Saturday, 1 May 2021

गांधारी

 

महाभारतकार महर्षी व्यासांनी महाभारत्तातील पात्र उभी करतांना प्रत्येक व्यक्तिरेखेला अक्षरशः अनंत छटा दिल्या आहेत आणि त्या सुद्धा इतक्या विविक्षित आहेत की त्या प्रत्येक छटेत ती व्यक्ती पूर्णतः वेगळी भासते. गांधारी ही अशीच एक बहुआयामी, बहुविध व्यक्तिरेखा.

गांधार नरेश सुबल, ह्याची कन्या. धृतराष्ट्राची पत्नी, कौरवांची जन्मदात्री, महासती, पतिव्रता, धृतराष्ट्राचा राज्याभिषेक न झाल्यामुळे महाराणी पदाला कायम मुकलेली, आणि दुर्योधनाचा राज्याभिषेक झाल्यावर राजमाता पद भूषाविणारी, अशा अनेक रुपात ती आपल्याला भेटते. पण एक स्त्री म्हणून गांधारी महाभारतातील कुठल्याही पर्वात वा प्रसंगात समोर येत नाही. ती कौरवांची जन्मदात्री आहे पण माता, आई म्हणून तिची व्यक्तिरेखा अपुरी वाटते. वरील वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना राजमाता गांधारीच्या मनात भावनांचा काय कल्लोळ उठत असेल त्याची कल्पना महाभारतकारांनी बहुतेक वाचकांवर व श्रोत्यांवर सोडली असावी.     

गांधार, हिमालयाच्या कुशीत, दऱ्याखोऱ्यानी वेढलेले एक छोटे राज्य सुबल त्याचा राजा आणि त्या निसर्गरम्य वातावरणात रहाणारे त्याचे प्रजाजन. त्यांच्या ध्यानीमनी नसतांना अचानक हस्तीनापुराहून, भीष्मांकडून गांधार देशीच्या राजकन्येला, गांधारीला, कुरुकुळाची स्नुषा होण्याची, धृतराष्ट्राची पत्नी होण्याची मागणी येते. हस्तिनापुर, दूरवर यमुनेच्या काठी, महाप्रतापी भीष्मांच्या    कृपाछत्राखाली, वसलेली पराक्रमी कुरूवंशाच्या राज्याची वैभवशाली ऐश्वर्यसंपन्न राजधानी एव्हढीच ऐकीव माहिती. नाही म्हणायला, पंडू, दिग्विजयी अभिषिक्त सम्राट, दोन भार्या असूनही अजून निपुत्रिक आहे हेही गांधार वासियांनी ऐकलं होतं. ही मागणी घेऊन येणाऱ्या दुताबरोबर गाड्या भरूभरून भेटीदाखल दिलेले सोनंनाण, कपडेलत्ते कुरु ऐश्वर्याची ग्वाही देत होती. आलेल्या भेटी ठेवायला गांधार नरेशचा खजिना देखील अपुरा पडला असता. ह्या धनभाराच्या संरक्षणार्थ आलेली कुरु सैन्याची तुकडी देखील संख्याबळाने गांधार सेनेपेक्षा जास्त होती. डोळे दिपवून टाकणारी ती धनसंपदा, एव्हढ्या मोठ्या कुळाशी जुळून येणारी ही सोयरिक आणि मुलीच्या मुलांची हस्तिनापूरच्या गादीचा वारस होण्याची शक्यता. हे सगळच सुबल राजाला स्वप्नवत वाटत होतें. हस्तिनापूरच्या प्रस्तावाला नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. गांधारी केव्हढी भाग्याची!! गांधार देशाची प्रजा जणू आनंदाच्या डोहीच तरंगत होती. विवाह हस्तिनापुरी संपन्न होणार होता. गांधार नरेशाकडून फक्त होकाराची आणि कन्यादानाची अपेक्षा होती.

माझ्या प्रयाणाकरिता खास रथाची व्यवस्थाही आलेल्या लव्याजम्यात होती. सुबल्र राजाला आणि मला जणू गृहीत धरलेले होते. माझी पाठवणी करतांना आईच्या डोळ्यातून वहाणारे अश्रू थांबतच नव्हते. मुलीचे सासरी जाणे हे काही नवीन नाही.  मी माझीच समजुत काढत होते, आईच्या अश्रुंचे उत्तर शोधीत होते. मी इतकी दूर जात आहे, ती देखील कायमची म्हणून असेल कदाचित. बाबा कसनुस अवसान आणून हसत होते. माझी अवस्थाही काही वेगळी नव्हती पण त्याचबरोबर नव- जीवना बद्दल, नवऱ्या बद्दल अपेक्षाही होत्या. शकुनी एकटाच केवळ अपवाद होता. त्याचा आनंद त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता.      

गांधारीचा स्वतःच्या भाग्यावर विश्वासच बसत नव्हता. गांधार देशातील सगळाच कारभार छोटेखानी. राजाला प्रजा कुटुंब प्रमुख मानत होती. दुर्गम प्रदेशामुळे परकीय आक्रमणाची शक्यताही नव्हती सगळ कस शांत, आनंदी. पर्वतराजीतील वाऱ्यापाण्यासारखं मुक्त, निर्मळ आणि स्वच्छंदी. मनात नाही म्हणायला शंकेची पाल चुकचुकत होती. एव्हढ्या मोड्या राज्याची साम्राज्ञी होण मला जमेल ना? तिथले रीतीरिवाज, शिष्टाचार सगळ सगळच नवीन.

गांधार ते हस्तीनापूर एव्हढा लांबचा प्रवास हा हा म्हणता संपला. सेवा करायला पुढे मागे दास दासी धावत होते आणि नुसत्या कल्पनेनेच माझे मन फुलपाखरू झाले होते. मनाने कधीचीच मी हस्तीनापुरी पोहोचले होते. आपल्या न पाहिलेल्या, होणाऱ्या पती विषयी विचार करण्यात, त्याचे चित्र ऐकीव गोष्टींवरून आपल्या मन:पटलावर चितारण्यात मी  गुंग होते. शकुनी आपल्या सख्ख्या बहिणीला काही कमी पडू देत नव्हता. शकुनीचे हस्तीनापुरी मजबरोबर येणे थोडे खटकलेच होते. स्वत:चे राज्य सांभाळायचे सोडून आपला भाऊ आपल्या बरोबर निघाला हे त्याच्या आपल्यावरील प्रेम म्हणायचे की ऐशोआरामाची अभिलाषा हे नेमके उलगडत नव्हते.

हस्तिनापुर वासियांनी माझे जंगी स्वागत केले. मोठ मोठे दरबारी मानकरी नगराच्या दारात स्वागताकरिता हजर होते. डोळे दिपविणारा सोहोळा होता तो. नगरातील उंच उंच इमारती, वाडे, महाल, चौपदरी रुंद रस्ते, दुतर्फा बांधलेली सुबक, रेखीव घरे सगळे कसे आखीव रेखीव जागाच्या जागी होतें. काढलेल्या रांगोळ्या, घातलेले अत्तरांचे सडे, बांधलेली तोरणे, उभारलेल्या गुढ्या, लावलेल्या पताका, टांगलेली झुंबरे, सोडलेल्या फुलांच्या माळा, वाद्यांचा घोष, फडकणारे ध्वज, नटलेल्या स्त्रिया आणि सजलेले पुरुष सगळे सगळे या गांधारीचे, माझे स्वागत करीत होते.

सुखाची परमावधी म्हणतात ती हीच की काय? एकदा वाटे महाराणीचं स्वागत आहे हे, मग आश्चर्य काय त्यात. त्या आनंदोत्सवात लोकांच्या चेहेऱ्यावरचा आंनद कृत्रिम का वाटतोय मला, काहींची नजर तर माझी कीव करीत असल्यासारखी भासतेय, भासच असेल बहुदा. असेच काहीसं निरोप घेताना आईवडीलांच्या डोळ्यात दिसलं कां? कन्या सासरी चाललेली बघून असेल कदाचित. खरोखरीच का मी इतकी भाग्यवान आहे? कां शंका यावी मला? स्वप्नातून जागी होईन कि काय मी?

