचा देव आहे.

बोला

जय जय रामकृष्ण हरी 
जय जय रामकृष्ण हरी  
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल   
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय