Friday, 31 January 2020

काssss पोछे!!


मथळा वाचूनच, ज्यांनी आयुष्यात पतंग उडविला आहे किंवा अजूनही उडवत आहेत (कागदी पतंग, गैरसमज नसावा) त्यांना वेगळा विषय प्रवेश लागणार नाही. पण ज्यांनी एका धारधार धाग्याने (प्रसंगी आपलं रक्त सांडून), वाऱ्यावर स्वार होऊन स्वर्गारोहण करण्याच्या किंवा मुसंडी मारून रसातळाला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतंगावर ताबा ठेवण्याची अनुभूती घेतलेली नसेल त्यांना ह्या पतंगाख्यानाचा पुरेपूर आनंद घेण्याकरिता खालील शब्दांच्या व्याख्या समजून घ्याव्या लागतील.

कणी -पतंगाच्या वरच्या टोकापासून (नाक) शेपटीला जोडणाऱ्या काडीला मागच्या बाजूने ठराविक अंतरावर छिद्रे (एकूण ४) पाडून त्यातून ओवून बांधलेली दोरी. त्यात देखील प्रकार आहेत, नाकाकडील २ छिद्रे ही पतंगाच्या आडव्या व उभ्या काठीच्या छेद बिंदू पाशी असतात व शेपटी कडे असलेल्या २ छिद्रांचे अंतर नाकापासून छेद बिंदू पर्यंत असलेल्या अंतरा इतके असेल तर ती कणी ०-०, एका बोटाच्या जाडी इतके जास्त असेल तर ती १-० आणि २ बोटांच्या जाडी इतके जास्त असेल तर २-०, ३-० कणी बांधून पतंग उडविणारे विरळाच. कणी पतंगाला, पतंग उडविणाऱ्याशी जोडते. पतंग उडविणाऱ्याने धागा ओढल्यावर नाक वर ठेवून ऊर्ध्व मार्गाला लागण्याचा आदेश पतंगा पर्यंत ही कणीच पोहचविते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कणी पतंगाचा तोल सांभाळते. विवेकाचे जेव्हढे महत्व मानवी मनाचे संतुलन राखण्यात आहे तेव्हढेच महत्व कणीला पतंगाच्या आयुष्यात आहे.

मांजा- काचांची भुकटी, शिरस, भात इत्यांदीचे मिश्रण लावून सुकवलेला धारधार दोरा, माणसाला पतंगाशी जोडणारी नाळ. मांज्या विषयीची बहुतांश माहिती ही ऐकीव आहे कारण मांजा घरी बनविण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. मांजा हा विकत आणणे, हेच खरे. मांज्याचे, तार मांजा, बारीक मांजा, दुधी, गुलाबी, काळा इत्यादी प्रकार, दुकानात टांगलेल्या फिरकी वरून खाली आलेल्या मांज्याच्या टोकाची परीक्षा करून, समजून घ्यावे लागतात. जिव्हेच्या धारेगतच मांजा काम करतो, जरा निष्काळजी झालात की रक्त निघालेच म्हणून समजा.

ढिल देणे- मांजा घट्ट न धरता पतंगाला वाऱ्यावर मनसोक्त उडू देणे (उडविणाऱ्याला तेवढीच विश्रांती). ढिल दिल्यावर वा सोडल्यावर स्वतःभोवती गिरक्या घेत लांब जाणारा पतंग, मुक्त छंदातल्या एखाद्या रचने प्रमाणे वाटतो. जरा ढिल जास्त झाली तर पतंग कोणत्या दिशेला जाईल ते सांगता येत नाही त्यामुळे थोड थांबून दिशेचा, वाऱ्याचा अंदाज घेत घेत मांजा सोडवावा लागतो. स्वातंत्र्या बरोबर निर्बंधांचे महत्व सांगणारे आणि इतके विनासायास सापडणारे  दुसरें समर्पक उदाहरण नाही.

हापसणे- दिलेली ढिल ओढून घेणे, मांजाला ताण मिळाल्यावर पतंगाला सरसर वर चढताना बघून लहानांबरोबर मोठे देखील टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. परिस्थितीचे भान राखून हात आखडता घेण्याचा किंवा स्वगृही येताना, जाणाऱ्या पावलांवर पाय टाकत परतण्याचा प्रकार आहे हा.

फिरकी किंवा चकरी - मांजा गुंडाळण्याचे व लागेल तसा सोडण्याचे लाकडी, आता बहुदा प्लास्टीकचे (चिनी बनावटीचे) साधन. गाशा गुंडाळणे हा शब्द प्रयोग फिरकीला बघूनच बहुदा सुचला असावा.

गुंता- अकार्यक्षम फिरकी धारकामुळे हापसलेला मांजा जमिनीवर पडून राहतो आणि कोणता दोरा कुठून कुठे गेला आहे? कोणता दोरा ओढला तर सुटून बाहेर येईल वा अधिकच अडकेल हे समजणे महा कठीण होते. अतिशय हळुवार हातानी हलके हलके मांजा मोकळा करावा लागतो. जोरात ओढाताण केली तर गुंता आणखीनच घट्ट होत जातो, मांजा काचतो आणि सहज तुटू शकतो. तुटलेला मांजा गाठी मारून जोडला तरी पाहिल्यासारखा होत नाही.  नाईलाजच झाला तर गाठ मारावीच लागते. यातला तरबेज ती इतकी बारीक मारतो की हात फिरवल्याशिवाय गाठ आहे हे लक्षातच येत नाही. नात्यांचा गुंता देखील असाच हळुवार सोडवावा लागतो, धसमुसळे पणा केला तर कायमचा दुरावा. नात्याचा धागा एकदा का काचला की परत कधीच पहिल्यासारखा होत नाही आणि गाठी पडल्या तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी गत, म्हणूनच तो होणार नाही ह्याची काळजी घेणे अधिक शहाणपणाचे आहे.

बदवणे- पतंग जास्तीत जास्त उंच उडवणे, सर्व भाषातील शब्द कोशकार ह्या शब्दाच्या व्युत्पत्ती वर अजूनही खल करीत आहेत.

लपेटणे- गुंडाळणे. हा शब्द प्रयोग इतका लोकप्रिय आहे कि त्याचा उगम पतंगाच्या खेळात आहे हे देखील लोक विसरले आहेत. हा शब्द थापा मारणे किंवा थापा मारून गुंडाळणे अशा अर्थी वापरला जातो. लपेटणे ही एक कृती आहें ज्यात मधली तीन बोटे दुमडून करंगळी आणि अंगठा जितका ताणता येईल तितका ताणून (वितेचा आकार) त्याभोवती मांजा गुंडाळायचा. तुम्ही जर सुटा मांजा (फिरकी शिवाय) विकत घ्यायला गेलात तर दुकानदार मांजा वरील पद्धतीने त्याच्या अंगठा व करंगळी ने केलेल्या वितेवर लपेटून इंग्रजी आठ आकारचं मांजाचं भेंडोळे कागदात बांधून तुम्हाला देईल. घरी येऊन अथवा तिथेच फिरकी वर तो न गुंतता गुंडाळणे हे कौशल्याचे काम आहे. स्वत:ची फिरकी घेऊन गेलात आणि पुरेशा किमतीचा मांजा जर घेतलात तर दुकानदार त्याचा फिरकीवरून तुमच्या फिरकीवर तो भरून देईल (येथे भरून ह्या शब्दाचा अर्थ डब्यात भरणे असा न घेता फिरकीवर गुंडाळणे असा घ्यावा).

कापोछे अथवा कायपोचे - (मराठी अस्मिता) अस्मानी द्वंद्वात पतंग बंधमुक्त झाल्यावर प्रतिस्पर्ध्याने केलेला जल्लोष (शंख ध्वनी). हे क्षेत्र मात्र येरागबाळ्याच नाही, तेथे पाहिजे जातीचे. तुमचं सगळ कसब पणाला लावून ह्या खेळात हवेत रहाणे, आपला पतंग शाबूत ठेवून विरोधकाचा मांजा आपल्या मांजाने घासून कापणे आणि सर्वात कळस म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा कापलेला (मांजा तुटलेला) पतंग तरंगत जाताना आपल्या पतंगाच्या मांजात कापोछे झालेल्या पतंगाचा लोंबता मांजा गुंतवून दोन्ही पतंगाना माघारी उतरवणे. पतंगाची खरी रंगत ह्या काटाकाटीतच आहे.
पतंगाच्या खेळात एका चमूत कमीत कमी तीन खेळाडू असावे लागतात, त्यातील एक न खेळणारा कप्तान असल्या सारखा असतो त्याचे काम पतंग नाक व शेपटी सोडून उरलेल्या दोन टोकांना पकडून स्वतःच्या डोक्यावर उंच धरून पतंग उडविणाऱ्याने सांगितल्यावर हवेत सोडणे (तो डोक्यावर उंच धरण्यापूर्वी मधली काठी वाकवून त्याला थोडासा बाक देणे), आणि पतंग हवेत गेल्यावर फिरकी बहाद्दर व पतंग उडविणाऱ्याच्या बाजूला उभे राहून प्रोत्साहन व नको असलेले सल्ले देणे एव्हढेच त्याचे काम असते. ह्या प्रेक्षक वजा खेळाडूची जागा त्याच्या अनुपस्थितीत फिरकीधराला घ्यावी लागते. थोडा मांजा जमिनीवर मोकळा सोडून फिरकी खाली ठेवून मग त्याला पतंग डोक्यावर धरून सोडताच पळत येऊन आपल्या फिरकी बहाद्दराच्या भूमिकेत शिरण्याचे कसब त्याला अंगी बनवावे लागते. फिरकीधराचे काम तसे जिकरीचे. पतंग उडविणाऱ्याच्या चुकीमुळे कापला गेला, तरी फिरकी घट्ट धरल्यामुळे ढिल मिळाली नाही म्हणून कापला गेला, असें पापाचे धनी व्हावे लागते. पतंग उडविणाऱ्याचा रुबाब काही औरच असतो. पतंग कापला जाण्यात त्याची कधीच चूक किंवा हार नसते. कसूर काय तो मांजाचा, पतंगाचा वा फिरकी धरणाऱ्याचा असतो.   

पतंगाच्या खेळात पतंग कापला जाणे हा पतंगाचा शेवट नसून ते केवळ पतंगाच्या मालकी हक्कांचे हस्तांतर आहे. फरक इतकाच की हे हस्तांतर  ‘कसेल त्याची जमीन’ तद्वत, ‘पकडेल त्याचा पतंग’ ह्या न्यायाने होते. कटून (बहुदा इंग्रजी cut ह्या शब्दात ह्याचा उगम असावा) आलेला पतंग वाऱ्यावर हेलकावत येतों आणि उंचावलेले हात, काठ्या ह्यांच्या स्पर्धेत, तो कुण्या भाग्यवंताच्या हातात पडतो, आणि मग तो वीर, कोहिनूर गवसल्या थाटात तेथून धूम ठोकतो. कापलेला पतंग पकडणे हा अत्यंत रोमहर्षक अनुभव आहे, त्यातली गंमत, उत्कंठा आणि पतंग हातात मिळाल्यावर होणारी उत्तेजित अवस्था ह्याचे वर्णन मज पामरास शब्दात करणे शक्य नाही. त्याची अनुभूती घेणे हेच खरे. बहुतांशी वेळेला त्याच्या मागे धावणाऱ्याना हुलकावणी देऊन तो पतंग दुसरीकडे जाऊन पडणे किंवा झाडाच्या फांदीवर अडकणे हे इतके सर्रास घडते की पुढील आयुष्यातील आशा, निराशेच्या खेळांचे जणू ते बाळकडूच आहे. आत्ता आत्ता पर्यंत कुणा धनिक बाळांच्या हातातून हवेत मिरविणारा पतंग, क्षणात रस्त्यावर खेळणाऱ्या आणि आशाळभूतपणे आकाशात  उडणाऱ्या रंगीबेरंगी पतंगाकडे पाहणाऱ्या मुलाच्या चेहेऱ्यावर हसू फुलवून जातो. अनपेक्षित आनंद म्हणजे काय ह्याचा पुरावा त्याचा चेहेरा देत असतो.

ह्या सगळ्या खेळात केंद्र स्थानी असलेल्या पतंगाचा शेवट, बहुदा तो फाटण्यात अथवा झाडात, तारेत वा अॅन्टेनात (माझ्या तरुण वाचकांसाठी? दूरदर्शन वा आकाशवाणी चे प्रक्षेपण ग्रहण करून संचापर्यंत पोहचविणारी, गच्चीवर लावलेली यंत्रणा, खरतर अॅन्टेना हा स्वतंत्र विषय होईल) अडकून होतो. हा केवळ अपघात असतो. काय गंमत आहे पहा, जर प्रसंगाचे पर्यवसान दुःखात किंवा वेदनेत होत असेल तर तो अपघात आणि जर त्या प्रसंगातून आनंद निष्पत्ती झाली तर तो योगायोग. समोरून मित्र अचानक आला तर तो योगायोग आणि येऊन तुमच्यावर आपटला  तर तो अपघात. त्यामुळे पतंग उडवत असताना त्यावरचा ताबा सुटून जर तो वरील एखाद्या ठिकाणी अडकला तर तो क्षण फारच क्लेशदायक असतो. मांजाला टिचक्या देऊन तो सोडवण्याचे अनेक प्रयत्न फोल ठरल्यावर त्यापासून फारकत घेणे अनिवार्य होते. मांजा हाताला गुंडाळून जितका ताणता येईल तितका ताणून पतंगाच्या जितक्या जवळ तो तोडता येईल तितक्या जवळ तो तोडणे एव्हढाच पर्याय शिल्लक राहतो आणि मोठ्या जड अंत:करणाने त्याची अंमलबजावणी होते. अडकलेला पतंग जर शेवटचा असेल तर त्या अडकून वाऱ्यावर फडफडणाऱ्या पतंगाला श्रद्धांजली वाहत काही काळ तिथे त्याच्याकडे काहीशा आशेने, पण बहुतांशी दुःखाने पाहत उभे राहणे अनिवार्य असते. त्या नंतर थोड्याच काळात  काहीच घडले नाही अशा पद्धतीने असें प्रसंग आयुष्यात देखील अनेक वेळा येतात आणि काहीशा अशाच पद्धतीने आपण त्यांना सामोरे जात असतो.

एकूणच पतंगाचा हा खेळ मला अनेक वेळा आयुष्यावरच रूपक वाटतो. लहानपणी ह्या कशाचीच जाणीव होत नाही पण आज मागे वळून पाहताना तो खेळ वेगळाच वाटतो. असो. गेल्या संक्रांतीला पतंग उडवले नसतील तर पुढील संक्रांतीला नक्की उडवा, तसा संकल्पच करा आणि ही मजा एकदा तरी अनुभवा.

Sunday, 14 April 2019

बलीदान



महाभारत म्हटले, की आपल्याला आठवतात काही ठरावीक पात्र. श्रीकृष्ण, द्रौपदी, पांडव. त्यांच्यात देखील सर्व प्रथम भीमार्जुन, मग धर्म, खलनायक म्हणून दुर्योधन, दुशाःसन, संमिश्र भावना घेऊन कर्ण, आणि अनेक प्रश्न चिन्ह घेऊन भीष्म, द्रोण. अजून ताण दिला तर गांधारी, धृतराष्ट्र, विदुर व कपटी शकुनी. महाभारतातील धर्मयुद्धाचा विचार केला तर आठवतात ते भीष्म, द्रोण, कर्ण या महारथींचे प्रश्नांकित मृत्यू. जाता जाता उपाख्यान म्हणता येईल असा एकलव्य देखील आठवल्याशिवाय रहात नाही. ह्यातील प्रत्येक पात्र स्वतंत्र लेखाचा विषय आहे हे खरेच, पण आठवत नाही तो घटोत्कच.

महाभारतावर जितका विचार करतो तितका महाभारतकार महाकवी व्यासांच्या प्रतीभेचा अविष्कार विस्मयकारक, केवळ थक्क करून सोडणार वाटतो. या महाकाव्याच्या निर्मिती बद्दल प्रचलित कथेनुसार हे महाकाव्य व्यासांनी सांगितले आणि गणपती ने लिहिले? व्यासांना असा लेखनिक हवा होता की जो त्यांच्या काव्योघाच्या वेगाने, त्यांना मध्ये न थांबवता लिहू शकेल, जे काम गणपतीने पार पाडलं. ह्याचा मुद्दाम उल्लेख करण्याचं कारण, महाभारतातील पात्र योजना आणि प्रसंगांचा अनुक्रम.

हेच बघाना, कुंती कुमारीका असताना, कवच कुंडल घेऊन जन्माला आलेला सूर्यपुत्र कर्ण, अधिरथाने सांभाळले म्हणून सूत पुत्र, द्रोणांनी घेतलेली शिष्यांची परीक्षा, तेंव्हा कर्णाने अर्जुनाला  दिलेले आव्हान, कर्णाचा झालेला पाणउतारा आणि त्याचवेळी दुर्योधनाने केलेला त्याचा सन्मान  त्यामुळे कर्णाची कौरव पक्षाशी झालेली कायमची बांधिलकी, वारणावतातील लाक्षागृहातून वाचून वनात गेलेल्या भीमा हातून झालेला हिडींब राक्षसाचा वध, भावाच्या मृत्युनंतरही भीमाच्या प्रेमात पडलेली हिडींबा आणि तीजपासून झालेला भीमपुत्र घटोत्कच, द्रौपदी स्वयंवर व युद्धाचे ढग जमू लागल्यावर इंद्राने ब्राह्मण वेषात कर्णाकडे मागितलेलं कवच कुंडलांच दान आणि त्या बदल्यात कर्णाला दिलेली अमोघ वासवी शक्ती आणि शेवटी पांडवांचा झालेला विजय व कुरुकुलाचा झालेला विनाश. हे सर्व प्रसंग वरवर जरी स्वतंत्र दिसले तरी त्यांचा एकमेकांशी अगदी जवळचा संबंध आहे. किंबहुना ते एकमेकांवर अवलंबून आहेत. महाभारत हे जर महाकाव्य आहे असें मानून आपण विचार करू लागलो तर, व्यासांच्या प्रतिभेला विनम्र अभिवादन करावे लागते. ते अशाकरता की ही सर्व पात्रे, प्रसंग महाकाव्याचा ओनामा करण्यापूर्वी त्यांच्या मनःचक्षु समोर सुस्पष्ट असावीत, आणि नेमके त्याच कारणास्तव महाकाव्याची निर्मिती हा एक अखंड ओघ असणार होता आणि तो कोठेही खंडित न करता लिहिणारा, अवगत करणारा सहाय्यक त्यांना हवा होता.

असो, ह्या सर्व प्रसंगांचा उहापोह येथे करण्याचे कारण महाभारतातील महायुद्धाच्या विजयाचं सर्व श्रेय श्रीकृष्णाला वा पांडवांना दिले जाते, त्यांच्या विजयात घटोत्कच्याच्या बलिदानाचा वाटा केवढा मोठा आहे हे कोठेही वाचावयास मिळत नाही. किंबहुना त्याच्या मृत्युचा उल्लेख देखील बलिदानाचा, असा केलेला आढळत नाही.

सर्व प्रसंगांची सुसंगत मांडणी करावयाची झाली तर कर्णाच्या जन्मापासून सुरवात करावी लागेल. जन्मजात कवच कुंडल धारण करून आलेला कर्ण हा अवध्य होता. द्रोण शिष्य परीक्षेच्या वेळेला, अपमानित झालेल्या कर्णाला, दुर्योधनाने अंगराज केल्यामुळे कौरवांना अर्जुनाच्या तोडीचा किंबहुना काकणभर सरस असा धनुर्धर मिळाला. लाक्षागृहात सापडलेली शवे, पांडव व कुंती ह्यांचीच आहेत ह्या गैरसमजाचा फायदा घेऊन स्वतःला पुरेसे प्रबळ करून मगच कौरवांचा सामना करावा ह्या विचारने पांडव वनात राहत होते. त्याच वास्तव्यात मनुष्य भक्षक हिडींब राक्षसाचा भीमाने निप्पात केला. त्याची बहिण हिडीम्बा भीमाच्या प्रेमात पडली आणि अशा विचित्र विवाहाला कुंतीची संमती मिळाली आणि घटोत्कच जन्माला आला. राक्षसीण, मानवाच्या प्रेमात पडून त्यांनी लग्न केल्याचं हे महाभारतातील एकमेव उदाहरण. ह्याच कालावधीत पुढे द्रौपदी स्वयंवरा नंतर पांडवांचा पांचाळ कुळाशी संबंध जुळून आला आणि त्यामुळे अधिक शक्तिशाली झालेले पांडव हस्तिनापुरात परत आले. घटोत्कच्याच्या जन्माचे नेमके प्रयोजन काय होते?  पुढील घटना क्रम पाहता केवळ अर्जुन रक्षणार्थ त्याचा जन्म झाला होता असें वाटल्यावाचून रहात नाही. 

आपल्या पुत्राचे रक्षण करण्याकरता इंद्राने कर्णाच्या दानशूरतेचा गैर फायदा घेऊन त्याच्याकडून कवच कुंडले काढून घेतली आणि कदाचित आपल्या कृत्याने खजील होऊन इंद्राने त्या बदल्यात स्वसंरक्षणार्थ अमोघ वासवी शक्ती कर्णास बहाल केली. ह्या शक्तीचा वापर करून केवळ एकदा शत्रूचा नाश करणे शक्य होते तदनंतर ती शक्ती इंद्राकडे परत जाणार होती. कवच कुंडलं गमावल्यानंतर देखील, ह्या अमोघ शक्तीमुळे कर्णाच पारडं जड होतं. कर्ण ही शक्ती अर्जुनावर प्रयोग करण्या करिता राखून ठेवणार हे देखील नक्की होते. अर्जुनाला वाचवण्याचा एकमेव उपाय म्हणजे शक्तीचा वापर होईपर्यंत त्याने कर्णा समोर न येणे. श्रीकृष्णाला ह्याची पूर्ण कल्पना होती, अर्जुनाच सारथ्य करताना त्याला कर्णा पासून लांब ठेवण्याची खबरदारी तो घेत होता. अर्थात हे फार काळ शक्य झाले नसते.  दुसरा पर्याय म्हणजे कर्णाला त्या शक्तीचा उपयोग करायला भाग पाडणे. कर्णासमोर त्याचा स्वतःचा मृत्यू, वा कौरवांचा प्रलयंकारी विनाश जर उभा राहिला असता तर त्याच्या कडून ही शक्ती वापरलि गेली असती.  ह्या पर्यायात जो कोणी कर्णाला शक्तीचा उपयोग करायला लावेल त्याचा मृत्यू निश्चित होता. थोडक्यात काय पांडवांना अशा महावीराची गरज होती की जो युद्धात वरील परिस्थिती निर्माण करील आणि आत्म समर्पणाला तयार राहील. रक्ताच्या नात्यांव्यतिरिक्त हे कृत्य करायला कोण तयार होईल?

ह्या कार्या करिता घटोत्कचा इतका योग्य वीर दुसरा कोणीही नव्हता. एक तर तो राक्षसिणीचा पुत्र असल्यामुळे मायावी युद्ध कला पारंगत होता. श्रीकृष्णाला जो संहार अपेक्षित होता तो करण्याची क्षमता या वीराकडे होती. धर्म युद्धाची बंधने देखील त्याच्यावर नव्हती. घटोत्कचाचे जीवीत कार्य त्याच्या जन्मा पूर्वीच निश्चित झालेले होते.

कौराव पांडवांच्या महायुद्धाच्या उत्तरार्धात, शिखंडीला मध्ये घालून अर्जुना करवी केलेल्या भीष्माचार्यांच्या पाडावानंतर द्रोणांच्या नेतृत्वा खाली झालेल्या संग्रामात एक दिवस धर्म युद्धाचे नियम डावलून सूर्यास्तानंतर युद्ध सुरु राहीले आणि त्या संधीचा फायदा घेऊन श्री कृष्णाने घटोत्कचाला युद्धात उतरविले. आपल्या राक्षस सेनेसह घटोत्कच कौरवांवर तुटून पडला.

घटोत्कचाने अतुलनीय पराक्रम दाखवत आपल्या मायावी युद्ध कलेने कौरव सेनेची पार दाणादाण उडवली, द्रोणाचार्या सारख्या कसलेल्या योध्याचा देखील त्याच्या पुढे निभाव लागेना. द्रोणांची ही गत झाल्यावर बाकीच्यांची काय कथा? कौरवांना पाळता भुई थोडी झाली आणि घटोत्कचाने शत्रू सैन्याचा अविरत संहार चालूच ठेवला. शेवटी दुर्योधनाने कर्णाला गाठून कसही करून घटोत्कचाचा बीमोड करावयाला सांगितले. कर्णाला दुर्योधन काय सुचवित आहे याची कल्पना होती. वासवी शक्तीचा घटोत्कचावर प्रयोग करायला त्याने नकार दिला. मनोमन कर्णाला खात्री होती कि वासवी शक्ती शिवाय तो अर्जुनाशी जिंकू शकत नाही. त्याने दुर्योधानाला तसे सांगितले, ‘अरे आपण उद्याची सकाळ पहिली तर अर्जुनाशी लढण्याचा प्रसंग येईल. ज्या वेगाने घटोत्कचाने कौरवांच नाश चालविलेला आहे त्या वरून अर्जुनाशी लढायला उद्या कोणी शिल्लक राहील असें मला वाटत नाही. तेंव्हा घटोत्कचाला या क्षणी ठार मारणे एव्हढाच पर्याय तुज पुढे आहे. ते तू वासवी शक्ती ने कर, अन्यथा दुसऱ्या मार्गाने, तो तुझा प्रश्न आहे.’ झाले! दुर्योधनाच्या ह्या आदेशापुढे, अंकित कर्णाचे काहीएक चालले नाही आणि वासवी शक्तीच्या प्रयोगाने त्याने घटोत्कचाचा वध केला. त्यावेळेला पांडव वीरांकडून त्याच्या संरक्षणार्थ कोणीही धावून आले नाही. वासवी शक्ती आपले काम चोख बजाऊन इंद्राकडे परतली. पर्यायाने अर्जुनाला अभय मिळाले. ते युद्ध जिंकूनही, कर्णाची स्थिती, पराजिता सारखी झाली.

आपल्या चुलत्या करिता आणि पर्यायाने पांडवांच्या विजया करिता दिलेल्या घटोत्कचाच्या बलिदाना नंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. युद्ध भूमीवर त्याचा बळी तो अनार्य होता म्हणून दिला गेला? की पुढे जाऊन सर्वात मोठा म्हणून तो राज्यावर अधिकार सांगेल म्हणून? की राक्षस म्हणून बळी देण्यास तो योग्य होता? घटोत्कचाच्या मृत्यूचा शोक द्रौपदी पुत्रांच्या शोका इतका करूण कां बरें वाटत नाही?

Sunday, 5 August 2018

अर्थ हरवलेले शब्द... २



“काय गोंधळ चालवलाय, सकाळ पासून? पार भंडावून सोडलय, एक मिनिट म्हणून शांतता नाही. स्वस्थ बसा बघू एका जागी, अगदी देवा सारखे बसा”. लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत आईने केलेला त्रागा. देव कसा बसतो ते कोणी बघितलंय पण आईचा रुद्रावतार बघून आम्ही भावंड मांडी घालून डोळे मिटून बसत असू. आमच देवपण काही क्षणातच संपत असे. मग डोळे किलकिले करून एकमेकांच्या खोड्या काढून पुनश्च दंगा चालू होत असे. बहुदा ती काही क्षणांची शांतता देखील आईला पुरत असावी. कारण आईचा ओरडा बऱ्याच वेळाने पुन्हा खावा लागत असें. स्वस्थ शब्दाशी माझी ओळख ही अशी.

देव कसा बसतो? देव बसलेला असतो का? बसत असेल तर खरच स्वस्थ बसतो का? त्या वयात असे विचार मनात आले असतील किंवा नसतीलही. आले असलेच तरी त्याचं उत्तर, असेल बहुदा, आई सांगते म्हणजे डोळे मिटून, न बोलता बसत असावा, इथेच संपत असावे. आता जेव्हा विचार करतो (अर्थात आजही देवाच्या बसण्याविषयीचे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत) तेव्हा एक नक्की लक्षात येतें कि सगळी गोम त्या स्वस्थ मध्ये आहे.

स्वस्थ म्हणजे नेमकं काय? स्वस्थ महणजे शांत? स्वस्थ म्हणजे गप्प? स्वस्थ म्हणजे हालचाल न करता?

स्वस्थ चा शब्दशः अर्थ, स्वतःत स्थित, स्वतःत स्थिर, अचल. स्थिर, अचल शब्दाचा अर्थ सगळ्यांनाच माहित आहे, म्हणजे जी काही भानगड आहे ती स्वतः या शब्दाशी निगडीत आहे. “स्वतः म्हणजे मी” सगळ्यात सोपं उत्तर. आपल्याला खरच मी कोण,  हे माहित आहे? या मी ची व्याख्या करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. कोS अहं?’ अशी अध्यात्मिक पृच्छा अनेक संत, योगी पुरुषांनी यशस्वीपणे केली. मला मात्र भौतिक पातळीवर राहायला आवडेल. मी चा जन्म नेमका कधी होतो? त्याची पुढील वाटचाल कशी होते? कठीण आहे सांगणे.

नवजात शिशु डोळ्या समोर आणा. कापडात घट्ट गुंडाळलेला तो चिमुकला निद्रिस्त जीव, त्याला असेल का मी ची जाणीव? मला नाही वाटत. भूक लागल्यावर डाव्या किंवा उजव्या हाताची इवलीशी मुठ, दुसऱ्या हाताने तो हात धरून, आपल्या  तोंडात घालण्याचा तो गोंडस प्रयत्न, एक गोष्ट दर्शवतो. तोंडात घालायचा हात आपला स्वतःचा , आपल्या शरीराचा भाग नसून हात ज्याचा आहे तो आणि ज्याला भूक लागली आहे तो हे दोघे वेगळे आहेत. थोडक्यात काय मी म्हणजे हे शरीर ही जाणीव अजून निर्माण झालेली नाही.

नामकरण होईपर्यंत सोन्या, मन्या इत्यादी, इत्यादी ही इतरांना असलेली आपली ओळख. आवाजाच्या दिशेने वळलेली मान, ही जणू हाकेला दिलेली ओ असावी, अशा थाटात ज्या कोण अक्का, मावश्या असतील त्या म्हणतात, "बघ लब्बाड, त्याला कळतंय, आपण त्याला हाक मारतोय ते". कालांतराने नामकरण होऊन बाकीची नाव मागे पडतात आणि दिलेले नाव हिच ओळख बनू लागते. हे आपल्याला चिकटणारं सगळ्यात पाहिलं लेबल. पुढे जसजसे मोठे होऊ लागतो तसतसे आपण कोणाचे तरी अपत्य आहोत, कोणाचे भाऊ / बहिण, काका, मामा, आत्या, पुढे जाऊन नवरा / बायको , वडील / आई , आजी / आजोबा आणि बरच काही, हीच स्वतःची ओळख वाटू लागते. लेबलांवर लेबलं चिकटत जातात. या मी वरच्या अनंत आरोपाखाली मी पुरता दबून, हरवून जातो. या नात्यांच्या गोड? आवरणात मी नाहीसा होतो. आजच्या जलद युगात नात्यांच्या लेबलांसोबत, आपली नोकरी / व्यवसाय, उद्योग, या जागी असलेली ओळख, ती तर बहुदा आजपर्यंतच्या सर्वच आवरणांना झाकून टाकते. हा परावर्तीत मी’, बाहेरून स्वतःची ओळख देणारा इतका बेमालूम आहे की त्याच्या आवडीनिवडीच मला माझ्या वाटायला लागतात. एव्हाना तुमच्या लक्षात आल असेल कि परावर्तीत मी विविध रुपात आहे, स्वाभाविक आहे की त्यात स्थिर होणे अशक्य आहे.  