दुसऱ्याच दिवशी ह्या स्वप्नांचा भंग झाला, एखादे नक्षीदार नाजूक काच पात्र खळकन फुटावे तद्वत. भीष्म पितामह आवर्जून मला भेटण्यास आले. आपल्या धीरगंभीर आवाजात मला म्हणाले “मुली, तुझा होणारा पती जन्मांध आहे हे ठाऊक असूनही तू ह्या विवाहाला मान्यता दिलीस, थोर आहेस. कुरु आणि व्यक्तिश: मी सदैव तुझ्या ऋणात राहू. धन्य आहेस तू!” दोन्ही हातांनी मला आशिर्वाद देत पितामह माझ्या उत्तराची वाट न बघता महालाबाहेर निघून गेले. जन्मांध? माझे पती जन्मांध आहेत? मला हे माहित असूनही मी विवाहाला मान्यता दिली? कसं शक्य आहे? माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मला, मला तरी हे निश्चित माहित नव्हते. मग भीष्मांनी असें का म्हणावे? ह्याचा अर्थ एकच माझ्या आईवडीलांना, भावाला, शकुनीला हे ठाऊक होते तर. हतबुद्ध झाले मी. आलेला हुंदका घशातच अडकला, इथे रडण्याची चोरी होती. हळुहळू एकेका प्रश्नाची उत्तर मिळू लागली. आईच्या डोळ्यांना लागलेली संतत धार. बाबांचा आनंदाचा मुखवटा. कां फसवल मला माझ्या खुद्द आईवडीलांनी? पर्याय होता कां बाबांना? मला मागणी घालायला आलेल्या दूतांबरोबर इतका फौजफाटा का होता याचे उत्तर मिळालं. सुबल राजाला, माझ्या बाबांना धाक म्हणून पाठवलं होत तर सैन्य, नाहीतर कुरु राज्याचा ध्वज मिरवणाऱ्या पथकावर हल्ला करण्याच वा लुटण्याच धारिष्ट्य कोणात होत? होकार जवळ जवळ धमकावूनच घेतल्यासारखा होता. मला हे कळलं असत तर मी विरोध केला असता, जीवाच काही बरवाईट करून घेतलं असत म्हणून बहुदा राज्यहीतासाठी माझा बळी गेला. काय करू मी? माझा भाऊ शकुनी. त्याला सोडून इथे मी कोणालाच ओळखत नाही, आणि तो तर आधीच विकला गेलाय. त्याच्या स्वतंत्र महालात गेल्यापासून त्याने माझी साधी चौकशी देखील केली नाही. त्याच्याकडून मदतीची काय अपेक्षा करणार. विवाह अटळ आहे. आता राग येतोय सगळ्यांचाच आणि सगळ्याचा. माझ्या असहायतेचा. कुरुकुळाला वारस हवा म्हणून माझा बळी, जन्मांध धृतराष्ट्राला हक्काची दृष्टी मिळावी, त्याची कायमची काठी व्हावी म्हणून माझा बळी. बदल्यात राजमाता पद, हे ऐश्वर्य जे मी कधीच मागितलं नव्हतं. अक्षरं जोडायची म्हटली तरी एकाचा पाय मोडावा लागतो. नात्यातही नेमक हेचं असतं तडजोड करावीच लागते, पण फसवणूक नाही. ज्या विश्वासावर नात्याची वास्तू उभी राहते तो मुळातूनच हरवला होता. बसं ठरलं. मी धृतराष्ट्राची दृष्टी होणार नाही. त्याची काठी होणे मला मान्य नाही. मी ही फसवणूक सहन करणार नाही. काय करणार होते मी? विवाहाला उभी रहाण्यापुर्वी माझा निर्णय मी जाहीर केला “माझ्या पतीला जे दृष्टी सुख नाही ते मी उपभोगणार नाही. माझ्या डोळ्यांवर मी आजन्म  पट्टी बांधून राहीन” माझ्या निर्णयाचा काय परिणाम होईल ते माझ्या ध्यानीमनीही नव्हते मी फक्त धृतराष्ट्राचा, माझ्या होणाऱ्या अन्ध पतीवर सूड घेतल्याच्या आनंदात होते. माझा सूडाचा आनंद क्षणभंगुर ठरला. माझ्या नावाचा जयजयकार सुरु झाला. पतिव्रता, महासती उपाध्यांनी माझा सत्कार होऊ लागला, प्रजा माझी थोरवी गाण्यात दंग झाली. जी पट्टी मी माझ्या हाताने बांधली तिची गाठ आता नीरगाठ झाली होती, कधीही न सुटण्याकरिता. ढोल ताशांच्या गदारोळात विधवेला सती सती म्हणत नवऱ्याच्या चितेवर ढकलणारा हा समाज मला पट्टी कधीच काढू देणार नाही हे नक्की होत.  धृतराष्ट्राला माझ्या निर्णयाने राग आला असेल, दु:ख झालं असेल तर त्याने ते तसं दिसू दिल नाही.

प्रत्येक स्त्रीची आपल्या लग्नानंतरची पहिली रात्र कशी असेल याची काही स्वप्न, काही अपेक्षा असतात, त्या स्वप्नांचा आकांक्षांचा चुराडा झाला. ती रात्र बाकी कशीहि असेल पण ती चाचपडण्यात जाईल असें मात्र कधीही वाटल नव्हतं. तो जन्मजात अधू आणि मी माझ्या प्रतिज्ञेमुळे. पुढील प्रवास तर एखाद्या दु:स्वप्नागत. आपल्याला सतत कोणीतरी पाहत आहे ही जाणीव डोक्यातून निघतच नव्हती. धृतराष्ट्राला जन्मापासून ह्या गोष्टीची सवय होती किंबहुना कोणीतरी सतत बाजूला असणे ही त्याची गरज होती आणि माझ्या बाबतीत ती नव्याने निर्माण झाली होती. मीच निर्माण केली होती ती! धृत्राष्ट्राने जग बघितलच नव्हतं, रंग नसणे म्हणजे काय हे समजण्याकरिता रंग एकदा तरी पहावे लागतात. प्रकाश ज्याला माहीतच नाही त्याला अंधार असण्याचे वा प्रकाश नसण्याचे दु:ख काय समजणार? पण माझ्याकरिता उगवणारा प्रत्येक दिवस हा रंगहीन, प्रकाशहीन होता. खरच कां हा अंधार मी मनापासून स्वीकारला होता? स्वतःचे डोळे बांधून घेण्याच्या या निर्णयाचा पश्चात्ताप कधीच झाला नाही कां?

माझ्या पहिल्या पुत्राचा, दुर्योधनाचा जन्म. माझ्या मुलाच पाहिलं दर्शन? माझ्या हातांच्या स्पर्शाने, ओठांनी आणि सुईणीने केलेल्या वर्णनावरून आलेली ती फक्त एक कल्पना. हे त्यानंतर प्रत्येक मुलाच्या जन्माच्यावेळी झाल. पुढे पुढे मूल हातीपायी, नाकीडोळी धड आहेना एव्हढे विचारून माझे कुतूहल मी शमवू लागले. स्तनपान करून निजलेल्या निरागस बाळाचा चेहेरा बघणे काही माझ्या भाग्यात नव्हते. मातृसुख म्हणजे फक्त प्रसूती वेदानां, एव्हढच समीकरण माझ्याकरिता शिल्लक राहीलं.

दुर्योधनाचा राज्याभिषेकाच्यावेळी, पांडवांनी राजसूययज्ञा नंतर केलेल्या सांगतेच्या वेळी, आद्य पूजेचा मान कृष्णाने स्वीकारला तेंव्हा, द्यूतात पांडव सर्वस्व हरले तेंव्हा, शरपंजरी पडलेला भीष्म, दुर्योधानाच्या मृत्युनंतर शोकाकुल झालेला धृतराष्ट्र

आणि महायुद्धात माझ्या सर्वाधिक मुलांच्या मृत्यूला कारणीभूत झालेला भीम मानभावीपणे आमच्या संत्वानाकरिता आला तेंव्हा, होय, या प्रत्येक वेळी आणि अशा अनेक क्षणी मला माझ्या डोळ्यांवरची पट्टी ओरबाडून काढावीशी वाटली.

पुत्र जन्माच्या शर्यतीत कुंतीने बाजी मारली. युधीष्टीराचा जन्म दुर्योधनाच्या आधी झाला. माझ्या पतीने औदार्याचा आव आणीत पांडवांना खांडव वन देऊ केलं आणि त्यांनी त्याच नंदनवन करीत इद्र्प्रस्थ उभे केले. त्यानंतर त्यांनी केलेला राजसूय यज्ञ, उभे केलेलं वैभव आणि मिळालेली वाहवा, प्रसिद्धी. हस्तिनापूरच्या नाकावर जणू टिच्चून आपल साम्राज्य उभारल पांडवांनी आणि कुरुकुलाच्या राजमातेच पद माझ्या हातून हिसकावून कुंतीच्या हाती सुपूर्त होतंय अस वाटू लागलं. कुरुकुळाची राजमाता बनण्याचे माझे स्वप्न स्वप्नच राहील, असें वाटू लागले दुर्याधानाच्या महत्त्वाकांक्षेने, शकुनीच्या कुटील नीतीने, आधीच अंध असलेल्या धृतराष्ट्राने पुत्रप्रेमाने विवेकाचे सर्व दरवाजे बंद केल्याने त्या स्वप्नांना आशेची पालवी फुटू लागली. एका क्रोधाच्या क्षणी स्वीकारलेल्या अंधत्वाबरोबर आई म्हणून मुलांना योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मी झटकत होते की मी जशी पूर्वी होते तशीच आजही असाहाय आहे. तेंव्हा आई वडील, भाऊ, भीष्म ह्यांच्या पुढे आणि आता पती व पुत्रांपुढे. मागे न परतण्याच्या वाटेवर कौरवांची वाटचाल सुरु झाली. पुढे घडला तो अतर्क्य नृसंहार. राहिले फक्त राजेपद, प्रजाहीन राज्याचे.

आज वनात वानप्रस्थाश्रमात मागे वळून बघतांना पुनःपुन्हा एकच विचार मनात येतो, काय उरलं

 माझ्या हातात? ना मी महाराणी झाले, ना कुरुकुळाची राजमाता. राजमाताच काय माता म्हणून घेण्याकरिता माझा एकही पुत्र जिवंत राहिला नाही. स्वत:च पेटविलेल्या राज्य लोभाच्या वणव्यात सगळे जळून खाक झाले. ज्या कुंतीचा आयुष्यभर मी द्वेष केला तिच्याच मुलांचे आश्रित म्हणून जगण्याची वेळ आली. भयंकरच होते सारे आणि ह्याला जबाबदार कोण? माझे आईवडील, शकुनी, धृतराष्ट्र, भीष्म कां मी? मनोमन मी सगळ्यांनाच श्रापित होते. कोणत्याही सूडाची किंमत ही मोजावीच लागते.

Sunday, 4 April 2021

हा माझा .....

माझ्या नित्य रहिवासाची जागा सायन मुंबई असून अर्थार्जनाची कर्मभूमी नवीन मुंबई असल्यामुळे न चुकता नित्य नेमाने, दररोज (रविवार आणि सम शनिवार सोडून) सकाळी व संध्याकाळी (खरतर रात्री) सायन ते नवी मुंबई आणि परत हा जवळजवळ जाऊन येऊन ५०-५५ किमी चा प्रवास घडतो. घडतो, असे म्हणण्याचं कारण, सारथ्य सक्षमपणे सांभाळणाऱ्या चक्रधर स्वामींवर सर्व भिस्त ठेऊन मी मागील आसनावर निर्धास्त बसतो आणि रथ जाईल तसा जात राहतो. सुरवातीला वेळेचा सदुपयोग करा, गेलेला क्षण परत येत नाही वगैरे, बराच वेळ खर्ची पाडून, पूर्वी ऐकलेले सुविचार आठवून, वर्तमान पत्र वाचनाने सुरवात करून, व्होट्सअॅप पर्यंत येऊन सर्व प्रयत्न सोडून दिले. 

आता त्या वेळात काय करतो?, खिडकीच्या बाहेर बघत बसतो. काय सांगू, खूप गंमत आहे असं बघत बसण्यात. चालकांचे (बेस्ट ने प्रवास करायला लागे पर्यंत ड्रायव्हरला मराठीत प्रती शब्द नाही असाच माझा समज होता) विविध नमुने पाहायला मिळतात. मला नेहमी वाटत्तं की चालकांच्या स्वभावाच प्रतिबिंब त्यांच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीत दिसून येतें. वरवर बघता चालकांचे, चार गट त्यांच्या पंथ निवडीवरून मी पाडतो. वाम, उत्तम, उपलब्ध आणि स्वैर. पंथांच्या नावांवरून तुम्हाला त्यांच्या शिकवणीची व त्यांचे अनुसरण करणाऱ्यांच्या स्वभावधर्माची थोडीफार कल्पना आली असेलच. तरी थोडं अधिक खोलात शिरतो.

ज्या पंथाचे आचरण करणाऱ्यांना आणि त्यांच्या सभोवती असणाऱ्या सर्वांस, सारखाच धोकादायक असणारा, अर्थात स्वैर पंथ. ह्या पंथाचे अनुग्रहित साधारण १७-२५ वयोगटातील दिसतात, एखाद-दोन कमी किंवा जास्त. वेळ दिवसातील कोणतीही. पण ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ सूर्यास्त नंतर जसजशी रात्र वाढत जाते तशी होतें. मध्यरात्री नंतर काही ठरावीक रस्त्यांवर त्यांचा प्रादुर्भाव वाढतो. ह्या पंथाचं अनुसरण करणाऱ्यांची काही व्यवछ्छेदक लक्षणे आहेत. उदा.  यांत्रिक दुचाकी, (मोटार सायकल वा मोटार बाईक) ही प्रवासाच साधन नसून लोकांना घाबरवण्याचे वा मुलीबाळींमधील सूमार बुद्धिमत्तेच्या वर्गाला प्रभावीत (प्रभे शिवाय) करण्याचे हत्यार आहे असा विश्वास. रहदारीचे नियमन करणाऱ्या लोह पट्टी (सिग्नल) वरील लाल दिवा हा इतरांना थांबवून, स्वैर मार्गीयांनाच जाण्याकरिता असतो अशी ठाम समजूत इत्यादी. ही मंडळी तुमच्या ध्यानीमनी नसताना तुमच्या गाडीच्या डाव्या अथवा उजव्या (बहुदा डाव्याच) अंगाशी घसट करीत तुम्हा समोरून तुम्हाला प्रसंगाचे आकलन हो होस्तो पुढील वाहनाशी लगट करीत त्याही वाहनाच्या पुढे अदृश्य होतात. समोरील वाहनाला मागे टाकून या स्वैराचारींचे पुढे जाणे सर्वस्वी तुमच्या नशीबावर अवलंबून असते. ही मंडळी ह्यांच्या वैयक्तिक जीवनात देखील बेदरकार असावीत, योग्य अयोग्य, चूक बरोबर ह्याचा विचार न करता, परिणामांची तमा न बाळगता, क्षणिक थरारा करता, रोमांचक अनुभव घेण्याकरता ह्यांच्या हातून काहीही कृत्य घडू शकेल. एकूणच ह्यांची संगत टाळता आली तर उत्तम.

वाम मार्ग, ह्या मार्गाचे आचरण करणारे उत्तम मार्गाच्या अगदी विरुद्ध असतात, पुढील वाहनाच्या डाव्या बाजूनेच पुढे जायचं असत ह्यावर ठाम विश्वास ठेवणारे आणि ह्यात गैर काहीच नाही असं नुसते न मानता आचरणात आणारे. तसं बघायला गेल तर हे लोक धाडसी असतात, धाडसी अशाकरता की, पुढील वाहन चालकाच्या कृपेवर सर्वतः ह्यांचे जगणे अवलंबून असते. ह्यांचा वाममार्गावरून जाण्याचा अट्टाहास बघितला कि कुठेतरी हे सर्व पांथस्थ डावरे असावेत आणि त्यांच्या करता डावं हेच उजव असावे असं वाटतं, (खर सांगतो, डावऱ्यां लोकांनी गैरसमज करून घेऊ नये पण हा संशोधनात्मक प्रबंधाला योग्य विषय आहे असें वाटते). ह्या मार्गावरून जाण्याकरिता वयाची कोणतीही अट नसते. ह्यां पंथातील लोकांचा शेवट बहुतेक स्वैर पंथांच्या मार्गाने जाण्याची मोठी शक्यता असते. ह्या मार्गाने जाणारी मंडळी बहुतेक शोर्ट कट वर विश्वास ठेवणारी असवित. ‘जुगाड हा शब्द त्यांच्या शब्दकोशात बहुतेक पहिल्या पानावर असतो. ही मंडळी त्यामुळे लोकप्रिय असू शकतात पण त्यांच्या किती जवळ जायचं हे ज्याच त्याने ठरवायचं आहे.

उपलब्ध मार्गीय, सहसा संधीसाधू असतात. मार्गाच्या नावाप्रमाणेच कुठल्याही एका मार्गाचा आग्रह हे धरीत नाहीत. साधारणत: पुढील वाहनाने निर्माण केलेल्या पोकळीचा फायदा घेत पुढे जाण्याच्या प्रयत्नात दिसतात. वाम मार्गाचा वापर जर त्यांच्या करिता सुरक्षित असेल तर निषिद्ध नाही. सहसा धोका पत्करत नाहीत आणि त्यांच्या पासून इतरांना धोका (त्याचा त्रास शेवटी त्यानाही होणारच) पोहोचणार नाही असा त्यांचा प्रयत्न असतो. मुख्यत्वे सदैव स्वतःचा फायदा बघणे इतकांच हेतू असतो. ही मंडळी शेवट, अंगिकारलेल्या पद्धतीचे समर्थन करतो’ (End Justifies the Means) या विचारसरणीवर विश्वास ठेवणारी असावीत त्यामुळे वैध, अवैध वगैरे भेद ते करीत नाहीत. ह्यांची संगत नसली तरी फारसं बिघडणार नाही कारण फायदा शेवटी त्यांचाच होणार.

वरील तीन मार्गात विभागल्यावर उरणारी बाकी मंडळी उत्तम मार्गाचा वापर करताना दिसतात. अर्थात ही संख्या तशी कमीच असते. तसं बघायला गेलं तर ह्या मार्गाचे अनुकरण खूप सोपं आहे. रहदारीच्या नियमांचं पालन करणे, वेळेवर निघणे वगैरे साधे सोपे नियम पाळण्याने ह्या मार्गाचे अनुकरण सहज शक्य आहे. नियम पाळणे आणि इतर वाहनचालकांचा आदर करणे ही दोन पथ्ये पाळलीत तर गंतव्य ठिकाणी वेळेत सुरक्षित पोहोचणे सहज शक्य आहे.

अर्थात आपला मार्ग आपणच निवडायचा,  सुज्ञास अधिक सांगणे न लगे!


Saturday, 27 March 2021

भीष्म

 

सूर्य कधीचाच मावळला होता. बहुदा अमावस्या असावी नभांगण तारकांनी खच्चून भरले होते. आकाश गंगेचा पट्टा त्या गर्दीतही उठून दिसत होता. दूर कुठेतरी कोल्हेकुई ऐकू येत होती. जवळच तरसांचे अशुभ हसणे ऐकायला येत होते. मधेच त्यांच्या दाताखाली फुटलेल्या हाडांचा आवाज त्या भेसूर शांततेचा भंग करीत माझ्या कानांपर्यंत पोहोचत होता. दिवसा गिधाडे, कुत्री, आणि सूर्यास्त होताच तरस, कोल्हे, महायुद्धात हकनाक मेलेल्या पशूंच्या मढ्यांवर ताव मारत असतात त्यांची पोट फुगून जमिनीला लागायची बाकी आहेत पण त्यांची मेजवानी काही संपत नाही. ज्या वीरांची पार्थिवं धड मिळाली त्यांच्यावर अग्निसंस्कार तरी झाले पण हत्तींच्या पायदळी दबुन, रथांच्या चाकाखाली भरडून जमिनीत गाडलेले मनुष्य देह तसेच कुजत पडले होते आणि हे रात्रींचर पुख्खा झोडत होते. अठरा अक्शौणी सैन्याचा संहार झाला होता. झालेला रक्तमांसाचा चिखल अजुन पुरता वाळला देखील नव्हता. एखादे तरस हुं हुं करीत माझ्या जवळ येतें आणि माझ्या जिवंतपणाची चाहूल लागताच दचकून माघारी फिरते.

या कुरुक्षेत्रावर महाभारतातील महासंग्राम झाला होता. महासंग्राम कशाकरिता? आंधळ्या महत्वाकांक्षेकरिता? दोन्ही बाजूंनी लढणाऱ्या सैनिकांचे एकमेकांशी काय वैर होते?, एकमेकांना ओळखत देखील नव्हते ते. भयावह होता तो नृसंहार. मी देवव्रत, मी भीष्म, भीष्माचार्य, भीष्म पितामह, कुरु वंशातील सर्वात वृद्ध सर्व साक्षी, महायुद्ध संपून अठरा दिवस लोटले. कुरुक्षेत्री शरशय्येवर, बाणांच्या तीक्ष्ण अग्रांवर माझा क्षीण देह तोललेला आहे आणि मी त्या वेदनांच्या पलीकडे जाऊन वाट पहातो आहे, उत्तरायण सुरु होण्याची वाट पहातो आहे.. या क्षणीही माझ्या आयुष्याचा क्षण अन क्षण माझ्या डोळ्यापुढे आहे मला विस्मरणाचे वरदान नाही.

शापीत गंगेच्या पोटी, शापीत अष्ट वसूंपैकी एक, देवव्रताच्या रूपाने जन्माला आला. वसिष्ठ ऋषींच्या शापामुळे आणि इंद्राच्या आज्ञेमुळे पृथ्वीवर मनुष्य योनीत जन्म घेणे अष्ट वसूंना क्रमपात्र होते आणि ब्रह्मदेवाने दिलेल्या शापामुळे कुरु राजा शंतनुची पत्नी होणे स्वर्ग लोकीच्या गंगेला अपरिहार्य होते. अष्ट वसुंनी गंगेला विनंती केली की आम्हाला तुझ्या पोटी जन्माला येउदे आणि जन्मत:च तू आमचा मनुष्य जन्म संपवून टाक. ठरल्याप्रमाणे सात वसूंना गंगेने नवजात अवस्थेतच पाण्यात बुडवून मुक्ती दिली पण शंतनुच्या विरोधामुळे आठव्या वसुला मात्र मनुष्य योनीत जगावं लागलं आणि खऱ्या अर्थाने शाप भोगावा लागला. आधीच ठरल्याप्रमाणे शंतनुला सोडून मला हृदयाशी कवटाळून गंगा, माझी माता स्वर्ग लोकी परत आली. क्षत्रियाला योग्य अशा अस्त्रशस्त्रा सहित सर्व विद्यात मी तेथेच पारंगत झालो. कुरु वंशाला साजेसा तरुण राजकुमार म्हणून मातेने मला माझ्या पित्याकडे, हस्तिनापूरचे महाराज शंतनु ह्यांच्या स्वाधीन केले. ती माझ्या वडिलांची आणि माझी पहिली आणि माझी माझ्या मातेशी शेवटची भेट.

देवव्रताला, ज्या प्रतिज्ञेमुळे त्याला भीष्म ही उपाधी प्राप्त झाली त्या प्रतीज्ञेकडे जरा पाहू. माझ्या पित्याच्या, शंतनुच्या, सत्यवतीशी विवाह करण्याच्या मागणीला, दशराजाचा, सत्यवतीच्या पित्याचा विरोध होता. देवव्रत, शंतनुचा थोरला पुत्र, हस्तिनापूरचा अभिषिक्त राजकुमार आणि गादीचा वारस जिवंत असतांना सत्यवतीच्या संततीला सत्ता मिळणे दुरापास्त होते. पिता म्हणून आपल्या कन्येचे हित तो पहात होता. आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता मी हस्तिनापुराच्या सिंहासनावरचा आपला हक्क सोडून दिला. ज्या वयात वानप्रस्थाश्रमाचा विचार करायचा त्या वयात माझा पिता लग्नाचा विचार करीत होता. कां सोडला मी माझा अधिकार? तेव्हढ्याने दशराजाचे समाधान झाले नाही. दशराज विचारता झाला “देवव्रता, तुझ्या मुलांचं काय? उद्या ती सत्तेवर अधिकार सांगतील आणि सत्यवतीच्या मुलांबरोबर त्यांचा कलह होणार नाही ह्याची खात्री तू कशी देशील?” दशराजाला कुरु कुळातील गृह कलह बहुदा आधीच दिसला होता. उत्तरा दाखल मी तेथे हजर असलेल्या लोकांच्या समक्ष प्रतिज्ञा केली “आजन्म ब्रह्मचारी राहीन” प्रतिज्ञा लग्न न करण्याची नव्हती कारण राज घराण्यात विवाहेतर संतती होणे गैर मानले जात नव्हते. थोडक्यात कोणत्याही परीस्थित मी कुरु कुलाचा वंश पुढे चालवणार नाही ही प्रतिज्ञा. खरचं का मला, सत्तेची आस नव्हती? प्रतिष्ठित कुरु सिंहासनावर बसण्याची इच्छा नव्हती?  कां त्यागाची देखील एक प्रकारची झिंग असते.. मद्याच्या पेल्यागत, एक रिचवल्यावर दुसरा आणि मग तिसरा सहज उचलला जातो. चढत्या क्रमाने मी त्यागाची परिसीमा गाठली. जर मी नकार दिला असता तर?  महासंग्राम घडला नसता?

घोर प्रतिज्ञा कि अघोरी प्रतिज्ञा? जेव्हा कुरु कुळाला वंशाची नितांत गरज होती (सत्यवतीचा दुसरा मुलगा विचीत्रवीर्य, याच्या अकाली मृत्यू नंतर) आणि तो देणे ही कुरु कुळातील हयात पुरुष म्हणून सर्वस्वी माझी जबाबदारी होतीं ती जबाबदारी मी ह्या प्रतिज्ञेमुळे पार पडू शकलो नाही. माझ्या असाह्यते मुळे महर्षी व्यासांना (सत्यवतीला पराशर मुनीं- पासून झालेला पहिला पुत्र, विचीत्रवीर्याचा सावत्र भाऊ) विचीत्रवीर्याच्या विधवांना नियोगाने संतती धारण करण्याकरिता  पाचारण केले गेलं. परिणामत: अंध धृतराष्ट्र, नपुंसक पंडू आणि दासी पुत्र विदुर ह्यांचा जन्म. तिघेही हस्तिनापूरच्या राज्य पदासाठी अयोग्य. काय मिळालं मला माझ्या प्रतिज्ञेमुळे? ना माझा.. ना कुरु कुळाचा.. कोणाचाच फायदा झाला नाही. किंबहुना दशराज जे टाळण्याचा प्रयत्न करीत होता ते घडवून आणण्यात माझ्या प्रतिज्ञेने हातभारच लावला.

जे करायचं नव्हतं तेच करीत आलो. प्रथम आपल्या सावत्र भावाचा विवाह. आपली नाही तर त्याच  भावाच्या विधवांना नियोगानी झालेली मुले सांभाळली, त्यांचे विवाह केले. त्यांच्या मुलांचा म्हणजे माझ्या नातवांचा सांभाळ केला आणि ज्या कुरु कुळाच्या सिंहासनावर बसण्यास, सत्ता उपभोगण्यास नकार दिला होता, तीच सत्ता अनिर्बंध, अनभिषिक्त अनुभवली. जो गृह कलह टाळण्याचा प्रयत्न केला त्या वितुष्टाची परिणीती म्हणून आज शरशय्येवर एकटा पडून, देह त्यागाच्या योग्य वेळेची वाट पाहत आहे.

खरचं काय मिळवलं मी? क्षत्रिय धर्माला अनुसरून योद्धा म्हणूनही कधी माझं नाव झाल नाही. काशी राजाच्या कन्या (अंबा, अंबिका आणि अंबालिका) ह्यांच स्वयंवरातून हरण करतांना कुरु कुळाचा प्रभाव कामी आला. काशी राजानेही विचार केला असेल कुरु कुळाशी सोयरिक होत असेल तर विरोध का करावा? गांधार देशाच्या राजकन्येचा अंध धृतराष्ट्राशी केलेलेला विवाह असो किंवा कुंती, माद्रीचा नपुंसक पंडूशी विवाह असो, केवळ कुरु कुळाशी संबंध जुळून येत होता म्हणून चालून गेलं. त्यात माझं श्रेय काहीच नाही. ह्या स्त्रियांचे मिळाले असतील तर शापच. (हा एक वेगळाच विषय आहे). युधिष्टीराने केलेल्या राजसूय यज्ञाच्या सांगतेचे यजमानपद शिशुपाल सांगत असताना देखील स्वीकारण्याचे धाडस मला झाले नाही. राजसभेत द्रौपदी वस्त्र हरणाच्या वेळी हस्तक्षेप करून चाललेला प्रकार मी थांबवू शकलो नाही. कां मला खात्री नव्हती, कि मी थांब म्हटल्यावर धृतराष्ट्र पुत्र माझ ऐकतील? दुर्योधनाच्या नादाने विराटाच्या गोधनाचे हरण करण्याकरिता कुरुसेने सोबत गेलो आणि एकट्या अर्जुनाच्या हातून कर्णद्रोणा सहीत सर्वजण पराभूत होऊन शरमेने माना खाली घालून हस्तिनापुरी परत आलो .

काय केलं नाही मी गुह कलह टाळण्याकरिता? माझ्या प्रतिज्ञेचा तोच तर खरा अर्थ होता. शेवटचा प्रयत्न म्हणून दुर्योधनाने दिलेले कौरव सेनेचे सेनापतीपद मी स्वीकारले. दुर्योधनाने जे केवळ औपचारिकता म्हणून देऊ केले होते. अर्जुन माझ्या विरोधात लढणार नाही आणि तह होऊन यातून मार्ग निघेल असें वाटत होते पण कृष्णाला हे मंजुर नव्हते त्याने अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त केले. माझ्या अधिपत्याखाली मी महायुद्धाचे पहिले नऊ दिवस जणू लुटुपुटीचे युद्ध खेळत होतो. दोन्ही पक्षांकडून कोणताही महत्वाचा योद्धा धारातीर्थी पडला नाही. हे फार दिवस चालणे शक्य नव्हतं. नवव्या दिवशी कृष्णाने रथातून उतरून मी भीष्माचा शेवट करतो असें सुचविले होते. त्यालाही युद्ध खऱ्या अर्थाने व्हायला हवे होते. द्रोण, कर्ण इत्यादी महारथी ही लुटूपुटीची लढाई फार काळ चालू देणार नव्हते. मार्ग एकच होता युद्धात धारातीर्थी पडणे. दक्षिणायन सुरु असल्यामुळे मृत्यू येऊन चालणार नव्हतं पण युद्धातून बाजूला होणे अत्यावश्यक होते. कृष्ण पांडवांचा त्राता असताना पांडवांचा पराभव केवळ अशक्य होता. मी सेनापती पदावर असताना कौरव हरते तर  ह्याहून मोठी नामुष्की नव्हती. तेंव्हा माझ्या पतनाचा मार्ग मीच भोळ्या युधिष्टिराला दाखवला आणि शिखंडीला पुढे घालून अर्जुनाने सोडलेल्या बाणांनी मी धारातीर्थी पडलो. शरशय्येवर पडून आज उत्तरायणाची वाट पहातो आहे.

मागे वळून पहाताना एक गोष्ट निश्चित जाणवते भीष्म प्रतिज्ञेच्या बदल्यात जे मिळालं त्याच महत्व मला कळलंच नाही. मला काय मिळालं? तर शंतनु कडून इच्छा मरणाचा वर!! खरंतर केवढे मोठे वरदान होते ते. सात वसुंनी गंगेच्या मदतीने शापातून मुक्तता मिळवली होती आणि ह्या आठव्या वसुला खुद्द त्याच्या पित्याने नेमकी तीच संधी उपलब्ध करून दिली होती,  “जा शापातुन मुक्त हो, स्वगृही, स्वर्गात जा”. त्या वरदानाच मी काय केलं तर उत्तरायणाची वाट बघण्याकरिता वापरलं. काय चुकल माझं? नात्याने कौरव, पांडव दोघेही मला सारखेच मग मी असत्याची बाजू घेऊन कौरवांकडून का लढलो? कृष्ण पांडवांच्या बाजूने आहे ह्यातच निर्णय झाल्यासारखाच होता. मी पांडवांच्या पक्षात गेलो असतो तर काही वेगळ घडलं असत का? कां कौरवांचा मिंधा झालो होतो मी? कां सारा दोष नियतीचा म्हणायचा आणि आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं?    

मी शापीत म्हणून जन्माला आलो आणि शापीत म्हणूनच जाणार हेच खरं!

Thursday, 4 March 2021

चहा

हा विषय खरेतर चहा पितापिता बोलून संपविण्याचा नाही. आजपर्यंत ह्या विषयावर जगभरात इतकं लिखाण झाल असेल, कि त्याची पानं मोजली तर आसामातल्या चहाच्या मळ्यातील पानांपेक्षा कदाचित जास्त किंवा तितकी तरी नक्कीच भरतील. मी त्यात भर घालण्याच्या विचारात नाही. पण .. नेहमीचच, जित्याची खोड ..

चहा कसा असावा ह्या वर तज्ञ मंडळीत बरीच मतमतांतर असतील, पण माझ्या दृष्टीने तो कसाही चालतो. फक्त हवा तेंव्हा नेमका मिळाला पाहिजे आणि नाही म्हणायला चहा गरम असावा. (कोल्ड टी च्या जमान्यात ह्यावरही वाद होईल).  

जपानी आणि चिनी बांधवांनी (उल्लेख करायला पण हल्ली भीती वाटते) चहा पिण्याच्या या सोप्या साध्या क्रियेचा उत्सव केला आहे. छोटे छोटे सुरेख कलाकुसर केलेले चिने मातीचे कान नसलेले कप (चषक, पेला चहाला योग्य नाही वाटत), त्यांची ताई शोभेल अशी पण नाजूक किटली. त्यातून बाहेर पडताना वाफ देखील बहुदा जपानी संगीताच्या लयीत बाहेर पडत असेल. पाय मुडपून जमिनीवरच्या आसनावरची बैठक. चहाचा हवेत दरवळणारा तो तरल सुगंध. (वास नव्हे. आलं उकळताना येतो तो.. तोही काही वाईट नसतो म्हणा) त्यात मिसळलेला धुपाचा मंद गंध. (धूप कांडी नव्हे) अहाहा! त्यात अदबीने, सुहास्य मुद्रेने, ते देखील, त्या माहोलाला साजेसं (वातावरण चालला असता.. पण माहोलात आहे ते वातावरणात नाही) हाताच्या अंजलीतून (ओंजळीत आणि अंजलीत काही तरी फरक आहे?) दिलेला तो कप, तितक्याच हळुवार पणे आपल्या हातात घेतल्यावर, बाकीच्या कषायांच्या हातात कप जाई पर्यंत  थांबून,  किंचित वाकून अभिवादन केल्यागत करून, मगच तो कप ओठाला लावायचा. हुश्श!!

माझा चीन मधला अनुभव सांगण्यासारखा आहे. एका मिटिंग मध्ये कुल्लड सारखेच पण त्याहून मोठे आणि वर कलाकुसर असलेले कप ग्रीन टीने भरून ठेवले होते. चहा गरमच प्यावा या नियमानुसार मी तो संपवला. जणू अदृष्यातून अवतरावी तशी एक सेविका अवतरली आणि तत्परतेने तिने तो भरला. कमरेत थोडं झुकून सुहास्य वदनाने माझ्याकडे एक कटाक्ष टाकून ती पुन्हा अनंत्तात विलीन झाली. हे इतकं वेगाने घडलं की काही समजे पर्यंत तो वाफाळलेला कप माझ्या अधरांची अधिरतेने वाट बघताना दिसला. त्या वातानुकुलीत कक्षात मलाही मोह आवरला नाही आणि मी तो रिता केला. त्या चपळ बालिकेने मला पुनः प्रत्ययाचा आनंद देत माझा रिकामा कप पुन्हा भरला आणि मीही तिला नाराज केलं नाही. अस दोन तीन वेळा घडल्यावर काहीतरी चुकतंय हे माझ्या लक्षात आलं. ग्रीन झाला म्हणून काय झालं शेवटी पाणीच ना? त्यातून वातानुकुलीत कक्ष. पाण्याने आपल काम केलं. माझी अवस्था काय झाली होती म्हणून सांगू, एकतर स्त्री दुभाष्या मार्फत संवाद साधण्याचा प्रयत्न करत चाललेली सभा, माझ्या अवस्थेचे तिला काय वर्णन करायचं आणि काय विचारायचं? सगळा प्रसंगच. मिटिंग संपण्याची एव्हढ्या आतुरतेने मी खचितच वाट पहिली असेल.

व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात, तद्वत, जितक्या प्रकृती तितके चहाचे प्रकार असें म्हणायला हरकत नाही.  इराणी, मसाला, ग्रीन, काळा, हरबल, निलगिरी, इत्यादी आणि हल्ली नव्याने लोकप्रिय होणारा म्हणजे तंदुरी, बासुंदी. शेवटचा प्रकार चाखायचा अजून धीर झालेला नाही.

