मथळा वाचूनच,
ज्यांनी आयुष्यात पतंग उडविला आहे किंवा अजूनही उडवत आहेत (कागदी पतंग, गैरसमज
नसावा) त्यांना वेगळा विषय प्रवेश लागणार नाही. पण ज्यांनी एका धारधार धाग्याने
(प्रसंगी आपलं रक्त सांडून), वाऱ्यावर स्वार होऊन स्वर्गारोहण करण्याच्या किंवा
मुसंडी मारून रसातळाला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतंगावर ताबा ठेवण्याची
अनुभूती घेतलेली नसेल त्यांना ह्या पतंगाख्यानाचा पुरेपूर आनंद घेण्याकरिता खालील शब्दांच्या
व्याख्या समजून घ्याव्या लागतील.
कणी -पतंगाच्या
वरच्या टोकापासून (नाक) शेपटीला
जोडणाऱ्या काडीला मागच्या बाजूने ठराविक अंतरावर छिद्रे (एकूण ४) पाडून त्यातून ओवून
बांधलेली दोरी. त्यात देखील प्रकार आहेत, नाकाकडील २ छिद्रे ही पतंगाच्या आडव्या व
उभ्या काठीच्या छेद बिंदू पाशी असतात व शेपटी कडे असलेल्या २ छिद्रांचे अंतर
नाकापासून छेद बिंदू पर्यंत असलेल्या अंतरा इतके असेल तर ती कणी ०-०, एका बोटाच्या
जाडी इतके जास्त असेल तर ती १-० आणि २ बोटांच्या जाडी इतके जास्त असेल तर २-०, ३-०
कणी बांधून पतंग उडविणारे विरळाच. कणी पतंगाला, पतंग उडविणाऱ्याशी जोडते. पतंग
उडविणाऱ्याने धागा ओढल्यावर नाक वर ठेवून ऊर्ध्व मार्गाला लागण्याचा आदेश पतंगा
पर्यंत ही कणीच पोहचविते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कणी पतंगाचा तोल सांभाळते.
विवेकाचे जेव्हढे महत्व मानवी मनाचे संतुलन राखण्यात आहे तेव्हढेच महत्व कणीला
पतंगाच्या आयुष्यात आहे.
मांजा- काचांची
भुकटी, शिरस, भात इत्यांदीचे मिश्रण लावून सुकवलेला धारधार दोरा, माणसाला पतंगाशी
जोडणारी नाळ. मांज्या विषयीची बहुतांश माहिती ही ऐकीव आहे कारण मांजा घरी
बनविण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. मांजा हा विकत आणणे, हेच खरे. मांज्याचे, तार
मांजा, बारीक
मांजा, दुधी, गुलाबी,
काळा इत्यादी प्रकार, दुकानात टांगलेल्या फिरकी वरून खाली आलेल्या मांज्याच्या
टोकाची परीक्षा करून, समजून घ्यावे लागतात. जिव्हेच्या धारेगतच मांजा काम करतो,
जरा निष्काळजी झालात की रक्त निघालेच म्हणून समजा.
ढिल देणे- मांजा
घट्ट न धरता पतंगाला वाऱ्यावर मनसोक्त उडू देणे (उडविणाऱ्याला तेवढीच विश्रांती).
ढिल दिल्यावर वा सोडल्यावर स्वतःभोवती गिरक्या घेत लांब जाणारा पतंग, मुक्त
छंदातल्या एखाद्या रचने प्रमाणे वाटतो. जरा ढिल जास्त झाली तर पतंग कोणत्या दिशेला
जाईल ते सांगता येत नाही त्यामुळे थोड थांबून दिशेचा, वाऱ्याचा
अंदाज घेत घेत मांजा सोडवावा लागतो. स्वातंत्र्या बरोबर निर्बंधांचे महत्व
सांगणारे आणि इतके विनासायास सापडणारे दुसरें
समर्पक उदाहरण नाही.
हापसणे- दिलेली ढिल
ओढून घेणे, मांजाला ताण मिळाल्यावर पतंगाला सरसर वर चढताना बघून लहानांबरोबर
मोठे देखील टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. परिस्थितीचे भान राखून हात आखडता
घेण्याचा किंवा स्वगृही येताना, जाणाऱ्या पावलांवर पाय टाकत परतण्याचा प्रकार आहे
हा.
फिरकी किंवा
चकरी - मांजा गुंडाळण्याचे व लागेल तसा सोडण्याचे लाकडी, आता बहुदा प्लास्टीकचे (चिनी
बनावटीचे) साधन. गाशा गुंडाळणे हा शब्द प्रयोग फिरकीला बघूनच बहुदा सुचला असावा.
गुंता-
अकार्यक्षम फिरकी धारकामुळे हापसलेला मांजा जमिनीवर पडून राहतो आणि कोणता दोरा
कुठून कुठे गेला आहे? कोणता दोरा ओढला तर सुटून बाहेर येईल वा अधिकच अडकेल हे
समजणे महा कठीण होते. अतिशय हळुवार हातानी हलके हलके मांजा मोकळा करावा लागतो.
जोरात ओढाताण केली तर गुंता आणखीनच घट्ट होत जातो, मांजा काचतो आणि सहज तुटू शकतो.
तुटलेला मांजा गाठी मारून जोडला तरी पाहिल्यासारखा होत नाही. नाईलाजच झाला तर गाठ मारावीच लागते. यातला तरबेज
ती इतकी बारीक मारतो की हात फिरवल्याशिवाय गाठ आहे हे लक्षातच येत नाही. नात्यांचा
गुंता देखील असाच हळुवार सोडवावा लागतो, धसमुसळे पणा केला तर कायमचा दुरावा. नात्याचा
धागा एकदा का काचला की परत कधीच पहिल्यासारखा होत नाही आणि गाठी पडल्या तर तोंड
दाबून बुक्क्यांचा मार अशी गत, म्हणूनच तो होणार नाही ह्याची काळजी घेणे अधिक
शहाणपणाचे आहे.
बदवणे- पतंग
जास्तीत जास्त उंच उडवणे, सर्व भाषातील शब्द कोशकार ह्या शब्दाच्या व्युत्पत्ती वर
अजूनही खल करीत आहेत.
लपेटणे- गुंडाळणे.
हा शब्द प्रयोग इतका लोकप्रिय आहे कि त्याचा उगम पतंगाच्या खेळात आहे हे देखील लोक
विसरले आहेत. हा शब्द थापा मारणे किंवा थापा मारून गुंडाळणे अशा अर्थी वापरला जातो.
लपेटणे ही एक कृती आहें ज्यात मधली तीन बोटे दुमडून करंगळी आणि अंगठा जितका ताणता
येईल तितका ताणून (वितेचा आकार) त्याभोवती मांजा गुंडाळायचा. तुम्ही जर सुटा मांजा
(फिरकी शिवाय) विकत घ्यायला गेलात तर दुकानदार मांजा वरील पद्धतीने त्याच्या अंगठा
व करंगळी ने केलेल्या वितेवर लपेटून इंग्रजी आठ आकारचं मांजाचं भेंडोळे कागदात बांधून
तुम्हाला देईल. घरी येऊन अथवा तिथेच फिरकी वर तो न गुंतता गुंडाळणे हे कौशल्याचे
काम आहे. स्वत:ची फिरकी घेऊन गेलात आणि पुरेशा किमतीचा मांजा जर घेतलात तर
दुकानदार त्याचा फिरकीवरून तुमच्या फिरकीवर तो भरून देईल (येथे भरून ह्या शब्दाचा
अर्थ डब्यात भरणे असा न घेता फिरकीवर गुंडाळणे असा घ्यावा).
कापोछे अथवा
कायपोचे - (मराठी अस्मिता) अस्मानी द्वंद्वात पतंग बंधमुक्त झाल्यावर
प्रतिस्पर्ध्याने केलेला जल्लोष (शंख ध्वनी). हे क्षेत्र मात्र येरागबाळ्याच नाही,
तेथे पाहिजे जातीचे. तुमचं सगळ कसब पणाला लावून ह्या खेळात हवेत रहाणे, आपला पतंग
शाबूत ठेवून विरोधकाचा मांजा आपल्या मांजाने घासून कापणे आणि सर्वात कळस म्हणजे
प्रतिस्पर्ध्याचा कापलेला (मांजा तुटलेला) पतंग तरंगत जाताना आपल्या पतंगाच्या
मांजात कापोछे झालेल्या पतंगाचा लोंबता मांजा गुंतवून दोन्ही पतंगाना माघारी
उतरवणे. पतंगाची खरी रंगत ह्या काटाकाटीतच आहे.
पतंगाच्या
खेळात एका चमूत कमीत कमी तीन खेळाडू असावे लागतात, त्यातील एक न खेळणारा कप्तान
असल्या सारखा असतो त्याचे काम पतंग नाक व शेपटी सोडून उरलेल्या दोन टोकांना पकडून
स्वतःच्या डोक्यावर उंच धरून पतंग उडविणाऱ्याने सांगितल्यावर हवेत सोडणे (तो
डोक्यावर उंच धरण्यापूर्वी मधली काठी वाकवून त्याला थोडासा बाक देणे), आणि पतंग
हवेत गेल्यावर फिरकी बहाद्दर व पतंग उडविणाऱ्याच्या बाजूला उभे राहून प्रोत्साहन व
नको असलेले सल्ले देणे एव्हढेच त्याचे काम असते. ह्या प्रेक्षक वजा खेळाडूची जागा त्याच्या
अनुपस्थितीत फिरकीधराला घ्यावी लागते. थोडा मांजा जमिनीवर मोकळा सोडून फिरकी खाली
ठेवून मग त्याला पतंग डोक्यावर धरून सोडताच पळत येऊन आपल्या फिरकी बहाद्दराच्या
भूमिकेत शिरण्याचे कसब त्याला अंगी बनवावे लागते. फिरकीधराचे काम तसे जिकरीचे.
पतंग उडविणाऱ्याच्या चुकीमुळे कापला गेला, तरी फिरकी घट्ट धरल्यामुळे ढिल मिळाली
नाही म्हणून कापला गेला, असें पापाचे धनी व्हावे लागते. पतंग उडविणाऱ्याचा रुबाब
काही औरच असतो. पतंग कापला जाण्यात त्याची कधीच चूक किंवा हार नसते. कसूर काय तो
मांजाचा, पतंगाचा वा फिरकी धरणाऱ्याचा असतो.
पतंगाच्या
खेळात पतंग कापला जाणे हा पतंगाचा शेवट नसून ते केवळ पतंगाच्या मालकी हक्कांचे
हस्तांतर आहे. फरक इतकाच की हे हस्तांतर ‘कसेल
त्याची जमीन’ तद्वत, ‘पकडेल त्याचा पतंग’ ह्या न्यायाने होते. कटून (बहुदा इंग्रजी
cut ह्या
शब्दात ह्याचा उगम असावा) आलेला पतंग वाऱ्यावर हेलकावत येतों आणि उंचावलेले हात, काठ्या
ह्यांच्या स्पर्धेत, तो कुण्या भाग्यवंताच्या हातात पडतो, आणि मग तो वीर, कोहिनूर
गवसल्या थाटात तेथून धूम ठोकतो. कापलेला पतंग पकडणे हा अत्यंत रोमहर्षक अनुभव आहे, त्यातली गंमत,
उत्कंठा आणि पतंग हातात मिळाल्यावर होणारी उत्तेजित अवस्था ह्याचे वर्णन मज पामरास
शब्दात करणे शक्य नाही. त्याची अनुभूती घेणे हेच खरे. बहुतांशी वेळेला त्याच्या मागे
धावणाऱ्याना हुलकावणी देऊन तो पतंग दुसरीकडे जाऊन पडणे किंवा झाडाच्या फांदीवर अडकणे
हे इतके सर्रास घडते की पुढील आयुष्यातील आशा, निराशेच्या खेळांचे जणू ते बाळकडूच
आहे. आत्ता आत्ता पर्यंत कुणा धनिक बाळांच्या हातातून हवेत मिरविणारा पतंग, क्षणात
रस्त्यावर खेळणाऱ्या आणि आशाळभूतपणे आकाशात
उडणाऱ्या रंगीबेरंगी पतंगाकडे पाहणाऱ्या मुलाच्या चेहेऱ्यावर हसू फुलवून
जातो. अनपेक्षित आनंद म्हणजे काय ह्याचा पुरावा त्याचा चेहेरा देत असतो.
ह्या सगळ्या
खेळात केंद्र स्थानी असलेल्या पतंगाचा शेवट, बहुदा तो फाटण्यात अथवा झाडात, तारेत वा
अॅन्टेनात (माझ्या तरुण वाचकांसाठी? दूरदर्शन वा आकाशवाणी चे प्रक्षेपण ग्रहण करून
संचापर्यंत पोहचविणारी, गच्चीवर लावलेली यंत्रणा, खरतर अॅन्टेना हा स्वतंत्र विषय
होईल) अडकून होतो. हा केवळ अपघात असतो. काय गंमत आहे पहा, जर प्रसंगाचे पर्यवसान
दुःखात किंवा वेदनेत होत असेल तर तो अपघात आणि जर त्या प्रसंगातून आनंद निष्पत्ती
झाली तर तो योगायोग. समोरून मित्र अचानक आला तर तो योगायोग आणि येऊन तुमच्यावर
आपटला तर तो अपघात. त्यामुळे पतंग उडवत
असताना त्यावरचा ताबा सुटून जर तो वरील एखाद्या ठिकाणी अडकला तर तो क्षण फारच
क्लेशदायक असतो. मांजाला टिचक्या देऊन तो सोडवण्याचे अनेक प्रयत्न फोल ठरल्यावर त्यापासून
फारकत घेणे अनिवार्य होते. मांजा हाताला गुंडाळून जितका ताणता येईल तितका ताणून
पतंगाच्या जितक्या जवळ तो तोडता येईल तितक्या जवळ तो तोडणे एव्हढाच पर्याय शिल्लक
राहतो आणि मोठ्या जड अंत:करणाने त्याची अंमलबजावणी होते. अडकलेला पतंग जर शेवटचा
असेल तर त्या अडकून वाऱ्यावर फडफडणाऱ्या पतंगाला श्रद्धांजली वाहत काही काळ तिथे
त्याच्याकडे काहीशा आशेने, पण बहुतांशी दुःखाने पाहत उभे राहणे अनिवार्य असते.
त्या नंतर थोड्याच काळात काहीच घडले नाही
अशा पद्धतीने असें प्रसंग आयुष्यात देखील अनेक वेळा येतात आणि काहीशा अशाच पद्धतीने
आपण त्यांना सामोरे जात असतो.
एकूणच पतंगाचा
हा खेळ मला अनेक वेळा आयुष्यावरच रूपक वाटतो. लहानपणी ह्या कशाचीच जाणीव होत नाही
पण आज मागे वळून पाहताना तो खेळ वेगळाच वाटतो. असो. गेल्या संक्रांतीला पतंग उडवले
नसतील तर पुढील संक्रांतीला नक्की उडवा, तसा संकल्पच करा आणि ही मजा एकदा तरी अनुभवा.