जो स्वतः मधला मी अभिप्रेत आहे, तो संक्रांतीच्या हलव्यागत, साखरेचे थरावर थर चढल्यावर तीळ जसा नाहीसा होतो ना अगदी तस्सा नाहीसा झाला आहे. हलव्याच्या दाण्यातून तीळ वेगळा करायचा आहे. स्वस्थ बसण्या करीता, स्वतः चा शोध लागल्यावरच पुढे प्रवास सुरु होणार.

हा मी तसा फार क्रियाशील आहे, तो अधून मधून आपलं डोक वर काढत असतो. सकाळच्या घाई गडबडीत क्वचित आठवणारी गाण्याची किंवा कवितेची एखादी ओळ क्षणात आपल्याला कुठे तरी दूर घेऊन जाते. कोणाच्या तरी आग्रहाखातर चित्रांच्या प्रदर्शनाला गेल्यावर एखाद्या चित्रापुढे नकळत थबकणारी आपली पाऊलं वा एखाद्या डोंगरावरून दिसणारे विहंगम दृश्य आपल्याला क्षणभर जगाचा विसर पडायला लावतं. नेमक काय होतं हे कळत नाही, पण काही काळ खूप छान वाटत राहतं, उगाचच. तुम्ही देखील हे निश्चित अनुभवलंय. पण मी भोवतालच्या आवरणात ती अनुभूती गडप झाली आहे.

नेमकी ही अनुभूतीच अधिकाधिक तीव्र करण्याची गरज आहे तीच आपल्याला खऱ्या मी च्या जवळ नेऊ शकेल. जसजसे आयुष्य पुढे जाईल तसतसे हे कांद्याच्या आवरणा सारखे असलेले मुखवटे एक एक करून गळून पडतील आणि कदाचित आपणच आपल्याला अनोळखी वाटू लागू आणि तेव्हा सुरवात करू म्हणाल, तर खूप उशीर झालेला असेल... थोडक्यात काय अर्थ हरवलेल्या शब्दात स्वस्थ ची भर पडेल. 

Sunday, 10 June 2018

अर्थ हरवलेले शब्द... १



सगळ्याच भाषा आपापल्या परीने विविध भाषालंकारानी सर्वांगाने नटलेल्या असतात, तरी मराठीची गोडी काही औरच, मातृ भाषा आहे, म्हणून असेल कदाचित. मराठी भाषेतील साहित्य निर्मिती, साहित्यकारांच्या भाषेवरील प्रभुत्वाचे जागोजागी घडणारे दर्शन, निर्मितीतील अभिजातता, विषयांतील वैविध्य, कालातीत असलेल्या म्हणी, वाक्प्रचार, सुविचार काय काय म्हणून सांगू. या सगळ्यांच्या मुळाशी असलेले अर्थपूर्ण शब्द, संस्कृतोत्पन्न असल्याचा पदोपदी मिळणारा पुरावा. मी गाणी ऐकतो पण त्यातले काव्य मला जास्त भावते, त्यातील अर्थ मला नेहेमीच आकृष्ट करतो. बोलताना, ऐकताना माझं लक्ष सारखं शब्दांकडे जातं. बदलत्या राहणीमानामुळे म्हणा किंवा त्यातील वेगामुळे म्हणा अनेक शब्दांचा अर्थ लोप पावतोय असे वाटते. का त्या शब्दांचा उपयोग, वापर करण्या योग्य स्थितीच उरलेली नाही, नेमक सांगणे कठीण आहे. वानगी दाखल परवाचीच गोष्ट पहा ना.