बाकी काय असेल ते असो, पण टपरी वर दोस्तांबरोबर कटिंग मारण्यात (पिण्यात नाही) जी मजा आहे ती काही औरच. त्यातून भटाचा चहा. त्याला चहा बनवताना बघणे म्हणजे एखाद्या वाद्यावृंदाला हजेरी लावण्यागत आहे. फरक इतकाच की इथे रचनाही त्याचीच आणि वादकही तोच. त्याच्या पितळी कषाय पात्रात (त्याला धरायला एक दांडी असते आणि त्या दांडीला एक कळकट्ट फडके गुंडाळलेले असते) एक पितळी पळी उलट सुलट वेगाने, दूध कडेला किवा तळाला लागणार नाही ह्याची दक्षता घेत फिरत असते. आपल्या अस्तित्वाचा जागर करीत, भट अधून मधून ती पळी भांड्याच्या कडेवर आपटून (बहुदा दोनदाच) नाद करीत असतो. माप म्हणाल तर चहा, साखर मुठीने टाकली जाते. दूध, बाजूच्या ग्यास स्टोव्हवर उकळत असते आणि चहाच्या पातेल्यातील पळी, पळीतला चहा दुधात न पडता चपळाईने भरून घेत कळेकळे पर्यंत पुन्हा चहाच्या भांड्यात प्रविष्ट होत एक सफाईदार गिरकी घेते. खलबत्यातील आलं आणि वेलची (सालच दिसतात बहुदा) कुटून एकत्र केलेलं मिश्रण त्या उकळत्या रसायनात पडतं. हे सर्व चालू असताना, उजव्या हाताने चार किंवा पाच काचेचे ग्लास खाली ठेवलेल्या पाण्याच्या बादलीत बुचकळून समोर उपडे ठेवले जातात. खरी गंमत पुढेच आहे, कषाय पात्रातील त्या उकळत्या रसायनाचे काही थेंब पळीने भट आपाल्या तळहातावर घेऊन चाखतो. अजून मी तरी भटाला त्या स्थितीतील चहात बदल करताना पाहिलेले नाही. पुढल्या क्षणी दोन्ही हातांनी कषाय पात्राची दांडी धरत समोरील फडक्याने (ज्याचा मूळ रंग काय असेल हे ब्रह्मदेवाला ही सांगणे शक्य नाही) झाकलेल्या भांड्यात उपडे करतो. कषाय पात्र पुन्हा धगधगत्या स्टोव्हवर चढवले जाते. त्यातील पळीने पायाशी असलेल्या दुसऱ्या बादलीतून (ग्लास बुचकळलेल्या नव्हे, तसा दोन्ही बादलीतील पाण्याचा रंग सारखाच असतो) पाणी भराभर भांड्यात घेऊन पुढील आधण ठेवले जाते. फडक्यातील चहा तोपर्यंत खालच्या भांड्यात जमा होतो. पण त्याने भटाचे समाधान होत नाही. मग हातातील सांडशीच्या (तेव्हढाच उपयोग पहिलाय सांडशीचा) मदतीने त्या फडक्यातील चहा पिळून घेतला जातो. फडक्यावरील चहाचा चोथा सफाईने गिऱ्हाईकांच्या मागे ठेवलेल्या डब्यात रिकामा होतो आणि गिऱ्हाईक देखील तितक्याच तत्परतेने भटाला वाट करून देतात. आता हे अभूतपूर्व रसायन उर्फ चहा नुकत्याच निथळलेल्या ग्लासात ओतून, हातात कमीत कमी तीन ग्लास घेऊन गिऱ्हाईकला पेश केला जातो. रोजचे गिऱ्हाईक (भटाकडे उकळा, (चहा नव्हे) व कॉफी देखील मिळते, पण ते काही खरे नव्हे) तितक्याच सफाईने तो गरम ग्लास अंगठा, तर्जनी व मधलें बोट या मध्ये पकडत, दोन पाऊले मागे होत नवीन गिऱ्हाईकांना जागा करून देते. भटाची कलाकारी, डोळे भरून पाहिल्यावर, गरम गरम चहाचे चवी चवी ने घुटके घेत दोस्तांच्या संगतीत रसनेला तृप्त करण्याचे सुख भाग्यवन्तानाच लाभते.

खरंतर चार दोन घोटातच चहा संपतो. चहा निमित्त असतो. दोस्तांबरोबर वेळ घालवण्यातच आनंद असतो. अर्थात त्यामुळे चहाचं महत्व काही कमी होत नाही.

Friday, 10 April 2020

कृष्णा


कृष्णेने उचले पर्यंत, गेले किती युग त्या डोहांकाठी पडून होतो, कोण जाणे. काळा शाळीग्राम, काळ्याशार पाण्याचा डोह, काठावर पाण्यात पाय सोडून अनंत काळापासून उभ्या असलेल्या वृक्षांच्या सावल्यांनी अधिकच गडद भासणारा. कृष्णेने हलक्या हाताने मला थंडगार पाण्यात सोडले. शहारलो, त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शाने, पाण्याने अजून मला आपल्या मिठीत घ्यायचे होते. माझं लक्ष कृष्णेच्या चेहेऱ्याकडे गेलं. महायुद्धाच्या आगी पेक्षाहि धगधगणारी ती नजर शांत, गंभीर, या डोहाच्या पाण्यासारखी भासली. आणि हे काय? कृष्णेने आपले केस, ह्या महासंहाराला कारणीभूत ठरणारे आणि त्याचा शेवटही करणारे हे केस, आज मोकळे सोडले आहेत. मला कृष्णेची माफी मागावीशी वाटली. खरतर अनेक वेळा वाटलाय तसं, पण नाही मागितली.

कृष्णेने केस का मोकळे सोडावेत, मुळात बांधावेतच कां? भीमाची गर्जना आठवते ना, भर राजसभेत दुर्योधनाने आपली जांघ थोपटून कृष्णेस बसण्यास खुणावले ती जांघ गदेच्या प्रहाराने फोडणारा भीम! कपटाने? कोणी, कोणी कपट नाही केलं? की कपटी होण्याचा मक्ता फक्त शकुनी नी कौरवांकडेच होता? हो केलं कपट, पण दुर्योधनाचा तर वध केला? दुःशासनाने, हेच काळेभोर केस धरून कृष्णेला फरफटत राजसभेत आणली, ती रजस्वला एक वस्त्रा असताना. भर राजसभेत, माना खाली घालून बसलेल्या वयोवृद्ध, ज्ञानी, लाचारीने कृती शून्य झालेल्या भीष्म, द्रोणांसमोर, हर्शोन्मत्त होऊन, पुढे सांग, पुढे सांग असें विदुराला विनावणाऱ्या अंध बापासमोर, धृतराष्ट्रा समोर, कृष्णेची वस्त्र फेडणाऱ्या दुःशासनाची छाती फोडून ते उन उन रक्त प्राशन करून त्या रक्ताने माखलेल्या हातानी कृष्णेचे केस बांधण्याची घन गर्जना करणारा तो भीम. हा भीम आपले चारही भाऊ, कृष्णेचे पाचही पती हजर असताना आपल्या पत्नीची विटंबना टाळू शकला नाही. पुरुषार्थ कशात तर सुडात, म्हणे सूड घेतला. मी सूड घेतला म्हणून कृष्णे तू केस बांध नव्हे मी बांधतो. त्या रक्ताने बरबरबटलेल्या हातांनी भीमाने कृष्णेची वेणी घातली. तिने कुठे बांधले तिचे केस? मी नसतो तर त्या दिवशी काय झाल असत? कल्पनाच न केलेली बरी. तुला सम्राज्ञी बनवलं आणि साम्राज्य कसल तर शत शत विधवा स्त्रिया, माता, असंख्य अश्राप अनाथ बालके आणि गत योध्यांचे श्रापणारे वृद्ध माता पिता. माता म्हणून कृष्णेच्या पदरी काय पडलं तर इतक्या पुत्रांची माता असून निपुत्रिक मरण्याचच ना? कृष्णे तुझ कौतुक करावं तेवढ थोडच आहे. एव्हढया घोर प्रसंगात सुध्दा समयसूचकता शाबूत ठेवून तुझ्या निष्क्रिय पतींना तू दास्य मुक्त केलंस.  माहित होत मला हे असच होणार. नाही, कृष्णे अनेक वेळा वाटून देखील माफी मागायला जीभ रेटली नाही. टाळू शकलो असतो मी. मी हे सर्व टाळू शकलो असतो?

पाण्याने आता मला पूर्ण वेढून घेतलं होत, खाली वर चहु बाजूला पाणीच होत. हळूहळू अंगाखालची हवा एकदा ह्या कुशीने एकदा त्या कुशीने अशी सोडत तळाकडे जात होतो. हवेचे बुडबुडे जळाच्या पृष्ठभागावर आवाज न करता फुटून तरंग निर्माण करीत होते. कृष्णेची नजर त्या तरंगांचा मागोवा घेत डोहाच्या काठा पर्यंत जात होती. पाण्यातून कृष्णेकडे बघताना ती खूप सुंदर दिसत होती, अनंत भोगलेल्या वेदनांचा मागमूसही नव्हता त्या चेहेऱ्यावर. सुंदर स्त्री माझ्या आयुष्यात काही नव्याने पहात नव्हतो. असंख्य गोपी ज्यांची नावे इतिहासाला नोंदताच आली नाहीत, राधा, रुक्मिणी, सत्यभामा, सोळा सहस्त्र स्त्रियांचा मी पती, पण कृष्णेच्या सौंदर्याची प्रत आज काही निराळीच भासत होती. सहस्त्र दीपांनी झगमगणाऱ्या दीपावलीचा प्रकाश, लख्ख चमकून डोळे दिपवणाऱ्या विद्द्युलतेचा प्रकाश आणि देवघरात तेवणाऱ्या शांत समईचा प्रकाश. प्रकाशच! पण एक दुसऱ्यां सारखा नाही. तसच काही सौंदर्याच असतं. समईच्या निरागस मंद तेवणाऱ्या ज्योतीच्या रूपावर जाऊ नका. नको तेवढे जवळ गेलात तर दाह केल्याशिवाय राहणार नाही.  ह्या शांत शालीन सौंदर्याचा देखील महायुद्धात सहभाग होता. तिच्या सौंदर्याची महती ऐकून स्वयंवराला आलेल्या रथी महारथीं मध्ये कर्ण, दुर्योधन आणि महायुद्धात कौरवांच्या बाजूने युद्धात उतरलेले अनेक राजे महाराजे हजर होते आणि त्या सर्वांना जे शक्य झालं नाही ते माझ्या परम मित्राने, अर्जुनाने सहजी केलं. अर्थात त्या वेळी माझ्या अस्तित्वाची दखल कोणी घेतली नाही. पण अर्जुनाला वरमाला घातल्यावर कृष्णेने मजकडे बघून केलेले स्मित बरच काही सांगून गेलं. याज्ञसेनी ती, यज्ञाच्या ज्वाळातून जन्माला आलेली अग्नी शिखाच ती. दहन करण हा तिचा स्थायी भाव. कां पाचांना मुठीत धरायला लावली? ती तर जळणार आणि त्यानाही जाळणार. माहित होत मला कोणी कोणी म्हणून सुखी होणार नाही. कृष्णे कितीवेळा तुझ्या समोर आलो माफी मागायला. पण तुझ्या नजरेला नजर देण्याचा धीरच झाला नाही. टाळू शकलो असतो मी. मी हे सर्व टाळू शकलो असतो?

लडिवाळपणे आंजारत गोंजारत पाणी मला तळापर्यंत घेऊन गेल. तळातल्या वाळूने देखील थोड बाजूला सरून मला जागा करून दिली. तळातल्या मऊ मुलायम वाळूत स्थिरावल्यावर मी पुन्हा कृष्णे कडे बघितलं, ती माझ्या बघण्याची जणू वाटच बघत होती, नजरेत क्षणभर निर्भत्सना वाटली. छे कसं शक्य आहे कृष्णेच्या नजरेत माझ्या बद्दल फक्त आणि फक्त प्रेमच असू शकत. मी श्रीहरी, कायम तिची सोबत करणारा, तिच्या एका हाकेत धावून येणारा तिचा मित्र. कौरवांच्या सभेतील ती घृणास्पद घटना वा धुऊन पालथ्या घातलेल्या अक्षय थाळीतून सुग्रास पक्वान्नांच्या पंक्तीच्या पंक्ती उठवून दुर्वास मुनिंच्या क्रोधाग्नी पासून पांडवांना वाचविणारा, अडी अडचणीला धावून येणारा संकट विमोचक असा सखा. माझी निर्भत्सना केवळ अशक्य, का हे माझ्या मनाचेच खेळ आहेत. नाही निर्भत्सना निश्चित नाही पण कणव, सहानुभूती? मला नेहेमीच असं वाटत आलाय कि कृष्णेला सगळ माहित आहे, कळतंय सगळ तिला. पण तरी मी तिची माफी मागायला हवी होती. टाळू शकलो असतो मी. मी हे टाळू शकलो असतो?. खरंच? खरंच का मी हे टाळू शकत होतों? स्वतःला कर्ता करविता म्हणवतो मग टाळणार कसं. खरच जे मी करतो ते स्वयं इच्छेने करतो?, कि कधी होणारं आहे, काय होणार आहे  हे नेमकं माहित असलेला मी, केवळ मी एकटाच, म्हणून करविता?.

सूर्य बहुदा अस्ताला कलला. सावल्या अधिकच गडद झाल्यात त्यात कृष्णेने नेमके केस मोकळे सोडलेत. तिचा चेहेरा नीट दिसत नाही आहे. नजरही नेमकी उमगत नाही. कृष्णेच्या नजरेत नेमकं तेच तर म्हणायचं नसेल. नियतीच्या नियमांना मी देखील अपवाद नाही. नाहीतर पारध्याचा बाण नेमका माझ्या अंगठ्याला कसा लागता? माफी मागण हा देखील माझ्या मोठे पणाचाचं भाग. हेच बघाना पांडवांच्या बाजूने लढलो कौरवांच्या नाशाला ते स्वतः सोडले तर मीच खरा जबाबदार. तरी एव्हढा सुद्धा वाईट पणा माझ्या वाटेला आला नाही. मी कायम वंदनीयच राहिलो. कर्णाची तर गोष्टच वेगळी, कर्ण, कर्ण का आठवावा या क्षणी? कृष्णेशी आणि कर्णाशी माझ नात सारखच होत, खर नाही वाटत? ज्यांच्या वाटेला टोकाच दुःख येत साहजिकच ते मला अधिक जवळचे वाटतात.

आता कृष्णा जवळ जवळ दिसतच नाही. मुळात ती सावळी, ती जिथे आहे तिथला काळोख जरा जास्त गर्द वाटतोय इतकंच. माफी? कसली माफी मागणार होतो मी? खरच का टाळू शकणार होतो मी महाभारत? नियतीचे प्रत्येक पाउल ठाऊक असलेला मी, असहाय, फक्त साक्षीदार!.

युगे न युगे ह्या डोहाच्या काठी शाळीग्राम होऊन पडलो होतो, पांडव संन्यस्थ होऊन निघाले म्हणून कृष्णा इथे पोहोचली आणि तिच्या हाताने जलसमाधी मिळाली, तिची कसली माफी मागणार होतो मी?

Friday, 31 January 2020

काssss पोछे!!


मथळा वाचूनच, ज्यांनी आयुष्यात पतंग उडविला आहे किंवा अजूनही उडवत आहेत (कागदी पतंग, गैरसमज नसावा) त्यांना वेगळा विषय प्रवेश लागणार नाही. पण ज्यांनी एका धारधार धाग्याने (प्रसंगी आपलं रक्त सांडून), वाऱ्यावर स्वार होऊन स्वर्गारोहण करण्याच्या किंवा मुसंडी मारून रसातळाला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतंगावर ताबा ठेवण्याची अनुभूती घेतलेली नसेल त्यांना ह्या पतंगाख्यानाचा पुरेपूर आनंद घेण्याकरिता खालील शब्दांच्या व्याख्या समजून घ्याव्या लागतील.

कणी -पतंगाच्या वरच्या टोकापासून (नाक) शेपटीला जोडणाऱ्या काडीला मागच्या बाजूने ठराविक अंतरावर छिद्रे (एकूण ४) पाडून त्यातून ओवून बांधलेली दोरी. त्यात देखील प्रकार आहेत, नाकाकडील २ छिद्रे ही पतंगाच्या आडव्या व उभ्या काठीच्या छेद बिंदू पाशी असतात व शेपटी कडे असलेल्या २ छिद्रांचे अंतर नाकापासून छेद बिंदू पर्यंत असलेल्या अंतरा इतके असेल तर ती कणी ०-०, एका बोटाच्या जाडी इतके जास्त असेल तर ती १-० आणि २ बोटांच्या जाडी इतके जास्त असेल तर २-०, ३-० कणी बांधून पतंग उडविणारे विरळाच. कणी पतंगाला, पतंग उडविणाऱ्याशी जोडते. पतंग उडविणाऱ्याने धागा ओढल्यावर नाक वर ठेवून ऊर्ध्व मार्गाला लागण्याचा आदेश पतंगा पर्यंत ही कणीच पोहचविते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कणी पतंगाचा तोल सांभाळते. विवेकाचे जेव्हढे महत्व मानवी मनाचे संतुलन राखण्यात आहे तेव्हढेच महत्व कणीला पतंगाच्या आयुष्यात आहे.

मांजा- काचांची भुकटी, शिरस, भात इत्यांदीचे मिश्रण लावून सुकवलेला धारधार दोरा, माणसाला पतंगाशी जोडणारी नाळ. मांज्या विषयीची बहुतांश माहिती ही ऐकीव आहे कारण मांजा घरी बनविण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. मांजा हा विकत आणणे, हेच खरे. मांज्याचे, तार मांजा, बारीक मांजा, दुधी, गुलाबी, काळा इत्यादी प्रकार, दुकानात टांगलेल्या फिरकी वरून खाली आलेल्या मांज्याच्या टोकाची परीक्षा करून, समजून घ्यावे लागतात. जिव्हेच्या धारेगतच मांजा काम करतो, जरा निष्काळजी झालात की रक्त निघालेच म्हणून समजा.

ढिल देणे- मांजा घट्ट न धरता पतंगाला वाऱ्यावर मनसोक्त उडू देणे (उडविणाऱ्याला तेवढीच विश्रांती). ढिल दिल्यावर वा सोडल्यावर स्वतःभोवती गिरक्या घेत लांब जाणारा पतंग, मुक्त छंदातल्या एखाद्या रचने प्रमाणे वाटतो. जरा ढिल जास्त झाली तर पतंग कोणत्या दिशेला जाईल ते सांगता येत नाही त्यामुळे थोड थांबून दिशेचा, वाऱ्याचा अंदाज घेत घेत मांजा सोडवावा लागतो. स्वातंत्र्या बरोबर निर्बंधांचे महत्व सांगणारे आणि इतके विनासायास सापडणारे  दुसरें समर्पक उदाहरण नाही.

हापसणे- दिलेली ढिल ओढून घेणे, मांजाला ताण मिळाल्यावर पतंगाला सरसर वर चढताना बघून लहानांबरोबर मोठे देखील टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. परिस्थितीचे भान राखून हात आखडता घेण्याचा किंवा स्वगृही येताना, जाणाऱ्या पावलांवर पाय टाकत परतण्याचा प्रकार आहे हा.

फिरकी किंवा चकरी - मांजा गुंडाळण्याचे व लागेल तसा सोडण्याचे लाकडी, आता बहुदा प्लास्टीकचे (चिनी बनावटीचे) साधन. गाशा गुंडाळणे हा शब्द प्रयोग फिरकीला बघूनच बहुदा सुचला असावा.

गुंता- अकार्यक्षम फिरकी धारकामुळे हापसलेला मांजा जमिनीवर पडून राहतो आणि कोणता दोरा कुठून कुठे गेला आहे? कोणता दोरा ओढला तर सुटून बाहेर येईल वा अधिकच अडकेल हे समजणे महा कठीण होते. अतिशय हळुवार हातानी हलके हलके मांजा मोकळा करावा लागतो. जोरात ओढाताण केली तर गुंता आणखीनच घट्ट होत जातो, मांजा काचतो आणि सहज तुटू शकतो. तुटलेला मांजा गाठी मारून जोडला तरी पाहिल्यासारखा होत नाही.  नाईलाजच झाला तर गाठ मारावीच लागते. यातला तरबेज ती इतकी बारीक मारतो की हात फिरवल्याशिवाय गाठ आहे हे लक्षातच येत नाही. नात्यांचा गुंता देखील असाच हळुवार सोडवावा लागतो, धसमुसळे पणा केला तर कायमचा दुरावा. नात्याचा धागा एकदा का काचला की परत कधीच पहिल्यासारखा होत नाही आणि गाठी पडल्या तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी गत, म्हणूनच तो होणार नाही ह्याची काळजी घेणे अधिक शहाणपणाचे आहे.