रविवार संध्याकाळ, दारावरची बेल वाजली मला कोणीही अपेक्षित नव्हतं. कुतुहूल मिश्रित मुद्रेने मी दार उघडलं. बघतो तो काय एक जुना सोबती दारात उभा. “कायरें आश्चर्य वाटलं मला बघून?” ध्यानी मनी नसताना अचानक दारात उभ्या राहिलेल्या मित्राला बघून खरतर थोडा गडबडलोच. तसा तो अवलियाच, आज पर्यंतच्या त्याच्या आयुष्यात असामान्य नाही पण जगरहाटीला धरून देखील काही नव्हते, स्वतःला सावरत म्हणालो “नाहीरे, अगदी तसच काही नाही, पण आज अचानक?” चेहेऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून तो हसला, “घरात तरी घेशील, की दारातूनच बोळवण करणार आहेस?” मी पटकन बाजूला होउन त्याच्या खांद्यावर हात टाकत त्याला घरात घेतलं, स्वारी सोफ्यावर स्थानापन्न झाली. त्याची देहबोलीच सुचवत होती की त्याच्याकडे खूप मोकळा वेळ आहे. त्त्याचं पाणी पिऊन होईपर्यंत देखील मला धीर निघत नव्हता, “आज कसा काय..?” नेहेमीच्या सवयी प्रमाणे माझ वाक्य अर्धवट तोडत तो बोलता झाला “अरे सहजच” “सहज?, आमच्या घरावरून कुठे जात होतास ?” मी, त्याच्या भेटीला उद्देश देण्याच्या प्रयत्नात. “नाही रे, तुझ्याकडे म्हणून येऊ शकत नाही का?, आलो सहज भेटायला” पुन्हा सहज! त्याच्या दृष्टीने माझी भेट एवढ कारण पुरेसें होते. माझ्या पचनी त्याचं ते “सहज” काही पडत नव्हते. छान अर्धा पाउण तास गप्पा झाल्या. तो मोकळेपणी बोलत होता आणि मी मात्र हा आता कारण सांगेल मग सांगेल म्हणून मनातल्या मनात वाट बघत होतो. त्याला निरोप देत दार लावताना देखील मी त्याला म्हणालो, “feel free यार, if there is anything you want to share?” अडचणीच्या वेळेला आपण इंग्रजीचा आधार का शोधतो माहित नाही. तो गोड हसला, “लेका, तुम्हा लोकांना ना निर्हेतूक काही असू शकत, हे पटतच नाही. सहज वागताच येत नाही. चल बाय” धाड धाड पायऱ्या उतरून तो चालता झाला. पुन्हा सहज!! मला काही केल्या चैन पडेना. तासा दोन तासाने मी त्याला फोन केला, “पोचलास का रें?” “कधीचाच, तुझ्या कडून सरळ घरीच आलो, आणखीन कुठे जायचंच नव्हतं.”

गादीवर पडल्यावर देखील माझ्या डोक्यातून त्याच ते “सहज” काही निघत नव्हतं. सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत, कोणती गोष्ट आपण सहज करतो याचा विचार करत होतो. सकाळी चालायला बाहेर पडण्यापासून सुरवात करा, बहुतेकांना मधुमेह, हृदय विकार नाहीतर रक्तदाब यांची भूत चालवत असतात. किती जण त्यांच्या रोजच्या चालायच्या रस्त्त्यावर कोणती झाडे आहेत हे सांगू शकतील? वाटेतल्या बहाव्याची झुंबरं वाऱ्यावर झुलताहेत, कोपऱ्यावरचा गुलमोहोर पेटलाय, तम्राशिम्बी (गुगल copper pod tree) आभाळाकडे हात करून उभा आहे वा काटे सावर लाल पाकळ्यांचा सडा पायतळी पसरून हिरव्या गार बोन्डांनी डवरली आहे किती जणांना हे दिसतं, जाणवतं ? त्याच रस्त्यावर जर निरुद्देश फिरलो तर निसर्गाची, भर उन्हात डोळ्यांना निवावणारी ही रूपं मनाला भावल्याशिवाय राहणार नाहीत. मी शेवटचा एका जागी सहज कधी बसलो होतो हे आठवत नाही. कधी भ्रमणध्वनीचा छोटा पडदा तर कधी विश्व दर्शन घडवणारा मोठा पडदा डोळ्यासमोर असतो. ते नसेल तर वर्तमान पत्र किंवा मासिक, एखादे पुस्तक. माझा मीच असा कधी बसलेलो मला आठवत नाही.

वेळ घेऊन, काम सांगून मगच भेटायला येणाऱ्यांच्या विश्वात वावरणाऱ्या मला त्याच ते “सहज” झेपत नव्हतं. मित्र असोत व आप्त सगळेच जण हे नियम पाळतात मी देखील कोणाकडे सांगितल्या शिवाय जात नाही. ही खरोखरच काळाची गरजच झाली आहे का संपर्क माध्यमांची विपुलता याला कारणीभूत आहे? त्यांचा अपव्यय?

एखादी गोष्ट प्रयास, सायास न करता जमली पाहिजे. तसं बघायला गेलो तर सहज शब्दाची ओळख लहानपणीच होते. वदनी कवळ घेता हा श्लोक आपल्यातील बहुतेकांना ठाऊक आहे. खालेल्ल्या अन्नाचे सहज हवन होते जर उदर भरण हा यज्ञ समजून घेतेलेला प्रत्येक घास हा त्या यज्ञातील श्रीहरिला दिलेली समिधा मानून सेवन केला तर. आपल्या आयुष्याचे काहीसे तसेच आहे. अहंकार, भीती आणि त्या पोटी निर्माण होणारा अविश्वास ह्या त्रिकोणात आपण स्वतःला पार अडकवून टाकलं आहे. भूतकाळात पाय रुतवून केलेली भविष्याची चिंता आणि वर्तमानाचा अधिक्षेप, अनिश्चिततेचा भासमान विळखा आणि त्या पासून स्वतःला वाचवण्याची सततची चालेली धडपड. ह्या सगळ्यात आपण आपले मूळ स्वरूप हरवून बसलोय. लहानपणीचा मी हरवलोय आणि आतातर त्याला शोधायची देखील भीती वाटत आहे. आपल्या भोवताली असलेल्या निसर्गाचा आपण ही एक भाग आहोत किंबहुना आपण निसर्गच आहोत, मग ते सहज सोपे का असू नये. आपल्याला मिळालेल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर स्वतः भोवती गुंता निर्माण करून त्यात अडकण्या पेक्षा मुक्त कसं होता येईल याचा विचार करा. जगण्यातली सहजता हरवू देऊ नका नाहीतर, सहज शब्द केवळ मराठी शब्द कोशातच राहील.