बदवणे- पतंग जास्तीत जास्त उंच उडवणे, सर्व भाषातील शब्द कोशकार ह्या शब्दाच्या व्युत्पत्ती वर अजूनही खल करीत आहेत.

लपेटणे- गुंडाळणे. हा शब्द प्रयोग इतका लोकप्रिय आहे कि त्याचा उगम पतंगाच्या खेळात आहे हे देखील लोक विसरले आहेत. हा शब्द थापा मारणे किंवा थापा मारून गुंडाळणे अशा अर्थी वापरला जातो. लपेटणे ही एक कृती आहें ज्यात मधली तीन बोटे दुमडून करंगळी आणि अंगठा जितका ताणता येईल तितका ताणून (वितेचा आकार) त्याभोवती मांजा गुंडाळायचा. तुम्ही जर सुटा मांजा (फिरकी शिवाय) विकत घ्यायला गेलात तर दुकानदार मांजा वरील पद्धतीने त्याच्या अंगठा व करंगळी ने केलेल्या वितेवर लपेटून इंग्रजी आठ आकारचं मांजाचं भेंडोळे कागदात बांधून तुम्हाला देईल. घरी येऊन अथवा तिथेच फिरकी वर तो न गुंतता गुंडाळणे हे कौशल्याचे काम आहे. स्वत:ची फिरकी घेऊन गेलात आणि पुरेशा किमतीचा मांजा जर घेतलात तर दुकानदार त्याचा फिरकीवरून तुमच्या फिरकीवर तो भरून देईल (येथे भरून ह्या शब्दाचा अर्थ डब्यात भरणे असा न घेता फिरकीवर गुंडाळणे असा घ्यावा).

कापोछे अथवा कायपोचे - (मराठी अस्मिता) अस्मानी द्वंद्वात पतंग बंधमुक्त झाल्यावर प्रतिस्पर्ध्याने केलेला जल्लोष (शंख ध्वनी). हे क्षेत्र मात्र येरागबाळ्याच नाही, तेथे पाहिजे जातीचे. तुमचं सगळ कसब पणाला लावून ह्या खेळात हवेत रहाणे, आपला पतंग शाबूत ठेवून विरोधकाचा मांजा आपल्या मांजाने घासून कापणे आणि सर्वात कळस म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा कापलेला (मांजा तुटलेला) पतंग तरंगत जाताना आपल्या पतंगाच्या मांजात कापोछे झालेल्या पतंगाचा लोंबता मांजा गुंतवून दोन्ही पतंगाना माघारी उतरवणे. पतंगाची खरी रंगत ह्या काटाकाटीतच आहे.
पतंगाच्या खेळात एका चमूत कमीत कमी तीन खेळाडू असावे लागतात, त्यातील एक न खेळणारा कप्तान असल्या सारखा असतो त्याचे काम पतंग नाक व शेपटी सोडून उरलेल्या दोन टोकांना पकडून स्वतःच्या डोक्यावर उंच धरून पतंग उडविणाऱ्याने सांगितल्यावर हवेत सोडणे (तो डोक्यावर उंच धरण्यापूर्वी मधली काठी वाकवून त्याला थोडासा बाक देणे), आणि पतंग हवेत गेल्यावर फिरकी बहाद्दर व पतंग उडविणाऱ्याच्या बाजूला उभे राहून प्रोत्साहन व नको असलेले सल्ले देणे एव्हढेच त्याचे काम असते. ह्या प्रेक्षक वजा खेळाडूची जागा त्याच्या अनुपस्थितीत फिरकीधराला घ्यावी लागते. थोडा मांजा जमिनीवर मोकळा सोडून फिरकी खाली ठेवून मग त्याला पतंग डोक्यावर धरून सोडताच पळत येऊन आपल्या फिरकी बहाद्दराच्या भूमिकेत शिरण्याचे कसब त्याला अंगी बनवावे लागते. फिरकीधराचे काम तसे जिकरीचे. पतंग उडविणाऱ्याच्या चुकीमुळे कापला गेला, तरी फिरकी घट्ट धरल्यामुळे ढिल मिळाली नाही म्हणून कापला गेला, असें पापाचे धनी व्हावे लागते. पतंग उडविणाऱ्याचा रुबाब काही औरच असतो. पतंग कापला जाण्यात त्याची कधीच चूक किंवा हार नसते. कसूर काय तो मांजाचा, पतंगाचा वा फिरकी धरणाऱ्याचा असतो.   

पतंगाच्या खेळात पतंग कापला जाणे हा पतंगाचा शेवट नसून ते केवळ पतंगाच्या मालकी हक्कांचे हस्तांतर आहे. फरक इतकाच की हे हस्तांतर  ‘कसेल त्याची जमीन’ तद्वत, ‘पकडेल त्याचा पतंग’ ह्या न्यायाने होते. कटून (बहुदा इंग्रजी cut ह्या शब्दात ह्याचा उगम असावा) आलेला पतंग वाऱ्यावर हेलकावत येतों आणि उंचावलेले हात, काठ्या ह्यांच्या स्पर्धेत, तो कुण्या भाग्यवंताच्या हातात पडतो, आणि मग तो वीर, कोहिनूर गवसल्या थाटात तेथून धूम ठोकतो. कापलेला पतंग पकडणे हा अत्यंत रोमहर्षक अनुभव आहे, त्यातली गंमत, उत्कंठा आणि पतंग हातात मिळाल्यावर होणारी उत्तेजित अवस्था ह्याचे वर्णन मज पामरास शब्दात करणे शक्य नाही. त्याची अनुभूती घेणे हेच खरे. बहुतांशी वेळेला त्याच्या मागे धावणाऱ्याना हुलकावणी देऊन तो पतंग दुसरीकडे जाऊन पडणे किंवा झाडाच्या फांदीवर अडकणे हे इतके सर्रास घडते की पुढील आयुष्यातील आशा, निराशेच्या खेळांचे जणू ते बाळकडूच आहे. आत्ता आत्ता पर्यंत कुणा धनिक बाळांच्या हातातून हवेत मिरविणारा पतंग, क्षणात रस्त्यावर खेळणाऱ्या आणि आशाळभूतपणे आकाशात  उडणाऱ्या रंगीबेरंगी पतंगाकडे पाहणाऱ्या मुलाच्या चेहेऱ्यावर हसू फुलवून जातो. अनपेक्षित आनंद म्हणजे काय ह्याचा पुरावा त्याचा चेहेरा देत असतो.

ह्या सगळ्या खेळात केंद्र स्थानी असलेल्या पतंगाचा शेवट, बहुदा तो फाटण्यात अथवा झाडात, तारेत वा अॅन्टेनात (माझ्या तरुण वाचकांसाठी? दूरदर्शन वा आकाशवाणी चे प्रक्षेपण ग्रहण करून संचापर्यंत पोहचविणारी, गच्चीवर लावलेली यंत्रणा, खरतर अॅन्टेना हा स्वतंत्र विषय होईल) अडकून होतो. हा केवळ अपघात असतो. काय गंमत आहे पहा, जर प्रसंगाचे पर्यवसान दुःखात किंवा वेदनेत होत असेल तर तो अपघात आणि जर त्या प्रसंगातून आनंद निष्पत्ती झाली तर तो योगायोग. समोरून मित्र अचानक आला तर तो योगायोग आणि येऊन तुमच्यावर आपटला  तर तो अपघात. त्यामुळे पतंग उडवत असताना त्यावरचा ताबा सुटून जर तो वरील एखाद्या ठिकाणी अडकला तर तो क्षण फारच क्लेशदायक असतो. मांजाला टिचक्या देऊन तो सोडवण्याचे अनेक प्रयत्न फोल ठरल्यावर त्यापासून फारकत घेणे अनिवार्य होते. मांजा हाताला गुंडाळून जितका ताणता येईल तितका ताणून पतंगाच्या जितक्या जवळ तो तोडता येईल तितक्या जवळ तो तोडणे एव्हढाच पर्याय शिल्लक राहतो आणि मोठ्या जड अंत:करणाने त्याची अंमलबजावणी होते. अडकलेला पतंग जर शेवटचा असेल तर त्या अडकून वाऱ्यावर फडफडणाऱ्या पतंगाला श्रद्धांजली वाहत काही काळ तिथे त्याच्याकडे काहीशा आशेने, पण बहुतांशी दुःखाने पाहत उभे राहणे अनिवार्य असते. त्या नंतर थोड्याच काळात  काहीच घडले नाही अशा पद्धतीने असें प्रसंग आयुष्यात देखील अनेक वेळा येतात आणि काहीशा अशाच पद्धतीने आपण त्यांना सामोरे जात असतो.

एकूणच पतंगाचा हा खेळ मला अनेक वेळा आयुष्यावरच रूपक वाटतो. लहानपणी ह्या कशाचीच जाणीव होत नाही पण आज मागे वळून पाहताना तो खेळ वेगळाच वाटतो. असो. गेल्या संक्रांतीला पतंग उडवले नसतील तर पुढील संक्रांतीला नक्की उडवा, तसा संकल्पच करा आणि ही मजा एकदा तरी अनुभवा.